असा झाला अरुणोदय पुस्तकाचा जन्म (साधना साप्ताहिक)
नवविवाहित सैनिक अरुणची नियुक्ती अरुणाचल प्रदेशातील सीमेवर होते. त्यानंतर त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना कसे अनुभव येतात, आजच्या अत्याधुनिक काळातही सीमेवर प्रत्यक्ष स्थिती काय आहे, शत्रू राष्ट्र चीनच्या तुलनेत भारताची संरक्षण सिद्धता किती आणि कशी आहे, भारतीय सैन्य विविध आव्हानांवर कसे मात करतात, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सैन्याला किती मदत होत आहे, टेलिफोन आणि विजेशिवाय सैन्याला कुठकुठल्या अडचणींना तोंड द्यावे लागते, देशरक्षणात कुठल्या बाधा येतात या साऱ्यांचा उलगडा वाचकांना या कादंबरीत होतो.
भावेश ब्राह्मणकर
२०१८ मध्ये माझ्या जीवनात एक महत्वाची
घटना घडली. संरक्षण मंत्रालयाच्यावतीने माझी निवड ‘डिफेन्स करस्पॉन्डन्स कोर्स’
(डीसीसी) साठी झाली. या कोर्स अंतर्गत अरुणाचल प्रदेशातील लुम्पो आणि बुमला या
भारत-चीन सीमेवरील संरक्षण तळांवर जाण्याचा प्रत्यक्ष योग मला आला. पत्रकार या
नात्याने संरक्षण क्षेत्राशी संबंधित बातम्यांचे वार्तांकन करताना अशा प्रकारे थेट
सीमेवर जाता आल्याने तेथील खरी स्थिती समजून घेता आली. अत्यंत खडतर, आव्हानात्मक
आणि प्रतिकूल अशा वातावरणातील भारतीय जवानांचे अनोखे विश्व तेथे दिसले. चीनसारख्या
कुख्यात आणि शेजारी राष्ट्राबरोबरच तेथील भौगोलिक स्थिती आणि हवामानाशी असलेली
जवानांची झुंज माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहिली, अनुभवली. कडाक्याच्या गारठ्यात आणि
काळ्याकुट्ट अंधारात जवानांसोबत सीमेवर थरारक पेट्रोलिंग करण्याची संधीही मिळाली. शब्दातीत
असे प्रसंग आणि अनुभवांचे संचित मिळाल्याने मी अक्षरशः भारावून गेलो.
संरक्षण क्षेत्र आणि खासकरून
सीमाभागातील स्थितीविषयी इंग्रजी पत्रकार लिखाण करतात. इंग्रजी माध्यमांमध्ये ते प्रसिद्ध
होते. पण मराठीचे काय? असा
प्रश्न मला सतावत होता. यासंदर्भात काही तरी ठोस केले पाहिजे, असा निश्चय मी
केला, पण काय आणि कसे
करावे, हे काही उमगत
नव्हते. दिवाळी अंकात ३-४ हजार शब्दांचा लेख लिहावा की आणखी काही करावे असा सतत
विचार सुरू होता. अखेर २०२४ मध्ये एक नामी संधी चालून आली.
‘कुसुमाग्रज
प्रतिष्ठान’च्यावतीने संशोधनात्मक आणि सर्जनशील लेखनाला अभ्यासवृत्तीद्वारे पाठबळ
दिले जाते आणि त्याची अर्ज प्रक्रिया सुरू असल्याचे समजताच ‘अरुणाचल’ मनात पिंगा
घालू लागला. मराठी साहित्यात अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेसंदर्भात फार लिखाण
झालेले नसल्याचेही आढळून आले. जे लेखन आहे ते सुद्धा केवळ १९६२ च्या युद्धाच्या
अनुषंगाने. त्यामुळे या अभ्यासवृत्तीसाठी अर्ज करून ‘अरुणाचल’चा विषय हाताळण्याचा
निश्चय केला. १ ऑगस्ट २०२४ रोजी अधिकृतपणे अभ्यासवृत्ती जाहीर झाल्याचे वृत्त
माध्यमांमध्ये झळकले. अभिनंदनाचा वर्षाव सुरू असतानाच जबाबदारीची जाणीव स्वस्थ बसू
देत नव्हती. मराठी साहित्यातील बोमदिला आणि रारंगढांग या दोन कादंबऱ्या अरुणाचल
मधील सैन्य स्थितीवर आधारीत असल्याचे मला दिसल्या. युद्धाव्यतिरीक्त शांतता
काळातील सैन्याचे कामकाज, आव्हाने आणि तेथील अकल्पनीय स्थिती यावर मराठी साहित्यात
फारसा प्रकाश टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे यास कादंबरीद्वारे शब्दरूप देण्याचे मी
अंतिम केले.
कादंबरी लिखाणासाठी पुन्हा एकदा
अरुणाचल सीमेवर जाण्याचे नियोजन करू लागलो. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी
आवश्यक होती. त्याअनुषंगाने पत्रव्यवहार कुणाशी आणि कसा करायचा याचे मार्गदर्शन
जाणकारांकडून घेतले. परवानगी मिळण्यास साधारण एक-दोन महिने लागतील, आणि त्यानंतर
लगेच जायचे तर ‘अरुणाचल’मध्ये बर्फवृष्टीमुळे सीमावर्ती भागात जाणे शक्य नसते.
परिणामी, बर्फवृष्टी
(हिवाळा) नंतर म्हणजे मार्च अखेरीस किंवा एप्रिल ते मे हा कालावधी योग्य असल्याचे
कळून चुकले. संरक्षण विभागाकडे अर्ज करायचा तर त्यासाठी त्यांना अत्यंत सूक्ष्म
नियोजन देणे गरजेचे होते. महिनाभर किंवा त्याहून अधिक काळासाठी लष्कराकडून परवानगी
मिळणार नसल्याचे संकेत मिळाले. त्यामुळे नाशिकहून तेथे जाणे, राहणे व तेथून
पुन्हा नाशिकला परतणे याचा विचार करून १५-२० दिवसांचे नियोजन केले. अर्जात
प्रत्येक दिवस व ठिकाणांचे सविस्तर वर्णन केले.
राजधानी नवी दिल्लीतल्या साऊथ
ब्लॉकमध्ये संरक्षण मंत्रालयाचे कार्यालय आहे. तेथील लष्कराच्या सार्वजनिक माहिती
संचालनालयाकडे (एडीजीपीआय) अर्ज केला. हा विभाग लष्कराच्या गुप्तहेर (आर्मी
इंटेलिजन्स) विभागाशी संलग्न आहे. लिखित स्वरूपातील अर्ज ऑगस्ट महिन्यातच मेल आणि
पोस्टाने पाठविला, पण त्याचे कुठलेही उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे अस्वस्थता वाढत होती.
यासंदर्भात पुण्यातील लष्कराच्या दक्षिण कमांड कार्यालय आणि दिल्लीतील साऊथ
ब्लॉकच्या कार्यालयात भेट दिली. त्यानंतर प्रस्तावाला अगदी थोड्या प्रमाणात चालना
मिळत होती. पण हाती काही लागत नव्हते. डिसेंबर महिना लोटला तरी मंजुरी मिळाली
नाही. नवीन वर्ष उजाडताच पुन्हा एकदा दोन्ही ठिकाणी भेटी दिल्या. अखेर लष्करी
गुप्तहेर विभागाकडून हालचाली सुरू झाल्या. फोनवरून माझ्याकडे, माझ्याशी निगडित
काही व्यक्ती, नाशकातील
काही मान्यवर, पुण्यातील
काही जाणकार यांच्याकडे चौकशी झाली. त्यानंतर मला पुण्यात प्रत्यक्ष भेटायला येण्याचे
सांगण्यात आले. तेथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात रंगलेल्या गप्पांतून ही माझी
कसून चौकशी असल्याचे कळून चुकले. त्यानंतर दिल्लीत माझ्यासाठी शिफारस गेल्याचेही
कळाले. मग, दिल्लीतून
पुन्हा फोनवर चौकशी सुरू झाली. ‘तुम्हाला का जायचे आहे?’ ‘तिथे काय करायचे
आहे?’ ‘परवानगीची गरज
का आहे?’ हे प्रश्न
वारंवार विचारतानाच ‘पर्यटक आणि सर्वसामान्य नागरिक जातात त्या भागात तुम्ही जाऊ
शकता,’ असे सूचित केले
जाऊ लागले.
१६ मार्चला नाशिकहून निघायचे असताना
प्रत्यक्षात फेब्रुवारीतही मंजुरीचे पत्र हाती नव्हते. परिणामी, मी फारच बैचेन
झालो. गेल्या १०-१२ वर्षांपासून संरक्षण पत्रकारिता करीत असल्याने आणि दिल्लीत दै.
लोकमतसाठी वार्तांकन करण्याचा अनुभव गाठी असल्याने संरक्षण क्षेत्रात माझ्या ओळखी
प्रस्थापित झाल्या आहेत. त्यामुळे मी या सर्व संबंधित आणि वरिष्ठांना (अगदी
खासगीतही) फोन, त्यांचा
सल्ला, मार्गदर्शन घेणे
सुरू केले. ही मात्रा लागू पडली. अगदी दिवसागणिक लष्कराचे विविध अधिकारी फोन करून
परवानगी पत्राबाबात चौकशी करू लागले. अखेर ज्याची कल्पना केली नव्हती तेच झाले.
लष्कराने नकारघंटा वाजवली. संरक्षण पत्रकारिता करणाऱ्या आणि मंत्रालयाचाच डिफेन्स
करस्पॉन्डन्स कोर्स पूर्ण केलेल्या व्यक्तीलाही परवानगी नाकारणे अतिशय दुःखद
वाटले. विशेष म्हणजे, २०१८ मध्ये डिफेन्स कोर्सवेळी आम्हा पत्रकारांना सांगण्यात आले होते
की, ‘तुम्हाला संशोधन
वा अभ्यास करायचा असेल, पुस्तक लिहायचे असेल, चित्रपट किंवा माहितीपट साकारायचा असेल तर आमच्याकडे अर्ज करा. आम्ही
नक्की तुम्हाला परवानगी देऊ,’ प्रत्यक्षात वेगळाच अनुभव येत होता.
‘अरुणाचल’ला
विनापरवानगी जाणे योग्य नसल्याने अन्य पर्यायांची युद्ध पातळीवर चाचपणी सुरू केली.
अवघ्या १५ ते २० दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाही तेथील राहणे, जेवण आणि फिरणे
याबाबत काहीच अंतिम झाले नव्हते. ‘अरुणाचल’चे राज्यपाल लेफ्टनंट जनरल कैवल्य
पारनाईक यांच्याकडून परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यालयातील
त्यांचे सचिव आयपीएस अधिकारी शरद दराडे यांच्याशी संपर्क केला. योगायोगाने ते
नाशिकच्या मखमलाबाद येथीलच आहेत. ‘आपण प्रत्यक्ष या. मी नक्की मदत करेन,’ असे त्यांनी
फोनवरून आश्वस्त केले. परिणामी बॅगा भरून सज्ज केल्या. १६ मार्चला नाशिकहून
गुवाहाटी गाठले. तेथे कामाख्या मातेचे दर्शन करून अभ्यास दौरारंभ केला. राजधानी
इटानगर मधील राजभवनात जाऊन श्री. दराडे यांची भेट घेतली. लष्कराची परवानगी
नसल्याने सीमावर्ती भागात जाणे फार अवघड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यपाल
अमेरिका दौऱ्यावरून त्याच दिवशी परतल्याने त्यांची भेटही शक्य नव्हती. अखेर लष्करी
अभ्यास परवान्याविना तवांग गाठण्याचे निश्चित केले. आता पुढे कसे होणार? परवानगीच नाही म्हटल्यावर कादंबरी
लिखाणासाठी आवश्यक माहिती कशी मिळेल? या प्रश्नांनी मी अस्वस्थ झालो.
भल्या पहाटे इटानगरहून तवांगकडे
निघालो, पण कुठे जायचे? कुठे रहायचे? काय करायचे? याचाच सतत विचार सुरू होता. विशेष म्हणजे, अरुणाचल प्रदेश हे
संवेदनशील राज्य असल्याने तेथे प्रवेश करण्यासाठी परवाना घ्यावा लागतो. तो नसेल तर
पोलिस किंवा सुरक्षा यंत्रणा या थेट अरुणाचलच्या सीमेबाहेर आणून सोडतात.
टॅक्सीचालकाने तशी माहिती दिली. माझ्याकडे परवाना नसल्याचेही मी सांगितले. त्याची
धाकधुक वाढली. कारण, रस्त्यात सुरक्षा यंत्रणांकडून वाहनांची तपासणी ठिकठिकाणी
होते. तेथे प्रवासी, पर्यटक यांच्याकडे असलेल्या परवान्याची पडताळणी केली जाते.
ज्यांच्याकडे परवाना नाही त्यांची कसून चौकशी केली जाते, परवाना का घेतला नाही
याची विचारणा होते. तसेच, योग्य व्यक्तींना परवाना देण्याची प्रक्रिया तेथे केली
जाते मात्र ते वेळखाऊ आहे. त्यामुळे इतर प्रवाशांना ताटकळत रहावे लागेल,
टॅक्सीचालक आणखी चिंतेत पडला. अखेर त्याने काही तरी जुगाड केला. ‘सुरक्षा चौकी आली की टॅक्सीतून बाहेर
जास्त बघायचे नाही’, ‘टॅक्सीच्या खाली उतरायचे नाही’, ‘विचारणा झाली तर परवाना असल्याचे सांगायचे’, अशा सूचना तो भराभर देऊ लागला. माझीही छाती धडधड करू लागली. पहिल्याच
चौकीवर टॅक्सी फार वेळ थांबली नाही. त्यामुळे मी सुस्कारा सोडला. मात्र, दुसऱ्या
चौकीवर बराच वेळ टॅक्सी थांबली. आता परवाना अडचणीत आणणार या विचारानेच कडाक्याच्या
थंडीत मला घाम फुटला. बाहेर डोकवायचे नसल्याने नेमके काय सुरू आहे ते सुद्धा कळत
नव्हते. टॅक्सीतील अन्य प्रवासी अरूणाचल मधीलच होते. त्यांच्याशी काही बोलावे का हा
संभ्रम होता. अखेर शांत बसून राहिलो. साधारण अर्ध्या तासाने ड्रायव्हर लगबगीने
आला. आपण जणू जग जिंकून आलो आहोत, असा त्याचा आविर्भाव पाहून माझा जीव भांड्यात
पडला. ‘साहबजी, कुछ टेन्शन नही’, असे माझ्याकडे पाहत तो म्हटला आणि सीटवर
बसून त्याने टॅक्सी सुरू केली. पर्वत, घाट, खोल दऱ्यांच्या मार्गाने टॅक्सी
तवांगकडे धावू लागली. रस्त्यात अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क नव्हते. याच दरम्यान
माझी फोनाफोनी सुरू होती तवांगसाठी.
कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद
केंद्राच्यावतीने ‘अरुणाचल’मध्ये गेल्या अनेक दशकांपासून समाजकार्य केले जाते. नाशिकमधील
ज्येष्ठ पत्रकार अरुण खोंडे यांच्या माध्यमातून मी तवांग येथील स्वामी विवेकानंद
केंद्राच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात यशस्वी झालो. केंद्राच्या राष्ट्रीय
पातळीवरील पदाधिकाऱ्यांशीही बोलणे झाले. त्यांनी सहकार्याचे आश्वासन दिल्याने मला
हायसे वाटले. तवांग केंद्राचे प्रमुख रिकीन नोर्बू यांच्या सूचनेनुसार तवांग शहरात
उतरलो. ते स्वतः त्यांची कार घेऊन आले. मला थेट केंद्राच्या कार्यालयातच आणले. मला
वाटले की, ते कार्यालय आणि केंद्राचे कामकाज सांगू इच्छितात. पण, त्यांनी कारमधून भले
मोठे ब्लँकेट आणि पाणी गरम करण्यासाठीची केटल आणली. कार्यालयातीलच एका रुममध्ये
माझी निवास व्यवस्था केल्याचे सांगून ते भराभर माहिती देऊ लागले. हे सारे पाहून मी
अचंबितच झालो. मी नाशिकचा, ते तवांगचे. अभ्यासाच्या निमित्ताने मी आलो आणि त्यांनी
माझी एवढी व्यवस्था करावी, हे पाहून सुखद वाटले आणि मनोमन म्हटले की, भगवंतच
माझ्या मदतीसाठी धावून आला आहे. मला निरोप देऊन ते गेले. ‘काही मदत हवी असेल तर केव्हाही फोन करा’, असे आवर्जून सांगितले. ही सारी मदत आणि आपुलकी पाहून माझ्या अंगातील
रक्त भराभरा पळू लागले. कडाक्याच्या थंडीतही मला उबदार वाटले. निवासाचा प्रश्न
मिटला. भोजनासाठी वरच्या मजल्यावर हॉटेल आहे. आता उरले होते ते लष्करी कार्य जाणून
घेण्याचे. त्यानुषंगाने मी प्रयत्न सुरू केले.
दुसऱ्या दिवशी तातडीने जिल्हाधिकारी
कार्यालय गाठले. १५ दिवसांचा परवाना घेतला आणि माझे संशोधन कार्य सुरू केले. ‘अरुणाचल’मध्ये
शाकाहारी व्यक्तींना जेवणाची मोठी अडचण होते तसेच बर्फवृष्टीमुळे काही दिवस
रूमबाहेर पडणेही अवघड होते. ही बाब लक्षात घेऊन माझे प्रिय मित्र व ज्येष्ठ
सामाजिक कार्यकर्ते श्री. रवींद्र अमृतकर यांनी सोलापूरच्या कोरड्या भाकरी आणि
शेंगा चटणी हा शिधा सोबत दिला होता. संपूर्ण दौरा आणि अभ्यास कार्यात त्यांनी
विविध प्रकारे मोलाची मदत केली. १५ दिवस मी तवांग आणि बुमला परिसरात अभ्यास दौरा
संपन्न केला. तवांगमध्ये शून्य अंश सेल्सिअसच्या आसपास असलेले तापमान, पाऊस आणि गारठा
या हवामानाने चांगलीच परीक्षा पाहिली, पण त्यात मी उत्तीर्ण झालो. लष्कराची
मराठा बटालियन योगायोगाने तवांगला होती. त्याची खूप मदत झाली. भरपूर अभ्यास करता
आला. सैनिकांशी खुप गप्पा केल्या. अपेक्षित माहिती मी त्यांच्याकडून गप्पांमध्येच जाणून
घेत होतो. शरीर व मनाने चांगली साथ दिल्याने गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री नाशकात
सुखरूप दाखल झालो.
अरुण नावाच्या जवानाची शौर्यगाथा आणि
त्याच्या संघर्षमय जीवनाचा पट मांडणाऱ्या कादंबरीचे लिखाण वेगात सुरू केले. तवांगला
जाण्यापूर्वीच काही भाग लिहिला होता. त्यापुढील काम झपाट्याने करू लागलो. एक
प्रकरण लिहिले की ते वाचायचे. त्यात बदल करायचे. पुढचे प्रकरण लिहायचे त्यानंतर
आधीचे प्रकरण पुन्हा एकदा वाचायचे. बऱ्याचदा ते प्रकरण नव्याने लिहून काढायचे असा
क्रम सुरू झाला. तसे पाहता मी प्रत्यक्षात कितीदा लिहीले, किती वेळा डिलीट केले, कित्येक
वेळा त्यात सुधारणा केल्या हे काही सांगता येणार नाही. मी जे काही लिहायचो ते
सर्वप्रथम माझी पत्नी सौ. अश्विनी हिला वाचण्यासाठी द्यायचो. वाचक या नात्याने ती
बऱ्याच सुधारणा सांगायची, प्रश्न विचारायची यातून मला अनेक बाबी कळत गेल्या. हा
सारा खटाटोप करून लेखनाचा अंतिम मसूदा निश्चित केला. कुसुमाग्रज अभ्यासवृत्तीचे
प्रमुख प्रा. हर्षवर्धन कडेपूरकर यांच्याकडे प्रिंट जमा केली. दोन दिवसांनी
त्यांच्या भेटीचा निरोप आला. त्यांच्याकडे पाहूनच मला लक्षात आले की, त्यांना
लिखाण पसंत पडलेले नाही. ‘लिखाणासाठी घेतलेले कष्ट आणि हेतू याबद्दल शंका नाही पण ही कादंबरी
वाटत नाही’,
असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारितेच्या शिक्षणापासूनच माझ्या मार्गदर्शक
असलेल्या प्रा. डॉ. वृन्दा भार्गवे यांना मी हा मसुदा दाखवला. ते वाचून प्रारंभी
त्या काहीशा रागावल्या पण त्यात नेमके काय नाही आणि काय हवे हे त्यांनी अत्यंत स्पष्टपणे
मला सांगितले. या सर्व चुका मला उमगल्या. विशेष म्हणजे, ही कादंबरी मला
पहिल्यापासून पुन्हा लिहायची आहे, याची जाणिव झाली. घरी येऊन मी जणू स्वतःला या
कादंबरीत झोकून दिले. पहिल्यापासून शेवटपर्यंत सारे बदल करून लेखन अंतिम केले. पुन्हा
दोनदा वाचून त्यातील बारीक सारीक तपशील आणि अन्य बाबी तपासल्या. डॉ. भार्गवे यांना
पुन्हा दाखविल्यानंतर त्या खुश झाल्या. श्रीमती सुषमा देशपांडे यांनी मुद्रित शोधन
केल्यानंतर ही कादंबरी प्रतिष्ठानकडे सुपूर्द केली.
मराठी साहित्याला मोठ्या उंचीवर
नेणारे, ज्यांच्या
वास्तव्याने नाशिक जगभर ख्यात आहे आणि ज्यांचे नाव मी लहानपणापासूनच आदराने घेतले
असे साहित्यश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या नावे असलेल्या
प्रतिष्ठानच्यावतीने अभ्यास, प्रवास, वाचन आणि लेखनाची अत्युच्च संधी प्राप्त झाली, याबद्दल मी
स्वतःला भाग्यशाली समजतो. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष, सर्व विश्वस्त, पदाधिकारी आणि
अभ्यासवृत्तीचे प्रमुख यांनी माझ्यावर विश्वास दाखविला. अभ्यास दौरा आणि
कादंबरीच्या निर्मितीत असंख्य जणांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. खासकरून मला
सतत मार्गदर्शन करणारे, प्रेरणा देणारे आणि प्रत्येक वेळी खंबीरपणे पाठिशी उभे राहणारे
ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, ज्येष्ठ लेखक लोकेश शेवडे, शंकराचार्य न्यासाचे विश्वस्त व सुजाण
वाचक प्रमोद भार्गवे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. स्वामी विवेकानंद केंद्र
आणि त्यांचे पदाधिकारी यांच्या भक्कम पाठबळामुळेच अरुणाचल दौरा सुफल संपूर्ण होऊ
शकला. ख्यातनाम दिलीपराज प्रकाशनाने ही कादंबरी मराठी साहित्यात आणण्याचा निर्णय
घेतला. माझ्या लेखनाची प्रथम वाचक आणि सर्व कार्यात भक्कमपणे सोबत असणारी माझी
अर्धांगिनी सौ. अश्विनी, सतत प्रेरणा देणारे आदरणीय पिताश्री, गुरूंप्रमाणे दिशादर्शन करणारे
ज्येष्ठ बंधू श्री. नितीन (आबा), आपुलकीचे पाईक असणारे भ्राता श्री. अनंत (बापू) आणि माझ्या सर्व
कार्यात हिरिरीने सहभागी होतानाच मला ऊर्जा देणारी कन्या कु. आभा या सर्वांमुळे
माझा अभ्यास आणि लेखन कार्य सुफळ संपूर्ण झाले.
अरुण या सैनिकाच्या कथानकाला आणि
लेखनाला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे. नवविवाहीत अरुणची अरुणाचल
प्रदेशातील सीमेवर नियुक्ती होते. त्यानंतर त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना कसे
अनुभव येतात, आजच्या अत्याधुनिक काळातही सीमेवर प्रत्यक्ष स्थिती काय आहे, शत्रू
राष्ट्र चीनच्या तुलनेत भारताची संरक्षण सिद्धता किती आणि कशी आहे, भारतीय सैन्य
विविध आव्हानांवर कसे मात करतात, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सैन्याला किती मदत होत
आहे, टेलिफोन आणि विजेशिवाय सैन्याला कुठकुठल्या अडचणींना तोंड द्यावे लागते, देशरक्षणात
कुठल्या बाधा येतात या साऱ्याचा उलगडा वाचकांना या कादंबरीत होतो. या कादंबरीकडे
प्रेमकथा, वीरकथा, युद्धकथा, साहसकथा, देशभक्ती म्हणूनही पाहता येईल. अरुणाचल मधील
विविध ठिकाणांची माहिती देणारे प्रवासवर्णन, सैन्य आणि सैनिक कुटुंबातील वास्तव
यांचे पदर उलगडणारीही आहे. प्रख्यात आर्टिस्ट श्रीपाद बाळकृष्ण (श्रीबा) यांनी
अत्यंत उत्कृष्ट आणि समर्पक असे मुखपृष्ट रेखाटून कादंबरीला एका वेगळ्या उंचीवर
पोहचवले आहे.
संरक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व
आणि उपग्रहचित्र विश्लेषक कर्नल (नि) विनायक भट यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या
जयंतीदिनी (२७ फेब्रुवारी) या कादंबरीचा प्रकाशन सोहळा नाशिकमध्ये संपन्न झाला.
(नि) व्हाईस अडमिरल सुनिल भोकरे आणि कर्नल भट सरांची प्रस्तावना कादंबरीस प्राप्त
झाली आहे. याद्वारे त्यांनी कादंबरीच्या गुणवत्तेबद्दल भाष्य केले आहे. अल्पावधीतच
ही कादंबरी वाचकांना भावल्याचे दिसून येते आहे. ज्या प्रकारची आव्हाने आणि
परिस्थिती ‘अरुणाचल’मध्ये आहे ती कल्पनातीतच म्हणावी लागतील. भारत-चीन सीमेवर २०२५
पर्यंत असलेले वास्तव या कादंबरीत वाचकांना उपलब्ध झाले आहे. पण त्यात काही उणीव
असेल तर ती माझी आहे, काही चूक घडली असेल तर ती सुद्धा माझीच आहे. मराठी साहित्य रसिकांनी ही कादंबरी नक्की वाचावी आणि
आपला अनमोल अभिप्राय नक्की, द्यावा ही कळकळीची विनंती.
--
ऑनलाईन लेखाची लिंक
https://www.weeklysadhana.in/view_article/This-is-how-the-book-Arunodaya-was-born
--
अरुणोदय पुस्तकाचे लेखक आणि मुक्त
पत्रकार. तसेच संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक.
मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
Please Follow me on :
WhatsApp Group – https://chat.whatsapp.com/D6XHacZLv83IvDo8Ed8sTe?mode=wwc
Facebook - www.facebook.com/BhaveshBrahmankar
X (Twitter) - www.twitter.com/BhavBrahma
Instagram - https://www.instagram.com/bhavbrahma
Blog - https://bhavbrahma.blogspot.com/
WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
--
#Arunoday #Book #Marathi #Literature
#Novel #Arunachal #Pradesh #Defence #Forces #India #China #Border #Fiction
#Sahitya #Kadambari #Bhavesh #Brahmankar

.png)
.png)
.png)
.png)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा