तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी (नवशक्ती)
तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी
महासत्तेसाठी आसुसलेल्या चीनला जबर धडकी भरली आहे. तब्बल १९ देशांचे ४० हजार सैनिक सशस्र मैदानात उतरले आहेत. भारतही यात सहभागी झाला असून जगात पहिल्यांदाच असा प्रकार घडत आहे.
भावेश ब्राह्मणकर
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज
हे सध्या चीन दौऱ्यावर आहेत. चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांची भेट घेऊन त्यांनी
ऑस्ट्रेलिया-चीन संबंध आणि व्यापार बळकट करण्याबाबत चर्चा केली. त्याचवेळी तिकडे
दक्षिण चीन समुद्रात ऑस्ट्रेलियाच्याच पुढाकाराने तब्बल १९ देशांचे लष्करी पथक सराव
करीत आहे. सुमारे ४० हजार सैनिक सशस्र सज्ज आहेत. तसे पाहता हा काही योगायोग नाही,
तर मुत्सद्देगिरी आणि डावपेचांचा एक भाग आहे. याद्वारे ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी
चीनला अनेक इशारे दिले आहेत. सर्वप्रथम दक्षिण चीन समुद्रात नेमके काय घडते आहे ते
जाणून घेऊ.
आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा
युद्ध सराव होत आहे. ‘तॅलिस्मन सेबर’ असे त्याला नाव
देण्यात आले आहे. ‘तॅलिस्मन सेबर’चा अर्थ आहे जादुई
तलवार. म्हणजेच ही जादुई शक्ती चीनच्या पोटात गोळाच आणणारी आहे. गेल्या काही दशकात
चीनने दक्षिण समुद्रात जणू मनमानी सुरू केली आहे. त्यामुळे या परिसरातील
लहान-मोठ्या देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावर आपलाच
हक्क आहे, असे चीनचे वर्तन आहे. त्याच्या युद्धनौका, लढाऊ विमाने, पाणबुड्या,
हेरगिरी आदींचा ससेमिरा तेथे सुरू आहे. त्याला शह देण्यासाठीच या महाकाय युद्ध
सरावाचा डाव टाकण्यात आला आहे. इंडो-पॅसिफिक समुद्रात चीनने आक्रमक कारवाया सुरू
ठेवल्या तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मजबूत, एकजूट आणि
तांत्रिकदृष्ट्या धारदार एकजूट तयार होत असल्याचा संदेश चीनला या सरावाने दिला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यूगिनी यांच्या आसपासच्या समुद्रात ‘तॅलिस्मन सेबर २०२५’ या युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. भल्या भल्या देशांना धडकी भरावी
असा हा महाकाय सराव आहे. ‘तॅलिस्मन सेबर’ हा सराव २००५ मध्ये सुरू झाला. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांद्वारे
वर्षातून दोनदा केला जातो. मात्र, यंदा या सरावात तब्बल १७ देशांना सहभागी करुन घेण्यात
आले आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. नेहमी हा सराव ऑस्ट्रेलियात होतो. यंदा
प्रथमच तो ऑस्ट्रेलियाबाहेर पापुआ न्यू गिनीमध्ये होत आहे. क्वीन्सलँड येथे अत्याधुनिक
शस्रास्रांसह ४० हजार सैनिकांची फौज जमली आहे.
कोरल समुद्र आणि नैऋत्य पॅसिफिक प्रदेशात चीनचा हस्तक्षेप सातत्याने
वाढत आहे. म्हणूनच भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि
आग्नेय आशियापासून दक्षिण पॅसिफिकपर्यंतचे बेट असलेले देश या युद्ध सरावात सहभागी
झाले आहेत. ‘नियमांवर आधारित सागरी व्यवस्था आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे’ हा प्रमुख संदेश सरावामागे आहे. चीन अनेकदा येथील लहान देश आणि बेटांवर
दावा करतो. दक्षिण चीन समुद्रातील फिलीपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया,
ब्रुनेई, सोलोमन बेटे, पापुआ न्यू गिनी सारख्या छोट्या देशांवर चीन नेहमीच डोळे
वटारतो. विस्तारवादासाठी चीनला हे देश हवे आहेत. परंतु, ‘तॅलिस्मन सेबर २०२५’ या युद्ध सरावाने चीनच्या महत्वाकांक्षांना नक्कीच वेसण बसणार आहे.
पहिल्यांदाच चीनच्या विरोधात १९ देश एकत्र आले आहेत आणि त्याच्या
भूमीलगत ४० हजार सैनिक युद्ध सराव करीत आहेत. या सरावात अनेक महत्वाच्या बाबी घडत
आहेत. जसे की, ऑस्ट्रेलियाने प्रथमच ‘हिमारस’ या
४०० किलोमीटर अंतरावरील अचूक लक्ष्य भेदणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
जपानने जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या ‘टाइप ३’ या मध्यम श्रेणीची क्षेपणास्त्रे डागली. दक्षिण कोरियाने ‘के-१’ रणगाडा आणि ‘के९ए२’ या स्व-चालित हॉवित्झर तोफेचे
प्रात्यक्षिक केले. अमेरिकन एफ३५बी लढाऊ विमानेही सहभागी झाली. हा सराव केवळ
दिखावा नाही तर तो एकजुटीची सुरुवात आहे. तसेच वेळेप्रसंगी हे देश चीनविरुद्ध
एकत्र येऊ शकतात. चीनविरुद्ध लढाईही करु शकतात, असा इशारा चीनला मिळत आहे. भारतातील
ऑस्ट्रेलियन राजदूत फिलिप ग्रीन म्हणाले की, ‘भारत पहिल्यांदाच ‘तॅलिस्मन सेबर २०२५’ युद्ध सरावात सहभागी होत आहे.
हे अभिमानास्पद आहे. इंडो-पॅसिफिकमधील संरक्षण आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे एक
अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे.’ तिबेटनंतर तैवानचा घास घेऊ पाहणाऱ्या
चीनला या महाकाय युद्ध सरावाने नक्कीच घाम फोडला आहे.
खास म्हणजे, युद्ध सराव सुरू झाल्याच्या दुसऱ्याच
दिवशी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान चीन दौऱ्यावर गेले आणि
त्यांनी चिनी राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी जिनपिंग यांच्या
डोळ्याला डोळा भिडवून अनेक संदेश दिले आहेत. चीनच्या कुटील कारवायांविरोधात इंडो
पॅसिफिक देश गप्प बसणार नाहीत, वेळेप्रसंगी ते तोडीस तोड उत्तर देतील, चीनने
महत्वाकांक्षांना आवर घालावा, इंडो-पॅसिफिक प्रदेश केवळ एका देशाचा नाही तर तो
सर्वांचा आहे, चीनने वर्चस्व गाजवण्यापूर्वी येथील देशांची ताकद पहावी आदींचा
त्यात समावेश आहे. अल्बानीज यांचे धाडस खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. कारण, संरक्षण,
व्यापार, उत्पादन, तंत्रज्ञान आदी क्षेत्रात बलाढ्य बनलेल्या चीनला कुणीही अंगावर
घेण्यास तयार नाही. तसेच, त्याला धडकी भरविण्याची क्षमता अमेरिका आणि रशियासोडून
कुणाकडेच नाही. अशा परिस्थितीत १९ देशांनी चीनच्या दहशतीला लगाम घालण्यासाठी एकत्र
येऊन एक नवा पायंडा पाडला आहे. चीनने आपल्या शेजारील देशांशी सलोख्याचे संबंध
ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा हे सर्व देश एकत्र येऊन सामूहिक ताकदीने चीनला धडा शिकवू
शकतात. चीनने इंडो पॅसिफिक प्रदेशातील कृत्रिम बेटांवर लष्करी तळ बांधले आहेत. हा महाकाय
युद्ध सराव त्या तळांना नष्ट करण्याच्या शक्तीचे प्रदर्शन देखील समजला जातो आहे.
युद्ध सरावात सहभागी झालेले ब्रिगेडियर विल्सन म्हणाले की, ‘हा सराव कोणत्याही
विशिष्ट देशाविरुद्ध नाही, तर चीन त्याला स्वतःविरुद्ध एक
धोरणात्मक संकेत म्हणून पाहत असेल.’
सध्या चीनमध्ये शांघाय शिखर संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या परराष्ट्र
मंत्र्यांची परिषद होत आहे. याच परिषदेदरम्यान ‘तॅलिस्मन सेबर २०२५’ हा महाकाय युद्ध सराव व्हावा हा काही योगायोग नाही. २०हून अधिक देशांचे
परराष्ट्रमंत्री चीनमध्ये जमले आहेत. युद्ध सरावाने चीनची झोप तर उडावीच शिवाय त्याच्या
परराष्ट्र धोरणात योग्य तो बदल होणे अपेक्षित आहे. चीनमधील देशोदेशीच्या परराष्ट्र
मंत्र्यांच्या समोर महाकाय युद्ध सरावाची वार्ता धडकत आहेत. एससीओच्या संरक्षण
मंत्र्यांची परिषद गेल्या महिन्यात झाली तर पुढील महिन्यात सदस्य देशांच्या प्रमुखांची
परिषद होणार आहे.
ऑस्ट्रेलियाने २०२२ मध्ये १७ देशांचा सहभाग असलेला युद्ध सराव करुन
चीनला वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता १९ देश एकजूटीने युद्ध सरावात
विविध प्रात्यक्षिके करीत आहेत. यातून लष्करी अधिकाऱ्यांमधील समन्वय, वैचारीक
देवाणघेवाण, कार्यपद्धती, युद्धात खेळायचे डावपेच, रणनिती आदींबाबत अत्यंत
महत्वपूर्ण प्रकाश टाकला जात आहे. वेळेप्रसंगी एवढे देश एकत्र येऊ शकतात हा सुद्धा
आदर्श यानिमित्ताने निर्माण झाला आहे. ‘एकीचे बळ, मिळते फळ’ या उक्तीनुसार कार्यवाही केली तर त्याचा नक्कीच फायदा होतो, हे सुद्धा
स्पष्ट होत आहे. अर्थात युद्ध सरावाच्या चालीला चीन कुठल्या डावपेचांनी उत्तर देतो
ते येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. तूर्त तरी चीनला धडकी भरवतानाच या युद्ध
सरावाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे, हे मात्र नक्की.
--
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र
संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
माझे WhatsApp चॅनल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
--
Talisman Sabre 2025, warfighting exercise, Australia, IndoPacific, China, South China Sea, Countries, Iteration, India, Queensland,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा