असा झाला अरुणोदय पुस्तकाचा जन्म (साधना साप्ताहिक)
नवविवाहित सैनिक अरुणची नियुक्ती अरुणाचल प्रदेशातील सीमेवर होते. त्यानंतर त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना कसे अनुभव येतात , आजच्या अत्याधुनिक काळातही सीमेवर प्रत्यक्ष स्थिती काय आहे , शत्रू राष्ट्र चीनच्या तुलनेत भारताची संरक्षण सिद्धता किती आणि कशी आहे , भारतीय सैन्य विविध आव्हानांवर कसे मात करतात , अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सैन्याला किती मदत होत आहे , टेलिफोन आणि विजेशिवाय सैन्याला कुठकुठल्या अडचणींना तोंड द्यावे लागते , देशरक्षणात कुठल्या बाधा येतात या साऱ्यांचा उलगडा वाचकांना या कादंबरीत होतो. भावेश ब्राह्मणकर २०१८ मध्ये माझ्या जीवनात एक महत्वाची घटना घडली. संरक्षण मंत्रालयाच्यावतीने माझी निवड ‘डिफेन्स करस्पॉन्डन्स कोर्स’ (डीसीसी) साठी झाली. या कोर्स अंतर्गत अरुणाचल प्रदेशातील लुम्पो आणि बुमला या भारत-चीन सीमेवरील संरक्षण तळांवर जाण्याचा प्रत्यक्ष योग मला आला. पत्रकार या नात्याने संरक्षण क्षेत्राशी संबंधित बातम्यांचे वार्तांकन करताना अशा प्रकारे थेट सीमेवर जाता आल्याने तेथील खरी स्थिती समजून घेता आली. अत्यंत खडतर, आव्हानात्मक आणि प्रतिकूल अशा वातावरणातील भारतीय जवानांचे अन...