‘जेन झी’ची ‘नेट झी’ मोहिम! (सामना उत्सव पुरवणी)

जगातील ६० देशांमधील ५५० हून अधिक विद्यापीठातील जेन झी सध्या नेट झी मोहिमेमध्ये गुंतले आहेत. पर्यावरण संकटाविषयी केवळ चिंता करण्यापेक्षा या सर्वांनी प्रत्यक्ष कृती सुरू करुन मोठा आदर्श निर्माण केला आहे.

भावेश ब्राह्मणकर

जगभरात २१ मार्च हा वन दिन, २२ मार्च जल दिन आणि २३ मार्च रोजी हवामान दिन साजरा होत आहे. हे तिन्ही दिवस साजरे करण्यामागे पर्यावरण रक्षणाची जाणिव निर्माण करणे हेच आहे. आणि याच दिनाच्या निमित्ताने आपण एका नाविन्यपूर्ण मोहिमेविषयी जाणून घेणार आहोत. नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश येथे ‘जेन झी’ने केलेल्या आंदोलनाची जगभर चर्चा झाली. मात्र, जगभरातील ‘जेन झी’ अतिशय सकारात्मक कार्य करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यास निमित्त ठरले आहे ते पुण्यातील पर्यावरण शास्त्रज्ञ आणि ग्रीन तेर फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. राजेंद्र शेंडे. पूर्वी ते संयुक्त राष्ट्राच्या ओझोन कृती समितीचे प्रमुख होते. तेथून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी तरुणांना डोळ्यासमोर ठेवत एक महत्वाकांक्षी मिशन हाती घेतले आहे. विद्यापीठातील तरुणांना पर्यावरण योद्धे बनविण्याची नेट झिरो ही चळवळ पाहता पाहता ६० देशातील ५५० हून अधिक विद्यापीठांपर्यंत जाऊन पोहचली आहे.

हवामान बदलास प्रामुख्याने कारणीभूत आहेत ते हरित गृह वायू. या वायूंचे उत्सर्जन विविध माध्यमातून होते. कोळसा, पेट्रोल यासह विविध इंधनांचे ज्वलन, उद्योग, वाहनांचे प्रदूषण यातून मिथेन, कार्बन डायऑक्साईड आदी हरित गृह वायू पृथ्वीच्या वातावरणात मिसळतात. या वायूंमुळे पृथ्वी भोवतीच्या वातावरणावर विपरीत परिणाम होतो. सहाजिकच पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्यास त्याची मदत होते. हे एक प्रकारचे चक्र आहे. ते विस्कळीत करायचे किंवा थांबवायचे असेल तर हरित गृह वायूंच्या उत्सर्जनाला आळा घालणे आवश्यक आहे. मात्र, हे करताना प्रगती किंवा विकासाला आळा घालावा लागेल, अशी भीती अनेक देशांना आहे. म्हणूनच हवामान बदलाला रोखण्यासंदर्भात समाधानकारक कृती होताना दिसत नाही. परंतु, या सर्व नकारात्मक वातावरणात नेट झिरो ही आशादायी मोहिम सक्रीय झाली आहे.

नेट झिरो ही मोहिम उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राबविली जात आहे. ही मोहिम राबविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत भारतीय तरुण हे जगातील सर्वात तरुण आहेत. जागतिक लोकसंख्येत भारताचा वाटा एक पंचमांश एवढा आहे. तर, २०२२ मधील वैश्विक सर्वेक्षणानुसार, भारतातील निम्मी लोकसंख्या ही २५ वर्षे वयापेक्षा कमी आहे. तर, ६५ टक्के हे ३५ वर्षे वयाखालचे आहेत. तरुण लोकसंख्या ही भारताची जमेची बाजू आहे. तरुणांमध्ये चैतन्य, उत्साह, नवे काही तरी करण्याची उर्मी असते. शिवाय ते कल्पक असतात. युवा शक्ती हा एक मोठा स्त्रोत आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे स्टार्टअप हे भारतात आहेत. केवळ एवढेच नाही तर ज्या स्टार्टअपची उलाढाल १०० कोटी अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक आहे अशांमध्येही भारत जगात तिसऱ्या स्थानी आहे. ही बाब केवळ भूषणावहच नाही तर भारतीय युवा शक्तीचे प्रतिबिंब दर्शविणारी आहे. आजच्या अत्याधुनिक काळाचे अपत्य आणि आगामी काळात ज्याचा बोलबाला असणाऱ्या चॅटजीपीटी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता), ऑगमेंटेड रिअलिटी अशा विविध क्षेत्रातही भारतीय तरुणांचाच बोलबाला आहे. त्यामुळेच तरुणांना डोळ्यासमोर ठेऊन नेट झिरो मोहिम सुरू झाली. उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये जेन झी सलग तीन ते पाच वर्षे शिक्षण घेतात. त्यांच्याकडून येणाऱ्या बहुविध संकल्पनाही या मोहिमेत राबविल्या जात आहेत. शिक्षण घेता घेता नेट झिरोच्या माध्यमातून युवक प्रत्यक्ष योगदान देत आहेत.


भारतात केंद्रीय शिक्षण मंत्रालय, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी), एनर्जी इफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल), भारतीय तंत्रशिक्षण संचालनालय (एआयसीटीई), द एनर्जी रिसोर्स इन्स्टिट्यूट (टेरी), युनेस्को, एनबीए/एनआयआरएफ, असोचॅम, निती आयोग, आयआयटी आणि विद्यापीठांनी या मोहिमेला बळ दिले आहे. कार्यशाळांद्वारे ही मोहिम समजून सांगतानाच प्राध्यापक, विद्यार्थी या सर्वांच्या शंकांचे निरसन आणि आगामी काळासाठीचा कृती आराखडा त्यांच्या मनात तयार व्हावा असा विचार करण्यात आला. त्यानुषंगाने विविध तज्ज्ञांची फळी सज्ज झाली. सर्वप्रथम पुणे विद्यापीठात कार्यशाळा झाली. त्यापाठोपाठ, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी येथे संपन्न झाल्या. आता तर ही मोहिम जगभर पसरली आहे. भारत, चीन, लॅटिन अमेरिका, अफ्रिकी देश, अमेझॉनलगतचे देश आदी त्यात सहभागी झाले आहेत.

नेट झिरो मोहिमेमध्ये विद्यापीठे व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पर्यावरण साक्षर बनविले जात आहे. सौर, पवन, जलविद्युत यासह अपारंपरिक स्त्रोतांद्वारे ऊर्जा निर्मिती, ऊर्जा कार्यक्षमता, वीजेची बचत यावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले जात आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचा कॅम्पस प्रदूषणमुक्त केला जाईल. त्यासाठी कचऱ्याचे व्यवस्थापन, पेपरलेस कामकाज, पर्यावरणस्नेही पर्यायांचा अवलंब. कार्यशाळांद्वारे जनजागृती आणि नक्की काय करायचे आहे याची पार्श्वभूमी तयार झाली. आता कृतीही सुरु झाली आहे. प्रत्येक उच्च शैक्षणिक संस्थांच्या कॅम्पसमध्ये प्रदूषण टाळण्यासाठी काय काय करायला हवे, काय नको याचा अहवाल तयार केला जात आहे. कार्बनमुक्त कॅम्पस करण्यासाठी कुठल्या नव्या बाबी करायच्या आहेत ते निश्चित होत आहे. त्यानंतर एक सर्वंकष कृती आराखडा बनवून तज्ज्ञांच्या संमतीने तो अंतिम केला जाईल. हा आराखडा राबवून नेट झिरोचे उद्दीष्ट निश्चित केले जाईल. ते गाठण्यासाठी प्रत्यक्ष कृती सुरू होईल. या सर्व प्रक्रियेत अनेक बड्या खासगी संस्था, कंपन्या, उद्योग हे सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत. सामाजिक उत्तरदायीत्वाच्या (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) माध्यमातून ते योगदान देत आहेत. म्हणजेच, आर्थिक बाजू ते सांभाळतात आणि शैक्षणिक संस्थांमधील युवक हे प्रत्यक्ष कृतीद्वारे योगदान देत आहेत. यात ग्रीन तेर फाऊंडेशन समन्वयाची भूमिका बजावत आहे.

जेव्हा उच्च शैक्षणिक संस्थांचा परिसर नेट झिरो होईल तो दिवस खुप महत्त्वाचा असेल. कारण, केवळ एका संस्थेत हे होणार नाही तर शेकडो संस्था एकाचवेळी किंवा टप्प्याटप्प्याने त्यांचे उद्दीष्ट गाठणार आहेत. जगभराचा विचार करता ही व्यापक मोहिम मोठे यश देणारी आहे. हवामान बदलाच्या युद्धात अशा प्रकारची लढाई लढणारे आणि ती जिंकणारे ‘जेन झी’ आणि शिक्षण क्षेत्र हे संपूर्ण जगालाच मार्गदर्शक ठरतील. जेन झींद्वारे होणारे हे विधायक कार्य कौतुकास्पदच नाही तर मार्गदर्शकही आहे.

--

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार.
मो.
9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

Please Follow me on :

WhatsApp Group – https://chat.whatsapp.com/D6XHacZLv83IvDo8Ed8sTe?mode=wwc

Facebook   - www.facebook.com/BhaveshBrahmankar

X (Twitter) - www.twitter.com/BhavBrahma

Instagram  - https://www.instagram.com/bhavbrahma

Blog        -  https://bhavbrahma.blogspot.com/

WhatsApp Channel  - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

--

#GenZ #Net #Zero #Environment #Youth #Education #University #Campus #Carbon #Emission #Footprint #Rajendra #Shende #SCCN #Initiative  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)

तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी (नवशक्ती)