अरवली पर्वत इतका महत्वाचा का आहे?
ज्या अरवली पर्वतांवरून भारतात एवढे रणकंदन माजले आहे ते एवढे महत्वाचे का आहेत? केवळ उत्तर भारतासाठीच ते महत्वपूर्ण भूमिका बजावतात का? हे पर्वत नष्ट झाले तर काय होईल?
भावेश ब्राह्मणकर
भारताच्या वायव्य म्हणजेच
उत्तर-पश्चिम दिशेला असलेला अरवली पर्वत सध्या देशासह परदेशात चर्चिला जात आहे. या
पर्वताची उंची, व्याख्या, केंद्र सरकारचे नियम, पर्यावरणप्रेमींनी सोशल मिडियासह
रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन आणि थेट सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी या
साऱ्यामुळे अरवली पर्वताविषयी विविध प्रकारच्या वार्ता पसरत आहेत. हा पर्वत इतका
महत्त्वाचा का आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.
अरवली पर्वत श्रेणी ही केवळ भारतातीलच
नव्हे, तर
जगातील सर्वात प्राचीन पर्वत रांगांपैकी एक आहे. भारताच्या भौगोलिक आणि पर्यावरणीय
संतुलनात या पर्वताचे स्थान वाखाणण्याजोगे आहे. हवामान संतुलनासाठी अरवली
पर्वतरांगेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण, ही रांग उत्तर भारतासाठी नैसर्गिक
हवामान संरक्षक भिंत आहे. राजस्थानातील थार वाळवंटाचा विस्तार पूर्व आणि दक्षिण
दिशेने होऊ न देण्याचे काम अरवली पर्वतरांग करते. अरवली पर्वत राजस्थानमधील थार
वाळवंटाला पूर्वेकडे (गंगा-यमुना मैदानांकडे) पसरण्यापासून रोखणारा एक नैसर्गिक
अडथळा म्हणून काम करतो. जर अरवली पर्वत
नसता, तर
हरियाणा आणि दिल्लीचा बराचसा भाग आज वाळवंट झाला असता, असे तज्ज्ञांचे मत आहे. पश्चिमेकडून
येणारे गरम व कोरडे वारे अडवून राजस्थान, हरियाणा, दिल्ली
भागातील तापमान संतुलित ठेवते.
अरवली पर्वतरांग ही अनेक नद्यांची
उगमभूमी आहे. बनास, साबरमती, लूणी यांसारख्या नद्या येथे उगम
पावतात. या नद्या त्या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत आहेत.
लुनी ही नदी वाळवंटी भागातून वाहते. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी
वाढवण्याचे काम अरवली पर्वतरांग करते. दिल्ली आणि त्यालगतच्या राष्ट्रीय राजधानी
क्षेत्रासारख्या भागांसाठी ही पर्वतरांग पाण्याची जीवनवाहिनी आहे. जरी अरवलीची
दिशा मान्सून वाऱ्यांच्या समांतर असल्याने तिथे पाऊस कमी पडतो, तरीही ही रांग उत्तर भारताच्या
हवामानावर नियंत्रण ठेवते. ती काही प्रमाणात आर्द्र वाऱ्यांना अडवून वरच्या भागात
पाऊस पाडण्यास मदत करते.
अरवली परिसरात वन्यजीव, पक्षी, औषधी वनस्पती यांची मोठी विविधता आहे. बिबट्या, लांडगा, हरिण, अस्वल
आदी वन्यप्राणी येथे आढळतात. ही पर्वतरांग ग्रीन कॉरिडॉर म्हणूनही महत्त्वाची आहे.
मातीची धूप रोखण्याचे महत्वपूर्ण कार्य अरवली पर्वतरांग करते. शेतीयोग्य जमीन
वाचवण्यात त्याची भूमिका मोलाची ठरते. पर्वत नष्ट झाल्यास शेतीवर विपरीत परिणाम
होतो. या पर्वतरांगेला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे. ही पर्वतरांग लाखो
वर्षांपूर्वी निर्माण झाल्याचे संशोधक व तज्ज्ञांचे मत आहे. मेवाड, अंबेर, रणथंबोर, सारिस्का यासारखी ऐतिहासिक स्थळे याच पर्वतरांगेत आहेत.
त्याचशिवाय विविध प्रकारचे पक्षी आणि दुर्मिळ वनस्पती येथे आढळतात. ज्यामुळे
पर्यावरणीय संतुलन राखले जाते. भारतीय
संस्कृतीच्या अनेक कथा, किल्ले आणि परंपरा अरवलीशी जोडलेल्या आहेत.
प्रदूषण नियंत्रणात अरवलीची भूमिका
निर्णायक आहे. अरवली पर्वत आणि टेकड्यांवरील जंगल हे दिल्लीसह राष्ट्री. राजधानी
क्षेत्रातील हवेचे प्रदूषण कमी करण्यास मदत करतात. धूळकण आणि प्रदूषक घटक
अडवण्याचे नैसर्गिक काम ही पर्वतरांग करते. दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमधील वाढत्या शहरीकरणामुळे होणारे प्रदूषण कमी
करण्यासाठी अरवलीची जंगले ही हरित फुफ्फुस म्हणून काम करतात. ही जंगले वातावरणातील
कार्बन शोषून घेतात आणि भूगर्भातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करतात.
तसेच, अरवली पर्वत खनिजांनी अत्यंत समृद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणात तांबे, जस्त, शिसे, संगमरवर, ग्रॅनाइट, जिप्सम चांदी ही खनिजे आहेत. त्यामुळे खाणींसाठी
हा पर्वत बोडका करण्याचा डावही वारंवार समोर येतो.
अरवलीवरुन वादंग माजण्याचे कारण
म्हणजे या पर्वतरागांची केलेली नवी व्याख्या. त्यानुसार, १०० मीटर पेक्षा कमी
उंचीचे पर्वत किंवा टेकड्या हे अरवलीचा भाग समजल्या जाणार नाहीत. त्यामुळे संवेदनशील
आणि पर्यावरणीयदृष्ट्या येथे नियम शिथील होतील. परिणामी, येथे मोठ्या प्रमाणात खाण
आणि उत्खननाचे कार्य वेग घेईल. यातून ही पर्वतरांग धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त
होत आहे. पर्यावरण तज्ञ आणि कार्यकर्त्यांनी म्हटले की, कमी उंचीचे लहान सपाट
माळरान, खडकाळ भाग आणि टेकड्या या परिसरासाठी
हवेच्या गुणवत्तेसाठी, वाळूतून वाऱ्याला रोखण्यासाठी, पाण्याच्या रिचार्जसाठी महत्त्वाचे आहेत. पण आता ते संरक्षणातून बाहेर
पडू शकतात. यामुळे जंगलांची तोड, वन्यजीवांचे
अधिवास धोक्यात, आणि पर्यावरणीय संतुलन बिघडू शकते. या
नवीन व्याख्येमुळे १०० मीटरपेक्षा कमी भागांमध्ये खनन आणि बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलस्तर, वाळवंटीकरण वाढणे, प्रदूषणात वाढ यांसारखे गंभीर परिणाम होण्याची काळजी व्यक्त केली जात
आहे.
सध्या बेकायदेशीर उत्खनन आणि
शहरीकरणामुळे अरवली पर्वताचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ज्यामुळे या भागातील
पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. अरवली कमजोर झाल्यास वाळवंटीकरणाचा धोका वाढू
शकतो. पावसाच्या चक्रात अरवलीची भूमिका महत्वपूर्ण आहे. अरवली पर्वत मान्सून
वाऱ्यांच्या दिशेला अडथळा निर्माण करतो. त्यामुळे उत्तर-पश्चिम भारतात पावसाचे
प्रमाण टिकून राहते. अरवली नष्ट झाली तर पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता
वाढते. अरवली पर्वतरांग नष्ट झाली तर थार वाळवंटाचा विस्तार होऊ शकतो. पावसाचे
प्रमाण घटून भूजल पातळी खालावू शकते. यातून उग्र जलटंचाईला तोंड द्यावे लागू शकते.
दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, हरियाणा, उत्तर प्रदेश येथे प्रदूषणात मोठी
वाढ होईल. जैवविविधतेचा ऱ्हास झाल्याने अनेक जीव धोक्यात येतील, काही अस्तंगत
होतील. नैसर्गिक साखळी बिघडल्याने पर्यावरण आणि परिसरावर विपरीत परिणाम होईल.
वन्यजीवांना त्यांचे खाद्य मिळाले नाही तर ते मानवी वस्तीकडे येऊ लागतील. यातून
मानव-वन्यजीव संघर्ष आणखीनच तीव्र होईल. परिणामी, मानव असुरक्षित होईल. त्याचबरोबर
शेती आणि मानवी जीवनावर गंभीर परिणाम करण्याची क्षमता या पर्वतरागांमध्ये आहे.
अरवली बचावाची सर्वोच्च न्यायालयाने दखल
घेतली आहे. त्यामुळेच न्यायालयाने सुनावणीत स्पष्ट केले की, पूर्वीच्या
अनुभवांवरून असे दिसून येते की संपूर्ण बंदीमुळे अनेकदा अवैध खाणकाम टोळ्या, हिंसक वाळू माफिया आणि अनियंत्रित उत्खनन वाढते. त्यामुळे न्यायालयाने
एक संतुलित दृष्टिकोन स्वीकारला आहे. सध्याचे कायदेशीर खाणकाम कठोर नियमांनुसार
सुरू राहील, वैज्ञानिक दृष्ट्या आधारित योजना
तयार होईपर्यंत नवीन खाणकाम थांबवले जाईल आणि कायमस्वरूपी संवेदनशील क्षेत्रे
प्रतिबंधित राहतील. न्यायालयाने संपूर्ण अरवली पर्वतरांगेसाठी शाश्वत
खाणकामासाठीचा एक सविस्तर व्यवस्थापन आराखडा (एमपीएसएम) तयार करण्याचे निर्देश
दिले आहेत. या आराखड्यात ज्या भागांमध्ये खाणकाम पूर्णपणे प्रतिबंधित केले पाहिजे, ते क्षेत्र
निश्चित करणे; जेथे मर्यादित आणि अत्यंत नियंत्रित खाणकामाला परवानगी दिली जाऊ शकते, असे विभाग
ओळखणे; संवेदनशील अधिवास आणि वन्यजीव कॉरिडॉरचे नकाशे तयार करणे; एकत्रित
पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन करणे; पर्यावरणीय वहन क्षमता निश्चित करणे; आणि पुनर्संचयन
व पुनर्वसन उपायांचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. न्यायालयाच्या या आदेशाने मोठा
दिलासा मिळाला आहे.
अरवली पर्वतरांग ही उत्तर भारताची
पर्यावरणीय ढाल आहे. तिचे संवर्धन म्हणजे पाणी, हवामान, शेती, आरोग्य आणि भविष्यातील पिढ्यांचे
संरक्षण होय. त्यामुळेच अरवली पर्वतरांग वाचवणे हे केवळ पर्यावरणाचा मुद्दा नसून
राष्ट्रीय गरज आहे.
--
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक.
तसेच मुक्त पत्रकार.
मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
Please Follow me on :
WhatsApp Group – https://chat.whatsapp.com/D6XHacZLv83IvDo8Ed8sTe?mode=wwc
Facebook - www.facebook.com/BhaveshBrahmankar
X (Twitter) - www.twitter.com/BhavBrahma
Instagram - https://www.instagram.com/bhavbrahma
Blog - https://bhavbrahma.blogspot.com/
WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
--
#environment # aravalli #range #mountain #rajasthan
#delhi #forest #biodiversity #ecology #delhi #haryana #court #rule #mining #saamana
#bhavesh #brahmankar

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा