जगाचा नकाशा बदलणार? (साप्ताहिक सकाळ )
जगाचा नकाशा बदलणार?
सध्या असलेल्या जगाच्या नकाशाला तीव्र विरोध करत ५५ देशांनी ‘करेक्ट द मॅप’ ही मोहिम सुरू केली आहे. अचानक असे काय घडले? सध्याचा नकाशा केव्हा आणि कसा तयार झाला? त्यात आता काय बदल होऊ घातले आहेत?
भावेश ब्राह्मणकर
‘आपण सध्या पाहत आणि वापरत असलेला
जगाचा नकाशा हा चुकीचा आहे. त्यात बदल करणे गरजेचे आहे. म्हणूनच ‘करेक्ट द मॅप’ या मोहिमेला इतरांनीही पाठिंबा
द्यायला हवा’, असे आवाहन जगातील तब्बल ५५ देशांनी केले आहे. हे
देश आहेत अफ्रिका खंडातील. त्यांच्या नाराजीचे कारण आहे त्यांच्या खंडाचा
नकाशामधील दर्शविलेला आकार. तसे पाहिले तर पहिल्यांदाच अशा प्रकारे जगाच्या
नकाशावर टीका होत नाहीय. यापूर्वीही ती झाली होती. मात्र, आता त्याची धार तीव्र
असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात जगाचा नकाशा बदलू शकतो किंवा
सुधारित नकाशा सर्वांना उपलब्ध होऊ शकतो.
सध्या वापरात असलेला नकाशाला मर्केटर
नकाशा असे म्हटले जाते. तो तयार करण्यात आला सोळाव्या शतकात. जेरार्डस मर्केटर या
व्यक्तीने तो विकसित केला. बेल्जिअमचा रहिवासी असलेला मर्केटर हा नकाशाकार होता. सोळाव्य़ा
शतकामध्ये युरोपात समुद्री प्रवास केला जात होता. नवनवीन प्रदेश हूडकून काढणे, व्यापारासाठी
बाजारपेठा शोधणे, सोने-चांदीसारखे मौल्यवान धातू मिळविणे यासाठी तेव्हा चढाओढ
होती. फ्रान्स, स्पेन, पोलंड, ब्रिटन, पोर्तुगाल आदी देश त्यात अग्रेसर होते. मात्र,
समुद्री प्रवासात येणाऱ्या अडीअडचणी लक्षात घेऊन जगाचा नकाशा तयार करावा, असे
काहींच्या मनात आले. अखेर मर्केटर याने पृथ्वीच्या गोलार्धावरील विविध देश आणि
महासागर यांचा अंदाज घेऊन नकाशा तयार केला. तोच हा मर्केटर नकाशा. पृथ्वी गोल
असल्याने हा नकाशा सपाट कागदावर पाहिला तर वेगळा दिसतो आणि तोच कागद गोल केला की
वेगळा भासतो. पाहता पाहता दर्यावर्दींमध्ये मर्केटरने काढलेला नकाशा वापरला जाऊ
लागला. जगभर तो पोहचला. जगन्मान्यता मिळालेला हा नकाशा तेव्हापासून आजतागायत
वापरला जात आहे. विशेष म्हणजे, विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे गेल्या चार ते पाच शतकात
अनेकानेक शोध लागले. मानव चंद्रावरही जाऊन पोहचला. पृथ्वीच्या भोवती असंख्य उपग्रहसुद्धा
फिरत आहेत. फोटो आणि व्हिडिओंची अत्याधुनिक दुनिया निर्माण झाली आहे. असे असतानाही
तब्बल पाच शतकांपूर्वीचा नकाशा वापरला जात आहे हे विशेष. त्याकाळी उपलब्ध
तंत्रज्ञान, साहित्य आणि सामग्रीचा विचार करता मर्केटर याने तयार केलेल्या नकाशामध्ये अनेक
चुका असल्याचे दिसून येते.
ग्रीनलँडचा भूभाग हा २.१ दशलक्ष वर्ग
किलोमीटर तर अफ्रिका खंडाचा प्रदेश ३०.२ दशलक्ष वर्ग किलोमीटर आहे. म्हणजेच अफ्रिका
खंड हा ग्रीनलँडपेक्षा तब्बल चौदा पट मोठा आहे. प्रत्यक्षात मर्केटर नकाशामध्ये ग्रीनलँड
हा अफ्रिकेपेक्षा मोठा असल्याचे दर्शविण्यात आले आहे. मर्केटर नकाशात उत्तरेकडील अनेक
राष्ट्रे आकारमानाने आफ्रिका खंडाशी तुलनात्मक दिसतात, परंतु प्रत्यक्षात ते
भूभागाच्या बाबतीत लहान आहेत. आफ्रिका खंड हा कॅनडापेक्षा सुमारे तीन पट तर
रशियाच्या आकारापेक्षा दीड पट मोठा आहे. तरीही मर्केटर नकाशामुळे विद्यार्थ्यांना
असे वाटते की ते देश आकाराने किंवा आफ्रिकेपेक्षाही मोठे आहेत. त्यामुळे अफ्रिकी
देशांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. म्हणूनच मर्केटर नकाशा बदलण्याची मागणी जोर धरत
आहे.
अफ्रिका खंडामध्ये एकूण ५५ देश आहेत.
या आफ्रिकन देशांची राजकीय आणि आर्थिक संघटना असलेल्या आफ्रिकन युनियनने ‘करेक्ट द मॅप’ या मोहिमेला मान्यता दिली आहे. ज्यामध्ये
‘मर्केटर प्रोजेक्शन’च्या जागी ‘इक्वल अर्थ प्रोजेक्शन’ आणावे, अशी आग्रही मागणी
केली आहे. देशोदेशीच्या सापेक्ष आकारांचे अचूक प्रतिनिधित्व करणारा नकाशा आणावा,
असे त्यांचे म्हणणे आहे. सोळाव्या शतकात पहिल्यांदा तयार केला गेलेला मर्केटर
नकाशा आजही नेव्हिगेशन आणि शिक्षणासाठी वापरला जातो. मर्केटर नकाशा चुकीची माहिती
देण्याबरोबरच संभ्रम तयार करणारा आहे. ‘जगातील सर्वात चुकीची
माहिती देणारी मोहिम आपण सर्वांनी थांबवायला हवी’, असे तज्ज्ञांचे
म्हणणे आहे. क्षेत्रफळाचा विचार करता अफ्रिका खंड हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा
आहे. या खंडाची लोकसंख्या एक अब्जाहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या भूभागावर मर्केटर नकाशामध्ये
अन्याय करण्यात आला आहे. तशी भावना अफ्रिकन देशांमध्ये निर्माण झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते नकाशे कधीच
वास्तवाचे परिपूर्ण प्रतिबिंब नसतात. त्यात प्रमाणबद्धतेचा अभाव असतो. सर्वसाधारणपणे
आकलन व्हावे या हेतूनेच नकाशाकडे पहायला हवे. मात्र, मर्केटर नकाशात भूभागाचे
आकारमानच मोठ्या प्रमाणात चुकले आहे. गोलाकार पृथ्वी ही कागदाच्या तुकड्यावर किंवा
पडद्यावर सपाट करण्याचा कोणताही प्रयत्न हा विकृती निर्माण करतो, असे नकाशा तज्ज्ञांना
वाटते. संत्री ही गोलाकार असते. जर संत्र्याचे तुकडे सोलून आपण ते टेबलावर ठेवले
आणि ते सपाट दाबण्याचा प्रयत्न केला तर कसे होईल?
गोलाकार भाग सपाट करण्याच्या प्रयत्नात त्यावरील आकार हे ताणले जातात, फाटतात
किंवा आकुंचन पावतात. मर्केटर नकाशाच्या बाबतीत सध्या तसेच घडत असल्याचे जाणकारांचे
मत आहे.
सोळाव्या शतकात मर्केटरने जेव्हा नकाशा
तयार केला तेव्हा काय स्थिती होती याचा विचार करायला हवा. जगाच्या भूगोलाचे गणितीय
अचूकतेने सपाट नकाशांवर प्रतिनिधित्व करण्याचा एक मार्ग नकाशाकारांना हवा होता.
ज्यामुळे नकाशा हा नेव्हिगेशनसाठी विश्वसनीय साधन बनेल. यातील प्रमुख दृष्टिकोन
म्हणजे जगाला एका भौमितिक आकारावर प्रक्षेपित करणे असा होता. पृथ्वी गोल असल्याने जेरार्डस
मर्केटर यांनी सर्वप्रथम एक दंडगोलाकार निवडला. त्यानुसार नकाशा तयार केला.
त्यामुळे त्यांची कल्पना विशेषतः नौकानयन जहाजांच्या युगात नेव्हिगेशनसाठी चांगली
कामी आली. प्रत्यक्षात हा नकाशा सपाट कागदावर पसरविला तर तो चुकीचा ठरतो. नेव्हिगेशनचा
विचार करता मर्केटरने तयार केलेला नकाशा गेल्या पाच शतकांपासून भूगोलाच्या
अभ्यासासाठी मानक बनला आहे. मात्र, ग्रीनलँड, कॅनडा किंवा रशिया हे देश प्रत्यक्षात आहेत त्यापेक्षा खूप मोठे दिसतात. मर्केटर
नकाशावरील टीका नवीन नाही. २०१८ मध्येही मर्केटर नकाशाला विरोध झाला. अचूक नकाशा
आणण्याची मागणी झाली. देशोदेशीचे खरे आकार त्यात प्रतिबिबिंत व्हावे असा हेतू
त्यामागे होता. जगाचा नकाशा बनविण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. त्यातही अनेक त्रुटी राहिल्या
आहेत. अंतर आणि दिशा यांच्याबाबतीत मोठीच गडबड कुठे ना कुठे होत असल्याचे दिसून
आले आहे. त्यामुळे सहमती होत नाही. परिणामी, मर्केटर नकाशाला पर्याय होईल असा
नकाशा स्वीकारण्यात आलेला नाही.
जागतिक बँक आणि संयुक्त
राष्ट्रांसारख्या संघटनांनी समान पृथ्वी नकाशा स्वीकारावा अशी इच्छा व्यक्त होत
आहे. २०१८ मध्ये गुगल मॅप्सने कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवरील मर्केटरवरून थ्रीडी ग्लोब
व्ह्यूवर हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जो अचूकतेच्या अगदी जवळ जातो. मात्र,
मोबाईल अॅपवर मर्केटर नेव्हिगेशनच दिसत असल्याचे सांगितले जाते. काळाच्या ओघात बदल
करणे आणि स्वीकारणे आवश्यक आहे. मात्र, सोळाव्या शतकात निर्मिलेला नकाशा एकविसाव्या
शतकातही वापरणे कितपत संयुक्तिक आहे, असा प्रश्न अभ्यासकांकडून उपस्थित केला जात
आहे. सुधारीत आणि नव्या नकाशासाठी स्वाक्षरी मोहिमही सुरू करण्यात आली आहे. येत्या
फेब्रुवारीमध्ये इथियोपियामध्ये अफ्रिकन देशांचे नेते जमणार आहेत. त्यात नवा नकाशा
स्वीकारण्याची अधिकृत घोषणा होण्याची चिन्हे आहेत.
--
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र
संबंध अभ्यासक आणि मुक्त पत्रकार. मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
Please Follow me on :
WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
Facebook - www.facebook.com/BhaveshBrahmankar
X (Twitter)
- www.twitter.com/BhavBrahma
Instagram
- https://www.instagram.com/bhavbrahma
Blog - https://bhavbrahma.blogspot.com/
--
Gerardus Mercator, World, Map, Projection, Navigation, Africa, Continent, Size, Shrink, Actual, Distort, adoption,

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा