गाझामधील या हानीचे काय? जबाबदारी कुणाची? (नवशक्ती)
गाझापट्ट्यात झालेल्या मनुष्य आणि वित्तहानीची जगभर चर्चा होत आहे. मात्र, याठिकाणी झालेल्या पर्यावरण हानीचे काय? संयुक्त राष्ट्राचा हा अहवाल अक्षरशः घाम फोडणारा आहे. त्याची कुठे वाच्यता होते आहे ना दखल...
भावेश ब्राह्मणकर
पश्चिम आशियातील इस्राईल आणि गाझा
यांच्यातील संघर्षाची जगभर विविध कारणांनी चर्चा झाली आणि होत आहे. हमास या
दहशतवादी गटाबद्दल, त्यांच्या क्रूर हल्ल्यांबाबत, इस्राईलच्या आक्रमकतेविषयी,
त्यांच्या अत्याधुनिक संरक्षणसामग्रीबद्दल, मानवतेला काळे फासणाऱ्या आक्रमक
हल्ल्यांविषयी, नेतन्याहू यांच्या अमानवी दृष्टीकोनाबाबत आणि बरेच काही. दोघांमध्ये
संघर्षविराम झाल्यानंतर स्थिती पूर्ववत होईल अशी आशा जगाला आहे. अत्यल्प प्रमाणात
हल्ले अजूनही सुरू असले तरी उद्धवस्त गाझातील भयावह स्थिती हळूहळू समोर येत आहे.
तेथील जनजीवनाची झालेली दुर्दशा इथपासून विविध क्षेत्रांवरील आघातांची दाहकता मन
सुन्न करणारी आहे. त्यातच आता संयुक्त राष्ट्राने एका अहवालातून गाझामधील पर्यावरण
हानीवर प्रकाश टाकला आहे. हा अहवाल अक्षरशः घाम फोडणाराच आहे. युद्ध आणि त्याच्या
परिणामांमध्ये पर्यावरणाचा फारसा उल्लेख किंवा चिंता व्यक्त केली जात नाही. मात्र,
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रासायनिक शस्त्रास्त्रांच्या काळात पर्यावरणाची किती
जबर हानी होते हे या अहवालाने उजेडात आणले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या या अहवालानुसार, गाझामधील तब्बल ९७ टक्के झाडे
नष्ट झाली आहेत. म्हणजेच, हिरवळीविना हा परिसर उघडा बोडका बनला आहे. त्याचबरोबर
हल्ल्यांमुळे उद्धवस्त झालेल्या इमारतींचा तब्बल ६१ दशलक्ष टन कचरा गाझा पट्ट्यात
साचला आहे. या साऱ्याचा गंभीर परिणाम तेथील पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होत आहे.
पाणी पुरवठाही बाधित झाला आहे. ज्यामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रसार वेगाने होत
आहे. ही हानी भरून काढण्यासाठी अनेक दशके लागू शकतात असे या अहवालात नमूद करण्यात
आले आहे. दुषित पाण्यामुळे अतिसाराचे गंभीर रुग्ण ३६ पटीने वाढले आहेत.
त्याचप्रमाणे, हेपेटायटीस ए-संबंधित काविळीचे रुग्ण ३८४ पटीने
वाढले आहेत. गाझामधील पाच लाखाहून अधिक लोक दुष्काळासारख्या गंभीर परिस्थितीसोबतच सुमारे
१० लाख लोक अन्नटंचाईचा सामना करत आहेत.
गाझा पट्ट्यात सुमारे अडीच लाख इमारती होत्या. बॉम्ब, क्षेपणास्त्र आणि गोळ्यांच्या हल्ल्यांमुळे यातील ७८ टक्के इमारती खराब झाल्या आहेत किंवा पूर्णपणे कोसळल्या आहेत. त्यामुळे सुमारे ६१ दशलक्ष टन कचरा जमा झाला आहे. विशेष म्हणजे, हा कचरा इजिप्तच्या १५ ग्रेट पिरॅमिड किंवा २५ आयफेल टॉवर्सच्या आकाराइतका आहे. एवढा कचरा हटवणार कसा आणि कुठे हा सुद्धा प्रश्नच आहे. या इमारतींच्या अंदाजे १५ टक्के ढिगाऱ्यामध्ये एस्बेस्टोस, औद्योगिक कचरा आणि जड धातू यासारखे धोकादायक पदार्थ असण्याचा धोका आहे. धूळ आणि कचऱ्याने तेथील रहिवासी त्रस्त झाले आहेत.
तसे पाहता युद्धे ही कुणाच्याही फायद्याची नसतात. युद्धात कुणीही जिंकत
नाही असे इतिहास सांगतो. युद्ध किंवा संघर्ष हे केवळ विनाशाच्या असंख्य पायवाटा
तयार करतात. युद्धात झालेली हानी भरून काढण्यासाठी अनेक दशके जातात. काही हानी तर
कधीच भरून येत नाही. अदृश्य स्वरूपातील परिणाम आणि हानी यांचे मोजमाप होत नाही.
किंवा अशी हानीची मोजणी करण्याचे तंत्रच आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे त्याविषयी
फारशी वाच्यता होत नाही. गाझामध्येही अशीच
परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथे बांधकाम आणि अन्य कचऱ्याचा ढीग दिसतो आहे पण
त्यापलिकडे झालेला मोठा दाह अद्यापही अदृश्यच आहे. तेथील पर्यावरणीय हानी भरून काढण्यासाठी
काही दशके नाही तर शतके लागतील, असेही हा अहवाल सांगतो.
संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाचा (युनेप) हा अहवाल खरं तर
संपूर्ण जगाचे डोळे उघडविणारा आहे. अर्थात त्याची दखल घेतली तरच अन्य़था पहिल्या
पानावरून पुढे असे चित्र सुरू राहिल. गाझा पट्टीतील दोन वर्षांच्या संघर्षामुळे तेथील
माती, स्वच्छ पाणीपुरवठा आणि किनारपट्टीचे गंभीर नुकसान झाले आहे. जे काही पिण्याचे
आणि स्वच्छ पाणी होते ते प्रचंड दुषित बनले आहे. विशेष म्हणजे हे पाणी मुळातच अल्प
प्रमाणात होते. गाझा पट्ट्यातील जलवाहिन्या आणि सांडपाणी व्यवस्था प्रचंड कोलमडली
आहे. त्यामुळे शौचासाठी खड्ड्यांचा वापर सुरू झाला आहे. काही भागात तर उघड्यावरच
हा प्रकार होत आहे. गाझा पट्ट्यातील एक लक्षात
घेण्याजोगी बाब म्हणजे गाझाची बहुतांश लोकसंख्या पाण्यासाठी भूगर्भातील पाण्यावर
अवलंबून आहे. मात्र हल्ले आणि कचऱ्यामुळे भूजलही प्रभावित झाले आहे. त्याशिवाय गाझाचा
किनारी प्रदेश आणि समुद्री भागही दूषित असल्याचा संशय आहे.
मात्र, या भागाची पाहणी किंवा तेथील चाचणी अद्याप झालेली नाही. किंवा ती करणेही शक्य नाही.
त्यामुळे या हानीची मोजदाद अद्याप या अहवालातही समाविष्ट नाही.
पाण्याचे स्त्रोत प्रदुषित झाल्याने तेथे अतिशय बिकट जलदुर्भिक्ष्य
निर्माण झाले आहे. आणि आता तर दुषित पाण्याने संसर्गजन्य रोग वेगाने पसरत आहेत.
तेथील परिस्थिती इतकी भयानक आहे की गंभीर अतिसाराने नागरिक हैराण झाले आहेत.
आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, अतिसाराच्या घटनांमध्ये ३६ पट वाढ झाली
आहे. तर, हेपेटायटीस ए संबंधित कावीळच्या रुग्णांमध्ये तब्बल ३८४ पट वाढ झाली आहे.
उलट्या आणि जुलाबाने रुग्ण बेजार झाले आहेत. त्यांना एक तर पाणी मिळत नाही. जे
मिळाले त्याने रोग जडत आहे. आरोग्य यंत्रणाही खिळखिळी झाल्याने उपचारही मिळत
नाहीत. त्यामुळे तेथील रुग्ण अक्षरशः तडफडत आहेत.
गाझापट्ट्यातील झाडे आणि हिरवळ जवळपास नाहीशी झाली आहे. अहवालातील आकडेवारीनुसार, २०२३ पासून ९७ टक्के झाडे, ९५ टक्के झुडपे आणि ८२ टक्के हंगामी
पिके नष्ट झाली आहेत. अशा परिस्थितीत, मोठ्या
प्रमाणात अन्न उत्पादन ठप्प झाले आहे. त्यामुळे अन्नधान्याचीही प्रचंड टंचाई आहे.
यामुळे तेथे उपासमार आणि कुपोषणाचा फेरा सुरू झाला आहे. दरम्यान, गाझामधील पाच
लाखाहून अधिक लोकसंख्या दुष्काळाचा तर सुमारे १० लाखाहून अधिक अन्नाच्या तीव्र
टंचाईचा सामना करत आहेत. बॉम्ब,
क्षेपणास्र, तोफगोळे अशा अस्रांचा वापर संघर्षात झाला आहे. त्यामुळे गाझातील मातीच्या
नैसर्गिक संरचनेवरही परिणाम झाला आहे. यामुळे तिची पाणी शोषण्याची क्षमता कमी झाली
आहे. परिणामी पूर येण्याचा धोका वाढला आहे. भूजल
पुनर्भरणही कमी झाले आहे. ही हानी भरून न येणारी अशीच आहे.
अहवालात नमूद करण्यात आले आहे की, जून २०२४ मधील सर्वेक्षणाच्या तुलनेत
परिस्थिती लक्षणीयरीत्या बिकट झाली आहे. उदाहरणार्थ, कचऱ्याचे
प्रमाण आता ५७ टक्क्यांनी वाढले आहे, जे २००८ पासून
गाझामधील सर्व संघर्षांमुळे निर्माण झालेल्या कचऱ्याच्या २० पट आहे. गाझाच्या
पर्यावरणीय नुकसानाची दखल घेण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात ३० शिफारशी देखील
देण्यात आल्या आहेत. यामध्ये पाणी आणि सांडपाण्याच्या पायाभूत सुविधांची जलद
पुनर्बांधणी, पद्धतशीर माती चाचणी, शक्य तितक्या
ठिकाणी कचरा हटवणे आणि पुनर्वापर करणे तसेच शस्त्रांच्या अवशेषांची सुरक्षित
विल्हेवाट लावणे आदींचा समावेश आहे. गाझाचे पर्यावरण केवळ काळजीपूर्वक, समावेशक आणि
वैज्ञानिक नियोजनाद्वारेच सुधारता येऊ शकते, असेही हा अहवाल सांगतो.
संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण विषयक
कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक इंगर अँडरसन म्हणतात की, "गाझातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. जर हे असेच चालू राहिले तर
भविष्यातील पिढ्यांच्या आरोग्यावर आणि जीवनावर त्याचा खोलवर परिणाम होईल. गाझातील
मानवतावादी संकट संपवणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. जीव वाचवण्यासाठी, मानवतावादी मदत
पोहोचवण्यासाठी, आवश्यक सेवा पुर्वरत करण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा आणि कचरा
साफ करणे आवश्यक आहे. शिवाय, गाझाच्या लोकांच्या अन्न आणि
पाण्याच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी माती, पाण्याचे स्रोत
आणि वनस्पती पुनर्संचयित करणे महत्त्वाचे असेल." युद्ध पश्चात होणाऱ्या या
अभूतपूर्व हानीची कुणीही कल्पना केली नसेल. ती प्रत्यक्षात अवतरली आहे त्यास
माणूसच कारणीभूत आहे. असाच प्रकार युक्रेनमध्येही असण्याची शक्यता आहे. हे असे
कुठवर सुरू राहणार? हे प्रकार थांबणार का? की इथून पुढे ते वाढणारच?
--
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र
संबंध अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार.
मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
Please Follow me on :
WhatsApp Group – https://chat.whatsapp.com/D6XHacZLv83IvDo8Ed8sTe?mode=wwc
Facebook - www.facebook.com/BhaveshBrahmankar
X (Twitter) - www.twitter.com/BhavBrahma
Instagram
- https://www.instagram.com/bhavbrahma
Blog
- https://bhavbrahma.blogspot.com/
WhatsApp Channel
- https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
--
#Gaza #West #Asia #Middle #East #environment #loss #waste #water #pollution #unep #report #war #crisis

छान लेख.
उत्तर द्याहटवा