जगातील एकमेव अन्न आत्मनिर्भर देश (सामना उत्सव पुरवणी)

एखादा देश स्वतःला लागणारे अन्न स्वतःच पिकवतो, असे सांगितले तर विश्वास बसेल का? पण हो, या देशाने हे करून दाखवले आहे. कसं केलं त्या देशाने सगळं? इतरांनाही शक्य आहे का?

भावेश ब्राह्मणकर

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात, जेव्हा जगातील महासत्ता असलेले देशही अन्नासाठी एकमेकांवर अवलंबून आहेत, तेव्हा दक्षिण अमेरिकेतील एका छोट्याशा देशाने संपूर्ण जगासमोर एक आदर्श घालून दिला आहे. गयाना असे या देशाचे नाव आहे. जगातील १८६ देशांच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, गयाना हा एकमेव असा देश आहे जो आपल्या गरजेच्या सातही श्रेणींमधील अन्नपदार्थ स्वतःच पिकवतो. विशेष म्हणजे, या देशाचा भारताशी अतिशय जवळचा संबंध असून येथील संस्कृतीवर भारतीय ठसा उमटलेला आहे. गयानाने मिळविलेला हा विजय केवळ भाग्यवश किंवा नैसर्गिक परिस्थितीमुळे झालेले नाही, तर तो एक स्पष्ट धोरणात्मक, आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या समन्वयातून घडलेला यशप्राप्त अनुभव आहे.

'नेचर फूड' या प्रतिष्ठित मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, गयाना हा अन्नधान्य उत्पादनात १०० टक्के स्वयंपूर्ण ठरला आहे. तांदूळ, गहू, मका यासारखी तृणधान्ये, कडधान्ये, फळे आणि भाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस (पोर्क, बीफ, पोल्ट्री), मासळी आणि तेलबिया अशा महत्त्वाच्या सातही विभागांत हा देश कुणावरही अवलंबून नाही. जगातील बडे देश जसे की अमेरिका (केवळ ४ श्रेणीत सक्षम), ब्रिटन (२ श्रेणी) आणि चीन (६ श्रेणी) देखील ही किमया साधू शकलेले नाहीत. भारताचा विचार केला तर आपण धान्य आणि दूध उत्पादनात अव्वल असलो तरी, डाळी (१०-१५ टक्के) आणि खाद्यतेल (५५-६० टक्के) आपल्याला आजही आयात करावे लागते. या पार्श्वभूमीवर गयानाचे यश डोळे दिपवणारे आहे.

गयाना हे दक्षिण अमेरिकेच्या कॅरिबियन किनाऱ्यावर वसलेले एक छोटे पण फलदायी राष्ट्र आहे. याची लोकसंख्या सुमारे ८ लाख इतकी असून, निसर्गाची अनुकूलता आणि कृषी रणनिती यांचा योग्य संगम मिळून या देशाने अद्वितीय प्रगती साधली आहे. गयानाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ४० टक्के लोक (सुमारे ३.५ लाख) भारतीय वंशाचे आहेत. १९ व्या शतकात ब्रिटीश राजवटीत उत्तर प्रदेश आणि बिहारमधून अनेक भारतीयांना गयानामध्ये ऊसतोड कामगार म्हणून नेण्यात आले होते. आज त्यांचे वंशज या देशाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. गयानातील जेवणात आजही बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशची चव मिळते. 'दाल पुरी', 'कढी-भजी', 'बारा' (वडा) आणि 'सात भाजी' (सण-उत्सवात बनवला जाणारा पदार्थ) हे येथील लोकप्रिय खाद्यप्रकार आहेत. भारतीय मसाल्यांचा वापर करून बनवलेली भाजी आणि 'पर्मिगी' (शेवयांसारखी मिठाई) यामुळे गयानात गेल्यावर भारताबाहेर आणखी एक भारत असल्याचा भास होतो.

गयानाचे भौगोलिक क्षेत्रफळ भारताच्या गुजरात राज्याइतके आहे, मात्र लोकसंख्या त्यामानाने अत्यंत कमी आहे. या देशाने केवळ नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून न राहता धोरणात्मक निर्णय घेतले. गेल्या काही वर्षांत गयाना सरकारने कृषी क्षेत्रावरील खर्चात तब्बल ४६८ टक्क्यांनी वाढ केली आहे. केवळ तांदूळ किंवा साखर या पारंपरिक पिकांवर लक्ष न देता, त्यांनी मका, सोयाबीन आणि दुग्ध व्यवसायालाही प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर सिंचन व्यवस्था, रस्ते, साठवणूक क्षमता आणि शेतकरी प्रशिक्षण यावर त्यांनी सातत्याने गुंतवणूक केली. दक्षिण अमेरिकेतील अनेक देश शेतीसाठी जंगल तोडत असताना गयानाने आपल्या ८५ टक्के भागातील जंगले सुरक्षित ठेवून उपलब्ध जमिनीचा जास्तीत जास्त वापर केला आहे. विषुववृत्ताजवळ असलेल्या गयानाला वर्षभर पाऊस, आर्द्रता आणि अ‍ॅमेझॉन नदी प्रणालीमुळे प्राप्त झालेली सुपीक जमीन लाभली आहे. या नैसर्गिक वरदानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांनी हा मैलाचा दगड गाठला आहे. २०२५ या वर्षात गयानाने कृषी बजेटसाठी तब्बल १०४.६ अब्ज डॉलरची तरतूद केली. यामुळे कृषी सुधारणा, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि संशोधनाला मोठा वाव मिळाला.

फक्त पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता, गयानाने विविध पिकांच्या उत्पादनाला प्राधान्य दिले. जसे की, भात, कॉर्न आणि सोया, मसाले, हळद, अद्रक, भाज्या फळे, मत्स्यपालन आणि दुग्धजन्य उत्पादने, मधमाश्य पालन. या सर्व क्षेत्रांना सक्षम करून गयानाने विविधीकरणामुळे अन्नचक्र अधिक स्थिर व सुरक्षित केले आहे. गयानामध्ये युवा, महिला आणि लहान शेतकऱ्यांना प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य देणारे कार्यक्रम सुरु केले गेले. विविध सरकारी योजना आणि उपक्रमांद्वारे नवयुवक कृषि उद्योगात रुजू केले असून, अनेकांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यास मदत झाली आहे. गयाना हा परंपरागतपणे भात उत्पादनासाठी परिचित आहे. अन्नपुरवठा आणि निर्यातीमध्ये भाताचे योगदान देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे आहे. हे उत्पादन देशांतर्गत खाण्यापेक्षा जास्त असल्यामुळे निर्यातीसही मदत होते. गयानात मत्स्यपालन क्षेत्र विस्तारले असून, पशुपालन (पोल्ट्री, गोवंश) आणि दुग्धजन्य उत्पादनही वाढीस लागले आहे. हे निर्णय राष्ट्रीय अन्न मूल्य साखळीला मजबुती देतात. गयाना चीन किंवा व्हिएतनामप्रमाणे अन्न पुरवठ्यात नाही तर स्वतःचे लाइव्हस्टॉक फीड (कॉर्न व सोया) सुद्धा उत्पादनास तयार करत आहे. ज्यामुळे दरवर्षी परकीय चलन वाचवले जाते व पशुधन क्षेत्राला बळ मिळते. गयाना हा मधमाशा पालन क्षेत्रही विकसित करत आहे, ज्यातून मधाच्या उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली आहे. २०२३ मध्ये २६०० गॅलन असलेले मध उत्पादन २०२४ मध्ये जवळपास ३० हजार गॅलनपर्यंत पोहचले.

पूर्ण स्थानिक अन्न पुरवठा झाल्यामुळे गयानाचे परकीय बाजारांवरील अवलंबित्व कमी झाले आहे. भरपूर उत्पादन आणि सरकारच्या सहाय्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आणि ग्रामीण भाग समृद्ध झाला आहे. नवीन पिके, प्रशिक्षण कार्यक्रम आणि रोजगार संधींमुळे ग्रामीण भागात तरुण वर्गात कृषि व्यवसायात रस वाढला आहे. गयानाचा हा आत्मनिर्भर पॅटर्न वाखाणण्याजोगा आहे. स्थानिक उत्पादनावर भर, युवा व महिलांना सशक्तीकरण, व्यापक पिक विविधीकरण आणि तंत्रज्ञान वापर हे जगभरातील अनेक देशांसाठी आदर्श ठरू शकते. विशेषतः त्या राष्ट्रांमध्ये जे अन्न आयातावर अवलंबून आहेत आणि जागतिक बाजारातील चढ-उतारामुळे धोक्याचा सामना करत आहेत. अर्थात गयानापुढे अजूनही आव्हाने कामय आहेत. जसे की,  हवामान बदलामुळे काही क्षेत्रात पिकांचे नुकसान, सुविधा, संरक्षण आणि निर्यातीसाठी अधिक गुंतवणूक, मागास भागात सामाजिक समावेश सुनिश्चित करणे. गयानाने पुढील दशकात कॅरिबियनच्या अन्न उत्पादनाचं हब बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यासाठी अपरिहार्य तंत्र, व्यापार संधी आणि भांडवल वाढवण्याचा मानस आहे.

आज अनेक देश अन्नासाठी इतर देशांवर अवलंबून आहेत. जागतिक उत्पादनाच्या हेलकट आणि भांडवलवादी शृंखलेमुळे, युद्ध, हवामान बदल किंवा जागतिक व्यापारातील अडथळे यामुळे अन्न पुरवठा संकटाची स्थिती उद्भवू शकते. काही देश मुख्य अन्न घटकांना निर्यात करतात तरीही ते संपूर्णपणे अन्न पुरवठा करू शकत नाहीत. कारण त्यांना काही आवश्यक अन्न तसेच धान्य हे आयात करावे लागते. विकसित देशही जे करू शकले नाही ते गयानाने करून दाखविले आहे. गयानाची ही यशोगाथा दाखवते की, नैसर्गिक संसाधने, धोरणात्मक गुंतवणूक, सामाजिक सहभाग, तंत्रज्ञानाचा वापर या साऱ्याच्या जोरावर अन्न सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेचा आदर्श मार्ग तयार होऊ शकतो.

जर उद्या जगाचा व्यापार काही कारणास्तव पूर्णपणे ठप्प झाला, तरी गयानाचे नागरिक उपाशी राहणार नाहीत. अन्न सुरक्षेच्या बाबतीत हा देश स्वावलंबी असण्याचे उत्तम उदाहरण आहे. वाढती लोकसंख्या आणि हवामान बदलाच्या संकटात जगातील इतर देशांसाठी गयानाचे हे मॉडेल एक दीपस्तंभ ठरू शकते. अशा प्रकारे, भारताची संस्कृती जपणारा हा छोटासा देश आज जागतिक स्तरावर 'अन्नदाता' म्हणून आपल्या स्वयंपूर्णतेचा झेंडा फडकवत आहे.

--

bhavbrahma@gmail.com

पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
मो.
9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

Please Follow me on :

WhatsApp Group – https://chat.whatsapp.com/D6XHacZLv83IvDo8Ed8sTe?mode=wwc

Facebook   - www.facebook.com/BhaveshBrahmankar

X (Twitter) - www.twitter.com/BhavBrahma

Instagram  - https://www.instagram.com/bhavbrahma

Blog        -  https://bhavbrahma.blogspot.com/

WhatsApp Channel  - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

--

#Guyana #Food #Agriculture #Success #Story #Crop #self #reliance #environment #Nature #country


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)

तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी (नवशक्ती)