हवामान बदल आणि लोकसंख्या वाढ (सामना उत्सव पुरवणी विशेष लेख)
भावेश ब्राह्मणकर जगभरात हवामान बदलाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. तापमानवाढ , अनियमित पर्जन्यमान , भीषण पूर , दीर्घकालीन दुष्काळ , समुद्रपातळीत वाढ आणि उष्णतेच्या लाटांनी जगातील प्रत्येक देशाला धोक्याची घंटा दिली आहे. या संकटासाठी नेमके कोण जबाबदार , यावर अनेक दशके चर्चा सुरू आहे. सर्वसामान्य समज असा आहे की, लोकसंख्या जितकी वाढेल , तितके कार्बन उत्सर्जन वाढेल आणि पृथ्वी अधिक तापेल. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण हा हवामान बदलावरील महत्त्वाचा उपाय असल्याचे वारंवार सांगितले जाते. मात्र , आधुनिक संशोधन या विषयाकडे अधिक व्यापक आणि संतुलित दृष्टिकोनातून पाहण्याचा सल्ला देते. सन २०२३ मध्ये जगाची लोकसंख्या आठ अब्जांचा टप्पा ओलांडून गेली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार, २०५० पर्यंत ती जवळपास ९.७ अब्ज आणि शतकाच्या अखेरीस १०.३ अब्जांपर्यंत पोहोचू शकते. अर्थातच अधिक लोकसंख्या म्हणजे अन्न , पाणी , निवारा , ऊर्जा , वाहतूक आणि रोजगार यांची वाढती मागणी. या गरजा भागविण्यासाठी उद्योग वाढतात , ऊर्जा निर्मिती वाढते आणि त्यातून हरितगृह वायूंचे उत्सर्जनही वाढते. त्यामुळे लोकसंख्या आणि हवामा...