आधी संरक्षण, नंतर राजकारण! (दै. सकाळ)

भारतीय वायूसेनेचे माजी प्रमुख भदौरिया यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारणात प्रवेश केला आहे. संरक्षण क्षेत्रातील व्यक्ती राजकीय क्षेत्रात येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आजवर अनेकांनी संरक्षण क्षेत्राद्वारे देशसेवा केल्यानंतर राजकीय प्रवेशातून राजकारण आणि समाजकारण केले आहे. त्या सर्वांचा घेतलेला हा धांडोळा...

- भावेश ब्राह्मणकर


मेजर जनरल जेकब फर्ज राफेल

जेकब यांनी महूच्या ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूलमधून पदवी प्राप्त केली.  दुसऱ्या महायुद्धात त्यांना उत्तर इराकमध्ये तैनात करण्यात आले. १९४३ मध्ये त्यांची तोफखाना ब्रिगेडमध्ये बदली झाली. ब्रिटिश सैन्याने त्यांना ट्युनिशिया मोहिमेवर पाठवले. १९४३ पासून युद्ध समाप्तीपर्यंत जेकब यांच्या युनिटने बर्मा मोहिमेत जपानी साम्राज्याविरुद्ध लढा दिला. नंतर त्यांना सुमात्रा येथे नियुक्त करण्यात आले. भारत-पाक फाळणीनंतर ते भारतीय सैन्यात दाखल झाले. १९६३ मध्ये त्यांना ब्रिगेडियर म्हणून बढती मिळाली. १९६५च्या भारत-पाक युद्धात त्यांनी इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केले. पुढे हीच राजस्थानातील बारावी इन्फंट्री डिव्हिजन बनली. वाळवंटातील युद्धावर भारतीय लष्कराची पुस्तिका त्यांनी तयार केली. १९६७ मध्ये त्यांची मेजर जनरल म्हणून पदोन्नती झाली. १९६९ मध्ये त्यांना जनरल सॅम माणेकशॉ यांनी पूर्व कमांडचे प्रमुख (चीफ ऑफ स्टाफ) म्हणून नियुक्त केले. निवृत्तीनंतर ते भाजपमध्ये दाखल झाले. भारत-इस्रायल संबंध सुधारण्याचे ते समर्थक होते. भारत-पाक संबंधांबाबतही त्यांनी विविध प्रकारचे मार्गदर्शन सरकारला केले.

लेफ्टनंट जनरल किन्हीरामन पलट कँडेथ
लेफ्टनंट जनरल किन्हीरमन पलट कँडेथ हे भारतीय सैन्यातील तीन-स्टार जनरल होते. १९६१ मध्ये त्यांनी ऑपरेशन विजयचे नेतृत्व करून गोव्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त केले. गोव्याचे नायब राज्यपाल म्हणून त्यांनी काही काळ काम केले. १९६५च्या युद्धावेळी ते लष्कराचे उपप्रमुख बनले. १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान ते पश्चिम लष्कर कमांडचे नेतृत्व केले. परमविशिष्ट सेवा मेडल आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले. ९०च्या दशकात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

कॅप्टन मोहम्मद अयूब खान
युद्धवीर अशी ओळख असलेल्या अयूब खान यांनी लष्करात रिसालदार म्हणून जबाबदारी सांभाळली. वडिलांपाठोपाठ ते सुद्धा लष्करी सेवेत दाखल झाले. घोडदळात त्यांनी कामगिरी बजावली. १९६५च्या भारत-पाक युद्धामध्ये शत्रूचे तब्बल ४ टँक उध्वस्त करण्याच्या टीमचे त्यांनी नेतृत्व केले. या शौर्यामुळेच त्यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना मानद कॅप्टन ही पदवीही बहाल करण्यात आली. ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) म्हणून ते निवृत्त झाले. प्रचंड लोकप्रियतेमुळेच तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी खान यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले. राजस्थानातील झुंझूनू येथून ते विजयी झाले. विशेष म्हणजे त्यांच्या रुपाने राजस्थानातील पहिला मुस्लीम खासदार संसदेत पोहचला होता. सलग दोन वेळा ते खासदार म्हणून विजयी झाले.

मेजर जनरल भुवन चंद्र खंडुरी
मेजर जनरल भुवन चंद्र खंडुरी यांनी १९५४ ते १९९० अशी तब्बल ३६ वर्षे सैन्यात सेवा बजावली. कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समध्ये ते कार्यरत होते. १९७१च्या भारत-पाक युद्धावेळी ते रेजिमेंटचे कमांडर होते. मुख्य अभियंता पदापर्यंत ते पोहचले. शिवाय सैन्यात आणि अभियांत्रिकी ब्रिगेडचे ते कमांडर राहिले. लष्करी मुख्यालयात अतिरिक्त लष्करी सचिव आणि मुख्य  अभियंता विभागात अतिरिक्त महासंचालक म्हणूनही त्यांनी काम केले. मेजर जनरल म्हणून ते निवृत्त झाले. सैन्यातील योगदानाबद्दल त्यांना अति विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. १९९१मध्ये उत्तराखंडच्या गढवालमधून ते खासदार झाले. तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री  होते. २००३ मध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले. विविध संसदीय समित्यांवर त्यांनी काम केले. देशातील अनेक शहरांना जोडणाऱ्या महामार्गांच्या निर्माणात त्यांचा वाटा मोठा आहे.

मेजर जसवंत सिंग
वयाच्या १५व्या वर्षी सैन्यात दाखल झालेले जसवंत सिंग हे मेजर पदापर्यंत पोहचले. ६०च्या दशकात ते सैन्यात अधिकारी झाले. मेयो कॉलेज आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमी (खडकवासला) येथून त्यांनी शिक्षण घेतले. १९८० मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेत दाखल झाले. देशाचे अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी कार्य केले. १५व्या लोकसभेत त्यांनी दार्जिलिंग मतदारसंघाचे नेतृत्व केले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये ते परराष्ट्रमंत्री होते. तहलका प्रकरणानंतर जॉर्ज फर्नांडिस यांनी राजीनामा दिल्याने सिंग हे संरक्षण मंत्री झाले. सिंग हे रालोआ युतीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार राहिले. मात्र, संपुआ सरकारच्या हमीद अन्सारी यांच्याकडून ते पराभूत झाले.

स्क्वॉड्रन लीडर राजेश पायलट
राजेश पायलट हे भारतीय हवाई दलात वैमानिक होते. स्क्वॉड्रन लीडर पदापर्यंत ते पोहोचले. नंतर त्यांनी "पायलट" हे आडनाव धारण केले. राजीव गांधींच्या प्रभावाखाली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. एक प्रमुख गुर्जर नेता अशी त्यांची ओळख बनली. भरतपूरच्या माजी राणीचा पराभव करत ते खासदार बनले. अंतर्गत सुरक्षा मंत्री पद त्यांनी भूषविले. त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचीही निवडणूक लढविली. सीताराम केसरी यांनी त्यांचा पराभव केला. काँग्रेसच्या पहिल्या फळीतील ते नेते होते. त्यांचे पुत्र सचिन हे सध्या काँग्रेस नेते आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग
राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि इंडियन मिलिटरी अकादमीमधून पदवी घेतलेले सिंग १९६३ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले. त्यांनी लष्करातून निवृत्ती घेतली. पण, १९६५च्या भारत-पाक युद्धावेळी त्यांनी पुन्हा लष्करात दाखल होऊन कॅप्टन म्हणून सेवा केली. सिंग हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे शालेय मित्र होते. १९८० मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर विजयी झाले. १९८४च्या ऑपरेशन ब्लू स्टारमधील लष्करी कारवाईच्या निषेधार्थ त्यांनी संसदेचा आणि काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर, ते शिरोमणी अकाली दलात सामील झाले. पंजाब विधीमंडळात ते आमदार झाले. कृषी, वन, विकास आणि पंचायत मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. पुन्हा काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. ते पंजाबचे मुख्यमंत्रीही राहिले.

कॅप्टन जगतवीर सिंग द्रोण
१९९० पर्यंत जगतवीर यांनी सैन्य दलात सेवा बजावली. कॅप्टन म्हणून ते निवृत्त झाले. १९९० मध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले. १०व्या, ११व्या आणि १२व्या लोकसभेत ते खासदार म्हणून निवडून आले. कानपूरचे महापौरपदही त्यांनी भूषविले.

विष्णू भागवत
भारताचे नौदल प्रमुख राहिलेल्या भागवत यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. त्यांना अतिविशिष्ट सेवा मेडल आणि परमविशिष्ट सेवा मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. प्रतिभावान आणि अष्टपैलू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. म्हणूनच त्यांनी नौदलाची कमान सांभाळली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मधून त्यांनी प्रशिक्षण घेतले. १९६०मध्ये ते नौदलात दाखल झाले. गोवा मुक्तिसंग्राम आणि १९७१च्या भारत-पाक युद्धात त्यांनी भरीव कामगिरी केली. ते पहिले आणि एकमेव नौदल प्रमुख आहेत ज्यांना सेवा करत असताना पदावरून काढून टाकण्यात आले. तसेच दंडात्मक कार्यवाही म्हणून त्यांचे अडमिरल पदही काढून घेण्यात आले. नौदल प्रमुख असताना थेट केंद्र सरकारच्या विरोधात कार्यवाही करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे सरकारने ही कारवाई केली.  त्यानंतर भागवत यांनी राजकारणात प्रवेश केला. मात्र, या क्षेत्रात त्यांची कामगिरी फारशी चमकदार नव्हती. बिहारच्या राजकारणात ते अल्पकाळ सक्रिय होते.

जनरल विजय कुमार सिंह (व्ही के सिंह)
१४ जून १९७० रोजी राजपूत रेजिमेंटच्या दुसऱ्या बटालियनमध्ये सिंह रुजू झाले. पाकिस्तान नियंत्रण रेषेवर त्यांनी या युनिटचे नेतृत्व केले. संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली. अमेरिकेच्या आर्मी इन्फंट्री स्कूलचे ते ऑनर्स ग्रॅज्युएट होते. फोर्ट बेनिंग येथील रेंजर्स कोर्सचे आणि पेनसिल्व्हेनियाच्या कार्लिले येथील युनायटेड स्टेट्स आर्मी वॉर कॉलेजचे ते पदवीधर होते. सिंह यांना बंडखोरी विरोधी आणि उच्च उंचीवरील ऑपरेशन्सचा उत्तम अनुभव आहे. १९७१च्या भारत-पाक युद्धात गुप्तचर अधिकारी म्हणून कार्य केले. शिवाय ते तरुण लेफ्टनंट होते. ३१ मार्च २०१० रोजी ते लष्कराचे प्रमुख बनले. हे पद प्राप्त करणारे ते पहिले कमांडो होते. २०१४मध्ये भाजपच्या तिकीटावर ते गाझियाबादचे खासदार झाले. मोदी सरकारमध्ये ते परराष्ट्रमंत्री बनले.

कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड
लष्करात कार्यरत असतानाच कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी नेमबाजीत नावलौकिक प्राप्त केला. देशासाठी त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये ७ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्य पदके जिंकली. लष्करात त्यांना अति विशिष्ट सेवा पदक, विशेष सेवा पदक, सैन्य सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच, देशसेवेची दखल घेत त्यांना पद्मश्रीने गौरविण्यात आले. राजकारणात येण्यासाठी राठोड यांनी लष्करातून मुदतपूर्व निवृत्ती घेतली. २०१३ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत जयपूर ग्रामीणमधून ते खासदार झाले. पहिल्या मोदी सरकारमध्ये ते मंत्री झाले. माहिती आणि प्रसारण विभागाचे राज्यमंत्री ते बनले.

एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया
२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. २०२१मध्ये ते वायूसेना प्रमुख म्हणून निवृत्त झाले. उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्याचे ते रहिवासी आहेत. राफेल या लढाऊ विमानांसाठी फ्रान्सशी वाटाघाटी करणाऱ्या टीमचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. अनेक अडथळे पार झाल्यानंतर करार झाला आणि भारताला फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने मिळाली. या योगदानामुळेच पहिल्या राफेल विमानाच्या शेपटीवर त्यांच्या नावाची दोन आद्याक्षरे आरबी००८ असे कोरण्यात आले आहे. स्वदेशी तेजस हे लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट कार्यक्रम तयार करण्यातही भदौरिया यांची भूमिका महत्त्वाची होती. एलसीए प्रकल्पावरील राष्ट्रीय उड्डाण केंद्राचे मुख्य चाचणी पायलट आणि प्रकल्प संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. तेजसच्या सुरुवातीच्या प्रोटोटाइप फ्लाइट चाचण्यांमध्ये भदौरियाचाही सहभाग होता. भाजपकडून त्यांना खासदारकीचे तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे.

(दै. सकाळमध्ये ४ एप्रिल २०२४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)

Defence Politics India Officers Politician Sakal Bhavesh Brahmankar Indian Navy Air Force Army 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)