तुमच्या आहारातून मासे गायब होणार? (सामना उत्सव पुरवणी)
तुमच्या आहारातून मासे गायब होणार?
लवकरच ही वेळ येणार असल्याचे संकेत संशोधकांकडून मिळत आहेत. हवामान बदलाचा हा परिणाम असून त्याची वेळीच दखल घ्यायला हवी. मासेमारी व्यवसायावरही मोठे संकट असल्याने भारतातील लाखो मच्छिमारांना उपासमारीला तोंड द्यावे लागणार आहे.
भावेश ब्राह्मणकर
जागतिक
तापमानवाढ, हिमनग
वितळणे, चक्रीवादळांची
तीव्रता वाढणे या हवामान बदलाच्या परिणामांची चर्चा मोठ्या प्रमाणावर सतत होत असते.
मात्र याच हवामान बदलाशी निगडित असलेला एक अत्यंत गंभीर मुद्दा समोर आला आहे. तो
म्हणजे समुद्र आम्लीकरण. याला इंग्रजीत ओशन असिडीफिकेशन असे म्हणतात. समुद्रात
असिडचे प्रमाण वाढत असल्याचे आपल्या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत नाही. मात्र त्याचे
परिणाम भारताच्या किनारपट्टी, सागरी परिसंस्था आणि कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेवर खोलवर होत आहे.
संशोधकांनी यासंदर्भात सविस्तर अभ्यास केला आहे. त्यातूनच हे सारे स्पष्ट होत आहे.
भारतात लाखो मच्छिमारांवर उपासमारीचे संकट यामुळे येऊ घातले आहे.
सर्वप्रथम हे
जाणून घेऊ की समुद्र आम्लीकरण म्हणजे नक्की काय. औद्योगिकीकरणानंतर कोळसा, तेल किंवा वायू यांचे ज्वलन वाढले
आहे. यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण झपाट्याने वाढत
आहे. या कार्बन डाय ऑक्साईडपैकी जवळपास ३० टक्के वायू महासागर शोषून घेतात.
समुद्राच्या पाण्यात मिसळल्यानंतर कार्बन डाय ऑक्साईडचे रूपांतर कार्बोनिक आम्लात
होते. परिणामी समुद्राच्या पाण्याची क्षारता (पीएच) कमी होते. म्हणजेच पाणी अधिक
आम्लीय बनते. याच प्रक्रियेला समुद्र आम्लीकरण असे म्हणतात. औद्योगिक युगापूर्वी
समुद्राचा पीएच साधारण ८.२ एवढा होता. हवामान बदलामुळे हा पीएच आता ८.१ च्या आसपास
आला आहे. आपल्याला असे वाटत असेल की हा बदल अगदी नगण्य आहे. मात्र, हा बदल जैविकदृष्ट्या
अतिशय गंभीर मानला जातो.
समुद्र
आम्लीकरणाचा सर्वात मोठा फटका कॅल्शियम कार्बोनेटवर अवलंबून असलेल्या सागरी
जीवांना बसतो. प्रवाळभित्ती, शंख-शिंपले, सिप, खेकडे, कोळंबी यांसारखे जीव आपले कवच किंवा
सांगाडा कॅल्शियमपासून तयार करतात. आम्लीय पाण्यात हे कवच तयार होणे कठीण होते, तसेच विद्यमान कवचही कमकुवत होते. प्रवाळभित्ती
या सागरी परिसंस्थेचा कणा मानल्या जातात. त्या मास्यांचे निवासस्थान, प्रजनन क्षेत्र आणि किनाऱ्यांचे
संरक्षण करतात. मात्र वाढती आम्लता आणि तापमानामुळे प्रवाळभित्तींची वाढ खुंटत आहे, अनेक ठिकाणी त्यांचा ऱ्हास सुरू आहे.
याचा थेट परिणाम सागरी जैवविविधतेवर होत आहे. समुद्र आम्लीकरणामुळे केवळ शंखधारी
जीवच नाही, तर
मासेही प्रभावित होत आहेत. संशोधनातून असे दिसून आले आहे की, आम्लीय पाण्यात काही
माशांची वास ओळखण्याची क्षमता, दिशाज्ञान आणि भक्षकांपासून वाचण्याची प्रतिक्रिया कमी होते. परिणामी
त्यांचे जगणे कठीण होते. याचा परिणाम संपूर्ण सागरी अन्नसाखळीवर होतो. सूक्ष्म
वनस्पती (फायटोप्लँक्टन) पासून सुरू होणारी ही साखळी विस्कळीत झाल्यास मासेमारीचे
उत्पादन घटते. याचा थेट फटका मत्स्यव्यवसायावर अवलंबून असलेल्या समुदायांना बसतो.
भारताला सुमारे
७,५०० किलोमीटर
लांबीची किनारपट्टी लाभली आहे. कोट्यवधी लोक थेट किंवा अप्रत्यक्षपणे समुद्रावर
अवलंबून आहेत. मासेमारी, मत्स्यप्रक्रिया, वाहतूक आणि पर्यटन हे सर्वच क्षेत्र समुद्राशी जोडलेले आहेत. विशेषतः
लहान मच्छीमार समाज आर्थिकदृष्ट्या आधीच असुरक्षित आहे. त्यांच्यासाठी समुद्र
आम्लीकरण हा दुहेरी संकटाचा विषय आहे. कारण, एकीकडे उत्पादन घटत आहे तर दुसरीकडे
उत्पन्नाची शाश्वती नाहीशी होत आहे. लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार सारख्या
बेटांवरील प्रवाळ कट्टे (कोरल रिफ्स) हे 'समुद्रातील वर्षावने' मानले जातात. हे प्रवाळ माशांच्या अनेक प्रजातींचे प्रजनन स्थळ असतात.
वाढत्या आम्लतेमुळे प्रवाळांचे 'ब्लीचिंग' (धुळीकरण)
होत असून ते नष्ट होत आहेत. प्रवाळ नष्ट झाले की त्यावर अवलंबून असलेली संपूर्ण
अन्नसाखळी विस्कळीत होते. आम्लयुक्त पाण्यामुळे माशांच्या अंडी घालण्याच्या
क्षमतेवर आणि त्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. लहान मासे या बदलत्या
वातावरणात तग धरू शकत नाहीत.
भारताच्या दोन
प्रमुख सागरी विभागांमध्ये समुद्र आम्लीकरणाचे स्वरूप वेगवेगळे आहे. अरबी समुद्रात
खोल समुद्रातून कार्बन डाय ऑक्साईडयुक्त पाणी वर येते. त्यामुळे येथे पाण्याचा
पीएच जलद गतीने कमी होत असल्याचे आढळून आले आहे. बंगालच्या उपसागरात मोठ्या
प्रमाणावर नद्यांमधून येणारे गोडे पाणी आणि गाळ यामुळे समुद्राच्या रसायनिक
स्थितीवर परिणाम होतो. येथे पाण्याचे थर तयार होतात. त्यामुळे कार्बन डाय ऑक्साईड अधिक
काळ पृष्ठभागाजवळ अडकून राहतो. धक्कादायक बाब म्हणजे भारतात अद्याप समुद्र
आम्लीकरणासाठी स्वतंत्र राष्ट्रीय मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित नाही. हवामान
बदलाच्या चर्चेत समुद्र तापमानवाढ आणि चक्रीवादळांवर भर दिला जातो, मात्र आम्लतेकडे तुलनेने दुर्लक्ष
होते. उपलब्ध संशोधन मर्यादित असून तेही काही विशिष्ट भागांपुरतेच केंद्रित आहे. समुद्रातील
प्लँक्टन (लहान जीव जे माशांचे अन्न आहे) आम्लतेमुळे नष्ट होत आहेत. अन्न
नसल्यामुळे माशांचे स्थलांतर होत आहे किंवा त्यांची संख्या घटत आहे. विशेषतः
भारतीय किनारपट्टीवर आढळणारे बांगडा, पापलेट आणि कोळंबी या माशांच्या उत्पादनात घट दिसून येत आहे. मत्स्य
उत्पादन कमी झाल्यामुळे माशांच्या किमती वाढत आहेत, मात्र कोळी बांधवांचे उत्पन्न घटत आहे. निर्यातीसाठी लागणाऱ्या कोळंबी
आणि इतर सागरी जीवांच्या गुणवत्तेवरही याचा परिणाम होत आहे.
समुद्र आम्लीकरण
ही जागतिक समस्या असली, तरी त्याचा सामना करण्यासाठी स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर पावले
उचलता येऊ शकतात. पहिले म्हणजे समुद्राच्या पीएच, कार्बोनेट पातळी आणि जैविक
परिणामांचे सातत्याने मापन करणारे नेटवर्क उभे करणे आवश्यक आहे. दुसरे म्हणजे मॅनग्रुव्ह, सीग्रास आणि प्रवाळभित्ती यांसारख्या
नैसर्गिक कार्बन शोषक परिसंस्थांचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तिसरे
म्हणजे मच्छीमार समुदायांना बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि पर्यायी उपजीविकेचे
पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हवामान धोरणांमध्ये
समुद्र आम्लीकरणाला स्वतंत्र मुद्दा म्हणून स्थान देणे आवश्यक आहे. केवळ कार्बन
डायऑक्साइडच नाही, तर
जमिनीवरून समुद्रात वाहून जाणारी रासायनिक खते आणि सांडपाणी यामुळेही समुद्रात
नायट्रोजन आणि फॉस्फरसचे प्रमाण वाढते. यामुळे 'युट्रोफिकेशन'ची प्रक्रिया घडते, जी पाण्याची आम्लता वाढवण्यास मदत करते. शहरीकरण आणि किनारपट्टीवरील
उद्योगांमुळे ही समस्या अधिक उग्र बनली आहे. जर सागरी आम्लतेचा दर असाच कायम
राहिला, तर
२१ व्या शतकाच्या अखेरीस समुद्रातील जैवविविधता ५० टक्क्यांनी कमी होण्याची भीती
शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
समुद्र आम्लीकरण
हे एक अदृश्य पण घातक संकट आहे. ते हळूहळू वाढत आहे आणि त्याचे परिणाम दीर्घकालीन
आहेत. जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर भारताच्या किनाऱ्यांवरील सागरी परिसंस्था, अन्नसुरक्षा आणि लाखो लोकांची उपजीविका धोक्यात येऊ शकते. हवामान
बदलाच्या लढ्यात समुद्राला केंद्रस्थानी ठेवणे ही आजच्या काळाची अपरिहार्यता आहे.
समुद्र निरोगी राहिला, तरच
मानवाचे भविष्य सुरक्षित राहील. शिवाय आहारात मासेही.
--
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक.
तसेच मुक्त पत्रकार.
मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
Please Follow me on :
WhatsApp Group
– https://chat.whatsapp.com/D6XHacZLv83IvDo8Ed8sTe?mode=wwc
Facebook - www.facebook.com/BhaveshBrahmankar
X (Twitter) - www.twitter.com/BhavBrahma
Instagram - https://www.instagram.com/bhavbrahma
Blog - https://bhavbrahma.blogspot.com/
WhatsApp Channel
- https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
--
#Ocean #Acidification #sea #fish #coral #ph #climate change #carbon #gas #saamana #bhavesh #brahmankar #environment

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा