अमेरिकेची कोंडी की चीनची बाजी? (नवशक्ती)
एआय, सेमीकंडक्टर आणि चिप्स क्षेत्रात अमेरिका व चीन यांची पराकोटीची स्पर्धा आहे. अशातच जगातील अव्वल आणि अमेरिकन कंपनी एनव्हिडीयाचे प्रमुख चीनी हेरगिरीच्या जाळ्यात येण्याचा अर्थ काय?
भावेश ब्राह्मणकर
जगाच्या
सत्तासमीकरणात आता तेल, नैसर्गिक वायू, अण्वस्त्रे आणि लष्करी सामर्थ्याइतकेच महत्त्व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सेमीकंडक्टर आणि
अत्याधुनिक संगणकीय चिप्सना प्राप्त झाले आहे. एकविसाव्या शतकातील जागतिक महासत्ता
कोण असेल, याचे उत्तर
कदाचित युद्धभूमीवर नव्हे, तर चिपनिर्मितीचे कारखाने, डेटा सेंटर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या
प्रयोगशाळांमध्ये ठरणार आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्षाचे बदलते स्वरूप
याचीच साक्ष देते. अशा निर्णायक टप्प्यावर अमेरिकेतील आघाडीची चिपनिर्मिती कंपनी
एनव्हिडिया आणि तिचे प्रमुख जेन्सेन हुआंग यांच्याभोवती निर्माण झालेले हेरगिरीचे
सावट जागतिक तंत्रज्ञानविश्वाला हादरवणारे आहे. चीनने अमेरिकेच्या तंत्रज्ञान
साम्राज्यात शिरकाव करून बाजी मारली आहे का, हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो.
सेमीकंडक्टर ही
केवळ इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील एक वस्तू नाही. लढाऊ विमाने, क्षेपणास्त्र
प्रणाली, उपग्रह, रडार, सायबर सुरक्षा, गुप्तचर यंत्रणा, स्वयंचलित
शस्त्रप्रणाली आणि आधुनिक युद्धनियोजन या सर्वांचा पाया अत्याधुनिक चिप्सवर
अवलंबून आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने युद्धभूमीवरील माहितीचे विश्लेषण, शत्रूच्या
हालचालींचा अंदाज, लक्ष्य निश्चिती आणि निर्णय प्रक्रियेचा वेग वाढवता येतो. त्यामुळे
एआय आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील वर्चस्व म्हणजे भविष्यातील लष्करी सामर्थ्यावरही
प्रभाव निर्माण करण्याची क्षमता.
अमेरिकेकडे चिप
डिझाइन, अत्याधुनिक
सॉफ्टवेअर, संशोधन
आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे मोठे जाळे आहे. एनव्हिडिया, एएमडी, इंटेल, क्वालकॉम यासारख्या
कंपन्या या व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत. दुसरीकडे चीनकडे प्रचंड उत्पादनक्षमता, मोठी देशांतर्गत
बाजारपेठ, सरकारी गुंतवणूक
आणि तंत्रज्ञान स्वावलंबनासाठी राजकीय इच्छाशक्ती आहे. त्यामुळे ही स्पर्धा एका
कंपनीची किंवा एका उत्पादनाची राहिलेली नाही. ती संपूर्ण तंत्रज्ञान परिसंस्थेवरील
नियंत्रणाची लढाई बनली आहे.
एनव्हिडियाचे
प्रमुख जेन्सेन हुआंग आणि चीनशी संबंधित व्यावसायिक महिला अॅलिस हुआंग ऊर्फ हुआंग
ले यांच्यातील कथित निकटच्या संबंधांमुळे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांचे लक्ष
वेधले गेले. सिंगापूरस्थित मेगास्पीड या डेटा सेंटर कंपनीशी संबंधित असलेल्या
अॅलिस हुआंगवर चीनच्या गुप्तचर यंत्रणेसाठी माहिती गोळा केल्याचा संशय आहे.
मेगास्पीडने दोन वर्षांत एनव्हिडियाच्या सुमारे ४.८ अब्ज डॉलरच्या चिप्स खरेदी
केल्याचे वृत्त आहे. या व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर प्रगत चिप्स चीनपर्यंत
पोहोचवण्याच्या संभाव्य मार्गांचाही तपास सुरू झाला.
जेन्सेन हुआंग
यांनी विवाहबाह्य संबंधांची कबुली देत कुटुंबीयांची आणि सहकाऱ्यांची माफी मागितली
आहे. एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. कंपनीने
राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती किंवा व्यावसायिक गोपनीयतेची गळती झाल्याचा
पुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे. चीननेही हेरगिरीचे आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे
अॅलिस हुआंगवरील आरोप किंवा चीनच्या सहभागाबाबत अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार
नाही. भागधारकांची दिशाभूल केल्याचा आरोप करणारा खटलाही एनव्हिडिया आणि जेन्सेन
हुआंग यांच्याविरोधात दाखल झाला आहे. या प्रकरणाला त्यामुळे आता राष्ट्रीय
सुरक्षेबरोबरच कॉर्पोरेट प्रशासन आणि गुंतवणूकदारांच्या विश्वासार्हतेचे परिमाण
प्राप्त झाले आहे. या घटनेतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चीनने अमेरिकेच्या
तंत्रज्ञान नेतृत्वातील एखाद्या संभाव्य कमकुवत दुव्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न
केला असण्याची शक्यता. मात्र, चीनने अमेरिकेच्या तंत्रज्ञान सुरक्षेच्या व्यवस्थेसमोर गंभीर प्रश्न
उभे करणे चिंताजनक आहे.
अमेरिकेने चीनला
प्रगत चिप्स आणि चिपनिर्मितीची अत्याधुनिक उपकरणे मिळू नयेत, यासाठी निर्यात
निर्बंधांचा वापर केला. नेदरलँड्समधील एएसएमएलच्या अत्याधुनिक लिथोग्राफी
यंत्रांवर, अमेरिकन
चिप डिझाइन सॉफ्टवेअरवर आणि जपानमधील काही उपकरणांवर असलेले नियंत्रण चीनच्या
प्रगतीतील महत्त्वाचे अडथळे आहेत. विशेषतः अत्याधुनिक चिपनिर्मितीसाठी आवश्यक
असलेल्या ईयुव्ही तंत्रज्ञानापर्यंत चीनला सहज प्रवेश नाही. मात्र, निर्बंधांनी
चीनची महत्त्वाकांक्षा संपवलेली नाही. उलट Huawei, SMIC आणि इतर देशांतर्गत कंपन्यांच्या
माध्यमातून स्वदेशी चिपनिर्मितीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जुन्या
पिढीतील DUV यंत्रसामग्रीचा
अधिक कार्यक्षम वापर, चिप पॅकेजिंग आणि देशांतर्गत संशोधनाच्या माध्यमातून चीन तांत्रिक
अंतर कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल
स्टडीजच्या २०२६ मधील विश्लेषणानुसार, अमेरिकेच्या आणि मित्रदेशांच्या
निर्यात निर्बंधांमुळे चीनच्या स्वदेशी तंत्रज्ञान विकासाला अधिक चालना मिळाली
आहे. याचा अर्थ चीनने अमेरिकेला मागे टाकले असा नाही. अत्याधुनिक चिपनिर्मिती, उत्पादनातील
अचूकता, लिथोग्राफी, डिझाइन
सॉफ्टवेअर आणि उच्च क्षमतेच्या GPU क्षेत्रात चीनसमोर अद्याप मोठी आव्हाने आहेत. मात्र, अमेरिकेवर
अवलंबून न राहता पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची चीनची रणनीती दीर्घकालीन आहे.
हीच अमेरिकेसाठी खरी चिंता आहे.
अमेरिकन काँग्रेसमध्ये
मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने बहुमत मिळवले आहे. जानेवारी २०२७ पासून
बदलणारे राजकीय समीकरण एआय उद्योगाच्या वाटचालीवर परिणाम करू शकते. डेमोक्रॅटिक
नेत्यांनी एआय कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण, प्रगत एआय मॉडेल्सची स्वतंत्र सुरक्षा
तपासणी, ग्राहकांचे
संरक्षण आणि डेटा सेंटरमुळे वाढणाऱ्या वीज खर्चाची जबाबदारी संबंधित कंपन्यांवर
टाकण्याचे संकेत दिले आहेत. उद्योगप्रमुखांना संसदीय समित्यांसमोर बोलावून
उत्तरदायित्व निश्चित करण्याचीही तयारी आहे. डेमोक्रॅटिक
पक्षाचा विरोध संपूर्ण सेमीकंडक्टर उद्योगाला नसून प्रामुख्याने एआय डेटा
सेंटरच्या अनियंत्रित विस्ताराला आहे. डेटा सेंटरसाठी प्रचंड प्रमाणात वीज, पाणी आणि जमीन
लागते. त्याचा आर्थिक आणि पर्यावरणीय भार सामान्य नागरिकांवर पडू नये, अशी भूमिका या
पक्षातील अनेक नेत्यांनी घेतली आहे.
त्यामुळे एआय
उद्योगातील गुंतवणुकीचा वेग कमी होण्याची किंवा प्रकल्पांना परवानग्या मिळण्यात
विलंब होण्याची शक्यता आहे. परंतु याचा अर्थ अमेरिकेतील सेमीकंडक्टर उत्पादनच
थांबेल असा नाही. २०२२ च्या चिप्स अक्ट अंतर्गत अमेरिकेने देशांतर्गत चिपनिर्मिती
आणि संशोधनासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे. अमेरिकेच्या सरकारी लेखापरीक्षण
कार्यालयाच्या ऑगस्ट २०२६ मधील अहवालानुसार, या कार्यक्रमांतर्गत ४९ उत्पादन
प्रकल्पांना निधी देण्यात आला आहे. अमेरिकेतील डेटा सेंटर प्रकल्पांवर
नियंत्रण आल्यास एआय पायाभूत सुविधांच्या विस्तारावर परिणाम होऊ शकतो. मात्र, चीनला प्रगत
चिप्स निर्यात करण्याबाबत अधिक कठोर भूमिका घेतली गेल्यास चीनसमोरील तांत्रिक
अडचणी वाढू शकतात. शिवाय, चीनच्या तंत्रज्ञान विकासाला रोखण्याच्या मुद्द्यावर अमेरिकेतील
दोन्ही पक्षांमध्ये व्यापक सहमती आहे.
अमेरिकेपुढील
सर्वांत मोठे आव्हान म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा आणि तंत्रज्ञानातील नवोन्मेष यांचा
समतोल राखणे. चीनला प्रगत चिप्सचा पुरवठा रोखण्यासाठी निर्बंध आवश्यक असले, तरी
अतिनियमनामुळे अमेरिकेतील कंपन्यांची जागतिक बाजारपेठ कमी होऊ शकते. संशोधन आणि
गुंतवणुकीचा वेग मंदावू शकतो. दुसरीकडे, निर्बंधांमध्ये ढिलाई केल्यास चीनच्या
लष्करी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेला बळ मिळण्याची भीती आहे.
एनव्हिडियाचे
जेन्सेन हुआंग यांचा चीनच्या बाजारपेठेबाबतचा दृष्टिकोनही याच संघर्षाचे प्रतिबिंब
आहे. चीनसारखी मोठी बाजारपेठ गमावणे अमेरिकन कंपन्यांना व्यावसायिकदृष्ट्या
परवडणारे नाही. परंतु त्याच बाजारपेठेतून मिळणारे तंत्रज्ञान आणि आर्थिक सामर्थ्य
चीनच्या सामरिक क्षमतेला बळ देऊ शकते. हा व्यापार आणि सुरक्षेतील मूलभूत संघर्ष
आहे.
यापुढील काळात
अमेरिका केवळ स्वतःच्या कंपन्यांवर अवलंबून राहणार नाही. तैवानमधील TSMC, दक्षिण
कोरियातील सॅमसंग, नेदरलँड्समधील ASML आणि जपानमधील उपकरणनिर्मिती कंपन्यांच्या सहकार्याने तंत्रज्ञान
पुरवठा साखळी अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे चीन दुर्मिळ खनिजे, उत्पादनक्षमता
आणि मोठ्या देशांतर्गत बाजारपेठेचा वापर करून स्वतःचे सामरिक स्थान मजबूत करण्याचा
प्रयत्न करेल. परिणामी, या संघर्षात तैवानचे स्थानही अत्यंत संवेदनशील राहणार आहे. कारण प्रगत
चिपनिर्मितीतील तैवानचे महत्त्व हे अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक रणनीतीशी थेट जोडलेले
आहे.
अमेरिका आणि चीन
यांच्यातील संघर्षाचा निकाल एखाद्या हेरगिरी प्रकरणावर किंवा एका निवडणुकीवर
लागणार नाही. तो संशोधन, उत्पादन क्षमता, तंत्रज्ञानातील स्वावलंबन, ऊर्जा, जागतिक व्यापार, लष्करी उपयोग
आणि आंतरराष्ट्रीय मित्रदेशांच्या सहकार्यावर ठरणार आहे. चीनने अमेरिकेला
निर्णायकपणे मागे टाकलेले नाही; पण अमेरिकेचे तंत्रज्ञानवर्चस्वही आता निर्विवाद राहिलेले नाही. एनव्हिडियाभोवतीचे
संशयाचे सावट अमेरिकेला आपल्या तंत्रज्ञान सुरक्षेचा पुनर्विचार करण्यास भाग पाडू
शकते. डेमोक्रॅटिक पक्षाचा वाढलेला प्रभाव एआय उद्योगाच्या विस्ताराला सामाजिक आणि
पर्यावरणीय उत्तरदायित्वाची चौकट देऊ शकतो. मात्र, चीनविरोधातील तंत्रज्ञान निर्बंध अधिक
कठोर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
एकविसाव्या
शतकातील महासत्ता तीच ठरेल जिच्याकडे जगाला आवश्यक असलेल्या
तंत्रज्ञानाची निर्मिती, पुरवठा आणि नियंत्रण करण्याची क्षमता आहे. चिप्सच्या या महासंग्रामात
अमेरिका आणि चीन यांच्यातील लढाई ही केवळ आर्थिक स्पर्धा नाही. ती भविष्यातील
लष्करी सामर्थ्य, जागतिक व्यापार, राजकीय प्रभाव आणि आंतरराष्ट्रीय सत्ता संतुलनाची निर्णायक लढाई आहे.
चीन संधी शोधत आहे, अमेरिका वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न करीत आहे तर जग या दोन
महासत्तांच्या तंत्रज्ञान संघर्षाच्या परिणामांची प्रतीक्षा करीत आहे!
--
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक.
तसेच मुक्त पत्रकार.
मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
Please Follow me on :
WhatsApp Group
– https://chat.whatsapp.com/D6XHacZLv83IvDo8Ed8sTe?mode=wwc
Facebook - www.facebook.com/BhaveshBrahmankar
X (Twitter) - www.twitter.com/BhavBrahma
Instagram - https://www.instagram.com/bhavbrahma
Blog - https://bhavbrahma.blogspot.com/
WhatsApp Channel
- https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
--

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा