नैनितालचा धगधगता वणवा (दै. सकाळ)
हिमालय पर्वतरांगेतील उत्तराखंडच्या नैनिताल भागात सध्या वणवा भडकला आहे. हवाई दल, आपत्ती यंत्रणा, अग्निशमन आदी यंत्रणा अहोरात्र कार्यरत असल्या तरी हा वणवा आटोक्यात आलेला नाही. या वणव्यामुळे मात्र, तेथील अत्यंत मौलिक अशी वनसंपदा आणि जैविक विविधता नष्ट होते आहे. या वणव्यातून आपण काही बोध घेणार की नाही ? -- भावेश ब्राह्मणकर पर्यावरण, संरक्षण व सामरिकशास्त्राचे अभ्यासक व मुक्त पत्रकार -- उत्तराखंड हे राज्य हिमालयाच्या कुशीत वसलेले आहे. घनदाट झाडी, दऱ्या आणि खोरे यांनी ते समृद्ध आहे. त्यामुळेच या परिसरात अत्यंत वैविध्यपूर्ण, दुर्मिळ असे पक्षी, प्राणी, वन्यजीव, बहुरंगी पाने-फुले, किटक, बहुढंगी वनसंपदा, विविध प्रकारचे सर्प आढळतात. दाट जंगल असल्याने वन्यजीव सुरक्षितपणे तेथे वावरतात. तसेच, मानवी हस्तक्षेपही फारसा नसतो. किंवा आक्रमक वन्यजीवांमुळेही मनुष्य हा जंगलाच्या आतल्या भागात जाण्यास धजावत नाहीत. मात्र, गेल्या १३ दिवसांपासून नैनिताल परिसरात वणव्याचा भडका उडाला आहे. अथक प्रयत्न करुनही तो आटोक्यात येत नाही. यासाठी भारतीय हवाई दलाला पाचारण करण्यात आले आहे. दलाने ऑपरेशन बाम्बी बकेट...