गजान्तलक्ष्मी पावणार की कोपणार? (कान्हेरी दिवाळी अंक)

गजान्तलक्ष्मी पावणार की कोपणार?

कोल्हापूरच्या महादेव हत्तीणीच्यानिमित्ताने देशभरात हत्तींचा प्रश्न चर्चिला जात आहे. माता लक्ष्मी भोवती असलेल्या हत्तींचे हिंदु धर्मात अनन्यसाधारण स्थान आहे. असे असतानाही विविध कारणांमुळे हत्तींचे भारतातील अस्तित्व धोक्यात येत आहे. राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित झालेला हत्ती भारतात गुण्यागोविंदानं नांदण्यासाठी अक्षरशः झगडत आहे.

भावेश ब्राह्मणकर

डायनासॉरच्या पश्चात पृथ्वीतलावर सर्वात शक्तीशाली आणि महाकाय असलेला प्राणी म्हणून हत्तींची ओळख आहे. जगाच्या पाठीवर दोन प्रकारचे हत्ती आढळतात. आशियाई आणि अफ्रिकी. हत्ती संपूर्ण विश्वातच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. हत्ती हा एक सोंडधारी सस्तन प्राणी आहे. शास्त्रीय भाषेत हत्तीचा समावेश स्तनी वर्गाच्या प्रोबॉसिडिया गणाच्या एलिफंटिडी कुलात केला जातो. लांब सोंड, लांब सुळे, सुपासारखे पसरट कान आणि खांबासारखे जाडजूड पाय ही हत्तीच्या शरीराची वैशिष्ट्ये आहेत. संस्कृत भाषेत हत्तीला ‘हस्तिन’ असे नाव असून त्यावरून त्याला हत्ती हे नाव पडल्याचे सांगितले जाते.

हत्ती हा प्राणी आफ्रिकेतील सहारा प्रदेश, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया प्रदेशांतील देशांमध्ये आढळून येतो. मराठी विश्वकोषात नमूद केलेल्या माहितीप्रमाणे, सद्यस्थितीत एलिफंटिडी कुलाच्या लोक्झोडोंटा आणि एलिफस या दोन प्रजाती अस्तित्वात असून त्यांच्या पुढील जाती आहेत : आफ्रिकन बुश एलिफंट (लोक्झोडोंटा आफ्रिकाना), आफ्रिकन फॉरेस्ट एलिफंट (लो. सायक्लॉटिस) आणि एशियन एलिफंट (एलिफस मॅक्झिमस). एशियन एलिफंट म्हणजेच आशियाई हत्ती. या जातीच्या चार उपजाती आहेत : ए. मॅ. मॅक्झिमस (श्रीलंका), ए. मॅ. इंडिकस (भारत), ए. मॅ. सुमात्रन (सुमात्रा) आणि ए. मॅ. बोर्निन्सीस (मलेशिया, इंडोनेशिया). प्रोबॉसिडिया गणामध्ये केवळ एलिफंटिडी कुल सध्या अस्तित्वात आहे. एलिफंटिडी कुलातील मॅमथ हा प्राणी विलुप्त झाला आहे. प्रोबॅसिडिया गणाच्या इतर कुलांतील हत्तीसारखे शरीर असलेले प्राणी देखील विलुप्त झाले आहेत. उदा., डायनोथिरस (डायनोथेरिइडी कुल), गॉम्फोथिरस (गॉम्फोथिरीडी कुल), मस्टॉडॉन (मॅमुटिडी कुल). आफ्रिकी हत्ती आफ्रिकेतील सहारा वाळवंटाच्या दक्षिणेस आढळतात, तर आशियाई हत्ती दक्षिण व आग्नेय आशियातील भारत, बांगला देश, चीन, नेपाळ, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, व्हिएतनाम या देशांत आढळतात.

सुमात्रन हत्ती
सर्वात लहान आकाराचा आणि जगातील सजीव आश्चर्य म्हणून इंडोनेशियातील सुमात्रन हत्तींची ओळख आहे. मात्र, हे हत्ती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड (डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूएफ)ने घोषित केले आहे. जंगलातील अधिवास झपाट्याने नष्ट होत असल्याने सुमात्रन हत्तींची संख्या लक्षणीयरित्या कमी होत आहे. घटती वनसंख्या आणि जंगल क्षेत्रातील वाढता मानवी हस्तक्षेप ही दोन मुख्य कारणे या परिस्थितीला कारणीभूत आहेत. सुमात्रा बेटांवरील जंगलांमध्ये जवळपास दोन हजाराच्या आसपास सुमात्रन हत्ती आहेत. साधारणत: १९८५ पासून या हत्तींचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. ही स्थिती अशीच राहिली तर येत्या दशकातच हे हत्ती काळाच्या पडद्याआड जातील, असा इशारा डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूएफने दिला आहे. यापुर्वीच, या संस्थेने सुमात्री गेंड्यांच्या बाबतीतही असाच इशारा दिला आहे. भारतीय भूमीवरही सुमात्रा बेटांपेक्षा फार काही आलबेल नाही.

भारतीय हत्ती
भारतातील हत्ती आणि त्यांचे अस्तित्त्व यांना पुराणकालाचा संदर्भ आहे. हत्तीला देवाचा खासकरुन गणपतीचा अवतार म्हणूनही ओळखले जाते. राजे
, महाराजांच्या साम्राज्यातले हत्तींचे स्थान आणि त्याला असलेले महत्त्व ख्यात आहे. हत्तीविषयी बऱ्याच आख्यायिका आणि दंतकथा आहेत. भारतीय संस्कृतीत हत्तीला महत्त्व दिले जाते. वैदिक काळापासून धार्मिक ग्रंथ व पुराणकथा यांत हत्तीचा उल्लेख आहे. हिंदू व बौद्ध धर्मांत हत्ती पवित्र मानतात. हिंदू धर्मातील प्रमुख देवता ‘गणपतीचे शीर्ष हत्तीच्या रूपातील आहे. ऋग्वेदात हत्तीसाठी हस्तिन् (हात असलेला) असा शब्द वापरला आहे. राजाचे वाहन म्हणून त्याला पूर्वी मान दिला जाई. महोत्सवी मिरवणुकीतही हत्तीला महत्त्वाचे स्थान असते. आजही देशातील अनेक देवस्थानांमध्ये असलेले हत्ती तेच दर्शवते. आसाम, मेघालय, आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगढ, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मेघालय, मिझोराम, ओरिसा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार आदी ठिकाणी हत्तींचे वास्तव्य आहे. आशियाई हत्ती आफ्रिकी हत्तींपेक्षा आकारमानाने लहान असतात. आशियाई हत्तींमध्ये केवळ नराचे सुळे मोठे असतात. मादीला सुळे नसतात किंवा फार लहान असतात. हत्तीचे दात बहुवारदंती प्रकारचे असतात, म्हणजे ते आयुष्यभर ठरावीक काळाने येतात. माणसामध्ये दुधाचे दात आणि कायमचे दात असे दोनच संच येतात. हत्तीच्या आयुष्यात एकूण सहा वेळा दात बदलतात. हत्तीला चावण्यासाठीचे दात तोंडाच्या मागच्या भागात येतात आणि पुढचे दात जसजसे झिजतात, तसतसे मागचे दात पुढे सरकतात. हत्ती २-३ वर्षांचा झाला की, त्याच्या उपदाढा पडतात. यानुसार ४–६ वर्षे झाली की, दुसऱ्या उपदाढा पडतात. उपदाढा यानुसार ९–१५ वर्षांनी तिसऱ्यांदा, १८–२८ वर्षांनी चौथ्यांदा, ४० वर्षांर्यंत पाचव्यांदा पडतात. सहाव्या आलेल्या उपदाढा अखेरच्या असतात आणि हत्तीच्या जबड्यात शेवटपर्यंत राहतात. आशियाई हत्ती संध्याचर असतात. ते दिवसाला सुमारे १५० किलो चारा खातात. त्यांच्या चाऱ्यात गवत, झाडाझुडपांचा पाला, मुळे, शेंगा इत्यादींचा समावेश असतो. दिवसातून ते एकदाच साधारणपणे ८० ते २०० लिटर पाणी पितात आणि नेहमी पाण्याच्या स्रोताजवळ वावरतात. आंघोळीसाठी त्यांना अधिक पाणी लागते.

म्हणून चिखलात लोळतात
हत्ती हा प्राणी अधिक बुद्धिमान समजला जातो. मानव
, कपी आणि डॉल्फिन यांच्या काही जातींप्रमाणे हत्तीच्या मेंदूचे बाह्यांग मोठे असते. हत्तीची बोधनक्षमता विकसित झालेली असते. परिस्थितीनुसार ते त्यांच्या भावना जसे, शोक करणे, शिकणे, समूहातील लहान पिलांची काळजी घेणे, नक्कल करणे, खेळणे, नि:स्वार्थी असणे, वस्तूंचा वापर करणे, सहकार्य करणे, दया दाखविणे, गोष्टी लक्षात ठेवणे, स्मरण करणे आणि एकमेकांशी संवाद साधणे अशा अनेक क्रिया वर्तनातून प्रकट करतात. आशियाई हत्तींच्या कळपात बहुतकरून माद्या आणि पिले एकत्र वावरतात. कळपात वयस्कर मादीच्या सूचना सर्वजण ऐकतात. एकमेकांना संदेश देण्यासाठी ते कमी कंप्रतेचा आवाज काढतात. कळपातील लहान नर पौगंडावस्था आली की, मातेपासून दूर राहतात. त्यामुळे प्रौढ नर त्यांच्या कळपापासून दूर असतात. नर हत्ती बहुधा एकेकटे राहतात. हत्तीला स्वेद ग्रंथी नसतात. त्यामुळे त्याला इतर मार्गांनी शरीर थंड ठेवावे लागते. यासाठी तो कान फडफडवतो किंवा सोंडेने शरीरावर पाणी फवारून घेतो. शिवाय तो चिखलात लोळतो. चिखल शरीरावर सुकू देतो. त्यामुळे त्याचे उन्हापासून व त्रासदायक कीटकांपासून संरक्षण होते. हत्तीची दृष्टी काहीशी अधू असते. त्याच्या प्रचंड डोक्याच्या तुलनेत डोळे बारीक असतात. तो आपले डोके पूर्णपणे वळवू शकत नाही. त्याला समोरचे व आजूबाजूचे दृश्य तेवढे दिसू शकते. मागील बाजूची कोणतीही गोष्ट पाहण्यासाठी त्याला मागे वळावे लागते. थोड्याशा आवाजाने किंवा गडद रंगाने तो बुजतो.

माणूस हत्तींचा सर्वात मोठा शत्रू
आशियाई हत्ती लाजाळू असतात आणि शत्रूंवर हल्ला करण्यापेक्षा ते पळून जातात. परंतु
, एकेकटे वावरणारे मोठे हत्ती जवळून जाणाऱ्या बेसावध व्यक्तींवर हल्ला करतात. काही वेळा रस्त्याच्या मधोमध उभे राहून ते वाट अडवतात. जेव्हा ते एखाद्या व्यक्तीला पकडतात तेव्हा त्या व्यक्तीला सोंडेने वेढून पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न करतात किंवा पकडलेल्या व्यक्तीला जमिनीवर पाडून सुळ्यांनी भोसकतात. माजाच्या काळात ते माणसांबरोबर तसेच अन्य प्राण्यांवर हल्ला करतात. एखाद्या प्राण्याने हत्तीवर हल्ला केल्यास तो त्या प्राण्याला तुडवून मारून टाकतो. पिलांसमवेत वावरणाऱ्या हत्तींच्या माद्या तर अधिक घातक असतात. माणूस हा हत्तींचा सर्वांत मोठा शत्रू आहे. हत्तींच्या नैसर्गिक अधिवासावर माणसाने शेती, उद्योग, वसाहत यासाठी आक्रमण केल्याने त्यांच्या अधिवासाचे क्षेत्र कमी झाले आहे. लोकसंख्येतील वाढ आणि नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास यांमुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. अधिवास नष्ट झाल्यामुळे किंवा विभागला गेल्यामुळे हत्ती आणि माणूस यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. मौल्यवान त्वचा आणि सुळे (हस्तिदंत) मिळविण्यासाठी हत्तींची शिकार केली जाते.

संस्कृत ग्रंथात वर्णन
वन्य हत्ती पकडण्याच्या पाच पद्धतींचे वर्णन जुन्या संस्कृत ग्रंथांत आढळते. यातील पहिली पद्धत आर्यांनी भारतात विकसित केली होती. द्रविड लोक खेडा पद्धत वापरीत. मेळा शिकार
, नेपाळमधील पिथा व कंबोडियातील लोकांची पद्धत या इतर पद्धती होत. आधुनिक काळापर्यंत हत्ती आपले गट बनवून शिकाऱ्यांपासून वरचेवर स्वतःचे संरक्षण करीत असत. मात्र, नंतरच्या काळात मनुष्य हा शिकारी हत्तींचे संपूर्ण कुटुंब गोळ्या घालून मारून टाकू लागला. त्याला शिकारीच्या भागात हत्तींना सहजपणे घाबरवून सोडता येऊ लागले. बंदुकीच्या बारासारख्या आकस्मिक आवाजाने हत्तींचा कळप भयभीत होतो. तो आवाजाच्या स्रोतावर हल्ला करू शकतो किंवा त्यापासून दूरच्या दिशेत सैरावैरा पळून जाऊ शकतो. भयभीत वा क्षुब्ध झालेला हत्ती कधीकधी सोंडेने मोठा कर्णकटू आवाज काढून गर्जना करतो.

गजाह अहवाल
अधिवास आणि कॉरिडोर धोक्यात आल्याने भारतात हत्तींच्या अस्तित्त्वाला मोठा धोका निर्माण झाला आहे. हे ओळखून २०१० मध्ये केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने एका समितीची स्थापना केली होती. हत्तींच्या समस्या
, त्यांचा अधिवास, अडचणी, हत्ती आणि मानवी संघर्ष आदींचा अभ्यास करुन डॉ. महेश रंगराजन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 'गजाहअहवाल सादर केला. या समितीने अनेक शिफारशी केल्या. त्यातील केवळ एकच शिफारस सरकारने मान्य केली. ती म्हणजे, हत्तीला राष्ट्रीय वारसा असलेला प्राणी घोषित करण्याची. मात्र, इतर शिफारशी कागदावरच आहेत.

प्रकल्प हत्ती
हत्तींचे संरक्षण, त्यांचे अधिवास आणि मार्ग, मानव-हत्ती संघर्ष समस्या सोडवणे आणि देशातील बंदिवान हत्तींचे कल्याण या उद्देशाने १९९२ मध्ये प्रकल्प हत्ती (प्रोजेक्ट एलिफंट) सुरू करण्यात आला. हत्तींच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि आंतरप्रजनन वाढविण्यासाठी आणि संघर्ष कमी करण्यासाठी महत्त्वाच्या हत्ती अधिवासांना 'एलिफंट रिझर्व्ह' म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. २०१७ मध्ये भारतात हत्तींची संख्या २९,९६४ इतकी होती, जी २०१२ मध्ये २९,३९१ ते ३०,७११ एवढी होती. हत्तींच्या संवर्धनासाठी हत्ती श्रेणीतील १४ राज्यांमध्ये ३३ हत्ती अभयारण्ये स्थापन करण्यात आली आहेत. जगभरातील एकूण हत्तींपैकी ६० टक्क्यांहून अधिक जंगली आशियाई हत्ती भारतात आहेत.

अधिवास असुरक्षित
सतत स्थलांतर करीत राहणे हे हत्तींचे वैशिष्ट्य आहे. हत्तींच्या एका कुटुंबकबिल्यासाठी साधारण ३५० ते ६०० चौरस किलोमीटर एवढा अधिवास आवश्यक असतो. अन्न कमी झाल्याचे लक्षात येताच हत्ती त्यांचा अधिवास बदलतात. दुसऱ्या अधिवासात गेल्यानंतर पहिला अधिवास वाढावा
, हा उद्देश त्यामागे असतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून उलटे चित्र तयार झाले आहे. हत्तींनी त्यांचा अधिवास सोडला की त्या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते. परिणामी त्या अधिवासात परतण्याचा हत्तींचा मार्ग बंद होतो. त्यामुळे हत्ती मानवी भागात शिरकाव करतात. अन्न मिळेनासे झाल्याने हत्तींचा मोर्चा कृषी पिकांकडे वळतो. शेतीचे नुकसान नको म्हणून हत्तींना हुसकवण्याचा प्रयत्न होतो. त्यातून मानव आणि हत्ती यांचा संघर्ष वाढतो.

कॉरिडॉरची सुरक्षा
जंगलांच्या लगत असलेल्या विविध प्रकल्पांचाही हत्तींवर विपरीत परिणाम होतो. हत्तींच्या दोन अधिवासातील स्थलांतराच्या मार्गाला कॉरिडॉर असे म्हटले जाते. अखंड स्वरुपाचा हा कॉरिडॉर हत्तींसाठी अत्यंत महत्त्वपुर्ण असतो. मात्र
, हा कॉरिडॉर तुटक स्वरुपात बनला तर हत्तींना असुरक्षित असल्यासारखे वाटते. त्यामुळे हत्तींचा कुटुंब कबिला उघड्यावर पडला असल्याचे त्यांना भासते. हत्तींच्या संरक्षणासाठी 'प्रोजेक्ट एलिफंटराबविण्यात येत आहे. यातून केवळ नुकसानग्रस्तांना मदत देण्याचे काम सुरु आहे. प्रत्यक्षात हत्तींच्या समस्या वाढत आहेत. रेल्वेखाली सापडून हत्तींचा मृत्यू होणे ही बाब सुद्धा चिंताजनक आहे. असुरक्षित अधिवासातून सुरक्षित अधिवासाकडे जाण्याचा हत्तींचा प्रयत्न असताना या मार्गात रेल्वे आल्यास अपघात घडतात. मानवी आणि हत्ती संघर्षातून वर्षभराला शेकडो हत्ती मृत्यूमुखी पडतात. हत्तींच्या अधिवास क्षेत्रात पाण्याचे प्रमाण कमी होत जाणे ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे. या सर्व समस्यांवर 'गजाहअहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. दहाव्या पंचवार्षिक योजनेत प्रोजेक्ट एलिफंटसाठी ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. केवळ निधीचे आकडे दाखवून हत्ती सुरक्षित असल्याचे सिद्ध होत नसल्याचे पर्यावरण आणि वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. त्यात खरोखरंच तथ्य आहे. त्यामुळेच सुमात्रन हत्तींवर सध्या आलेली वेळ उद्या भारतीय हत्तींवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मानव वन्यजीव संघर्ष
मानव-वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी सरकार नेमके काय करीत आहे असा प्रश्न खासदारांनी संसद अधिवेशनात उपस्थित केला. त्यास केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत लेखी उत्तर दिले. सिंह म्हणाले की, एकूण आठ पातळ्यांवर काम केले जात आहे. पहिले म्हणजे, वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या तरतुदींनुसार वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांचे संवर्धन करण्यासाठी देशभरात राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, संवर्धन राखीव जागा आणि सामुदायिक राखीव जागा यासारख्या संरक्षित क्षेत्रांचे जाळे तयार करण्यात आले आहे. दुसरे म्हणजे, मानव-वन्यजीव संघर्षाला तोंड देण्यासाठी मंत्रालयाने फेब्रुवारी २०२१ मध्ये एक सल्लामसलत जारी केली होती. मंत्रालयाने ३ जून २०२२ रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना झालेल्या पिकांच्या नुकसानासह मानव-वन्यजीव संघर्षांच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या सल्लागारात समन्वयित आंतर-विभागीय कारवाई, संघर्षाच्या ठिकाणांची ओळख पटवणे, मानक कार्यपद्धतींचे पालन करणे, जलद प्रतिसाद पथकांची स्थापना करणे, त्वरित देयकासाठी सानुग्रह अनुदानाच्या रकमेचा आढावा घेण्यासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावरील समित्या स्थापन करणे आणि बाधित व्यक्तींचा मृत्यू किंवा दुखापत झाल्यास, शक्यतो २४ तासांच्या आत मदत त्वरित देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचना जारी करण्याची शिफारस केली आहे.

तिसरे बाब म्हणजे, मंत्रालयाने २१ मार्च २०२३ रोजी मानव-वन्यजीव संघर्ष परिस्थिती हाताळण्यासाठी प्रजाती-विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. चौथे म्हणजे, केंद्र सरकार वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाच्या व्यवस्थापनासाठी केंद्र पुरस्कृत योजना, 'वन्यजीव अधिवास विकास' आणि 'प्रकल्प वाघ आणि हत्ती' अंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक मदत पुरवते, ज्यामध्ये वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शिकारीसाठी भरपाई आणि काटेरी तारांचे कुंपण, सौरऊर्जेवर चालणारे विद्युत कुंपण, निवडुंग वापरून जैव-कुंपण, सीमा भिंती इत्यादी भौतिक अडथळे बांधणे इत्यादी विस्तृत उपक्रमांसाठी मदत समाविष्ट आहे. वन्यजीव अधिवास विकास, क्षमता बांधणी इत्यादी.

पाचवे म्हणजे, केंद्र पुरस्कृत योजना, 'वन्यजीव अधिवास विकास' आणि 'प्रकल्प वाघ आणि हत्ती' या योजनांमध्ये मानव-वन्यजीव संघर्षातील बळींना सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार, मंत्रालयाने डिसेंबर २०२३ मध्ये या योजनांअंतर्गत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास सानुग्रह अनुदान ५ लाख रुपयांवरून १० लाख रुपयांपर्यंत वाढवले ​​आहे. राज्य सरकारकडून जारी केलेल्या विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वांनुसार/या संदर्भात केलेल्या तरतुदींनुसारही त्याची देयके नियंत्रित केली जातील. सहावे म्हणजे, भारतीय वन्यजीव संस्थांसह इतर संस्थांद्वारे राज्य वन विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना क्षमता बांधणीसाठी मंत्रालय मदत पुरवते. जेणेकरून त्यांना पूर्वसूचना प्रणाली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करता येईल.

सातवे म्हणजे, वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या कलम ११(१)(अ) नुसार राज्याच्या मुख्य वन्यजीव वॉर्डनला कायद्याच्या अनुसूची-१ मध्ये येणाऱ्या प्राण्यांच्या शिकारीसाठी परवाने देण्याचा अधिकार आहे. हे प्राणी मानवी जीवनासाठी धोकादायक असतात. शिवाय, कायद्याच्या कलम ११(१)(ब) नुसार राज्याच्या मुख्य वन्यजीव वॉर्डन किंवा कोणत्याही अधिकृत अधिकाऱ्याला कायद्याच्या अनुसूची-२ मध्ये येणाऱ्या वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी परवाना देण्याचा अधिकार आहे. हे असे प्राणी असतात जे मानवी जीवनाला किंवा मालमत्तेला धोका निर्माण करतात. आणि सर्वात शेवटचे आठवे म्हणजे, मानव-वन्यजीव संघर्षाबाबत सामान्य जनतेला संवेदनशील करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी संबंधित राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांकडून विविध माध्यमांद्वारे माहिती प्रसारित करण्यासह वेळोवेळी जागरूकता मोहिमा राबवल्या जातात, असे सिंह यांनी सांगितले आहे.

आकडेवारीत घट
केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, २००७-०८ मध्ये भारतात २७,६९४ हत्ती होते. सध्या हत्तींची गणना सुरू आहे. ईशान्य भारतात अद्याप गणना झालेली नाही. त्यामुळे उर्वरीत देशात १५,८८७ हत्ती आहेत. अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झाल्यावर खरे चित्र स्पष्ट होईल. ईशान्य भारत वगळता उर्वरीत भागातील आकडेवारीची २०१२ शी तुलना करता भारतात हत्तींच्या संख्येत तब्बल २० टक्क्यांनी घट झाली आहे. ही बाब चिंताजनक आहे. मध्य आणि पूर्व भागात २०१२ मध्ये २,९०६ हत्ती होते. तेथे ४ टक्क्यांनी घट झाल्याने सध्या तेथे अवघे १,८६४ हत्ती आहेत. पश्चिम घाटात २०१२ मध्ये १६,२०४ हत्ती होते. तेथे आता ११,९६१ हत्ती आहेत. म्हणजे येथे तब्बल १७ टक्क्यांची घट आहे. शिवालिक आणि गंगेच्या प्रदेशात १,६३७ हत्ती होते. आता तेथे २,०६२ हत्ती शिल्लक आहेत. म्हणजेच ईशान्य भारत वगळता देशात २०१२ मध्ये २०,७४७ हत्ती होते. तीच संख्या आता १५,८८७ झाली आहे. ही बाब फारशी चांगली नाही. 

केरळमध्ये राज्य आपत्ती
पश्चिम घाटातील सर्वात शेवटचे राज्य असलेल्या केरळमध्ये हत्ती आणि माणूस यांच्यातील संघर्षात दिवसागणिक वाढ होत आहे. या संघर्षामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होतो. काही माणसांचा बळी गेल्यानंतर त्यात वाढ होते. हिंसक झालेल्या हत्तींनी थेट माणसावर असा थेट हल्ला करणे आणि माणसाचा जीव घेणे ही बाब खुपच चिंतेची आहे. अखेर केरळ सरकारने आता मानव-वन्यजीव संघर्षाला राज्य आपत्तीचा दर्जा जाहीर केला आहे. अशा प्रकारच्या आपत्तीला आणि समस्येला असा दर्जा देणारे केरळ हे भारतातील पहिलेच राज्य  आहे. हा निर्णय केरळ सरकारला घ्यावा लागला कारण घटते जंगल आणि जंगलांमधील मानवी हस्तक्षेपात प्रचंड वाढ झाली आहे. त्याचबरोबर हत्तींची संख्याही चिंता करावी एवढी कमी झाली आहे. अशातच जंगली हत्ती आणि मानव यांच्यात संघर्ष होत आहे. कधी जंगलात, कधी शेतात, कधी रस्त्यात तर कधी गावात. अचानक आणि आक्रमकपणे हत्तींकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. काही नागरिकांचा बळी गेल्याने मानवी असंतोषात वाढ झाली. नागरिकांनी हिंसक बनत थेट कायदाच हातात घेतला. अखेर ही परिस्थिती हाताळण्यासाठी या समस्येला राज्य आपत्तीचा दर्जा केरळ सरकारने  दिला आहे. केरळचा निम्माहून अधिक भूभाग हा वनाच्छादित आहे. तर, हत्ती-मानव संघर्षाच्या शेकडो घटना दरवर्षी घडत आहेत. अवघ्या तीन वर्षात जवळपास ७० जणांचा बळी गेला आहे. त्याशिवाय शेतपिकांची हानी, मालमत्तेची हानी हे वेगळेच. घटते जंगल, खाद्याची कमतरता, वाढता मानवी हस्तक्षेप, पीक पद्धतीतील बदल, पशुपालनातील वाढ, रस्त्यांसह विविध पायाभूत सुविधांचा विस्तार, परदेशी वृक्षांची लागवड, निवाऱ्यातील असुरक्षिततेची भावना यामुळे हत्ती आक्रमक झाले आहेत. वायनाड, पलक्कड, कन्नूर आणि इडुक्की हे चार जिल्हे हत्ती-मानव संघर्षाने सर्वाधिक ग्रस्त आहेत. साडेतीन हजाराहून अधिक असलेली हत्तींची संख्या गेल्या ६-७ वर्षात निम्म्यावर आली आहे. म्हणजे, हत्तींची संख्या घटूनही प्रश्न उग्र झाला आहे. सर्वसाधारणपणे वन्यप्राण्यांशी संबंधित प्रश्न वनविभागाकडूनच हाताळले जातात. त्यासाठी वन्यजीव संरक्षण कायदा वापरला जातो. केरळमध्ये चीफ वाईल्डलाईफ वॉर्डन हा एकमेव अधिकारी आहे जो यासंबंधी निर्णय घेतो. हत्तींना बेशुद्ध करणे, त्यांना पकडणे, त्यांच्या हत्तेची परवानगी देणे यासारख्या निर्णयांना त्यामुळे उशीर होत असल्याची ओरड आहे. त्यामुळेच राज्य आपत्तीचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत या समस्येची हाताळणी होते. केवळ वनविभागाऐवजी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती निर्णय घेते. या समितीत वनविभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस, अग्नीशमन विभाग अशा विविध विविध विभागांचा समावेश असतो. ही समिती स्थानिक पातळीवर जलद निर्णय घेईल. नुकसान भरपाई देणे असो की हत्तींना अटकाव करणे, हुसकून लावणे, त्यांना बेशुद्ध करणे किंवा त्यांना जेरबंद करणे हे सारेच निर्णय ही समिती घेईल. राज्य पातळीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती निर्णय देईल. हत्ती-मानव संघर्षाच्या प्रश्नावर तात्पुरत्या पण प्रभावी उपायासाठी हा निर्णय योग्य ठरेल. पण, कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी नाही. त्यामुळे त्यादृष्टीनेही सरकारने पावले टाकणे आवश्यक आहे.

ओडिशा सरकारनेही २०१५ मध्ये सर्पदंशाच्या समस्येला राज्य आपत्तीचा दर्जा दिला होता. त्यानंतर सर्वाधिक निर्णय केरळ सरकारने घेतले आहेत. केरळने २०१५ मध्ये वीज कोसळणे आणि किनारपट्टीचे स्खलन, २०१७ मध्ये भूस्खलन, २०१९ मध्ये उष्माघात आणि उष्णतेची लाट तर २०२० मध्ये कोविड महामारी या समस्यांना राज्य आपत्तीचा दर्जा दिला होता. दर्जा देऊन तात्पुरती मलमपट्टी होते असेच म्हणता येईल. वन्यप्राण्यांना सुरक्षित असे वातावरण तयार करणे गरजेचे आहे. त्याकडे पुर्णपणे डोळेझाक केले जात आहे. जीवो जीवस्य जीवनम् हाच निसर्गाचा नियम आहे. आपणही जगा आणि इतरांनाही जगू द्या, या नियमाचाच मानवाला विसर पडला आहे. यातूनच हत्तींशी द्वंद्व सुरू आहे. ते थांबवायचे असेल तर केवळ सरकारी किंवा प्रशासकीय उपाय करुन चालणार नाही. सामाजिक बदलही करावे लागतील. त्याची तयारी सर्वांनीच करायला हवी. अन्यथा गजान्त लक्ष्मीचा कोप अटळ आहे.  

--

हत्ती गणनेची आकडेवारी अशी

राज्य

१९९३

१९९७

२००२

२००७

२०१२

२०१७

अरुणाचल प्रदेश

२१०२

१८००

१६०७

१६९०

८९०

१६१४

आसाम

५५२४

५३१२

५२४६

५२८१

५६२०

५७१९

मेघालय

२८७२

१८४०

१८६८

१८११

१७५४

नागालँड

१७८

१५८

१४५

१५२

२१२

४४६

मिझोरम

१५

२२

३३

१२

--

मणिपूर

५०

३०

१२

--

--

त्रिपुरा

१००

७०

४०

५९

५९

१०२

पश्चिम बंगाल (उत्तर)

१८६

२५०

२९२

३००-३५०

६४७

४८८

पश्चिम बंगाल (दक्षिण)

१४

२६

३६

२५

 

१९४

झारखंड

५५०

६१८

७७२

६२४

६८८

६७९

ओडिशा

१७५०

१८००

१८४१

१८६२

१९३०

१९७६

छत्तीसगड

--

--

--

१२२

२४७

२४७

बिहार

--

--

--

--

--

२५

मध्य प्रदेश

--

--

--

--

--

उत्तराखंड

८२८

११३०

१५८२

१३४६

१८३९

उत्तर प्रदेश

४७

७०

८५

३८०

२९१

२३२

हरियाणा

--

--

--

--

--

हिमाचल प्रदेश

--

--

--

--

--

तामिळनाडू

२३०७

२९७१

३०५२

३८६७

४०१५

२७६१

कर्नाटक

५५००

६०८८

५८३८

४०३५

५६४८-६४८८

६०४९

केरळ

३५००

३६००

३८५०

६०६८

५९४२-६४२२

५७०६

आंध्र प्रदेश

४६

५७

७४

२८

४१

६५

महाराष्ट्र

--

--

--

अंदमान-निकोबार

--

--

--

--

--

२५

एकूण

२५५६९

२५८४२

२६३७३

२७६६९-२७७१९

२९३९१-३०७११

२९९६४


रेल्वे अपघातात ठार झालेल्या हत्तींची संख्या

राज्य

२०१९-२०

२०२०-२१

२०२१-२२

२०२२-२३

२०२३-२४

आसाम

पश्चिम बंगाल

तामिळनाडू

झारखंड

केरळ

ओडिशा

त्रिपुरा

उत्तराखंड

-

-

उत्तर प्रदेश

कर्नाटक

एकूण

१४

१२

१५

१५

१७

 

वीजेचा धक्का लागून ठार झालेल्या हत्तींची संख्या

राज्य

२०१९-२०

२०२०-२१

२०२१-२२

२०२२-२३

२०२३-२४

आसाम

११

१३

१२

११

पश्चिम बंगाल

१०

तामिळनाडू

१५

१४

झारखंड

१०

केरळ

१०

ओडिशा

१३

२६

१५

उत्तराखंड

-

-

उत्तर प्रदेश

कर्नाटक

१५

१३

आंध्र प्रदेश

-

एकूण

६७

५८

५२

८९

८०

 

(स्रोत -  केंद्र सरकारने संसदेत दिलेली माहिती)

--

bhavbrahma@gmail.com

पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार. मो. 9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

Please Follow me on:

WhatsApp Channel

https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

Facebook   - www.facebook.com/BhaveshBrahmankar

X (Twitter)www.twitter.com/BhavBrahma

Instagram   - https://www.instagram.com/bhavbrahma

Blog         - https://bhavbrahma.blogspot.com/

--

Asian, Elephant, Wild Animal, Forest, Environment, Corridor, Conservation, Census, 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)

तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी (नवशक्ती)