'किवी' नागरिकांची अगतिकता आणि नवी स्वप्ने (नवशक्ती)
न्यूझीलंड सध्या मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. समुद्र ओलांडून ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या मानवी कुटुंबांचे थवे जगभर चर्चेचा विषय ठरत आहेत. याचा अर्थ नक्की काय? हे फक्त तेथेच घडते आहे की इतरत्रही?
भावेश ब्राह्मणकर
एकेकाळी जगातील सर्वात शांत आणि
राहण्यायोग्य देश म्हणून ओळखला जाणारा न्यूझीलंड सध्या एका मोठ्या स्थित्यंतरातून
जात आहे. न्यूझीलंडचे नागरिक, ज्यांना प्रेमाने 'किवी' म्हटले
जाते, ते
आता मोठ्या संख्येने आपले घरदार सोडून शेजारील ऑस्ट्रेलियात स्थायिक होत आहेत.
अलीकडेच 'न्यूयॉर्क
टाइम्स'सह
विविध माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, हा केवळ स्थलांतराचा आकडा नसून तो एका देशाच्या आर्थिक आणि मानसिक
अवस्थेचा आरसा आहे. स्थलांतराच्या लाटेचे गांभीर्य दर्शविणारे मोठे उदाहरण म्हणजे
राजधानी वेलिंग्टनच्या माजी महापौर टोरी व्हानाऊ यांनी आपले सामान बांधून मेलबर्न गाठले
आहे. त्या म्हणतात की, "समुद्रापार
कुठे तरी अधिक लख्ख प्रकाश (संधी) असल्याचे जाणवतेय." जेव्हा एखाद्या
राजधानीचे नेतृत्व करणारी व्यक्ती देश सोडते, तेव्हा सामान्यांच्या मनात काय चालले असेल, याची कल्पना येते.
सामाजिक आणि आर्थिक जगात २०२६ मध्ये
नवे प्रतिमान दिसत आहे. अनेक व्यक्ती नुसता प्रवास करीत नसून प्रत्यक्षात देश बदलत
आहेत. याद्वारे ते आपले भविष्य पुन्हा रचत आहेत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे
न्यूझीलंड. नागरिकांचे ऑस्ट्रेलियात स्थलांतर झपाट्याने वाढत आहे. हा एक सामाजिक
अर्थव्यवस्थेचा, आर्थिक
निर्णयाचा आणि मनाच्या आशेचा प्रवास म्हटला पाहिजे. न्यूझीलंडच्या अधिकृत
आकडेवारीनुसार, ऑक्टोबर
२०२४-२०२५ या १२ महिन्यांमध्ये थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल ७१ हजाराहून अधिक
न्यूझीलंड नागरिकांनी कायमस्वरूपी देश सोडला आहे. (स्थलांतराचे हे प्रमाण २००८
नंतर सर्वाधिक आहे.) या तुलनेत परत येणाऱ्यांची संख्या अवघी २६ हजारांच्या आसपास
आहे. या स्थलांतरितांपैकी ५० टक्क्यांहून अधिक लोकांचे पहिले पसंतीचे ठिकाण
ऑस्ट्रेलिया हेच आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला वेगळे करणाऱ्या टास्मान
समुद्राला स्थानिक भाषेत 'द डिट्च' (The Ditch) म्हटले
जाते. टास्मान समुद्राचे पाणी दोन्ही देशांची वेगळी संस्कृती, विविधता आणि जीवनशैली दाखवते. मात्र,
स्थलांतराची ही लाट समाजातील बदललेल्या आशा, आर्थिक अपेक्षा आणि भविष्यातील जीवन ओढीच्या निर्णयाचे प्रतिबिंब आहे.
ऑस्ट्रेलियात स्थलांतर होण्यामागे काही ठोस कारणे आहेत.
स्थलांतराचे पहिले कारण म्हणजे, भरघोस
पगार. न्यूझीलंडच्या तुलनेत ऑस्ट्रेलियात मिळणारा पगार जवळपास २० ते ३० टक्क्यांनी
अधिक आहे. उदाहरणार्थ, एखाद्या
सामाजिक कार्यकर्त्याला न्यूझीलंडमध्ये जेवढे पैसे मिळतात तेवढेच काम ऑस्ट्रेलियात
केले तर वर्षाला सुमारे २० हजार अमेरिकन डॉलर्स अधिक मिळतात. याचा अर्थ चांगला
पगार किंवा उत्तम मोबदला यामुळे नागरिकांचा कल ऑस्ट्रेलियाकडे आहे. दुसरे कारण, कमी
महागाई. न्यूझीलंडमध्ये घरांच्या किंमती आणि जीवनावश्यक वस्तूंचा खर्च गगनाला
भिडला आहे. त्या तुलनेत ऑस्ट्रेलियातील राहणीमान खर्च अधिक परवडणारा असल्याचे
स्थलांतरितांचे मत आहे.
तिसरे कारण करिअरच्या संधी. ऑस्ट्रेलियामध्ये
तंत्रज्ञान, आरोग्यसेवा
आणि बांधकाम क्षेत्रात मोठ्या संख्येने संधी उपलब्ध आहेत. न्यूझीलंडमध्ये असलेल्या
अत्यल्प संधी आणि त्याबदल्यात मिळणारे कमी पैसे यामुळे सहाजिकच ऑस्ट्रेलिया
अनेकांना खुणावते आहे. व्यावसायिक संधी अधिक मिळत असल्याने उच्चशिक्षितांना त्या खुणावत
आहेत. चौथे कारण म्हणजे, सकारात्मक
वातावरणाचा शोध. पहिल्या तीन कारणांमध्ये पैसा हे स्थलांतराचे कारण असले तरी चौथे
अतिशय महत्वाचे आहे. न्यूझीलंडमध्ये सध्या एक प्रकारचे नैराश्य दाटून आल्याचे
स्थलांतरीतांचे मत आहे. त्यातुलनेत ऑस्ट्रेलियात अधिक सकारात्मक वातावरण (Better Vibes) आहे. तिथल्या
लोकांमध्ये अधिक उत्साह आणि आनंद जाणवतो, जो सध्या न्यूझीलंडच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत हरवल्यासारखा
वाटतोय. याचाच अर्थ सकारात्मक वातावरणाकडे अनेक कुटुंबांचा कल आहे.
पाचवे कारण म्हणजे 'ब्रेन ड्रेन' की 'ब्रेन
एक्सचेंज'? हो.
उच्चशिक्षित आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने न्यूझीलंडचा त्याग करून ऑस्ट्रेलियात
जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, ही बाब ब्रेन ड्रेन (बुद्धिवंतांचे सोडून जाणे) आहे. आणि ती
न्यूझीलंडसाठी हानिकारक आहे. मात्र, काही समाजशास्त्रज्ञांचे मत उलट आहे. सध्याची ही परिस्थिती म्हणजे एक
प्रकारचे 'ब्रेन
एक्सचेंज' आहे.
कारण भविष्यात जेव्हा न्यूझीलंडची स्थिती सुधारेल, तेव्हा हेच तरूण नवीन कौशल्ये घेऊन परत मायदेशी येऊ शकतात. सहावे कारण
म्हणजे, सरकारचे प्रयत्न आणि आव्हाने. न्यूझीलंडच्या सध्याच्या पुराणमतवादी
सरकारने ही लाट थोपवण्यासाठी काही पावले उचलली आहेत. कर सवलती आणि परदेशी
गुंतवणुकीवरील निर्बंध शिथिल करण्याची घोषणा अर्थमंत्री निकोला विलिस यांनी केली
आहे. मात्र, या घोषणेने किती जलद बदल घडेल? किती जण परत यायला तयार आहेत? हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत.
ऑस्ट्रेलियातील सरकार आणि तिथल्या
लवचिक इमिग्रेशन नियमांमुळे 'किवी' नागरिकांचे
आकर्षण कायम आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशात नैसर्गिक आणि सहज
होणारी वाहतूक तसेच मोकळेपणाने दिला जाणारा व्हिसा यामुळे स्थलांतर होत राहते. दोन्ही
देशातील ट्रान्स टास्मान ट्रॅव्हल अरेंजमेंट अंतर्गत दोन्ही देशांच्या नागरीकांना
एकमेकांच्या देशात राहण्यासह कामाचे अधिकार मिळतात. त्यामुळे स्थलांतर आणखी सुलभ
होतं. मात्र, कायमस्वरुपी राहण्यासाठी होणारे स्थलांतर हे चिंताजनकच आहे.
सध्याच्या स्थलांतराचा वेग पाहिला तर प्रत्येक १४ नागरिकांमागे १ नागरिक
ऑस्ट्रेलियात जात आहे. टास्मान समुद्राच्या पश्चिम किनार्यावर ऑस्ट्रेलिया तर
पूर्वेला न्यूझीलंड आहे. नवीन ठिकाणी आशा शोधण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत. स्थलांतरासाठी
ऑस्ट्रेलियाला ८० टक्के पसंती दिली जात आहे. न्यूझीलंडच्या सकल देशांतर्गत उत्पादन
(जीडीपी) वाढ कमी झाली आहे. बेरोजगारी वाढत आहे. त्यातुलनेत खर्च वाढत आहे. यामुळे
नागरिक आर्थिक दबावाखाली येत आहेत. या स्थलांतराने केवळ व्यक्ती नाही तर समाज, अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय स्वप्ने
यांचाही इतिहास बदलतो आहे.
टास्मान समुद्रातून नागरिकांचा प्रवास
फक्त एका देशाचे भौगोलिक अंतर नाही, तर सामाजिक, आर्थिक, आणि
मानसिक अंतर आहे. या स्थलांतराचा अर्थ मागील दशकातल्या आकडेवारीतील सर्वात मोठ्या
बदलाचा इतिहास म्हणावा लागेल. हा नव्या पिढीचा निर्णय आहे. जिथे आर्थिक संधी, जीवनशैलीतील बदल, आयुष्याची सुरक्षितता आणि स्वतःच्या
स्वप्नांना पूरक जीवनशैली शोधण्याची चाहूल एकत्र येते. न्यूझीलंड ते
ऑस्ट्रेलियापर्यंतचा नागरिकांचा प्रवास कालचा निर्णय नसून आजच्या सामाजिक युग बदलाचा
निर्णय असल्याचे बोलले जात आहे. “जीवनाची चळवळ कोणत्याही सीमांमध्ये अडकलेली नाही”,
हे सुद्धा यातून स्पष्ट होते. न्यूझीलंडचे नागरिक आज केवळ पैसाच नाही, तर 'उमेद' शोधण्यासाठी
समुद्र ओलांडत आहेत. आपल्या हक्काच्या मातीपासून दूर जाणे सोपे नसते, पण जेव्हा भविष्याची शाश्वती धूसर
होते, तेव्हा
माणसाला स्थलांतराचा कठोर निर्णय घ्यावा लागतो. 'किवी' लोकांचा
हा प्रवास जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलांचे आणि वाढत्या महागाईच्या संकटाचे जिवंत
उदाहरण म्हणता येईल. दरम्यान, भारतातही वेगळी स्थिती नाही. २०१५ ते २०२४ या दहा
वर्षात तब्बल १५ लाख ८१ हजार ५६२ जणांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. म्हणजेच, या
सर्वांनी अन्य देशात स्थायिक होऊन तेथील नागरिकत्व घेतले आहे. स्थलांतराची ही लाट
चिंतेचीच म्हणावी लागेल. हा प्रवाह कधी थांबेल याचे निश्चित उत्तर नाही. कारण,
स्थानिक पातळीवरचा आत्मविश्वासच स्थलांतराला रोखू शकतो. आणि हा आत्मविश्वास विविध
बाबींवर अवलंबून आहे.
--
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक.
तसेच मुक्त पत्रकार.
मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
Please Follow me on :
WhatsApp Group
– https://chat.whatsapp.com/D6XHacZLv83IvDo8Ed8sTe?mode=wwc
Facebook - www.facebook.com/BhaveshBrahmankar
X (Twitter) - www.twitter.com/BhavBrahma
Instagram - https://www.instagram.com/bhavbrahma
Blog - https://bhavbrahma.blogspot.com/
WhatsApp Channel
- https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
--
#New #Zealand #Kiwi #Australia #moving #relocation #migration #sea #living
#lifestyle #livehood #movement #citizenship #trend

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा