सावधान, भारतात हत्तींची संख्या घटतेय!
सावधान , भारतात हत्तींची संख्या घटतेय ! हत्तींची भारतातील संख्या गेल्या पाच वर्षात तब्बल २० टक्क्यांनी घटली आहे. गजान्तलक्ष्मीचे रुप असलेले हत्ती कमी होण्यामध्ये विविध कारणे आहेत. राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित झालेला हत्ती भारतात गुण्यागोविंदानं नांदण्यासाठी झगडत आहे. भावेश ब्राह्मणकर डायनासॉरच्या पश्चात पृथ्वीतलावर सर्वात शक्तीशाली आणि महाकाय असलेला प्राणी म्हणून हत्तींची ओळख आहे. जगाच्या पाठीवर दोन प्रकारचे हत्ती आढळतात. आशियाई आणि अफ्रिकी. आशियाई भागात सर्वाधिक संख्येने असलेल्या हत्तींच्या काही प्रजाती आढळतात. त्यामुळे हे हत्ती संपूर्ण विश्वातच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. आशियातील सर्वात लहान आकाराचा आणि जगातील सजीव आश्चर्य म्हणून ओळख असलेल्या इंडोनेशियातील सुमात्रन हत्तींना नजर लागल्याचं वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड (डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूएफ)ने काही वर्षांपूर्वी घोषित केले. जंगलातील अधिवास झपाट्याने नष्ट होत असल्याने सुमात्रन हत्तींची संख्या लक्षणीयरित्या कमी होत आहे. घटती वनसंख्या आणि जंगल क्षेत्रातील वाढता मानवी हस्तक्षेप ही दोन मुख्य कारणे या परिस्थितीला कारणीभूत आहेत...