वाळवंटात पूर आणि दुर्मिळ माकडांचे अस्तित्व (सामना उत्सव पुरवणी विशेष)

सध्या हवामान बदलाचा हाहाकार पहायला मिळत आहे. भारतात मान्सून रेंगाळला आहे तर चीनमधील वाळवंटात पूर आला आणि इंडोनेशियात दुर्मिळ माकडे अस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

भावेश ब्राह्मणकर

संपूर्ण जग सध्या एका वेगळ्या आणि अत्यंत चिंताजनक हवामान बदलाच्या कालखंडातून जात आहे. कधी नव्हे ते निसर्गाचे असे चमत्कार आणि प्रकोप पाहायला मिळत आहेत, ज्याची मानवाने कधी कल्पनाही केली नव्हती. नुकत्याच समोर आलेल्या दोन वेगवेगळ्या जागतिक घटनांनी पर्यावरण तज्ज्ञांची झोप उडवली आहे. एकीकडे चीनमधील जगातील सर्वात कोरड्या समजल्या जाणाऱ्या टाकलामाकन वाळवंटात भीषण पूर आला आहे, तर दुसरीकडे इंडोनेशियातील मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जगातील अत्यंत दुर्मिळ अशा 'तापनुली ओरंगुटान' या प्रजातीच्या माकडांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. या दोन्ही घटना मानवासाठी धोक्याची घंटा आहेत.

चीनच्या उत्तर-पश्चिमेकडील शिनजियांग प्रांतात असलेले टाकलामाकन वाळवंट हे चीनमधील सर्वात मोठे आणि जगातील अत्यंत रखरखीत वाळवंट म्हणून ओळखले जाते. मात्र, यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच या वाळवंटाने एका अभूतपूर्व संकटाचा सामना केला – तो म्हणजे 'पूर'. ज्या वाळूच्या ढिगाऱ्यांवर पाण्याचा थेंबही मिळणे कठीण होते, तिथे आता पाण्याचे मोठे प्रवाह वाहत असल्याचे चित्र चीनच्या सीसीटीव्ही या सरकारी वृत्तवाहिनीने दाखवले आहे.

वाळवंटात पूर येण्याचे मुख्य कारण म्हणजे अचानक झालेली कमालीची तापमानवाढ आणि अवेळी झालेला मुसळधार पाऊस. जूनच्या सुरुवातीलाच शिनजियांग प्रांतातील तापमान सरासरीपेक्षा चक्क ७.३ अंश सेल्सिअसने जास्त होते. येथे तापमान ३८ अंश सेल्सिअस (१०० अंश फॅरेनहाइट) पर्यंत पोहोचले होते. या तीव्र उष्णतेमुळे तियानशान आणि कुनलुन पर्वतरांगांमधील हिमनद्या आणि बर्फाचे थर वेगाने वितळू लागले. हा वितळलेला बर्फ आणि त्यात पडलेला मुसळधार पाऊस यांचे पाणी शिनजियांगमधील सर्वात लांब अंतर्गत जलवाहिनी असलेल्या तारिम नदीत आले. नदीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपल्यामुळे तिने आपली पात्रे ओलांडली आणि हे पाणी थेट टाकलामाकन वाळवंटातील सखल भागात घुसले.

वास्तविक पाहता, २०२१ पासून या वाळवंटात असे पूर येत आहेत, पण ते सामान्यतः ऑगस्ट महिन्यात येतात जेव्हा उन्हाळा सर्वोच्च पातळीवर असतो. यावर्षी मात्र जूनच्या सुरुवातीलाच ही परिस्थिती निर्माण झाल्याने हवामान तज्ज्ञ चिंतेत आहेत. शिनजियांगच्या काही भागांत या काळात ऐतिहासिक सरासरीपेक्षा दुप्पट ते तिप्पट पाऊस नोंदवला गेला आहे.

वाळवंटात पाणी आल्यामुळे स्थानिक जंगलांना आणि झाडांना संजीवनी मिळाली आहे. काही काळासाठी तिथे सुंदर 'ओएसिस' (वाळवंटातील हिरवळ) तयार झाली आहे. परंतु, तज्ज्ञांच्या मते हा आनंद फार काळ टिकणारा नाही. टाकलामाकन वाळवंट हे चारही बाजूंनी पर्वतांनी वेढलेले आहे आणि समुद्रापासून खूप दूर आहे. त्यामुळे येथील अत्यंत कमी आर्द्रता आणि वेगवान बाष्पीकरणामुळे हे पाणी लवकरच सुकणार आहे. दुसरीकडे, चीनच्या हवामान विभागाच्या विश्लेषक सुन कियानकियान यांनी इशारा दिला आहे की, हा पूर स्थानिक पायाभूत सुविधांसाठी अत्यंत घातक आहे. या अतिवृष्टी आणि पुरामुळे रस्ते, रेल्वे मार्ग आणि तेल-वायूचे कारखाने उद्ध्वस्त होऊ शकतात. त्यामुळे पर्यटक आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चीनमध्ये निसर्गाचे हे रूप पाहत असतानाच, इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर एक हृदयद्रावक चित्र समोर येत आहे. गेल्या वर्षी सुमात्रा येथे आलेल्या चक्रीवादळ, मुसळधार पाऊस आणि भीषण भूस्खलनामुळे केवळ मानवी हानीच झाली नाही, तर वन्यजीवांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. या आपत्तीत जगातील सर्वात दुर्मिळ अशा तापनुली ओरंगुटान या वानर प्रजातीची किमान ७% लोकसंख्या एका झटक्यात नष्ट झाली आहे. 'बोर्नियो फ्युचर्स', 'वर्ल्ड वेदर अट्रिब्युशन' आणि 'लिव्हरपूल जॉन मूर युनिव्हर्सिटी' यांनी केलेल्या संयुक्त अभ्यासानुसार, सुमात्राच्या बातांग तोरु  जंगलात राहणाऱ्या तापनुली ओरंगुटानच्या पश्चिम भागातील सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पुरामध्ये आणि भूस्खलनात किमान ५८ तापनुली ओरंगुटान मारले गेले. या संपूर्ण प्रजातीची एकूण संख्या जगात केवळ ८०० च्या आसपास आहे. त्यातील ७% पेक्षा जास्त ओरंगुटान एकाच वर्षात मरण पावले. तज्ज्ञांच्या मते, हा सर्व्हे फक्त पश्चिम भागाचा होता, जंगलाच्या इतर भागांचा अभ्यास केला तर हा आकडा याहूनही मोठा असू शकतो. या आपत्तीत मानवी वस्त्यांचेही मोठे नुकसान झाले होते; सुमारे १,२०० लोकांचा मृत्यू झाला होता आणि ३ लाख घरे उद्ध्वस्त झाली होती.

बोर्नियो फ्युचर्सचे मुख्य लेखक एरिक मेयार्ड यांनी सांगितले की, मानवनिर्मित हवामान बदलामुळे मलाक्का सामुद्रधुनीच्या आसपास अतिवृष्टीची तीव्रता वाढली आहे. सुमात्रा बेटावर झालेल्या बेसुमार जंगलतोडीमुळे येथील मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता संपली. मुसळधार पावसामुळे डोंगराचे कडे अत्यंत वेगाने कोसळले. झाडांवर राहणारे हे ओरंगुटान इतक्या वेगाने आलेल्या भूस्खलनातून स्वतःचा जीव वाचवू शकले नाहीत. "ज्या प्रजातीची संख्या आधीच बोटावर मोजण्याइतकी आहे, त्यांच्यासाठी ७% नुकसान म्हणजे खूप मोठा धक्का आहे. आधीच जंगलतोड आणि मानवी हस्तक्षेपामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात होते, त्यात निसर्गाच्या या प्रकोपाने त्यांच्या विनाशाचा वेग वाढवला आहे," अशी भीती मेयार्ड यांनी व्यक्त केली आहे.

चीन आणि इंडोनेशियातील या दोन घटना आपल्याला एकच संदेश देतात की, हवामान बदल ही भविष्यातील भीती राहिलेली नसून, वर्तमानातील जळजळीत वास्तव बनले आहे. वाळवंटात पूर येणे आणि जंगलात राहणारे प्राणी भूस्खलनात मरण पावणे, या दोन्ही निसर्गाच्या साखळीतील बिघाडाच्या खुणा आहेत. कार्बन उत्सर्जन कमी करणे, जंगलतोड थांबवणे आणि निसर्गाचा समतोल राखणे ही आता केवळ जागतिक नेत्यांची जबाबदारी राहिलेली नाही, तर संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. जर आपण आताच ठोस पावले उचलली नाहीत, तर निसर्गाचे हे रौद्ररूप अशा अनेक प्रजाती आणि मानवी संस्कृतींना गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही.

--

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार.
मो.
9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

Please Follow me on :

WhatsApp Group – https://chat.whatsapp.com/D6XHacZLv83IvDo8Ed8sTe?mode=wwc

Facebook   - www.facebook.com/BhaveshBrahmankar

X (Twitter) - www.twitter.com/BhavBrahma

Instagram  - https://www.instagram.com/bhavbrahma

Blog        -  https://bhavbrahma.blogspot.com/

WhatsApp Channel  - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

--

#Climate #Change #China #Indonesia #Flood #Tapanuli #Orangutan #Xinjiang #North #Sumatra #Batang #Toru #Taklamakan #Desert #landslides #Global #Warming #Environment #Bhavesh #Brahmankar


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)

तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी (नवशक्ती)