माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण

नमस्कार,

आपणा सर्वांना सांगताना आणि आमंत्रित करताना आनंद होतो की, अरूणोदय या माझ्या पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल, गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजित केला आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान अभ्यासवृत्ती

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने २०२४ मध्ये मला अभ्यासवृत्ती देण्यात आली. एक लक्ष रूपयाची ही अभ्यासवृत्ती ज्यांना आजवर लाभली ते मराठी साहित्यातील आघाडीचे लेखक आहेत. या अभ्यासवृत्ती अंतर्गत अरूणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमा हा विषय मी निवडला. तेथे प्रत्यक्ष जाऊन अरूणोदय या कादंबरीचे मी लेखन केले. आता ही कादंबरी पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनाच्यावतीने मराठी साहित्यविश्वात येत आहे.

यांच्या हस्ते प्रकाशन
भारताच्या संरक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व आणि नवी दिल्लीतील लष्करी गुप्तहेर क्षेत्राचे तज्ज्ञ कर्नल विनायक भट आणि सेवानिवृत्त हवाईदल उपप्रमुख व्हाईस अडमिरल सुनील भोकरे यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

कर्नल भट यांच्याविषयी
कर्नल भट हे चिनी भाषा तज्ज्ञ आहेत. त्यामुळेच भारत-चीन यांच्यातील वाटाघाटींमध्ये ते दुभाषी म्हणून भूमिका बजावतात. तसेच, उपग्रहाद्वारे घेतल्या जाणाऱ्या छायाचित्रांचे विश्लेषण करणाऱ्या अत्यंत मोजक्या व्यक्ती आशिया खंडात आहेत. त्यापैकीच ते एक आहेत. भारत, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आदी देशांच्या सॅटेलाईट छायाचित्रांचे विश्लेषण करून कर्नल भट यांनी आजवर भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन सीमेवरील अनेक खळबळजनक बाबी उजेडात आणल्या आहेत. लष्करात असताना कर्नल भट यांनी तवांग परिसरात सेवा बजावली आहे. ते प्रथमच नाशिकला येत आहेत.

व्हाईस अडमिरल भोकरे यांच्याविषयी
व्हाईस अडमिरल सुनील भोकरे हे भारतीय नौदलाच्या अण्विक कमांडचे प्रमुख राहिले आहेत. नौदलात त्यांनी विविध प्रकारचे नेतृत्व केले आहे. अंदमानच्या सुमद्रात अनेक देशांसोबत झालेल्या सरावाचेही नेतृत्व त्यांच्याकडे होते. सध्या ते मद्रास आयआयटीमध्ये तज्ज्ञ व्याख्याते म्हणून कार्यरत आहेत. तसेच, भारत सरकारच्या अनेक सुरक्षा समित्यांमध्ये ते सक्रीय आहेत. व्हाईस अडमिरल भोकरे यांना त्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीबद्दल अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल आणि नौसेना मेडलने गौरविण्यात आले आहे. दोन्ही मान्यवरांचा संरक्षण क्षेत्रात अनेक दशकांचा अनुभव आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या यानिमित्ताने दोन्ही मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी सर्वांना मिळणार आहे.


या मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व लेखक सुरेश भटेवरा, कुसुमाग्रज प्रतिष्ठान अभ्यासवृत्तीचे प्रमुख प्रा. हर्षवर्धन कडेपूरकर, दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे, शंकराचार्य न्यासाचे विश्वस्त प्रमोद भार्गवे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सल्लागार व ज्येष्ठ लेखक लोकेश शेवडे, ज्येष्ठ लेखिका डॉ. वृन्दा भार्गवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कादंबरीत यावर प्रकाश

अरूणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमा भागाबाबत १९६२च्या अनुषंगाने मराठी साहित्यात पुस्तके प्रसिद्ध आहेत. शांतता काळातील कार्य आणि तवांग परिसरातील सद्यस्थितीवर मराठीमध्ये पुस्तक उपलब्ध नाही. भारतीय लष्कराच्या अरूणाचल प्रदेशातील कामकाज, तेथील भौगोलिक व हवामान स्थिती, शत्रूचे आव्हान, सैनिकांची दैनंदिन जीवनशैली यासह अनेक बाबींवर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आहे. या पुस्तकास कर्नल भट आणि व्हाईस अडमिरल भोकरे यांची प्रस्तावना लाभली आहे. अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या अरूण नावाच्या जवानाचा चित्तथरारक जीवनपट उलगडणारी ही कादंबरी आहे. ती वाचकाला खिळवून ठेवते.

प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू
पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी दिलीपराज प्रकाशनाकडून सुरू झाली आहे. २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी देण्यात आली आहे. वाचकांना येथे पुस्तकाचे बुकींग करता येईल. जे वाचक नोंदणी करतील त्यांना मार्चच्या पहिल्या आठवड्यात घरपोच पुस्तक मिळणार आहे. 
तसेच, बुकींग केलेल्या वाचकांना प्रकाशन समारंभाच्या ठिकाणी पुस्तक मिळू शकणार आहे.

कुसुमाग्रजांच्या जयंतीचे औचित्य
साहित्यश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांची २७ फेब्रुवारी रोजी जयंती आहे. याचदिवशी जगभरात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून अरूणोदय या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होत आहे.

आपणास आग्रहाचे निमंत्रण
अरूणोदय हे माझे पहिलेच पुस्तक आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास आपण उपस्थित रहावे, असे आग्रहाचे निमंत्रण मी आपणास देत आहे. कृपया त्याचा स्वीकार करावा.

धन्यवाद

भावेश ब्राह्मणकर
मुक्त पत्रकार व लेखक, नाशिक
मो. 9423479348


#bhavesh #brahmankar #marathi #book #arunoday #dilipraj #prakashan #literature #novel #fiction #arunachal #pradesh #india #china #border #defence #military #jawan #life #challenges #threat #indian #army #himalayan #region 


टिप्पण्या

  1. प्रिय भावेश, शिष्यवृत्ती मिळवण्यासाठीची धडपड,त्यानंतर तिचा योग्य वापर करुन मिळवलेली माहिती आणि ती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीची तळमळ यातून तयार झालेल्या तुझ्या पहिल्या आपत्त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !🌺🌺👌👌👍🏼👍🏼

    उत्तर द्याहटवा
  2. भावेशजी, तुमच्या कादंबरी प्रकाशन सोहळ्यास खूप खूप शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  3. सीमेपल्याडच्या नभाला स्पर्शुनी शब्द तुझा उगवला,
    अरुणाचलच्या पहाटेसंगे अनुभवांचा सूर्य उजळला।
    धैर्य, जिद्द आणि लेखणीची तुझी अविचल साथ,
    प्रत्येक पावलावर उमटली पत्रकारितेची मात॥

    थंडी, वारे, सीमारेषा - सगळ्यांशी संवाद साधला,
    डोळ्यांनी पाहिलेला सत्यकिरण पुस्तकात तू बांधला।
    “अरुणोदय” नव्हे केवळ ग्रंथ, तो तुझ्या स्वप्नांचा उद्गार,
    संघर्ष, अभ्यास, संवेदना यांचा तेजस्वी अवतार॥

    आज शब्दांच्या या पर्वाचा मंगल सोहळा साजरा,
    मैत्रीच्या मनातून तुला शुभेच्छांचा वर्षाव आज खरा।
    अशाच उंच भराऱ्या घेऊ दे लेखणीची पताका,
    यशाच्या नभात सदैव उजळो तुझ्या कर्तृत्वाची दिपिका॥

    हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल साहित्यप्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...

    डॉ.दिलीप कोठावदे, नाशिक

    उत्तर द्याहटवा
  4. प्रिय भावेश, कादंबरीचे शीर्षकच मोठ touchy आहे ,जरूर वाचेल.तुझं मनापासुन अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा . नानासाहेब पाटील , निवृत्त कार्यक्रम अधीकारी, आकाशवाणी.

    उत्तर द्याहटवा
  5. भावेशजी हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)

तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी (नवशक्ती)