भारत आणि चीनमधील संबंध खरंच सुधारणार?
भारत आणि चीनमधील संबंध खरंच सुधारणार ? गलवानमधील सशस्त्र संघर्षाला यंदा चार वर्षे पूर्ण झाली आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होत आहे. यानिमित्ताने चर्चा सुरू झाली आहे ती भारत आणि चीनमधील संबंध सुधारणार का याची. भावेश ब्राह्मणकर काश्मीर खोऱ्यातील गलवान येथे जून २०२० मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सशस्त्र धुमश्चक्री झाली. भारतीय लष्करी अधिकाऱ्यासह २० जवान यात शहीद झाले. चीनचे किती सैनिक मारले गेले याचा अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र, ही संख्या भारतीय जवानांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. तसेच, गलवान खोऱ्यात शेकडो एकर जमीन चीनने बळकावल्याची मोठी वदंता आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करत गेल्या वेळच्या मोदी सरकारने हा सारा प्रकार दडपला. संसदेत विरोधकांचा आवाज क्षीण असल्याने याबाबत सरकारी खुलासा झालेला नाही. परंतु, या सशस्त्र संघर्षामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या घटनेला आता ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही हे संबंध पूर्ववत होऊ शकलेले नाहीत. भारत-चीन सीमेवर दोन्ही बाजूने तब्बल ५० ते ६० हजार स...