जगभर वाढतेय चष्मेबहाद्दरांची संख्या! कारण... (नवशक्ती)
पुढील २४ वर्षात जगातील निम्मी लोकसंख्या चष्मा लावणारी असेल. चष्मा लागणे हे चांगले लक्षण आहे की वाईट? यासंदर्भात झालेले संशोधन विविध बाबींवर प्रकाश टाकणारे आहे. त्यातून आपले डोळे उघडणार का?
भावेश ब्राह्मणकर
अभिनेता संजय
नार्वेकर यांचा २००६ मध्ये चष्मेबहाद्दर हा मराठी चित्रपट आला होता. त्यात त्यांनी
सयाजी ही भूमिका साकारली. चित्रपटात सयाजीकडे एक जादूचा चष्मा असतो. तो घातल्यावर
त्याला भिंतीच्या पलीकडचे किंवा लोकांच्या मनातले दिसू लागते, ज्यामुळे अनेक विनोदी प्रसंग घडतात. हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे
नुकताच प्रसिद्ध झालेला एक संशोधन अहवाल. त्यात असे म्हटले आहे की, जगभर चष्मा
घालणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. जागतिक आरोग्य
संघटना आणि विविध संशोधन संस्थांच्या अहवालानुसार, २०५० पर्यंत जगातील सुमारे ५० टक्के
लोकसंख्या म्हणजे सुमारे ४.८ अब्ज लोकांना डोळ्यांच्या समस्यांना सामोरे जावे
लागेल. यामध्ये भारतासह चीन, सिंगापूर यांसारख्या आशियाई देशांची स्थिती अधिक गंभीर आहे. चष्मा लावणे म्हणजे दृष्टी कमी होणे आहे का? आपल्या डोळ्यांवर काही परिणाम होत आहे का? चष्मा हे
प्रतिष्ठेचे लक्षण आहे की अधोगतीचे? या अहवालात
साऱ्यावरच प्रकाश टाकण्यात आला आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर
आपण जितकी प्रगती करत आहोत, तितकेच आपण आपल्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करत आहोत. विशेषतः डोळ्यांच्या
आरोग्याची समस्या केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेली नाही. लहान मुलांपासून
तरुणांपर्यंत सर्वच वयोगटांमध्ये डोळ्यांची कमजोरी, धूसर दृष्टी आणि
मायोपिया या समस्या झपाट्याने वाढत आहेत. हा आजार आहे 'मायोपिया
एपिडेमिक'. म्हणजेच निकटदृष्टीदोषाची साथ. एकप्रकारचा हा आजारच आहे. यामध्ये व्यक्तीला
जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात, परंतु दूरच्या वस्तू धूसर दिसतात. डोळ्यांच्या बाहुल्यांचा आकार
वाढल्यामुळे प्रतिमा रेटिनावर तयार न होता त्याच्या पुढे तयार होते. पूर्वी हा दोष
अनुवांशिक मानला जात असे, परंतु आता जीवनशैलीतील बदलांमुळे हा एक जागतिक आजार बनला आहे. 'डिना इंडिया' आणि 'ब्रायन होल्डन
व्हिजन इन्स्टिट्यूट'ने यासंदर्भात संशोधन केले आहे. त्यांच्या अहवालानुसार: २५ वर्षांपूर्वी म्हणजे २००० साली जगातील केवळ २५ टक्के लोकसंख्या मायोपियाने ग्रस्त होती. सद्यस्थितीत हा
आकडा वेगाने वाढून ३३ टक्क्यांच्याही पुढे गेला आहे. २०५० पर्यंत
जगातील दर दोन व्यक्तींपैकी एकाला चष्मा असेल. यातील १० टक्के लोक 'हाय मायोपिया'चे शिकार असतील, ज्यामुळे अंधत्व
येण्याचा धोका वाढतो. मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत. त्यामागे प्रामुख्याने
दोन कारणे आहेत. एक म्हणजे स्क्रीन टाइम आणि बाहेर किंवा
मैदानावर खेळण्याच्या वेळेत झालेली घट.
चीन,
सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान या पूर्व आशियाई देशातील शालेय
मुलांमध्ये मायोपियाचे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सिंगापूरला तर
'जगाची मायोपिया
राजधानी' असे म्हटले जाते. दक्षिण कोरियामध्ये तरुणांमधील मायोपियाचे
प्रमाण जवळपास ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. भारतातही मायोपिया वेगाने वाढत असून, तज्ज्ञांच्या मते २०३० पर्यंत भारतातील प्रत्येक तिसरे मूल
मायोपियाग्रस्त असू शकते. ही आकडेवारी केवळ शहरी भागापुरती मर्यादित नाही, तर हळूहळू ग्रामीण भागातही ही समस्या पसरत आहे. लहान
वयातच अभ्यासाचा वाढलेला ताण, ऑनलाइन शिक्षण, तासनतास मोबाईलवर गेम खेळणे आणि टीव्ही पाहणे यामुळे लहान वयातच जाड
भिंगाचे चष्मे लागत आहेत. स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे
डोळ्यांच्या स्नायूंवर प्रचंड ताण येतो. निळा प्रकाश डोळ्यांच्या रेटिनाला हानी
पोहोचवतो. संशोधनानुसार, सूर्यप्रकाश डोळ्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा असतो. सूर्यप्रकाशातील
'डोपॅमाइन' डोळ्यांच्या
बाहुल्यांना जास्त वाढण्यापासून रोखते. मुले घराबाहेर कमी खेळत असल्याने त्यांना
हा नैसर्गिक प्रकाश मिळत नाही. वाचन, लिहिणे किंवा स्क्रीन पाहणे यासारखी जवळची
कामे जास्त
वेळ केल्याने डोळ्यांना लांबचे पाहण्याची सवय सुटते. अपुऱ्या
झोपेमुळे डोळ्यांना विश्रांती मिळत नाही, ज्यामुळे दृष्टी कमकुवत होते. ज्या
कुटुंबात आई-वडिलांना डोळ्यांचा दोष आहे, त्या मुलांना मायोपिया होण्याची
शक्यता अधिक असते. मात्र आजच्या घडीला जीवनशैलीचे घटक आनुवंशिक कारणांपेक्षा अधिक
प्रभावी ठरत आहेत.
मायोपियाची
लक्षणे समजून घ्यायला हवीत. पालकांनी आपल्या मुलांच्या बाबतीत काही गोष्टींकडे
लक्ष द्यायला हवे. खासकरून दूरच्या वस्तू पाहताना डोळे बारीक करणे, टीव्ही पाहताना
खूप जवळ बसणे, वारंवार डोकेदुखी होणे, डोळ्यांतून पाणी येणे किंवा डोळे चोळणे, अभ्यासात
किंवा खेळात लक्ष न लागणे, दूरचे फळे, फलक किंवा
टीव्हीवरील मजकूर स्पष्ट न दिसणे, वाचन करताना डोळे लवकर थकणे, पुस्तक फार जवळ
धरून पाहणे किंवा वाचणे ही लक्षणे दिसताच डोळ्यांच्या
डॉक्टरांची भेट आणि सल्ला घ्यायला हवा. मायोपिया म्हणजे केवळ चष्मा लागणे असा एक
गैरसमज आहे. पण ते साफ चुकीचे आहे. जर हा दोष वेळेवर नियंत्रित केला नाही, तर भविष्यात 'हाय मायोपिया' होऊ शकतो. त्यामुळे
कमी वयातच मोतिबिंदू होणे, डोळ्यातील दाब वाढून दृष्टी जाणे किंवा डोळ्याचा पडदा
फाटणे, ज्यामुळे कायमचे
अंधत्व येणे याची भीती आहे. मायोपिया होऊ नये यासाठी काही उपाययोजना करायला
हव्यात. तज्ज्ञांच्या मतानुसार, डोळ्यांचे आरोग्य जपायला हवे. दर २० मिनिटांच्या
स्क्रीन वापरानंतर, २० फूट दूर असलेल्या वस्तूवर २० सेकंद लक्ष केंद्रित केल्यास डोळ्यांच्या
स्नायूंना आराम मिळतो. मुलांना दररोज किमान १ ते २ तास सूर्यप्रकाशात बाहेर खेळू द्यावे.
यामुळे मायोपियाचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो. लहान मुलांचा
स्क्रीन टाइम मर्यादित करायला हवा. जेवताना किंवा झोपण्यापूर्वी मोबाईल पूर्णपणे
टाळावा. अंधुक प्रकाशात वाचन टाळावे. पुस्तक व डोळ्यांमधील अंतर योग्य ठेवावे.
आहारात व्हिटॅमिन ए, सी, ई
आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड असलेल्या पदार्थांचा समावेश करावा (उदा. गाजर, हिरव्या
पालेभाज्या, अंडी, मासे). वर्षातून किमान
एकदा डोळ्यांच्या तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यायला हवी. आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या
सल्ल्याने चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्स, तसेच काही प्रकरणांमध्ये विशेष आयड्रॉप्सच्या मदतीने मायोपियाची वाढ मंदावता
येते. शाळांमध्ये नियमित नेत्रतपासणी शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी जागरूकता कार्यक्रम
आणि मैदानी खेळांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. पालकांनीही मुलांच्या स्क्रीन
वापरावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
'डिना इंडिया' आणि 'ब्रायन होल्डन
व्हिजन इन्स्टिट्यूट'च्या संशोधन अहवालाकडे डोळसपणे बघायला हवे. डोळ्यांची दृष्टी ही
अमूल्य देणगी आहे. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे ही देणगी धोक्यात आली आहे. जर वेळीच
उपाययोजना केल्या नाहीत तर मायोपिया ही भविष्यातील मोठी आरोग्य समस्या ठरू शकते. योग्य सवयी, जागरूकता आणि
नियमित तपासणी यांच्या माध्यमातून आपण स्वतःचे आणि आपल्या मुलांचे डोळे निरोगी
ठेवू शकतो. आज घेतलेला छोटासा निर्णय उद्याच्या अंधुक भविष्यास वाचवू शकतो. २०५०
सालचे हे भयानक चित्र बदलणे आपल्या हातात आहे. तंत्रज्ञान नाकारता येणार नाही, पण त्याचा वापर
मर्यादित करणे शक्य आहे. 'डिजिटल डिटॉक्स' आणि नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब केल्यास आपण आपली आणि आपल्या पुढच्या
पिढीची दृष्टी सुरक्षित ठेवू शकतो. डोळे हे निसर्गाची अनमोल देणगी आहेत, त्यांची काळजी
घेणे ही काळाची गरज आहे.
--
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध अभ्यासक. आणि मुक्त पत्रकार.
मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
Please Follow me on :
WhatsApp Group
– https://chat.whatsapp.com/D6XHacZLv83IvDo8Ed8sTe?mode=wwc
Facebook - www.facebook.com/BhaveshBrahmankar
X (Twitter) - www.twitter.com/BhavBrahma
Instagram - https://www.instagram.com/bhavbrahma
Blog - https://bhavbrahma.blogspot.com/
WhatsApp Channel
- https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
--
#myopia #eyesight #problems #worldwide #digital #strain #cataract #sightedness #vision #eye #health #epidemic #children

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा