जगभरातील निसर्ग वेडे (दिवाळी अंक - आनंद तरंग)

जगभरातील निसर्ग वेडे

निसर्गाशी नातं जोडणाऱ्या आणि केवळ परिसरातील रहिवाशीच नाही तर संपूर्ण जगासमोरच आदर्श निर्माण करणाऱ्या या निसर्गवेड्यांची ही यशोगाथा. अनेकांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आणि दीपस्तंभासारखी...

भावेश ब्राह्मणकर

चेन्नईचे बर्ड मॅन
जोसेफ शेखर हे चेन्नईतील कॅमेरा दुरुस्त करणारे व्यावसायिक. २००४ मध्ये त्सुनामीच्या वाताहतीमुळे पोपटाची एक जोडी शेखर यांच्या घरालगत घुटमळत होती. थकलेली आणि भूकेने व्याकूळ झालेल्या त्या जोडीकडे पाहून शेखर यांना थेट रडूच कोसळले. त्यांनी तातडीने तांदळाचे दाणे घेतले आणि त्यांच्यासमोर ठेवले. ती जोडी दाण्यांवर तुटून पडली. हे पाहून शेखर यांनी ठाम निश्चय केला तो पक्ष्यांना अन्न देण्याचा. दररोज पहाटे ते घराच्या गच्चीवर तांदळाचे दाणे टाकू लागले. त्या दोन पोपटांबरोबरच इतरही पोपट, कबुतर व पक्षी तेथे येऊ लागले. हे पाहून शेखर यांचा उत्साह वाढतच गेला. आता तर त्यांच्या गच्चीवर तब्बल ४ हजाराहून अधिक पक्षी दररोज जमतात. शेखर दररोज सकाळी साडेचार वाजता उठतात. तब्बल ६० किलो तांदूळ उकडवतात. हाच तांदूळ ते गच्चीवरील  लाकडी फळ्यांवर टाकतात. पक्षी यायला सुरुवात होते आणि पाहता पाहता संपूर्ण गच्चीच पक्ष्यांनी भरुन जाते. पोटभरुन ते दाणे खातात. गेल्या १८ वर्षांपासून अव्याहतपणे हे काम करीत आहेत. बाहेरगावी गेले तरी ते रात्री परत येतात फक्त पक्ष्यांसाठी. आपल्या उत्पन्नातील तब्बल ६० टक्के वाटा ते पक्ष्यांवर खर्च करतात. आता तर ते जखमी पक्ष्यांवर औषधोपचार करतात. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, जगभर त्यांच्या कार्यावर वृत्त आणि लेख प्रसारीत होत असतात.

बाली बेटावरच्या जिद्दी भगिनी
पर्यटनासाठी ख्यात असलेले बाली बेट हे इसाबेल आणि मेलाटी यांच्या प्रयत्नांमुळे चक्क प्लास्टिक मुक्त झाले आहे. मित्र-मैत्रिणींचा ग्रुप करुन त्यांनी दर आठवड्याला समुद्रकिनारा स्वच्छतेची मोहिम सुरू केली. बाय बाय प्लास्टिक असा नारा दिला, फेसबुक पेजही सुरू केले, सह्यांची मोहिम राबविली. विमानतळावर स्टॉल लावून तेथेही स्वाक्षरी घेतल्या. हजारो स्वाक्षरींचे पत्र त्यांनी गव्हर्नरला पाठवले. मात्र, प्लास्टिकचे प्रमाण कमी होत नव्हते. म्हणून त्यांनी गव्हर्नर ऑफिस बाहेर आंदोलन सुरू केले. अखेर बाली बेटाला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी गव्हर्नरने त्यांच्यासोबत सामंजस्य करार केला. टप्प्याटप्प्याने प्लास्टिक कसे हद्दपार करायचे याचा आराखडा तयार करण्यात आला. शाळा, कॉलेज, विविध संस्था, कार्यालये येथे जनजागृती करण्यात आली. दोन्ही बहिणींच्या लढ्याला यश आले. जगभरात ही वार्ता पसरली. दोन्ही बहिणींना विविध कार्यक्रम आणि व्याख्यानांसाठी बोलविले जाते. त्या आता चक्क सेलिब्रेटी झाल्या आहेत.

माफियांचा हस्तक ते वृक्ष संवर्धक
एखाद्या चित्रपटात शोभावा असा जीवनपट आहे सुमात्रा बेटावरील पर्योटो यांचा.  माफियांनी बेटावरील झाडांची कत्तल, लाकूड वाहतूक यांचा धंदा सुरू केला. पाहता पाहता मोठे जंगल नष्ट झाले. कामगार असलेल्या पर्योटोला माफियांनी बक्कळ पैसे देऊन जणू विकतच घेतलं. दोन वर्षे हैदोस चालला. एके रात्री तो पोलिसांना सापडला. जेलमध्ये राहिला. त्याला चूक उमगली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेतलं. त्याचं मनपरिवर्तन झालं. पर्योटोने कॉफीच्या शेतात मोलमजुरी सुरू केली. ह्यूमन राईटस वॉच, डब्ल्यूडब्ल्यूएफ या संघटनांनी जंगल रक्षणासाठी जनजागृती सुरू केली. पर्योटोसह अनेक कामगार सहभागी झाले. कॉफीचे शेत आणि त्यालगत घनदाट झाडी यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात जैविक विविधता बहरली. त्याचे संगोपनही होऊ लागले. व्यवसाय वाढल्याने कॉफीची निर्यात सुरू झाली. यामुळे आर्थिक सुबत्ता येऊ लागली. पाहता पाहता वृक्ष संवर्धनाचे मोठे कार्य साकार झाले. सरकारनेही त्यास बळ दिले. नदीवर छोटा जलविद्युत प्रकल्प ग्रामस्थांनी साकारला. त्याची वीज गावातील घरांमध्ये वापरली जात आहे. सुमात्रा कॉफी निर्यातीत जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहचला. प्रवाहाच्या विरोधात पोहून पर्योटोसह कामगारांनी मोठे परिवर्तन घडविले आहे. हजारो झाडे आणि मौलिक जैविक विविधता वाढण्यात त्यांचा मोठा वाटा आहे

खत्री दाम्पत्य आणि देवाची बाग
अफझल आणि नुसरत खत्री हे तसं सुखी दाम्पत्य. पण, अमेरिकेतून ते भारतात परतले. मुंबईत त्यांनी भंगाराच्या जागेत बायोडायव्हर्सिटी पार्क साकारला. शेकडो पक्ष्यांसाठी नंदनवन खुलं केलं आहे. त्याशिवाय शहरातील कचऱ्याची डोकेदुखीही चपखलपणे हाताळून त्यांनी वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. मुंबईच्या समतानगरमधील सोसायटीच्या परिसरात स्वच्छतेचे काम सुरू केले. जवळपास टनभर कचरा ते महापालिका कर्मचाऱ्यांना देऊ लागले. पोलिस स्टेशनच्या मागील दीड एकर जागा हिरवीगार करण्यासाठी त्यांनी पोलिसांच्या साथीने प्रयत्न केले. भंगार, जुनी वाहने आणि कचऱ्याने ती जागा भरलेली होती. खत्री दाम्पत्य जोरदार कामाला लागले. त्यांच्या मदतीला पोलिस, विद्यार्थी, रहिवासी आले. महिन्याभरात जागा स्वच्छ झाली. तेथे वृक्ष लागवड आणि संगोपनाचा ध्यास खत्री दाम्पत्याने घेतला. कुणी रोपे, कुणी विटा, कुणी माती आणली. पाहता पाहता दीड एकर वृक्षराजीने बहरला. घनदाट झाडी, फुलपाखरे, पक्षी, प्राणी आदींची रेलचेल सुरू झाली. पहाटे किंवा सायंकाळी तेथे अनेक जण येऊ लागले. त्या जागेचे नामकरण देवाची बाग झाले. कंपोस्ट खतही तेथे तयार केले जाऊ लागले. स्थानिक कचऱ्याचे तेथे विघटन होऊ लागले. गांडूळ खत प्रकल्पही सुरू झाला. 

फॉरेस्ट मॅन
उजाड आणि वाळवंटासारख्या भागावर त्याने वृक्षारोपणाला सुरुवात केली. एकट्याच्या जीवावर त्याने थोडेथोडके नाही तर तब्बल ५५० हेक्टरवर घनदाट जंगल साकारले आहे. वाघ, हत्ती, गेंडे यासह वन्यजीवांचा आता या जंगलात चांगलाच राबता आहे. विशेष म्हणजे, वनविभागालाही या जंगलाची आणि त्या व्यक्तीची अनेक वर्षे माहिती नव्हती. फॉरेस्ट मॅन म्हणून ओखल्या जाणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे जादव पायेंग. ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात आसाममध्ये माजुली या बेटावर त्यांनी चमत्कारच घडविला आहे. महापुरामुळे हे बेट ओसाड बनले. शेकडो साप कडाक्याच्या उष्णतेमुळे मृत्यूमुखी पडल्याचे पाहून जादेव यांचा जीव हेलावला. त्यानंतर त्यांनी घरचा गोपालनाचा व्यवसाय सांभाळून या बेटावर वृक्षारोपण आणि झाडांचे संगोपन करण्याचा विडा उचलला. निर्जन भागात रोपे जगणे तसे अवघड. पण, त्यांनी हार मानली नाही. हळूहळू रोपे उगवत गेली. अथक मेहनतीने बेट हिरवेकंच झाले. तेथे बहुविध प्रकारची जौविक विविधताही नांदते आहे. वाघांपासून अनेक वन्यजीव बागडत आहेत. अरुणा छपोरी या गावापरिसरात हत्तींकडून शेतपिकांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वनविभागाकडे आल्या. त्याची शहानिशा करायला गेलेल्या वन कर्मचाऱ्यांना या जंगलाचा शोध लागला. बंगाली वाघ, हरिण, गिधाडे, एक शिंगी गेंडे, हत्ती आदी वन्यप्राण्यांचा तेथे वावर आहे. स्थानिक आदिवासी ग्रामस्थांना घेऊन आता हे जंगल टिकविण्याचे काम सुरू आहे. २०१५ मध्ये जादव यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एखाद्या चित्रपटात शोभेल असेच जादव यांचे कार्य आहे. त्यांच्यावरील लघुपटाचा जगप्रसिद्ध कान्स महोत्सवात गौरव झाला आहे. जादव यांच्या कार्याची महती सांगणारी लहान मुलांसाठीची पुस्तकेही लोकप्रिय झाले आहेत. कुठल्याही फळाची किंवा लाभाची अपेक्षा न करता त्यांनी केलेले हे काम आदिवासी बांधवांसह संपूर्ण जगालाच प्रेरणा देणारे ठरले आहे.

आयआयटीचे प्राध्यापक ते थेट आदिवासी
आयआयटीत शिक्षण आणि अमेरिकेत पीएचडी मिळविलेली व्यक्ती रस्ता, वीज नसलेल्या आदिवासी भागात कुर्ता आणि धोतर घालून राहत असल्याचं सांगितलं तर त्यावर विश्वास बसेल? वडील आयआरएस (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस) मध्ये उच्च अधिकारी, आई दिल्ली विद्यापीठात फिजिक्सच्या प्राध्यापिका आणि भाऊ आयआयटी दिल्लीमध्ये प्राध्यापक अशा कुटुंबात जन्मलेले आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासारख्या शिष्यांना घडविणारे व्यक्तिमत्व आहे आलोक सागर. आदिवासींचे जीवनमान उंचावणे आणि निसर्गाची पूजा करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. दिल्ली आयआयटीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर संशोधनासाठी ते अमेरिकेच्या ह्यूस्टनमधील राईस विद्यापीठात गेले. पीएचडी प्राप्त करुन ते भारतात परतले. दिल्ली आयआयटीत प्राध्यापक म्हणून रुजू झाले. काही वर्षांनी अचानक त्यांनी राजीनामा देत घर सोडले. मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्याच्या आदिवासी दूर्गम भागात ते आले. वीज, रस्ते आणि अन्य कुठल्याही सुविधा नसणाऱ्या कोचामू गावात आले. सकाळी उठून भटकायचे, देशी झाडांची, वाणांची लागवड करायची आणि आदिवासी बांधवांना मदत करणे, त्यांच्या अडी-अडचणी सोडविणे सुरू केले. आदिवासी बांधवांप्रती त्यांचा स्नेह जुळला. आदिवासींची बोली, भाषा ते शिकले.  पांढरी मोठी दाढी, डोक्यावर वाढलेले केस आणि धोतर नेसलेले आलोक आदिवासीच वाटू लागले. तीन कुर्ते, धोतर आणि सायकल एवढीच त्यांची मालमत्ता आहे. स्वतःची ओळख ते कुणालाही देत नाहीत. आदिवासींचे शिक्षण, झाडांचे संगोपन आणि देशी वाणांची लागवड यातच त्यांना रस आहे. पन्नास हजाराहून अधिक झाडे त्यांनी लावली आहेत. तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासींना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी ते आग्रही आहेत. जंगल रहावे यासाठी ते आदिवासींचे संघटन करीत आहेत.

--

bhavbrahma@gmail.com

पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पत्रकार. मो. 9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

Please Follow me on :

WhatsApp Channel  - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

Facebook   - www.facebook.com/BhaveshBrahmankar

X (Twitter)  - www.twitter.com/BhavBrahma

Instagram   - https://www.instagram.com/bhavbrahma

Blog            - https://bhavbrahma.blogspot.com/

--

Environment, Conservation, Forest, Success Story, Positive, efforts, biodiversity, Protection, Green Worriers,  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)

तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी (नवशक्ती)