या देशातही लष्कराने घेतली सत्ता ताब्यात (नवशक्ती)
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांनी विजय मिळाल्याचे घोषित केले. अभूतपूर्व गोंधळ उडाला. अराजकामुळे लष्कराने सत्ता ताब्यात घेऊन अनेक नेत्यांना जेरबंद केले. आता पुढे काय होणार कुणालाच माहित नाही.
भावेश ब्राह्मणकर
अफ्रिका खंडात असलेला गिनी बिसाऊ हा
देश सध्या अराजक आणि राजकीय अस्थैर्यातून जात आहे. निमित्त ठरले ते राष्ट्राध्यक्ष
पदाच्या निवडणुकीचे. २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत निकाल घोषित
होण्यापूर्वीच गदारोळ उडाला. विरोधी पक्षाचे नेते फर्नांडो डायस आणि सत्ताधारी रे
डोनाल्ड यांनी स्वतंत्रपणे घोषित केले की, ‘आपल्याला
५० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली असून प्रथम फेरीतच विजय प्राप्त झाला आहे.
त्यामुळे दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीची गरज नाही.’ परिणामी,
अधिकृत निकाल जाहीर तर झालाच नाही पण देशात आंदोलनांची लाट आली. हे सारे पाहून लष्कराने
सत्ता ताब्यात घेतली आणि देशात संचारबंदी लागू केली. तात्काळ सर्व सार्वजनिक
संस्था, सरकार, संसद, माध्यमे, निवडणूक आयोग इत्यादींना निलंबित करण्यात आले. देशाच्या बाहेरील आणि
आंतरराष्ट्रीय सीमाही बंद करण्यात आल्या. सत्ताधारी व विरोधी नेत्यांनाही नजरकैद
केले गेले. पुन्हा एकदा हा देश अस्थैर्याच्या गर्तेत ढकलला गेला आहे. अफ्रिकन
युनियनसह अनेक देशांनी चिंता व्यक्त करून देशात स्थैर्य आणण्याची मागणी केली आहे.
गिनी-बिसाऊ देशाचा इतिहास पाहिला तर तो
अस्थैर्य, बंड, अराजक आदींनी भरलेला आहे. प्राचीन व मध्ययुगीन काळात हा प्रदेश
शतकानुशतके मांडिंगा, फुला, बियाफाडा, बालांता अशा आफ्रिकन जमातींचा होता. १३ ते
१५ व्या शतकात हा प्रदेश माली साम्राज्य व नंतर काबू साम्राज्य याच्या प्रभावाखाली
होता. सोने, मीठ, गुलाम यांचा व्यापार
यासाठी हा प्रदेश महत्वाचा होता. १५ ते १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत पोर्तुगीजांनी
या देशावर राज्य केले. त्यामुळे हा प्रदेश पोर्तुगीज गिनी नावानेही ओळखला जायचा. पोर्तुगीजांनी
येथे गुलाम व्यापाराचे प्रमुख तळ उभारले होते. १९५० नंतर देशात अमिल्कार काब्राल यांच्या
नेतृत्वात स्वातंत्र्य लढ्याची चळवळ सुरू झाली. अनेक छुपी युद्धे झाली. १९७४ मध्ये
पोर्तुगालमध्ये कार्नेशन क्रांती झाली. त्यानंतर गिनी बिसाऊला स्वतंत्र राष्ट्र
म्हणून मान्यता मिळाली. लुईस कॅब्राल या पहिला राष्ट्राध्यक्ष बनल्या. देशाने
समाजवादी मॉडेल स्वीकारले.
आर्थिक अडचणी आणि जातीय तणाव देशात
वाढतच गेला. १९८० मध्ये जोओ बर्नार्डो व्हिएरा यांनी लष्करी बंड करून सत्ताच्युत
केले. ते १८ वर्षे सत्तेत राहिले. पायाभूत सुविधांचा विकास न झाल्याने भ्रष्टाचार
बोकाळतच आहे. सैन्य आणि सत्तेत तणावाचे वातावरण वाढतच आहे. १९९० च्या दशकात
बहुपक्षीय लोकशाही मार्ग स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, १९९८-९९ मध्ये
गृहयुद्धाने देशाला पोखरले. राष्ट्राध्यक्ष आणि सैन्यप्रमुख यांच्यात संघर्ष
वाढला. अखेर राष्ट्राध्यक्ष देश सोडून पळून गेले. देशात प्रचंड आर्थिक नाश झाला. २०००
नंतर सततची राजकीय अस्थिरता आहे. सतत सरकार बदल, सैनिकी बंड, हत्या, निलंबन
याने देश ग्रस्त आहे. २००३ आणखी एक लष्करी बंड झाले. २००९ मध्ये राष्ट्राध्यक्षांची
हत्या झाली. २०१२ मध्ये पुन्हा लष्करी तख्तापालट झाला. २०१४ मध्ये लोकशाही
निवडणुका झाल्या पण स्थैर्य तात्पुरतेच ठरले. २०१९–२०२२ या काळात सरकार आणि सैन्य
यांच्यात वारंवार संघर्ष झाला. २०२३ मध्ये संसदेत सशस्त्र संघर्ष झाला. सैन्याने
हस्तक्षेप केला. आता यंदाही निवडणूक झाली पण अराजक निर्माण झाले आहे.
गिनी बिसाऊला मादक द्रव्य तस्करीचा
गंभीर विळखा पडला आहे. ड्रग्ज तस्करच देशातील राजकारणात हस्तक्षेप करीत आहेत. गिनी-बिसाऊ
अटलांटिक महासागराला लागून आहे. किनारी भागात बेटे आहेत. युरोप–आफ्रिका–दक्षिण
अमेरिका या तिन्ही दिशांना समुद्री जोडणी करणारा हा प्रदेश आहे. गिनी-बिसाऊ
अटलांटिक महासागराला लागून आहे. युरोप, चीन आणि रशिया या देशांचे मासेमारी हक्क व व्यापार-भागीदारी आहे. काजू
उत्पादन या देशाचा आर्थिक कणा आहे. येथून काजूची मोठी निर्यात होते. देशात केवळ
शेतीचाच आधार आहे. उद्योग जवळपास नाहीतच. गुंतवणूक नसल्याने रोजगारासह अन्य गंभीर
प्रश्न आहेत. देशात गरिबीने अजस्त्र हायपाय पसरले आहेत.
यंदाच्या निवडणुकीत झालेला गदारोळ
चिंता वाढविणारा आहे. निवडणूक आयोगावर सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण असल्याच्या तक्रारी
आहेत. एकूणच पारदर्शकतेवर प्रश्न आहेत. राष्ट्राध्यक्ष एम्बालो यांनी सैन्यावर
नियंत्रण वाढवण्याचा प्रयत्न केल्याने सैन्यातील काही गट एम्बालो यांचे विरोधक
बनले. हे गट आक्रमक झाले. आम्ही राष्ट्रीय सुरक्षा व लोकशाही वाचवत आहोत असा दावा
करून पुढे आले. ड्रग तस्करी रोखण्यासाठी सत्ता हस्तगत केल्याचा दावा सैन्यातील
काही गट करत आहेत. काही सैन्य गटांना वाटते की युरोप, भारत, अमेरिकेसारख्या देशांचे
निरीक्षण वाढले आहे. गिनी-बिसाऊचा इतिहासच तख्तापलटांनी भरलेला आहे. सत्तेवर कब्जा
करणे ही सैन्यासाठी सामान्य बाब आहे. गिनी-बिसाऊमधील सध्याचे तख्तापलट हे अचानक
मुळीच नाही. निवडणुकीतील गडबड, सैन्य–सत्ताधारी संघर्ष, मादक द्रव्य तस्करीचे जाळे,
कमजोर संस्था, ऐतिहासिक अस्थिरता या सर्वांचा एकत्रित परिणाम आहे.
गिनी बिसाऊ हा भौगोलिकदृष्ट्या लॅटिन
अमेरिकेतून युरोपकडे जाणाऱ्या कोकेनसारख्या नशीली पदार्थांच्या मार्गात येते.
त्यामुळे देशातील “नार्को-स्टेट” अशी बाजू मानली जाते. ड्रग्ज तस्करी आणि व्यापारातून मिळणारा पैसा बर्याचदा राजकीय आणि
सैन्य प्रतिनिधींमध्ये जातो. त्यामुळे भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी सत्तेकडे आकर्षित
होते. अनेकदा हा अवैध पैसा निवडणुकीमध्ये, सैन्यात किंवा शासनात वापरला जातो. परिणामी लोकशाही टिकविणे आणि
पारदर्शकता राखणे कठीण होते. सरकार आणि शासकीय यंत्रणा ही भ्रष्टाचाराने बरबटलेली
आहे. संसद, न्यायव्यवस्था, प्रशासन हे फारच कमकुवत बनले आहेत. वारंवार संसदेचे विघटन,
संवैधानिक प्रश्न, सरकार आणि संसदेतील तणाव हे
सर्व संस्थात्मक अस्थिरतेचे कारण बनतात. गरिबीशी झुंजणाऱ्या जनतेला कुठलाही आशेचा
किरण दिसत नाहीय. अशावेळी लष्कर आणि सत्ताधारी स्वार्थाची पोळी भाजून घेत आहेत. आरोग्य,
शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा, स्वच्छता अशा सर्वच क्षेत्रात अनेक आव्हाने
दिवसागणिक वाढत आहेत.
गिनी बिसाऊ हा जगाच्या पाठीवरील असाच
एक देश आहे जेथील जनता मोठ्या बदलाची किंवा चमत्काराची वाट पाहत आहे. तो कधी आणि
कसा होईल हे आतातरी सांगता येत नाही. गिनी बिसाऊ सारखे असे अनेक देश आहेत. मानवतेला
काळीमा फासून स्वार्थाची पोळून भाजून घेणारे जोवर आहेत तोवर हे सारेच देश होरपळणार
आहेत. संयुक्त राष्ट्रासारखी संस्थाही हतबल आहे. हे कशाचे निदर्शक मानावे?
--
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र
संबंध अभ्यासक आणि मुक्त पत्रकार.
मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
Please Follow me on :
WhatsApp Group – https://chat.whatsapp.com/D6XHacZLv83IvDo8Ed8sTe?mode=wwc
Facebook - www.facebook.com/BhaveshBrahmankar
X (Twitter) - www.twitter.com/BhavBrahma
Instagram
- https://www.instagram.com/bhavbrahma
Blog
- https://bhavbrahma.blogspot.com/
WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
--
#guinea #bissau #africa #cocaine
#election
#protest #agitation #corruption #drug #military #power #navshakti #bhavesh
#brahmankar

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा