रॅमन मॅगसेसे विजेती शाहीना अली (सामना उत्सव पुरवणी)

रॅमन मॅगसेसे विजेती शाहीना अली

आशिया खंडातील पिटुकला देश असलेल्या मालदीवमधील शाहीना अली या महिलेला प्रतिष्ठीत रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. तिचं कार्य नक्की काय? मालदीव किंवा जगाला त्याचा काय फायदा होत आहे? जाणून घेऊया या सर्वाविषयी...

भावेश ब्राह्मणकर

भारतापासून जवळच असलेला आणि हिंदी महासागरात वसलेले मालदीव हे बेट सव्वीस प्रवाळ टेकड्या आणि जवळजवळ १,२०० प्रवाळ बेटांनी बनलेला आहे. पर्यटनासाठी जगविख्यात असलेल्या या बेटाला भेट देण्याची अनेकांची इच्छा असते. स्नॉर्कलिंग आणि मासेमारीसाठी आदर्श असलेल्या अ‍ॅक्वामरीन पाण्याने मालदीव वेढलेला आहे. मालदीवची संस्कृती समुद्राशी खोलवर जोडलेली आहे. तेथील पर्यटन हा सर्वात आघाडीचा उद्योग बनला आहे. मासेमारी उद्योगालाही त्याने मागे टाकले आहे. 

निसर्गसंपन्न अशा मालदीवला मात्र नजर लागली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तेथे झपाट्याने शहरीकरण वाढत आहे. त्याचे नानाविध परिणाम होत आहेत. खासकरून प्लास्टिकने घातलेला अजगरी विळखा संपूर्ण बेटाला, तेथील समुद्रकिनारे आणि समुद्राच्या पाण्यालाही अनन्वित प्रदूषित करीत आहे. त्यामुळे सागरी परिसंस्था, अर्थव्यवस्था आणि मालदीवकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा धोका जमीन आणि समुद्र दोन्हीवर आहे. प्लास्टिकचा कचरा बहुतांशपणे जाळला जातो किंवा समुद्रात फेकला जातो. त्यामुळे हानिकारक धूर आणि सूक्ष्म प्लास्टिक तयार होतात. ते सारे किनाऱ्यावरील आणि पाण्याखालील सर्व प्रकारच्या जीवांचे नुकसान करीत आहेत. या साऱ्या स्थितीने अत्यंत अस्वस्थ झाली ती शाहिना अली ही तरुणी. यासंदर्भात ठोस काही तरी करायला हवे असा चंग तिनं बांधला. पण काय आणि कसं करायचं हे निश्चित होत नव्हतं. अखेर तिनं प्रारंभ केला.

लहान मुले आणि शाळा येथे जाऊन तिने प्रबोधनाला सुरुवात केली. प्लास्टिकमुळे आपल्या भोवती काय घडत आहे हे सारे ती सांगू लागली. पण इतरांसारखेच किंवा पुस्तकी भाषेतले ती सांगत असल्याने तिला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे मात्र ती नाउमेद झाली नाही. आज नाही तर उद्या किंवा या शाळेत नाही तर दुसऱ्या शाळेत मला सकारात्मक प्रतिसाद लाभेल, या आशेवर ती कार्यरत राहिली. पाहता पाहता मालदीवमधील ७० शाळा तिने पिंजून काढल्या. मोठी जनजागृती केली. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच प्लास्टिकचे धोके कळाले. मात्र पुढे काय असा प्रश्न शाहीनासमोर निर्माण झाला. केवळ जनजागृती करून फार काही होणार नाही त्यास योग्य अशा कृतीची जोड द्यावी लागेल, हे एव्हाना तिला कळून चुकले होते. म्हणूनच तिने पार्ली या आपल्या स्वयंसेवा संस्थेच्या मदतीने समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता मोहिम आरंभली. प्रारंभी अल्प असलेला प्रतिसाद हळूहळू वाढू लागला. आणि पाहता पाहता तिने ७००हून अधिक स्वच्छता मोहिमा लोकसहभागातून यशस्वीपणे राबविल्या. त्यामुळे ती मालदीवमध्ये पर्यावरण कार्यकर्ती म्हणून ख्यात आहे.

शाहिना म्हणते, "लहानपणी समुद्रकिनारी बागडायचे. नैसर्गिक कवचांनी भरलेली उत्कृष्ट पांढरी वाळूमध्ये मी मनसोक्त खेळायचे. नैसर्गिक खजिना जणू माझ्यासाठी खुला होता. प्लास्टिकचा वापर फार नव्हता. कापडी पिशव्या, पत्र्याचे डबे, काचेच्या बाटल्या असायच्या. प्लास्टिक असले तरी ते जतन करून त्याचा पुन्हा पुन्हा वापरायचो. मात्र ता प्लास्टिक हे मालदीवसारख्या माझ्या निसर्ग खजिन्यासाठी एक दुःस्वप्न बनून आले आहे. योग्य कचरा व्यवस्थापनाच्या अभावामुळे शेकडो टन कचरा निर्माण होत आहे. त्यात खासकरून प्लास्टिक सर्वाधिक आहे. प्लास्टिक अव्यवस्थितपणे हाताळणी आणि अशास्त्रीय विल्हेवाट लावली जात आहे. मी स्वतः एक फोटो जर्नलिस्ट आणि डायव्हिंग प्रशिक्षक आहे. समुद्राच्या पाण्यात तरंगणारा कचरा, कचऱ्याने भरलेल्या लाटा किनाऱ्यांवर धडकणे आणि मृत मासे तसेच मृत कोरल पाहून अक्षरशः माझा जीव कोंडतो. हे चित्र बदलण्याची नितांत गरज आहे.

शाहीनाने २०१५ मध्ये पार्ली फॉर द ओशन्स या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केले. समुद्री आणि वापरायोग्य पाण्याचे प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी तसेच प्लास्टिक कचरा लोकांसाठी उपयुक्त स्रोतात रूपांतर करण्यासाठी एक व्यापक कार्यक्रम तिने आखला. त्यावर व्यापक पद्धतीने काम सुरू केले. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेला हा उपक्रम आता चळवळ बनला आहे. जनजागृती मोहिम, स्वाक्षरी उपक्रम राबविल्यानंतर प्लास्टिक गोळा करणे हा सुद्धा कार्यक्रम घेण्यात आला. चांगल्या वातावरणासाठी प्लास्टिक टाळा, त्यास रोखा आणि त्याचा पुनर्वापर करा’, असे ब्रिद त्यांनी तयार केले. आणि आता ते मालदीवमध्ये सर्वदूर पोहचले आहे. तेथे येणाऱ्या पर्यटकांनाही त्याची जाणिव करून दिली जाते.

स्वयंसेवक, स्थानिक व्यवसायिक, स्वयंसेवी संस्था, शाळा आदी या चळवळीत जोडले गेले आहेत. मोठ्या प्रमाणात स्वच्छता, शैक्षणिक कार्यक्रम आणि पुनर्वापर उपक्रम राबविले जात आहेत. बेटावरील सत्तरहून अधिक शाळा या प्लास्टिक संकलन केंद्र बनल्या आहेत. प्लास्टिकचा कमीत कमी वापर करण्यावरही भर दिला जात आहे. या सर्वाचे दृष्य परिणामही दिसून येत आहे. शाहीनाला जाणीव आहे की, तिच्या देशाचे स्वच्छ आणि सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी पाण्यात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी बरेच काही करावे लागेल. तिने हवामान बदलाला तोंड देण्यासाठी सरकारसोबत काम सुरू केले. गेल्या दहा वर्षातील कार्याची तपश्चर्या फळास येत आहे. प्लास्टिकविषयी प्रचंड जनजागृती मालदीवमध्ये झाली आहे आणि होत आहे. शाहीना सांगते की, "आपण फक्त एका समस्येचे निराकरण करू शकत नाही. आपल्याला सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. कारण सर्वकाही समुद्राशी जोडलेले आहे. आपला देश फक्त १ टक्के जमिनीने बनलेला आहे. उर्वरित ९९ टक्के समुद्राने व्यापलेला आहे. हवामान बदलामुळे अनेक संकटे येणार आहेत. आपण त्यासाठी तयार रहायला हवे. सुरुवात आपण स्वतःपासूनच करायला हवी." तिच्या बोलण्याने मालदीववासिय भारावून जातात. त्यामुळेच तिला दिवसागणिक प्रतिसाद वाढतो आहे. तिच्या या मौल्यवान कार्याची दखल रॅमन मॅगसेसे पुरस्कार समितीने घेतली आहे.  

शाहीनाने अनेक संकटे आणि अडथळ्यांना तोंड दिले आहे. काहींचे टोमणे ऐकले, काहींचे वाईट वर्तन तर काहींच्या शिव्या. मात्र ती डगमगली नाही. कुणी हेटाळणी केली तरी तिचा संयम ढळला नाही. शांतपणे तिने आपले कार्य चालू ठेवले. त्यामुळेच आज हजारो नागरिकांमध्ये प्लास्टिकबाबत जनजागृती करण्याचे यश तिला पाहता आले आहे. संयुक्त राष्ट्राने २०२५ हे वर्ष समुद्री प्लास्टिक प्रदूषण यासंदर्भात जनजागृतीसाठी साजरे करण्याचे ठरविले आहे. त्यानुषंगाने जगभरात असंख्य कार्यक्रम, स्पर्धा होत आहेत. मॅगसेसे पुरस्कार समितीने याचाही विचार शाहीनाची निवड केली आहे. आशिया खंडातील नोबेल समजला जाणारा हा पुरस्कार तिला जाहीर झाल्याने जगभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र, हा पुरस्कार माझा नाही तर माझ्यासोबत कार्य करणाऱ्या सर्वांचा आहे. आशियातील सर्वात लहान देश कदाचित सर्वात मोठा प्रदूषण विरोधी चॅम्पियन बनेल, असा आशावाद ती व्यक्त करीत आहे. 

--

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

Please Follow me on :

WhatsApp Channel  - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

Facebook   - www.facebook.com/BhaveshBrahmankar

X (Twitter) - www.twitter.com/BhavBrahma

Instagram  - https://www.instagram.com/bhavbrahma

Blog        -  https://bhavbrahma.blogspot.com/

--

#Environment #Ali #Shaahina #The #Ramon #Magsaysay #Award #maldives #Plastic #Pollution #conservation #protection 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)

तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी (नवशक्ती)