चीनकडून नव्या डावपेचांची आखणी (नवशक्ती)
चीनकडून नव्या डावपेचांची आखणी भारताला खिंडीत गाठण्यासाठी चीनने नव्या आणि आक्रमक डावपेचांची आखणी केली आहे. गेल्या दोन महिन्यातील चीनच्या विविध घडामोडी आणि निर्णयांनी तसे स्पष्ट होत आहे. भारतासाठी ही चिंतानजक बाब आहे. आगामी काळात अजून बरेच काही घडण्याची चिन्हे आहेत. भावेश ब्राह्मणकर भारताने १९९८ मध्ये पोखरण येथे अणू चाचणी केल्यानंतर तत्कालिन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी एक मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की, चीन हा भारताचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद उमटले. आता २६ वर्षांनंतर त्यांच्या वक्तव्याची प्रचिती येत आहे. संसदीय समितीने नुकताच एक सुरक्षा अहवाल देशाला सादर केला आहे. त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, हिंद महासागर क्षेत्रात चीनची वाढती सामरिक उपस्थिती ही भारतासाठी एक आव्हान आहे. म्हणजेच सरकारच्या लेखी आणि कागदोपत्रीही एव्हाना तसे स्पष्ट झाले आहे. भारताचा शेजारी पण महासत्ता होण्याच्या तीव्र स्पर्धेत अत्यंत आक्रमक असलेला चीन असंख्य प्रकारच्या खेळ्या करीत आहे. जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांपैकी एक, सर्वाध...