ट्रम्प यांनी रशियासाठी पेटवले युद्ध?

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या फायद्यासाठी इराण युद्धात उडी घेतली आहे. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटले ना! पण, हे खरे आहे. ते कसे?

भावेश ब्राह्मणकर

पर्शियन आखातातील तणाव आणि इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक राजकारणाचे केंद्र पुन्हा एकदा आखाती देशांकडे सरकले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विजयाचे दावे करत असले, तरी जमिनीवरील वास्तव वेगळे आहे. 'होर्मुझची सामुद्रधुनी' बंद झाल्यामुळे केवळ कच्च्या तेलाचेच नव्हे, तर जागतिक अन्नसुरक्षेचे आणि खत बाजारपेठेचे गणितही पूर्णपणे बिघडले आहे. मात्र, या सर्व रणधुमाळीत रशिया हा सर्वात मोठा 'सुप्त लाभार्थी' म्हणून समोर येत आहे. युक्रेन युद्धामुळे जागतिक राजकारणात कोपऱ्यात ढकलल्या गेलेल्या व्लादिमीर पुतिन यांच्या रशियाला इराण युद्धाने जणू नवी संजीवनी दिली आहे.


रशियाच्या तिजोरीत अब्जावधींची भर

होर्मुझची सामुद्रधुनी बंद होणे हे तेल उद्योगासाठी नेहमीच एक 'दुःस्वप्न' मानले जात असे. आज ते वास्तव बनले आहे. जगातील एकूण तेल वाहतुकीपैकी एक तृतीयांश वाहतूक या मार्गाने होते. युद्धामुळे हा मार्ग असुरक्षित झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. रशियासाठी हे पथ्यावर पडले आहे.

२०२५ च्या उत्तरार्धात रशियन तेलावर प्रति बॅरल २५ डॉलर्सपर्यंत असलेली सवलत आता १५ डॉलर्सवर आली आहे. फेब्रुवारीत ४५ डॉलर्स प्रति बॅरल असलेले रशियन तेल मार्चमध्ये ९० डॉलर्सवर पोहोचले. केवळ या दरवाढीमुळे रशियाला दरमहा अतिरिक्त ८.५ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळत असून, त्यातील ५ अब्ज डॉलर्स थेट सरकारी तिजोरीत जात आहेत. युक्रेन युद्धामुळे लागलेला रशियाच्या अर्थसंकल्पीय तुटीचा डाग या 'विंडफॉल' नफ्यामुळे पुसला जात आहे. केवळ तेलच नव्हे, तर नैसर्गिक वायू क्षेत्रातही हीच स्थिती आहे. कतारचा गॅस पुरवठा होर्मुझमुळे बाधित झाल्याने युरोपला पुन्हा एकदा रशियन एलएनजीकडे वळण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. अमेरिकेकडून मदतीची अपेक्षा असली तरी, पुरवठा साखळीतील त्रुटींमुळे रशियाचे पारडे जड झाले आहे.

खत बाजारपेठेतील 'सायलेंट' क्रांती

तेलापेक्षाही भयंकर आणि दूरगामी संकट जागतिक खत बाजारपेठेवर ओढवले आहे. आखाती देश जगातील एकूण युरिया व्यापारापैकी ४६ टक्के आणि अमोनिया व्यापारापैकी ३० टक्के वाटा उचलतात. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने हा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. मध्यपूर्वेतील युरियाचे भाव ६०० ते ७०० डॉलर्स प्रति टनाच्या पार गेले आहेत. विशेष म्हणजे, तेलाप्रमाणे खतांचा कोणताही 'धोरणात्मक राखीव साठा'  जगाकडे उपलब्ध नाही. अशा वेळी रशिया, जो जगातील २३ टक्के अमोनिया आणि १४ टक्के युरिया निर्यात करतो, हा जगासाठी एकमेव मोठा आधार उरला आहे. नायजेरिया, इथिओपिया आणि घानासारखे देश आतापासूनच २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी रशियाकडे आगाऊ नोंदणी करत आहेत. ही केवळ व्यापारी उलाढाल नसून, रशियावर निर्माण होणारे एक दीर्घकालीन राजकीय आणि आर्थिक अवलंबित्व आहे.



अन्नसुरक्षेचा 'रशियन' सापळा आणि भू-राजकीय लाभ

खतांच्या किमती वाढल्याचा परिणाम त्वरित दिसत नाही, तर तो ६ ते ९ महिन्यांनी अन्नधान्याच्या महागाईच्या स्वरूपात समोर येतो. संयुक्त राष्ट्रांच्या 'वर्ल्ड फूड प्रोग्राम'नुसार, जर हे युद्ध २०२६ च्या मध्यापर्यंत खेचले गेले, तर जगातील उपासमारीने होरपळणाऱ्या लोकांची संख्या ३६ कोटींच्या वर जाऊ शकते.

यातून सुटण्यासाठी आफ्रिकी आणि आशियाई देश रशियाकडे धाव घेत आहेत. रशियाने यापूर्वी २०२२ मध्ये युक्रेन युद्धाच्या वेळी 'ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह'चा वापर करून आपली राजकीय ताकद दाखवून दिली होती. आता खतांच्या माध्यमातून रशिया पुन्हा एकदा 'ग्लोबल साउथमधील देशांचा तारणहार' म्हणून स्वतःला प्रस्थापित करत आहे. रशियाला आता युद्धविरामाची घाई नाही, कारण त्यांची खत निर्यात पायाभूत सुविधा होर्मुझवर अवलंबून नाहीत.

चीन आणि भारताशी बदलती समीकरणे

इराण युद्धामुळे चीन आणि भारताला आपल्या ऊर्जा सुरक्षेची मोठी चिंता वाटू लागली आहे. समुद्रातून होणारा व्यापार कधीही धोक्यात येऊ शकतो, हे उमजल्याने चीन आता रशियाच्या 'पॉवर ऑफ सायबेरिया-२' या गॅस पाइपलाइन प्रकल्पाकडे गांभीर्याने पाहत आहे. जमिनीवरून येणारा हा गॅस मार्ग सागरी नाकेबंदीपासून मुक्त असेल.

भारतालाही ट्रम्प प्रशासनाचा दबाव असूनही रशियन तेलाची साथ देणे भाग पडत आहे. आखातातील अस्थिरतेमुळे रशियन तेल हे भारतासाठी एक सुरक्षित आणि खात्रीशीर पर्याय बनले आहे. यामुळे रशियन तेलावर मिळणारी सवलत कमी झाली असली तरी, पुरवठ्याची हमी भारतासाठी महत्त्वाची ठरत आहे.

२०२७ चे संकट आणि रशियाचे 'पीक'

पर्शियन आखातातील हे युद्ध कदाचित लष्करीदृष्ट्या लवकर थांबेलही, पण त्याचे खरे आर्थिक पडसाद २०२७ मध्ये उमटतील. जेव्हा जगाला अन्नधान्याच्या तीव्र तुटवड्याचा आणि महागाईचा सामना करावा लागेल, तेव्हा रशिया आपली ही 'मार्केट पॉवर' राजकीय फायद्यात रूपांतरित करेल. रशिया स्वतःला जगाचा 'अन्नदाता' म्हणून सादर करेल, ज्याने जगाला उपासमारीपासून वाचवले.

युक्रेन युद्धामुळे रशियन अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी पुतिन यांची धडपड सुरू आहे. अशातच ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या युद्धात उतरून थेट रशियालाच मदत केली आहे. रशियाकडील तेल, नैसर्गिक वायू आणि खतांना जबरदस्त मागणी होत आहे. त्यामुळे रशियन अर्थव्यवस्था सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांचे हे युद्ध रशियासाठी केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर जागतिक स्तरावर पुन्हा एकदा 'अपरिहार्य शक्ती' म्हणून उदयास येण्याची संधी घेऊन आले आहे. रशियाने या युद्धाची पेरणी केलेली नसली, तरी त्याचे समृद्ध पीक मात्र रशियाच कापणार, हे आता सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे.

--

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार.
मो.
9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

Please Follow me on :

WhatsApp Group – https://chat.whatsapp.com/D6XHacZLv83IvDo8Ed8sTe?mode=wwc

Facebook   - www.facebook.com/BhaveshBrahmankar

X (Twitter) - www.twitter.com/BhavBrahma

Instagram  - https://www.instagram.com/bhavbrahma

Blog        -  https://bhavbrahma.blogspot.com/

WhatsApp Channel  - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

--

#America #Iran #War #Israel #Russia #Strait #Hormuz #Urals #Crude #Oil #LNG #Fertilizer #Donald #Trump #Vladimir #Putin #Benefit #USA

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)

तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी (नवशक्ती)