आधी संरक्षण, नंतर राजकारण! (दै. सकाळ)
भारतीय वायूसेनेचे माजी प्रमुख भदौरिया यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारणात प्रवेश केला आहे. संरक्षण क्षेत्रातील व्यक्ती राजकीय क्षेत्रात येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आजवर अनेकांनी संरक्षण क्षेत्राद्वारे देशसेवा केल्यानंतर राजकीय प्रवेशातून राजकारण आणि समाजकारण केले आहे. त्या सर्वांचा घेतलेला हा धांडोळा... - भावेश ब्राह्मणकर मेजर जनरल जेकब फर्ज राफेल जेकब यांनी महूच्या ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूलमधून पदवी प्राप्त केली. दुसऱ्या महायुद्धात त्यांना उत्तर इराकमध्ये तैनात करण्यात आले. १९४३ मध्ये त्यांची तोफखाना ब्रिगेडमध्ये बदली झाली. ब्रिटिश सैन्याने त्यांना ट्युनिशिया मोहिमेवर पाठवले. १९४३ पासून युद्ध समाप्तीपर्यंत जेकब यांच्या युनिटने बर्मा मोहिमेत जपानी साम्राज्याविरुद्ध लढा दिला. नंतर त्यांना सुमात्रा येथे नियुक्त करण्यात आले. भारत-पाक फाळणीनंतर ते भारतीय सैन्यात दाखल झाले. १९६३ मध्ये त्यांना ब्रिगेडियर म्हणून बढती मिळाली. १९६५च्या भारत-पाक युद्धात त्यांनी इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केले. पुढे हीच राजस्थानातील बारावी इन्फंट्री डिव्हिजन बनली. वाळवंटातील युद्धावर भारतीय...