सिरीया : आगीतून थेट फुफाट्यात (नवशक्ती)

धगधगत्या पश्चिम आशियातील आणखी एक देश अस्थिर झाला आहे. गृहयुद्धाच्या भडक्यानंतर सिरीयाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, हा देश आगीतून फुफाट्यात जात असल्याचे दिसून येत आहे.

भावेश ब्राह्मणकर

पश्चिम आशियातील इस्त्राईल, इराण, लेबनॉन आदी देशांमध्ये सुरू असलेल्या अस्थैर्यात आता सिरीयाची भर पडली आहे. गृहयुद्धामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रस्त असलेल्या सिरीयामध्ये अखेर बंडखोरांनी विजय प्राप्त केला आहे. अध्यक्ष बशर अल असद हे देश सोडून पळून गेले आहेत. हयात तहरीर अल-शाम या बंडखोर गटाने आपला झेंडा फडकावला आहे. या गृहयुद्धात असाद कुटुंबाची गेल्या पाच दशकांहून अधिक काळाची सत्ता खालसा झाली आहे. हे काही अचानक घडलेले नाही. असद यांचे कुकर्म त्यास अधिक कारणीभूत आहे.



बशर यांचे वडील हफीज अल असद यांनी तब्बल तीन दशके सिरीयाचे नेतृत्व केले. गृहयुद्ध आणि अस्थिरतेच्या गर्तेत असलेल्या सिरीयाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी काही प्रमाणात प्रयत्न केले. २००० मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा उत्तराधिकारी आणि सिरीयाचा अध्यक्ष निश्चित झाला. बशर हे नेत्रशल्यचिकीत्सक म्हणून लंडनमध्ये सेवा बजावत होते. त्यांचा मोठा भाऊ हा रस्ते अपघातात ठार झाला. त्यामुळे बशर यांच्याकडे सिरीयाची सूत्रे आली. उच्च विद्याविभूषित असल्याने त्यांच्याकडून सिरीयनांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. बशर यांची पत्नी सुद्धा उच्चशिक्षित असल्याने ती जमेची बाजू ठरेल, असे जनतेला वाटणे स्वाभाविक होते. बशर यांना नेतृत्व करता यावे यासाठी चक्क घटनेत बदल करण्यात आला. कारण, त्यांचे वय त्यावेळी अवघे ३४ होते. सत्तारुढ होताच बशर यांनी काही प्रमाणात कठोर निर्णय घेऊन सिरीयाला योग्य रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. त्याचे दृष्य परिणाम दिसू लागले. मात्र, सिंहासनावर बसल्याने त्यांचे पाय जमिनीवर राहिले नाहीत. त्यांच्यात अहंकाराबरोबरच अनेक दुर्गुणांनी प्रवेश केला. आपली खुर्ची अधिक बळकट रहावी यासाठी त्यांनी विरोधकांवर निशाणा धरला.

बशर यांच्या अडीच दशकांच्या सत्ता कार्यकाळात गेली दीड दशके ही सिरीयासाठी अत्यंत वाईट ठरली. विरोधकांना अक्षरशः चिरडून टाकण्याचे आणि रक्तपात घडविण्याचे दुष्कृत्य बशर यांनी अतिशय निष्ठूरपणे केले. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या विरोधकांची संख्या वाढली. बंडखोर गटांनीही आपले हातपाय पसरले. या साऱ्याला अटकाव करण्यासाठी बशर यांनी रशिया आणि इराण यांची साथ मिळविली. या दोन्ही देशांच्या लष्करी आणि आर्थिक बळावर बशर यांनी अक्षरशः माज केला. यामुळे सिरीयन प्रचंड वैतागले. हजारो निष्पापांचा बळी जाऊ लागला. तर आपले भविष्य अंधकारमय असल्याचे वाटू लागल्याने लाखो नागरिकांनी अन्य देशांची वाट धरली. जे सिरीयात राहिले त्यांचा जणू छळच सुरू होता. ना रोजगार, ना सुख. महागाईचा आगडोंब उसळून जगणेही मुश्कील होऊ लागले. त्यातच आयसिससह अन्य दहशतवादी संघटनांनी बंडखोर गटांना बळ देण्यास प्रारंभ केला.

सिरीयामध्ये आपलं विश्व निर्माण केलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया (आयसीस) या दहशतवादी संघटनेने सिरीयात पाण्याचा प्रश्न गडद केला. पाण्याच्या साठ्यांवर आयसीसने ताबा मिळवला. ते इतके आक्रमक बनले की पाणी घेण्यासाठी कुणी आले तर त्यांच्यावर थेट गोळी झाडणे, मुंडके छाटणे किंवा आयसिसमध्ये सहभागी करुन घेण्याचा सिलसिला सुरू झाला. पाण्याला शस्त्र बनवून सिरियन नागरिकांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या आयसीसने जगभरात एक नवा काळा अध्याय लिहिला. पर्यावरणीय घटकाच्या माध्यमातून अमानवी डावपेच यशस्वी करण्याचा कुटील डाव रचला गेला. पाणी मिळू नये म्हणून इंधन आणि तेल यांच्या पुरवठ्यावरही आयसिसने परिणाम केला. त्यामुळे भूजल उपसणेही शक्य झाले नाही. परिणामी, देश सोडून जाण्यापलिकडे सिरीयनांना पर्याय उरला नाही. २०१४ मध्ये मोसूल या धरणावर आयसीसने कब्जा केला. पाणी सोडणे आणि न देणे यावर नियंत्रण आल्याने आयसीसने जगभरात दबदबा निर्माण केला. यातूनच अमेरिकेला थेट आव्हान देण्यात आले. बराक ओबामांच्या नेतृत्वात अमेरिकन सैन्याने या धरणावरील आयसीसचा कब्जा दूर केला. पण, याने संकट निवळले असे मुळीच नाही. दहशत निर्माण करायची तर पाण्याच्या माध्यमातून ते शक्य आहे, असा संदेश दिला गेला. शिवाय पाण्याचा प्रश्न हा केवळ सामाजिक सुरक्षेचा नाही तर तो राष्ट्रीय सुरक्षेचाही बनला. ही परिस्थिती बशर यांना हाताळता आली नाही. आपल्याला विरोधकच नको म्हणून हुकूमशाहीच्या माध्यमातून बशर यांनी सिरीयनांचा अनन्वित छळ केला. या साऱ्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू झाले.

बंडखोर गट आक्रमक झाले. सहाजिकच बशर यांना अनेक मर्यादा येऊ लागल्या. कारण, जनतेचीच साथ त्यांना लाभत नव्हती. जनतेच्या मनातून ते पूर्णपणे उतरले. रशिया आणि इराण यांच्या मदतीच्या जोरावर बशर यांनी बंडखोर आणि विरोधक या सर्वांचा सफाया करण्याचा सपाटा लावला. पण, हा डाव त्यांच्यावरच उलटला. सैन्यानेही बशर यांची साथ सोडली. कारण, सैन्यालाही पुरेसा पगार मिळत नव्हता. त्यातच रशिया हा युक्रेनसोबतच्या युद्धामुळे पुरता जायबंदी झाला. अडीच वर्षांपासून तो युक्रेनच्या मागे लागला आहे. तर, इराण हा इस्त्राईलच्या माऱ्यापुढे हतबल झाला. परिणामी बशर यांचा भक्कम पाठिंबाच गायब झाला. त्यामुळे बंडखोर गटांनी आक्रमक होत बशर यांची सत्ता खालसा करण्यात यश मिळविले.

बशर यांना अखेर देश सोडून परागंदा व्हावे लागले. त्यांनी रशियामध्ये आश्रय मिळविला. आपल्याच देशाचा छळ करुन आणि तेथील संपत्ती लुटून बशर यांनी रशियाची वाट धरली. सिरीयन जनतेने रस्त्यावर उतरुन आनंद व्यक्त केला. अध्यक्षीय प्रासादात घुसून तेथील अनेक वस्तू घेऊन पलायन केले. दरम्यान, मोहम्मद अल जोलानी याच्या नेतृत्वातील हयात तहरीर अल शाम या बंडखोर संघटनेने सिरीयामध्ये वर्चस्व मिळविले आहे. अनेक दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या या संघटनेमुळे सिरीयाची वाटचाल आता अफगाणिस्तानसारखी होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालिबानने अफगाणिस्तानात आपला कारभार सुरू केल्यापासून मानवाधिकारांचे प्रचंड उल्लंघन होत आहे. खासकरुन महिलांना अनेक जाचाला तोंड द्यावे लागत आहे. आता सिरीयातही हे दुष्टचक्र सुरू होणार असल्याच्या वदंता आहेत. तसेच, दहशतवादी संघटनाच देश चालवायला लागल्या तर नजिकच्या काळात काय घडेल, याची कल्पनाही अनेकांना करवत नाही. कारण, देशाची साधनसंपत्ती, पायाभूत सुविधा, लष्कर, भूभाग असे सारेच अधिकृतपणे त्यांना वापरता येणार आहे. पश्चिम आशियातील संकटग्रस्त देशांमध्ये अशा प्रकारचा अंकूर रुजणे ही धोक्याची घंटा तर नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे. बंडखोर गटांना देश योग्य पद्धतीने चालविता येईल का? सिरीयनांचे प्रश्न ते सोडवू शकतील का? महागाई, बेरोजगारीसह असंख्य प्रश्न निकाल काढण्यात बंडखोर यशस्वी होतील का? अशी प्रश्नांची मालिका निर्माण झाली आहे. बांगलादेशातही नागरी उठाव झाला. तत्कालिन पंतप्रधान शेख हसिना यांना देश सोडावा लागला. सध्या तेथे हंगामी सरकार स्थापन झाले. निवडणुका घेऊन देशाला स्थिरतेकडे नेण्याची जबाबदारी हंगामी सरकारची आहे. मात्र, बांगलादेशचे संस्थापक रेहमान यांचे चित्र नोटेवरुन घालविण्यासाठी नव्या नोटा छापण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. यातून सर्वसामान्यांना कोणता दिलासा मिळणार आहे? देशाचे सारे प्रश्न निकाली निघणार आहेत का? अशाच प्रकारे सिरीयातही घडणार आहे का? बंडखोर गटाची वाटचाल, त्यांची ध्येयधोरणे आणि भूमिका हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तूर्त तरी सिरीयन हे आगीतून फुफाट्यात जात असल्याचेच चित्र आहे.

--

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

माझे WhatsApp चॅनल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे 

https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

--

Middle, East, Syria, West, Asia, Rebels, Civil, War, Bashar, Assad, Government, 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)

तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी (नवशक्ती)