महिला सरपंच काय करू शकते? (सामना उत्सव पुरवणी)
संपूर्ण गावाचा विरोध असेल तर काय होईल? विधवा महिला सरपंच फार काही बदल घडवू शकते का? गावाला तब्बल १ कोटी रुपयांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळू शकतो का? हे सारेच योगेश्वरी चौधरी या सरपंच महिलेने करून दाखविले आहे.
भावेश ब्राह्मणकर
एखाद्या महिलेच्या आयुष्यात
एकापाठोपाठ एक संकटे येतात, तेव्हा ती खचून जाण्याची शक्यता अधिक असते. पण जेव्हा ती स्त्री
संकटांनाच आपली ताकद बनवते, तेव्हा ती केवळ स्वतःचे आयुष्यच नाही, तर संपूर्ण गावाचे नशीबच बदलवू शकते. याचा प्रत्यय गोंदिया
जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा या छोट्याशा गावात येत आहे. सरपंच
योगेश्वरी चौधरी यांनी आपल्या कर्तृत्वातून गावाचे नात थेट जगभरात नेले आहे. कधीकाळी
शिक्षिका असलेल्या योगेश्वरी यांनी आज डव्वा गावाला देशातील पहिली 'क्लायमेट ॲक्शन पंचायत' म्हणून गौरव मिळवून दिला आहे.
योगेश्वरी चौधरी यांचा प्रवास सोपा
नव्हता. त्यांचे जीवन चढउतारांनी भरलेले आहे. २००३ मध्ये डव्वा गावात नवीन वधू
म्हणून पाय ठेवताना त्यांनी फक्त १२वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले होते. पुढे
त्यांनी बीए, एमएड आणि डीएड हे शिक्षणही पूर्ण केले. २०१७ मध्ये त्यांच्यावर आभाळच
कोसळले. त्यांच्या पतीचा अचानक मृत्यू झाला. घरात पाठिंबा देणारे कुणीही मोठे
नव्हते, सोबत
होता तो केवळ छोटा मुलगा. बहुतांश लोक अशा वेळेस हार मानली जाते. पण योगेश्वरी
यांनी स्वतःच्या दुःखामध्येही सामर्थ्य शोधले. खचून न जाता त्यांनी गावातील शाळेत
शिक्षिका म्हणून काम सुरू केले. मात्र, गावातील खालावलेली शेती, पाण्याचा प्रश्न आणि युवकांचे रोजगारासाठी शहराकडे होणारे स्थलांतर
त्यांना अस्वस्थ करत होते. गावाला एका खंबीर नेतृत्वाची गरज होती. गावकऱ्यांच्या
आग्रहाखातर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि डिसेंबर २०२३ मध्ये त्या डव्वा
गावाच्या पहिल्या महिला सरपंच म्हणून निवडून आल्या.
डव्वा गावाचा कायापालट करण्यासाठी
त्यांनी पर्यावरणाला केंद्रस्थानी ठेवले. योगेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली गावात
तब्बल एक लाख सोळा हजाराहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. ओसाड जमिनीवर
त्यामुळे आज चक्क घनदाट हिरवळ पसरली आहे. योगेश्वरी यांनी केवळ झाडे लावली नाहीत, तर ती जगवण्यासाठी जिओ-टॅगिंग आणि
विशेष देखभालीची व्यवस्थाही केली. यामुळे गावाचे तापमान तर कमी झालेच, पण जैवविविधताही वाढली. त्यांच्या याच
कार्यामुळे डव्वा गावाला केंद्र सरकारचा 'कार्बन न्यूट्रल' श्रेणीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. वीज बिलाचा ताण कमी करतानाच
स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी गावात सौर उर्जेचा वापर वाढवला. आज
गावातील ४०० हून अधिक घरे सौर दिव्यांमुळे प्रकाशमान झाली आहेत. पथदिवे आणि
सार्वजनिक कामांसाठी सौर उर्जेचा वापर केल्यामुळे ग्रामपंचायतीच्या खर्चात मोठी
बचत झाली आहे.
बदल कधीच सोपा नसतो. योगेश्वरी
यांनाही सुरुवातीला 'पुरुषी' मानसिकता आणि विरोधाचा सामना करावा
लागला. गणपती विसर्जनासाठी गावात कृत्रिम तलाव बांधण्याच्या निर्णयाला
ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला होता. मात्र, स्थानिक जलस्रोत प्रदूषित होऊ नयेत यावर त्या ठाम राहिल्या. आज त्याच
निर्णयामुळे गावातील पाण्याचे साठे शुद्ध राहिले आहेत. उच्चशिक्षित असल्यामुळे
त्यांनी शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला. 'फार्म स्कूल'च्या माध्यमातून शेतकऱ्यांना माती परीक्षण, बियाणे निवड आणि सेंद्रिय शेतीचे धडे दिले. परिणामी, भात शेतीचे उत्पादन वाढले आणि नवीन
फळबागा फुलल्या. महिलांना केवळ घरकामात मर्यादित न ठेवता त्यांनी बचत गटांच्या
माध्यमातून निर्णय प्रक्रियेत सामील केले.
हिरवीगार शेते, भरभराटीला आलेले पशुपालन, सुधारलेली पिकांची पेरणी आणि लाखोंच्या
घरातील वृक्षराजी यामुळे गाव परिसराचा नूर बदलून गेला आहे. डव्वाचे हे परिवर्तन
खेतीचे उत्पादन वाढवणे, जलसंधारण, आणि
पर्यावरणीय संतुलन राखणे या सगळ्यांचा समावेश आहे. गावात बदल घडविण्यासाठी योगेश्वरी
यांनी घोषणा करण्याऐवजी गावतल्या जनतेशी संवाद साधला. ग्रामीणांचे विचार आणि
त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांनी खुल्या चर्चांच्या माध्यमातून गावासाठी
प्राधान्यक्रम तयार केला. त्यासाठी त्यांनी विविध समित्या बनवल्या. जसे की, जैवविविधता,
स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, नैसर्गिक संसाधन संरक्षण आदींचा
त्यात समावेश होता. या समित्यांनी प्रत्येक घरात आवाज देण्याची संधी दिली आणि
गावाच्या बदलात सर्वांचा सहभाग सुनिश्चित केला. सौर कृषी पंप योजनेद्वारे त्यांनी
सिंचन क्षेत्रात मोठा बदल घडविला. शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक पद्धती शिकवण्यासाठी
फार्म स्कूल त्यांनी सुरू केले. येथे
शेतकरी शास्त्रीय पद्धतीने मातीची गुणवत्ता, बीजारोपण, पीक व्यवस्थापन आणि नियंत्रित अवलोकन शिकत आहेत. त्यामुळे उत्पादन
वाढले आणि शेतकरी आत्मनिर्भर झाला.
योगेश्वरी चौधरी यांच्या
दूरदृष्टीमुळे डव्वा ग्रामपंचायतीला तब्बल १ कोटी ६१ लाख रुपयांचे विविध पुरस्कार
मिळाले आहेत. यात केंद्र सरकारचा 'क्लायमेट ॲक्शन स्पेशल पंचायत अवॉर्ड' आणि महाराष्ट्र शासनाचा 'माझी वसुंधरा' व 'संत
गाडगेबाबा' पुरस्कारांचा
समावेश आहे. हा निधी आता गावाच्या शाश्वत विकासासाठी वापरला जात आहे. सरपंच
योगेश्वरी यांनी लोककार्यात स्त्रियांचा सहभाग वाढविला. केवळ एक-दोन नव्हे तर
तब्बल ३८ महिला स्वयं सहायता गट तयार केले. आर्थिक निर्णय, खरेदी व्यवस्थापन आणि कृषी कामात मोठ्या प्रमाणात सहयोगी भूमिका या महिला
बजावू लागल्या. परिणामी, महिलांना आज शेतकामाचे निर्णय घेता येतात, उत्पन्नाचा भाग विभाजित केला जातो आणि
गावाच्या विकासात समतोल योगदान दिसून येते. अनेक महिला यांनी सांगितले की, “आम्ही आता फक्त सहायक नाही; निर्णयकर्ते आहोत.” हेच वास्तव
ग्रामीण अर्थव्यवस्थेत आणि जीवनशैलीत एक स्पष्ट बदल आहे. गावाला मिळालेल्या पुरस्कारांनी
दाखवून दिले की, ग्रामीण
नेतृत्वाने केवळ सौरऊर्जा, शेती और वृक्षारोपणात नाही तर संपूर्ण वातावरण संरक्षक दृष्टिकोनातून
काय काय साधता येऊ शकते.
डव्वा गावाच्या यशाने ग्रामीण भागासह संपूर्ण
देशासाठी काही महत्त्वाचे धडे दिले आहेत. स्थानिक नेतृत्व बदल साधू शकते.
एक महिला सरपंच आणि एक सहकार्यशील समुदाय हा ठरविले तर भूजल सुधारणा, पर्यावरणीय संरक्षण आणि सामाजिक
समावेश साधू शकतात. तंत्रज्ञान व शाश्वत पद्धती गावात आणल्या
जाऊ शकतात. सौरऊर्जा, शाश्वत शेती आणि वृक्षारोपण
यांसारख्या उपायांनी उत्पादन व जीवनमान दोन्ही सुधारले जाऊ शकतात. महिलांचा सहभाग जग बदलू शकतो.
गोष्टींना फक्त ऐकून घेण्याऐवजी, महिलांसोबत निर्णय प्रक्रियेचा भाग बनून गाव विकसित होऊ शकते. डव्वा गावाची
कथा फक्त पुरस्कार किंवा रक्कम मिळण्याची गोष्ट नाही. ती म्हणजे विश्वास, सहकार्य आणि नेतृत्वाचा संस्कार यांचा
परिपाक आहे. सरपंच चौधरी आणि ग्रामपंचायतीने दाखवून दिले की लहान गावही मोठे बदल
घडवू शकते, जर
त्यात दृष्टिकोन, आत्मविश्वास
आणि जमिनीवर काम करण्याची तयारी असेल. या यशोगाथेने नक्कीच भारतातील इतर
ग्रामपंचायतींना आणि नेतृत्वांना स्वतःच्या गावात स्थिरता, पर्यावरणीय उत्तरदायित्व आणि सामाजिक समावेश या मूल्यांचे पालन
करण्यासाठी प्रेरणा दिली आहे.
"जेव्हा झाडाची छोटी रोपे मोठी
होऊन सावली देतात, तेव्हा
गावकऱ्यांच्या डोळ्यांतील समाधान मला खरी ताकद देते,"
असे योगेश्वरी अभिमानाने सांगतात. वैयक्तिक आयुष्यातील दुःखाचे डोंगर
पार करून, एका
सामान्य महिलेने प्रशासकीय आणि नेतृत्व कौशल्याच्या जोरावर गावाला जागतिक हवामान
बदलाच्या लढ्यात अग्रस्थानी नेले आहे. योगेश्वरी चौधरी यांची ही यशोगाथा आज
महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील प्रत्येक सरपंचासाठी आणि महिला लोकप्रतिनिधीसाठी दिशादर्शक
आहे.
--
पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त
पत्रकार.
मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
Please Follow me on :
WhatsApp Group – https://chat.whatsapp.com/D6XHacZLv83IvDo8Ed8sTe?mode=wwc
Facebook - www.facebook.com/BhaveshBrahmankar
X (Twitter) - www.twitter.com/BhavBrahma
Instagram - https://www.instagram.com/bhavbrahma
Blog - https://bhavbrahma.blogspot.com/
WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
--
#Climate #Action #Panchayat #sarpanch #women #yogeshwari #chaudhari #environment # gondia #district #rural #development #dawwa #village #award #tree #plantation #solar

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा