शी जिनपिंग यांची ऐतिहासिक साफसफाई मोहिम (नवशक्ती)
सर्वेसर्वा शी जिनपिंग चीनमध्ये मोठी आणि ऐतिहासिक साफसफाई मोहिम राबवत आहेत. भ्रष्टाचारावरून त्यांनी अनेक दिग्गजांवर कठोर कारवाई केली आहे. आताही त्यांनी देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्याला हात घातला आहे. ही मोहिम नक्की काय आहे ? भावेश ब्राह्मणकर चीनच्या सैन्यातील सर्वात वरिष्ठ व प्रभावशाली अधिकारी जनरल झांग यूक्सिया यांच्याविरुद्ध गंभीर शिस्तभंग व कायदा उल्लंघनाच्या आरोपांवर चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे पाऊल चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी मधील नेतृत्वाला ढवळून टाकणाऱ्या , अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक बदलांपैकी एक मानले जात आहे. तसेच ही कारवाई केवळ चीनच्या देशांतर्गत राजकारणापुरती मर्यादित नसून त्याचा आंतरराष्ट्रीय सुरक्षा , चीनच्या शेजारच्या देशांवरील धोरणे आणि जागतिक सामरिक संतुलनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जनरल झांग यूक्सिया हे चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचे (सीएमसी) उपाध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टीच्या पोलिट ब्युरोचे सदस्य होते. याचाच अर्थ झांग हे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगनंतरचे दुसरे सर्वात उच्च सैन्य अधिकारी म्हणून काम करत होते. झांग यांच्या विरोधात गंभीर शिस्तभ...