पंजाबमध्ये पुराने हाहाकार का उडाला? (सामना - उत्सव पुरवणी)

पंजाबमध्ये पुराने हाहाकार का उडाला?

कृषी समृद्ध पंजाब राज्यात अतिवृष्टी आणि महापुराने अक्षरशः हाहाकार उडाला आहे. शेकडो एकर शेती आणि १९०२ गावे पाण्यात गेली आहेत. ४ ते ५ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. हे अचानक कसे आणि का घडले?

भावेश ब्राह्मणकर

भारतातील एकूण २० टक्के गहू आणि १२ टक्के तांदूळ पंजाब राज्यात उत्पादित होतो. यावरुन या राज्याचे कृषी क्षेत्रातील योगदान कळून चुकते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये अतिवृष्टी आणि महापुराने प्रचंड वाताहत झाली आहे. तेथे तब्बल ३.८ लाख नागरिक बाधित झाले आहेत तर ११.७ लाख हेक्टर शेतपिके नष्ट झाली आहेत. आतापर्यंत ४३ लोकांचा बळी गेला आहे. २३ जिल्ह्यांना पुराने वेढा दिला आहे. सुमारे ४ ते ५ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पाण्याने वेढलेली गावे आणि शेत यांचे फोटो तसेच व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाले आहेत. पण हे सारे कसे आणि का घडले यावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे.

पंजाबला यापूर्वीही महापुराने वेढल्याच्या नोंदी आहेत. १९५५, १९८८, १९९३, २०१९ आणि २०२३ मध्ये मोठी वाताहत झाली होती. आताही असेच घडते आहे. पंजाबमध्ये तीन प्रमुख नद्या आहेत. रावी, बियास आणि सतलज. या तिन्ही नद्या हिमालय पर्वत रांगेत उगम पावतात आणि हिमाचल प्रदेशातून पंजाबात येतात. जगातील सर्वाधिक सुपिक जमीन या नद्यांद्वारेच पंजाबात तयार झाल्याचे सांगितले जाते. म्हणूनच कृषी क्षेत्रात पंजाबचा वरचष्मा आहे. आता सर्वप्रथम हे जाणून घेऊ की पंजाबात महापूर कसा आला?

हिमाचल प्रदेशात १० ऑगस्टच्या सुमारास पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला. सहाजिकच तेथील पाणी नदीच्या पात्रातून महापुराद्वारे खालच्या भागात आले. या तिन्ही नद्यांवर प्रत्येकी थीन, पोंग आणि भाक्रा ही धरणे आहेत. वरच्या भागातून पाण्याचे लोट आल्याने तिन्ही धरणे काठोकाठ भरत असल्याचे पाहून धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. यामुळे वेगाने पाणी पंजाबमध्ये आले. नद्यांनी पाणी पातळी ओलांडली आणि महापुराच्या विळख्यात पाहता पाहता पंजाबचे २३ जिल्हे वेढले गेले. अचानक आलेल्या या पुराने नागरिकांना कुठलीही संधी मिळाली नाही. स्वतःचा जीव केवळ ते वाचवू शकले. या महापुरात जिवितहानी अल्प झाली असली तरी शेतपिके आणि मालमत्तेची हानी कोट्यवधींच्या घरात आहे. अनेक कुटुंब अक्षरशः देशोधडीला लागले आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत त्यांची उभी पिके पाण्यात गेली आहेत. सरकार आणि प्रशासन हे सुद्धा हतबल झाल्याचे पहायला मिळत आहे. दरवर्षीपेक्षा अधिक पाऊस हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पडल्याचे हवामान विभागाचे आकडे सांगतात. त्यापलीकडेही काही कारणे आहेत ज्यामुळे ही सर्व वाताहत झाली आहे.

पंजाबमध्ये नदी किनारी मोठे अतिक्रमण झाले आहे. महापुरात या साऱ्याच अवैध बाबींचा नायनाट झाला आहे. तसेच, तिन्ही धरणातून पाणी सोडताना असमन्वय असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळेच अचानक लाखो क्युसेक्सस पाणी धरणातून सोडण्यात आले. परिणामी, पंजाबमध्ये होत्याचे नव्हते झाले. अत्यंत कमी कालावधीत पाण्याची पातळी लक्षणीय वाढली. यातून बचावासाठी आवश्यक तो वेळच मिळू शकला नाही. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कागदावरच राहिली. तरीही शेत आणि गावांमध्ये घुसणारे पाणी काही रोखता आले नसते. कारण, पाण्याचे लोटच एवढ्या वेगाने भूभाग काबीज करीत होते की त्यापुढे निवारण खुजेच ठरले असते. भाक्रा आणि पोंग या धरणातून पाणी सोडण्यासाठी भाक्रा बियास व्यवस्थापन बोर्ड आहे. त्यावर पंजाबनेच नियुक्त केलेले अधिकारी आहेत. असे असतानाही धरणातून पाणी सोडण्यापूर्वी कुठलाही इशारा खालच्या भागात दिला गेला नाही. हिमाचल प्रदेशातून किती प्रमाणात आणि कुठल्या वेगाने पाणी येते आहे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले नाही. धरणात जमा होणाऱ्या पाण्याचेही निरीक्षण काहीसे निष्काळजीच होते. त्यामुळे सतत थोडे थोडे पाणी सोडता आले असते. मात्र, अचानक लाखो क्युसेक्स पाणी सोडून महापुराला जणू आमंत्रण देण्यात आले. प्रशासकीय पातळीवरचा हा हलगर्जीपणा हजारो शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे.

तिन्ही प्रमुख नद्यांच्या उपनद्यांचीही परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यांनाही महापूर आला. या नद्यांवरील अतिक्रमणे, त्यांच्या पात्राचे झालेले आकुंचन आणि नदी पात्रातील गाळ व रेती हे सारेच परिस्थिती बिघडविणारे ठरले. त्यामुळे नदी आणि उपनद्यांच्या परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झाले. धरणातून पाणी सोडण्याच्या निकषावरुन पंजाब राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात खडाजंगी सुरू झाली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार कार्यरत आहे. तर, केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे. दोघांमध्ये विळ्याभोपळ्याचे नाते आहे. त्यामुळे त्याचीही धार आहेच. मात्र, आता आपत्तीजनक परिस्थिती असताना त्यात खरे तर राजकारण व्हायला नको. पण ते होते आहे कारण मानसिकता. दोन्ही सरकारे एकमेकाकडे बोट दाखवित असून पाण्यात अडकलेली लाखो जनता ते पाहत आहे. पंजाबला पूर नवीन नसले तरी त्याची तीव्रता कमी करता येणे शक्य आहे. तेवढेच खरे तर आपल्या हाती आहे. मात्र, याचा सारासार विचार होताना दिसत नाही. त्यामुळे नाहक जनता भरडली जात आहे.

यापूर्वी आलेल्या महापुरांमधून आपण काहीच धडा घेतला नसल्याचे स्पष्ट होते. मुंबईचा पूर असो की चेन्नई किंवा पंजाब. सर्वत्र सारखीच स्थिती आहे. आपत्ती व्यवस्थापनाद्वारे फक्त हानी कमी करता येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिहारमध्ये प्रचारसभेला जाण्यास वेळ आहे पण पंजाबमध्ये नुकसानीची पाहणी करण्यास नाही, असा आरोप विविध संघटना आणि पक्षांकडून होत आहे. कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पंजाबचा दौरा करुन सद्यस्थिती जाणून घेतली आहे. त्यांनी पंजाब सरकारवर खापर फोडले आहे. तर, मुख्यमंत्री भगवतसिंग मान यांच्या नेतृत्वातील सरकारने केंद्र सरकारवर आगपाखड करताना नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी कार्य करण्याची ग्वाही दिली आहे.

पंजाबमध्ये गहू आणि तांदळाचे उत्पादन घटल्याने देशातील बाजारपेठेवर त्याचा निश्चितच परिणाम होणार आहे. त्यामुळे गहू आणि तांदळाचे दर अधिक राहण्याची शक्यता आहे. कृषी कायद्यांना विरोध केल्यापासून केंद्रातील मोदी सरकारचा पंजाबच्या शेतकऱ्यांवर राग असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच मोदी पंजाबला प्रारंभी गेले नाही. त्यांनी मुख्यमंत्री मान यांच्याशी फोनवर चर्चा केली. अखेर मोदींनी मंगळवारी पंजाबचा दौरा केला.

ऑपरेशन ब्लू स्टार, पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निघृण हत्या, खलिस्तान चळवळीची डोकेदुखी हे सारे लक्षात घेऊन केंद्र सरकारने पंजाबकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा दुखावलेल्या पंजाबी बांधवांवर गळ टाकण्यासाठी पाकिस्तान आणि चीन हे टपलेलेच आहेत. पंजाबमधील महापूर ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही तर देश सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्वाची घटना आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे तू तू मै मै करण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करून जनतेला दिलासा देणे आवश्यक आहे. तसेच, त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून त्यांना उभारी द्यायला हवी. एखाद्याला देशद्रोही म्हणणे किंवा त्याला तसे कृत्य करण्यास भाग पाडणे यास प्राधान्य द्यायचे की देशभक्त होऊन पंजाबच्या आपत्ती निवारणात सक्रीय व्हायचे हे केंद्र आणि पंजाब राज्य सरकारला ठरवावेच लागेल. अन्यथा नैसर्गिक आपत्तीतून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा गंभीर होऊ शकतो.

--

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

Please Follow me on :

WhatsApp Channel  - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

Facebook   - www.facebook.com/BhaveshBrahmankar

X (Twitter)  - www.twitter.com/BhavBrahma

Instagram   - https://www.instagram.com/bhavbrahma

Blog            - https://bhavbrahma.blogspot.com/

--

Punjab, Flood, Natural Disaster, Heavy Rainfall, Climate Change, Rivers, Devastation, Dam, Ravi, Beas, Sutlej, farmland, Loss,  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)

तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी (नवशक्ती)