डोळे दिपावणारे चीनचे सौर साम्राज्य! (सामना उत्सव पुरवणी)

जसा समुद्र अथांग असतो तसे सौर पॅनल्स साकारून चीनने अभूतपूर्व असा विक्रम केला आहे. तब्बल ४२० चौकिमीवरील हे सौर पॅनल्स सध्या जगभरात चर्चेचे ठरत आहेत. यातून चीनने नक्की काय साध्य केलं आहे?

भावेश ब्राह्मणकर

समुद्रसपाटीपासून सुमारे १०,००० फूट उंचीवर, जिथे हवा विरळ आहे आणि सूर्यप्रकाश अधिक तीव्र आहे, तिथे निळ्याशार काचेच्या पॅनेलचे एक अथांग महासागर पसरलेले दिसते. हे चित्र आहे 'जगाचे छप्पर' समजल्या जाणाऱ्या तिबेटी पठाराचे. चीनने या दुर्गम आणि उंचावर असलेल्या प्रदेशात तब्बल १६२ चौरस मैल (सुमारे ४२० चौरस किलोमीटर) क्षेत्रफळावर सौर पॅनेलचे जाळे विणले आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, हे केवळ एक ऊर्जा प्रकल्प नसून जागतिक हवामान बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भू राजकीय वर्चस्व यांच्या लढाईतील चीनचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. चीनच्या किंगहाई प्रांतातील 'तालातान सोलर पार्क' हा जगातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पांपैकी एक आहे. याचे क्षेत्रफळ तब्बल चेन्नई महापालिका क्षेत्राएवढे मोठे आहे. या प्रकल्पाची क्षमता इतकी अफाट आहे की, तो सुमारे ७० लाख घरांना वीज पुरवू शकतो. इथे लावलेले सौर पॅनेल हे प्रसिद्ध 'थ्री गॉर्जेस डॅम' च्या एकूण ऊर्जा क्षमतेच्या बरोबरीचे आहेत.

चीनने एवढ्या उंचावरील तिबेटी पठाराची निवड का केली याबाबत ठोस वैज्ञानिक कारणे आहेत. किंगहाई प्रांतात उंचावर हवा विरळ असल्याने वातावरणातील अडथळे कमी असतात आणि सूर्याचे किरण थेट व अधिक तीव्रतेने जमिनीवर पोहोचतात. कमी ढग, दीर्घकाळ सूर्यप्रकाश आणि विस्तीर्ण मोकळी जमीन या तिन्ही घटकांचा दुर्मिळ संगम तिबेटी पठारावर आढळतो. सौर पॅनेलसाठी उष्णतेपेक्षा प्रकाश महत्त्वाचा असतो. किंबहुना, पॅनेल जास्त गरम झाले तर त्यांची कार्यक्षमता कमी होते. पठारावरील थंड हवेमुळे हे पॅनेल थंड राहतात आणि अधिक कार्यक्षमतेने वीज निर्मिती करतात. तसेच, पठाराचा मोठा भाग निर्मनुष्य आणि सपाट आहे, ज्यामुळे सौर पॅनेल लावणे आणि त्यांची देखभाल करणे सोपे जाते. केवळ वीज निर्माण करून उपयोग नाही, तर ती सुरक्षितपणे साठवणे आणि हजारो मैल दूर असलेल्या शहरांपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान होते. मात्र, चीनने यासाठी अल्ट्रा-हाय-व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन्सचे जाळे उभारले आहे. या माध्यमातून तिबेटमध्ये निर्माण झालेली वीज ही एक हजार मैलांहून अधिक लांब असलेल्या पूर्व किनारपट्टीवरील औद्योगिक शहरांपर्यंत किमान गळतीसह पोहोचवली जात आहे. तसेच, रात्रीच्या वेळी विजेचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी जवळच पवनचक्की आणि जलविद्युत प्रकल्पांची जोडणी करण्यात आली आहे.

तालातान या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे चीनच्या वाढत्या डिजिटल गरजा पूर्ण करणे. आजच्या काळात 'डेटा सेंटर्स' आणि 'एआय मॉडेल्स' चालवण्यासाठी प्रचंड विजेची गरज लागते. तिबेटी पठारावरील स्वस्त आणि स्वच्छ वीज या डेटा सेंटर्ससाठी इंधन ठरत आहे. यामुळे चीनला जगातील एआय शर्यतीत आघाडी मिळवणे सोपे होणार आहे. या प्रकल्पाने स्थानिक पर्यावरणात एक रंजक बदल घडवून आणला आहे. सौर पॅनेलमुळे जमिनीवर सावली पडते, ज्यामुळे वाळवंटी भागात जमिनीतील आर्द्रता टिकून राहते आणि गवत उगवू लागले आहे. या गवताचा फायदा घेण्यासाठी स्थानिक मेंढपाळ तिथे मेंढ्या चरायला नेतात. या मेंढ्यांना आता 'फोटोव्होल्टेइक मेंढ्या' म्हटले जाते. हे गवत मेंढ्यांनी खाल्ल्यामुळे सौर पॅनेलभोवती कचरा साचत नाही आणि मेंढपाळांना चारा मिळतो हा एक प्रकारे पर्यावरणाचा आणि उद्योगाचा समतोल आहे. चीन सध्या जगातील ५० टक्क्यापेक्षा जास्त सौर ऊर्जा क्षमता स्वतःकडे राखून आहे आणि जगातील ८०% सौर पॅनेलचे उत्पादन तिथेच होते. अमेरिकेसारखे देश जेव्हा आपल्या जीवाश्म इंधन (कोळसा, गॅस) उद्योगाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा चीन वेगाने अक्षय ऊर्जेकडे वळत आहे. २०६० पर्यंत 'कार्बन न्यूट्रल' होण्याचे चीनचे ध्येय असून, हे सौर प्रकल्प त्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे.

तालातान सौर प्रकल्पात तब्बल ७० लाख सौर पॅनल्स लावण्यात आल्याचे सांगितले जाते. सध्या या प्रकल्पातून तब्बल १६ हजार गिगावॉट एवढी वीज निर्मिती होत आहे. लवकरच ती १८ हजार गिगावॉट पर्यंत पोहचणार आहे. इतक्या मोठ्या प्रकल्पाचे काही दुष्परिणामही संभवतात. तिबेटी पठार हे जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र आहे. सौर पॅनेल्समुळे स्थानिक परिसंस्थेत बदल होण्याची शक्यता काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, काही अभ्यासांनुसार सौर पॅनेल्समुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि काही भागांत गवत वाढीस मदत होते. स्थानिक तिबेटी समाजाच्या जीवनशैलीवरही याचा परिणाम होत आहे. पारंपरिक पशुपालन आणि स्थलांतरित जीवनशैली बदलण्याच्या प्रक्रियेत आहे. मात्र, त्याच वेळी रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होत आहेत. तथापि, इतक्या मोठ्या प्रमाणावर निसर्गाशी केलेली ही छेडछाड दीर्घकाळात काय परिणाम करेल, यावरही पर्यावरणवाद्यांचे लक्ष आहे. पण सध्या तरी, 'जगाच्या छतावर' चीनने आपल्या ऊर्जेच्या सामर्थ्याचा ध्वज फडकवला आहे.


चीन हा आजही जगातील सर्वात मोठा कार्बन उत्सर्जन करणारा देश आहे. कोळशावर आधारित ऊर्जा उत्पादनावर त्याची मोठी अवलंबित्व आहे. मात्र
, आंतरराष्ट्रीय दबाव आणि अंतर्गत प्रदूषणाच्या समस्यांमुळे चीनने नवीकरणीय ऊर्जेकडे मोठ्या प्रमाणावर वळण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुढील दशकांमध्ये कार्बन उत्सर्जन शिखरावर नेऊन नंतर ते कमी करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. सौर आणि पवनऊर्जा प्रकल्पांमध्ये केलेली ही गुंतवणूक त्याच दिशेने टाकलेले पाऊल आहे. जग झपाट्याने हवामान बदलाच्या उंबरठ्यावर उभे असताना स्वच्छ ऊर्जेच्या शोधात मोठ्या राष्ट्रांमध्ये स्पर्धा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चीनने घेतलेला एक निर्णय संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे. तिबेटी पठारावरील १६२ चौरस मैलांचा सौर प्रकल्प म्हणजे केवळ तांत्रिक चमत्कार नाही, तर तो भविष्यातील जागतिक ऊर्जा राजकारणाचा संकेत आहे. चीन जगाला हे दाखवू इच्छितो की स्वच्छ ऊर्जा ही केवळ पर्यावरण रक्षणासाठीच नव्हे, तर आर्थिक आणि तांत्रिक वर्चस्वासाठीही आवश्यक आहे. तिबेटी पठारावरील सौर पॅनल्सचे निळे साम्राज्य केवळ विजेची निर्मिती करत नाही, तर ते भविष्यातील बदलत्या जगाचे प्रतीक आहे. हवामान बदलाच्या संकटाचा सामना करताना तंत्रज्ञान आणि निसर्ग यांची सांगड कशी घातली जाऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

--

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार.
मो.
9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

Please Follow me on :

WhatsApp Group – https://chat.whatsapp.com/D6XHacZLv83IvDo8Ed8sTe?mode=wwc

Facebook   - www.facebook.com/BhaveshBrahmankar

X (Twitter) - www.twitter.com/BhavBrahma

Instagram  - https://www.instagram.com/bhavbrahma

Blog        -  https://bhavbrahma.blogspot.com/

WhatsApp Channel  - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

--

#china #talatan #solar #park #renewable #energy #power #tibet #environment #technology #panels # plateau #giant #clean


टिप्पण्या

  1. छान माहिती दिली आहे. पण सर्व परीसर उजाड होईल. मानवी जीवनाला डीहाइड्रेशन चा कदाचित सामना करावा लागेल. अर्थात हे बाहेर येणार नाही. प्राणी आणि पक्षी जीवनावरही मोठा परीणाम होली.
    प्रा प्र द कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण

महिला सरपंच काय करू शकते? (सामना उत्सव पुरवणी)

लहानग्यांचा स्क्रीन टाईम कमी करणारा चिनी प्रयोग (नवशक्ती)