लडाखमधील उद्रेकाला ही सुद्धा आहे किनार (सामना उत्सव पुरवणी)
हिमालय पर्वत रांगेतल्या इवल्याशा लडाख प्रदेशात जे हिंसक आंदोलन झाले त्याची भरपूर चर्चा होत आहे. तेथील जनता आणि खासकरून तरूण हे आक्रमक का झाले ? त्याची विविध कारणे आहेत. त्यातीलच एक आहे भारतातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प. तो काय आहे ? स्थानिकांचा त्यास विरोध का आहे ? भावेश ब्राह्मणकर जगातील नंदनवन अशी ओळख असलेल्या पांढऱ्या शुभ्र हिमालयाच्या कुशीत वसलेले लडाख हे राज्य सध्या विशेष चर्चेत आहे. खासकरून तिथे झालेले उग्र आंदोलन आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेमुळे. राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहचविल्याचे कारण देत वांगचुक यांना जेरबंद करण्यात आले आहे. लडाखवासियांमधील असंतोषाच्या विविध कारणांपैकी एक म्हणजे स्क्यांग चु थांग हरीत ऊर्जा सौर प्रकल्प. तब्बल ६० हजार कोटी रूपये खर्चून तब्बल ४८ हजार एकरवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. ९ गिगावॉट सौर आणि ४ गिगावॉट पवन अशी एकूण १३ गिगावॉट ऊर्जा या प्रकल्पातून तयार होणार आहे. भारतातील हा सर्वात मोठा हरित ऊर्जा प्रकल्प असेल. समुद्र सपाटीपासून ४,६५७ मीटर असलेल्या आणि लडाखची राजधानी लेहपासून १७५ किमी अंतरावरील दुर्गम अशा स्क्यांग चू थांग प...