हिमालयात चायनीज वनस्पतीचे टेन्शन! (सामना उत्सव पुरवणी विशेष लेख)

उत्तराखंडमध्ये पहिल्यांदाच आढळलेल्या चिनी वनस्पतीने पर्यावरण तज्ज्ञांच्या पोटात भितीचा गोळा आला आहे. अत्यंत आकर्षक असलेली ही वनस्पती जैवविविधतेसाठी घातक असल्याचा संशय आहे.

भावेश ब्राह्मणकर

अथांग सौंदर्य, बर्फाच्छादित शिखरे आणि दुर्मिळ वनौषधींचे माहेरघर असलेल्या हिमालयाच्या पर्यावरणावर एका नव्या संकटाचे सावट निर्माण झाले आहे. उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील दारमा आणि व्यास व्हॅलीजवळील छियालेख बुग्याल (उत्तुंग पर्वतीय गवताळ प्रदेश) येथे नुकतीच एक अत्यंत विषारी चिनी वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळून आली आहे. 'चायनीज स्टेलेरा' (Chinese Stellera) किंवा 'हिमलियन स्टेलेरा' (Stellera chamaejasme) असे तिचे नाव आहे. या वनस्पतीचे फुललेले ताटवे पहिल्यांदाच भारताच्या या भागात अधिकृतपणे नोंदवले गेले आहेत. वरकरणी अत्यंत देखणी आणि आकर्षक वाटणारी ही वनस्पती प्रत्यक्षात स्थानिक वनस्पती आणि जैवविविधतेसाठी अत्यंत घातक असल्याचे समोर आल्याने वन संशोधन शाखा आणि पर्यावरण तज्ज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


दिसायला सुंदर, सोसायला विषारी
वन विभागच्या रिसर्च विंगमधील शास्त्रज्ञांना आणि जेआरएफ (ज्युनिअर रिसर्च फेलो) मनोज यांना आदि कैलास यात्रा मार्गाजवळ छियालेख बुग्याल भागात या वनस्पतीचे अस्तित्व आढळले. यापूर्वी चमोली जिल्ह्यातील मल्लारी क्षेत्रात आणि नंदा देवी राष्ट्रीय उद्यानाच्या आसपास या वनस्पतीची काही तुरळक रोपे आढळल्याची नोंद होती, परंतु या विशिष्ट व्हॅलीमध्ये पूर्णपणे बहरलेली, फुलांनी सजलेली झाडे आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही वनस्पती पांढऱ्या, गुलाबी किंवा पिवळसर रंगाच्या आकर्षक फुलांच्या गुच्छांनी नटलेली असते, ज्यामुळे निसर्गाची शोभा वाढल्यासारखा भास होतो. मात्र, हा केवळ एक निसर्गाचा विरोधाभास आहे.

वैज्ञानिक विश्लेषणांनुसार, ही वनस्पती अत्यंत विषारी आहे. याचे विष इतके तीव्र असते की, जर एखाद्या पाळीव प्राण्याने किंवा मानवाने याचे अनवधानाने सेवन केले, तर त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. इतकेच नव्हे, तर या वनस्पतीची पाने हाताने चुरघळून केवळ त्याचा सुवास घेतला, तरी माणसाला तत्काळ चक्कर किंवा भोवळ येण्याचा धोका असतो. म्हणूनच या देखण्या रूपाच्या मागे लपलेले विषारी वास्तव ओळखणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

इकोसिस्टमवर घाला
चायनीज स्टेलेराचा सर्वात मोठा धोका म्हणजे तिची आक्रमक विस्तारवादी पद्धत. ही वनस्पती 'अ‍ॅलेलोपॅथी' (Allelopathy) या प्रक्रियेचा वापर करते. ती आपल्या मुळांमधून आणि पानांमधून एक असे विशिष्ट रासायनिक द्रव्य उत्सर्जित करते, जे शेजारील इतर वनस्पतींसाठी मारक ठरते. या रासायनिक प्रक्रियेमुळे तिच्या आसपास उगवणाऱ्या इतर स्थानिक वनस्पती आणि उपयुक्त औषधी गवत पूर्णपणे नष्ट होते, ज्यामुळे संपूर्ण कुरण ओसाड बनू शकते.

हिमालयातील बुग्याल हे स्थानिक औषधी वनस्पती, मऊ गवत आणि दुर्मिळ फुलांसाठी प्रसिद्ध आहेत, ज्यावर स्थानिक भोटिया जमातीचे आणि इतर मेंढपाळांचे पाळीव प्राणी (याक, शेळ्या, मेंढ्या) जगतात. जेव्हा चायनीज स्टेलेरा आपले पाय पसरते, तेव्हा ती आजूबाजूच्या उपयुक्त गवताचा नाश करते. परिणामी, प्राण्यांसाठी खाण्यायोग्य गवत संपून केवळ ही विषारी वनस्पतीच तिथे शिल्लक राहते.

चीन, तिब्बत आणि मंगोलियाच्या कोरड्या व पर्वतीय प्रदेशात ही वनस्पती प्रामुख्याने आढळते. चीनमध्ये पारंपरिक औषधे तयार करण्यासाठी हिच्या मुळांचा मर्यादित वापर केला जात असला, तरी तिचे अनियंत्रित पसरणे हे तिथल्याही गवताळ प्रदेशांच्या ऱ्हासाचे (Grassland Degradation) प्रमुख लक्षण मानले जाते. आता हाच पॅटर्न भारताच्या हिमालयात पाहायला मिळत असल्याने शास्त्रज्ञांचे धाबे दणाणले आहेत.

वाढत्या प्रसाराची कारणे
भारतात ही वनस्पती एवढ्या वेगाने का पसरत आहे, याचे मूळ जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलामध्ये दडलेले आहे. हिमालयातील तापमान सातत्याने वाढत असून, बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरड्या आणि कडक हवामानात तग धरण्याची प्रचंड क्षमता चायनीज स्टेलेरामध्ये असते. तिची मुळे मातीत खोलवर रुजलेली असतात, ज्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष असले तरी ती सहज जिवंत राहते. अति-चरई (Overgrazing) मुळे जेव्हा स्थानिक गवत कमकुवत होते, तेव्हा या विषारी वनस्पतीला मोकळे रान मिळते. छियालेख बुग्यालमध्ये हिचा झालेला मोठा प्रसार हा हिमालयातील नैसर्गिक संतुलनात बिघाड झाल्याचा धोक्याचा इशारा आहे.

तातडीच्या उपाययोजनांची गरज
जर वेळीच या वनस्पतीचा प्रसार रोखला नाही, तर आदि कैलास आणि लगतच्या संपूर्ण हिमालयातील बुग्यालांचे वाळवंटीकरण किंवा 'विषारी मैदानात' रुपांतर होण्याचा धोका नाकारता येत नाही. वन विभागाने या संदर्भात तातडीने खालील पावले उचलणे गरजेचे आहे:

मॅपिंग आणि सर्वेक्षण:
उपग्रह तंत्रज्ञान (
Remote Sensing) आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षणाच्या माध्यमातून या वनस्पतीचा प्रसार नक्की कुठे आणि किती प्रमाणात झाला आहे, याचा अचूक नकाशा तयार करणे आवश्यक आहे.

स्थानिक जनजागृती:
स्थानिक मेंढपाळ, पर्यटक आणि ट्रेकर्सना या वनस्पतीबाबत माहिती देऊन, तिचे तोटे समजावून सांगणे गरजेचे आहे, जेणेकरून जनावरांना यापासून दूर ठेवता येईल.

जैविक नियंत्रण:
या वनस्पतीला नैसर्गिकरित्या नष्ट करणाऱ्या किंवा तिचा प्रसार रोखणाऱ्या पद्धतींवर वन संशोधन संस्थेने (FRI) तातडीने संशोधन सुरू केले पाहिजे.

निसर्गातील प्रत्येक घटकाचे एक चक्र असते, मात्र जेव्हा एखादी परकीय किंवा आक्रमक प्रजाती स्थानिक पर्यावरणाचा गळा घोटू लागते, तेव्हा मानवी हस्तक्षेप आणि शास्त्रीय व्यवस्थापन अनिवार्य ठरते. आदि कैलास क्षेत्रात उमललेली ही चिनी फुले हिमालयाचे सौंदर्य वाढवणारी नसून, भविष्यातील मोठ्या संकटाची नांदी आहेत. हिमालयाचे रक्षण करणे म्हणजे केवळ देशाच्या सीमांचे रक्षण करणे नव्हे, तर तिथल्या अमूल्य जैवविविधतेचे रक्षण करणे होय. वन विभाग आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्र या 'चायनीज स्टेलेरा'च्या आव्हानाचा वेळीच मुकाबला केला पाहिजे, तरच हिमालयाची पावन भूमी आणि तिची वनसंपदा सुरक्षित राहील.

--

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार.
मो.
9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

Please Follow me on :

WhatsApp Group – https://chat.whatsapp.com/D6XHacZLv83IvDo8Ed8sTe?mode=wwc

Facebook   - www.facebook.com/BhaveshBrahmankar

X (Twitter) - www.twitter.com/BhavBrahma

Instagram  - https://www.instagram.com/bhavbrahma

Blog        -  https://bhavbrahma.blogspot.com/

WhatsApp Channel  - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

--

#Himalaya #Plant #Chinese #Stellera #chamaejasme #Allelopathy #Global #Warming #Uttarakhand #Ecology #Biodiversity #Environment #Bhavesh #Brahmankar


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)

तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी (नवशक्ती)