इराणमधील काळ्या पावसाची एवढी चर्चा का? (सामना उत्सव पुरवणी)
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धाने जगभरात भितीचा गोळा निर्माण झाला आहे. त्यातच इराणच्या तेहरानमध्ये काळा पाऊस पडल्याने त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचे कारण काय?
भावेश ब्राह्मणकर
विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील
युद्धे केवळ दोन देशांमधील लष्करी ताकद आजमावण्यापुरती मर्यादित राहिलेली नाहीत.
आधुनिक युद्धतंत्रात शत्रूला जेरीस आणण्यासाठी आता केवळ मानवी जीवहानी केली जात
नाही, तर
त्या देशाचा आर्थिक आणि नैसर्गिक कणा मोडण्याचे काम केले जात आहे. इराण आणि
इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या ताज्या संघर्षाने याचे भयावह स्वरूप जगासमोर आणले
आहे. इस्रायलने इराणच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर केलेल्या भीषण हवाई
हल्ल्यानंतर तेहरानमध्ये पडलेला 'काळा विषारी पाऊस' ही केवळ एक हवामानशास्त्रीय घटना नसून, ती निसर्गावर झालेल्या क्रूर आक्रमणाची पोचपावती आहे.
गेल्या रविवारी इराणची राजधानी
तेहरानच्या नागरिकांनी जे अनुभवले, ते कोणत्याही हॉलीवूडच्या थरारपटापेक्षा कमी नव्हते. आकाशातून
पाण्याचे थेंब नव्हे, तर
काळ्या रंगाचे, चिकट
आणि दुर्गंधीयुक्त रसायन पडत होते. फोर्ब्स आणि इतर आंतरराष्ट्रीय माध्यमांनी
दिलेल्या वृत्तानुसार, हा 'काळा पाऊस' म्हणजे इस्रायली हल्ल्यात जळून खाक झालेल्या इराणच्या तेल साठ्यांचा
आणि रिफायनरींचा अवशेष होता. जेव्हा क्षेपणास्त्रे तेल साठ्यांवर आदळतात, तेव्हा लाखो टन कच्च्या तेलाचे ज्वलन
होते. यातून निर्माण होणारा प्रचंड काळा धूर, कार्बनचे कण आणि सल्फर डायऑक्साइड सारखी विषारी रसायने वातावरणात
वरच्या थरापर्यंत पोहोचतात. पावसाच्या ढगांशी या कणांचा संयोग झाला की, तो पाऊस 'काळा विषारी पाऊस' म्हणून जमिनीवर येतो. हा पाऊस केवळ कपडे किंवा गाड्या खराब करत नाही, तर तो मानवी त्वचा, फुफ्फुसे आणि संपूर्ण परिसंस्थेसाठी कर्करोगासारखा
घातक ठरतो. या घटनेने इराणमध्ये आता आरोग्य आणि पर्यावरण आणीबाणी निर्माण केली
आहे.
इराण हा जगातील महत्त्वाचा तेल
उत्पादक देश आहे. इस्रायलने नेमके याच मर्मावर घाला घातला. इराणच्या अब्जावधी
डॉलर्सच्या तेल मालमत्तेचे नुकसान तर झालेच, पण त्यातून निर्माण झालेला 'ब्लॅक कार्बन' आता संपूर्ण पश्चिम आशियाच्या वातावरणात पसरला आहे. जेव्हा तेल
प्रकल्प जळतात, तेव्हा
त्यातून निघणारा धूर इतका दाट असतो की तो सूर्याचे किरण जमिनीपर्यंत पोहोचू देत
नाही. यामुळे स्थानिक तापमानात अचानक बदल होतात. या धुरामध्ये 'हायड्रोकार्बन्स'चे प्रमाण सर्वाधिक असते. हे कण
श्वासाद्वारे शरीरात गेल्याने श्वसनसंस्थेचे कायमस्वरूपी नुकसान होते. तेहरानमधील
रुग्णालयांमध्ये सध्या श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली
आहे, हे याचेच द्योतक
आहे.
आजच्या काळात युद्धाला केवळ राजकीय
परिप्रेक्ष्यातून न पाहता 'इकोसाईड' या
नजरेतून पाहण्याची गरज आहे. इकोसाईड म्हणजे पर्यावरणाची जाणीवपूर्वक केलेली व्यापक
नासाडी. इराणमधील या हल्ल्यांमुळे होणारे नुकसान जाणून घेणे आवश्यक आहे.
जमिनीचे विषारीकरण - तेल साठे फुटल्यामुळे हजारो गॅलन तेल शेतजमिनीत आणि मोकळ्या
भूभागात पसरले आहे. कच्च्या तेलातील जड धातू जमिनीत मुरल्यामुळे ती जमीन पुढील
अनेक दशके नापीक होते. त्याशिवाय जळालेल्या तेलातून तयार झालेली राख आणि रासायनिक
अवशेष जमिनीवर साचतात. या घटकांमध्ये अनेकदा भारी धातू आणि विषारी संयुगे असतात.
ही रसायने जमिनीत मिसळल्यास शेतीची सुपीकता कमी होते. जमिनीतील सूक्ष्मजीव, जे मातीचा कस टिकवून ठेवतात, ते या तेलाच्या थर आणि भारी धातूंमुळे
गुदमरून मरतात. इराणमध्ये पिकांचे उत्पादन घटून अन्नसाखळीतही विषारी घटक प्रवेश
करण्याची शक्यता वर्तवली जात होते. दीर्घकाळ या जमिनीचा वापर करणेही धोकादायक ठरू
शकते.
जलस्त्रोतांवरील संकट - इराण हा
मुळातच पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेला देश आहे. येथील भूगर्भातील पाणी हेच शेती आणि
पिण्यासाठी मुख्य आधार आहे. जेव्हा काळा पाऊस पडतो किंवा तेल जमिनीवर सांडते, तेव्हा ते पावसाच्या पाण्यासोबत
झिरपून थेट भूजलात मिसळते. एकदा का भूजल साठे विषारी झाले की, ते शुद्ध करणे विज्ञानासाठीही मोठे
आव्हान असते. या युद्धामुळे इराणच्या पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षेला मोठा सुरुंग
लागला आहे.
सागरी जीवसृष्टीचा विनाश - इराणची
किनारपट्टी आणि पर्शियन आखातातील जैवविविधता जागतिक स्तरावर महत्त्वाची आहे. तेल
गळतीमुळे समुद्राच्या पृष्ठभागावर तेलाचा तवंग निर्माण होतो, ज्यामुळे पाण्यात ऑक्सिजन जाण्याचे
प्रमाण कमी होते. यामुळे मासे आणि इतर जलचर प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू
होतो. हे केवळ इराणचे नुकसान नसून संपूर्ण जागतिक सागरी पर्यावरणाचे नुकसान आहे.
मानवी आरोग्याला बाधा - युद्धामुळे
निर्माण होणारे वायू प्रदूषण हा सर्वात मोठा पर्यावरणीय धोका ठरत आहे. तेलसाठे आणि
औद्योगिक प्रकल्प जळल्यामुळे प्रचंड प्रमाणात धूर आणि विषारी वायू हवेत पसरतात.
यामुळे हवेची गुणवत्ता अत्यंत धोकादायक पातळीवर जाते. अशा प्रदूषित हवेमुळे
नागरिकांमध्ये श्वसनाचे आजार, अस्थमा, फुफ्फुसांचे विकार आणि डोळ्यांच्या तक्रारी वाढू शकतात. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि आधीपासून आजार असलेल्या व्यक्तींवर याचा अधिक परिणाम
होतो.
जैविक विविधतेची हानी - युद्धामुळे जैवविविधतेलाही धोका निर्माण होतो.
हवाई हल्ले, आग आणि प्रदूषण यामुळे अनेक प्राणी-पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट
होतात. धूर आणि विषारी वायूंमुळे पक्ष्यांचे स्थलांतर बदलते किंवा अनेक प्रजातींचा
मृत्यू होतो. काही प्रजाती दीर्घकाळासाठी त्या प्रदेशातून नष्ट होण्याचाही धोका
निर्माण होतो. त्यामुळे संपूर्ण परिसंस्थेवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
जग आज 'नेट झिरो' आणि
कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या गप्पा मारत असताना, ही युद्धे या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. एका क्षेपणास्त्र
हल्ल्यात आणि त्यानंतर लागणाऱ्या आगीत जेवढा कार्बन उत्सर्जित होतो, तेवढा कार्बन कमी करण्यासाठी जगाला
कित्येक वर्षे लागतात. इराणमधील रिफायनरींच्या आगीतून निघालेला कार्बन हा जागतिक
तापमान वाढीला हातभार लावणारा ठरणार आहे. दुर्दैवाने, युद्धात होणाऱ्या मानवी मृत्यूंची गणना केली जाते, आर्थिक नुकसानीचे आकडे मोजले जातात, पण पर्यावरणाचे जे नुकसान होते, त्याकडे जागतिक संघटनांचे दुर्लक्ष
होते. जिनिव्हा कन्व्हेन्शननुसार, नैसर्गिक पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर आणि दीर्घकालीन नुकसान
करणाऱ्या युद्धतंत्रावर बंदी आहे. मात्र, इराण-इस्रायल संघर्षात या नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे.
इराणमधील ही घटना जगासाठी एक
धोक्याची घंटा आहे. जर युद्धे अशीच निसर्गाला ओलीस धरून खेळली गेली, तर भविष्यात जिंकणारा देशही नष्ट
झालेल्या निसर्गामुळे हरलेलाच असेल. कारण, बॉम्बने पडलेले खड्डे भरून काढता येतील, पण विषारी झालेले पाणी आणि हवा शुद्ध करण्यासाठी निसर्गाला हजारो
वर्षे लागतील.
इतिहासातही युद्धामुळे पर्यावरणावर
गंभीर परिणाम झाल्याची उदाहरणे आहेत. १९९१ मध्ये गल्फ युद्धाच्या वेळी कुवेतमधील
तेल विहिरींना आग लावण्यात आली होती. त्या आगीतून निर्माण झालेल्या धुरामुळे अनेक
महिन्यांपर्यंत वातावरण प्रदूषित झाले होते. त्या तुलनेत इराणमधील सध्याची
परिस्थिती लहान असली तरी त्याचे परिणाम दीर्घकालीन असू शकतात. इराणमधील 'काळा पाऊस' हा केवळ इराणचा प्रश्न नाही. निसर्गाला सीमा नसतात. तेथील विषारी हवा
वाऱ्यासोबत शेजारील देशांमध्येही जाईल. मानवाच्या सत्तेच्या आणि वर्चस्वाच्या
हव्यासापोटी निसर्गाचा जो बळी दिला जात आहे, त्याचे परिणाम पुढील पिढ्यांना भोगावे लागणार आहेत. आता वेळ आली आहे
की, जागतिक
समुदायाने 'पर्यावरणीय
युद्ध गुन्हे' यावर
कडक कायदे करून त्यांची अंमलबजावणी करावी. अन्यथा, उद्याचा सूर्य हा धुराच्या लोटात हरवलेला असेल आणि पाऊस हा जीव देणारा
नसून जीव घेणारा 'काळा
पाऊस' ठरेल.
--
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक.
तसेच मुक्त पत्रकार.
मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
Please Follow me on :
WhatsApp Group – https://chat.whatsapp.com/D6XHacZLv83IvDo8Ed8sTe?mode=wwc
Facebook - www.facebook.com/BhaveshBrahmankar
X (Twitter) - www.twitter.com/BhavBrahma
Instagram - https://www.instagram.com/bhavbrahma
Blog - https://bhavbrahma.blogspot.com/
WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
--
#Israel #Iran #Conflict #War #West #Asia
#Middle #East #Environment #Loss #Global #Warming #Crimes #Oil #Refineries #Ecocide
#Pollution #Black #Rain



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा