व्याधीग्रस्त ते थेट आयर्नमॅन (आनंद तरंग दिवाळी अंक)

व्याधीग्रस्त ते थेट आयर्नमॅन

उडाणटप्पू, कॉलेजला एटीकेटी ते थेट यशस्वी उद्योजक

अनेक व्याधींनी ग्रस्त ते थेट आयर्नमॅन... दररोज विविध प्रकारची १० औषधे घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला ते ठणठणीत खेळाडू... उडाणटप्पू, बीकॉमला एटीकेटी ते यशस्वी उद्योजक... बदनामीचा शिक्का ते अतिशय प्रतिष्ठीत व्यवसाय... भारतातील पहिल्या अत्याधुनिक भगर मीलची उभारणी... सोनपरी या ब्रँडचा देशभरात बोलबाला... ही यशोगाथा आहे महेंद्र छोरिया यांची. अशक्य वाटणारा पण त्यांनी शक्य करुन दाखविलेला त्यांचा हा यशोप्रवास.... खऱ्या अर्थाने जीवन यांना कळले हो असाच....

भावेश ब्राह्मणकर

वय ३७. वजन ९० किलो. उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, फुफ्फुस कमकुवत झालेले, हाय कोलेस्टेरॉल अशा विविध व्याधींचे निदान. उंची ५ फूट ४ इंच. अशी व्यक्ती जगातील सर्वात खडतर अशी आयर्नमॅन ही स्पर्धा जिंकू शकते का? असा प्रश्न विचारला तर डॉक्टरांचेही उत्तर असेल नक्कीच नाही! पण, ही किमया करुन दाखविली आहे नाशिकच्या महेंद्र छोरिया यांनी. चमत्कार म्हणा की आणखी काही पण अविश्वसनीय असेच हे सारे घडले आहे. सर्वचजण अचंबित होतात. पण, हे सारं काही एका दिवसात आणि रात्रीत घडलेलं नाही. त्यामागे त्यांची अपार मेहनत, जिद्द आणि चिकाटी आहे.

कुठलंच यश सहजासहजी मिळत नाही, असं सांगताना छोरिया २०१४ मधील सर्व प्रसंग अगदी लख्खंपण मांडतात, ‘मला सहा शारीरीक व्याधींनी गाठलं होतं. माझे फॅमिली डॉक्टर मनोज चितळे म्हणाले की, मुंबईत लिलावती हॉस्पिटलला जावून ये. संपूर्ण बॉडीचेकअप कर. मग, आपण पुढे काय करायचे ते ठरवू. मी थेट लिलावती हॉस्पिटलमध्ये गेलो. तेथे पूर्ण बॉडीचेकअप केले. विविध तपासण्या केल्या. चाचण्यांचे रिपोर्ट आले. कन्सल्टींग डॉक्टरने बोलवून सांगितलं की, सारेच रिपोर्टस गंभीर आहेत. कुठल्या आजारावर औषध नाही द्यायचं? असा आमच्यासमोर मोठा प्रश्न आहे. तुमच्या फुफ्फुसांची क्षमता कमी झालेली आहे. हाय ब्लड प्रेशर, डायबेटीस, हाय ओबेसिटी. कोलेस्टेरॉल सुद्धा हाय आहे. आता फक्त हार्ट सुरू आहे. त्यामुळे या १० गोळ्या सुरुवातीला देतो. त्या तातडीने सुरू करा. या गोळ्या घेऊनच तुम्हाला संपूर्ण आयुष्य जगावे लागेल. विशेष म्हणजे, दर तीन महिन्यांनी पुन्हा तपासण्या करुन आपण पुढील उपचार ठरवत जावू.’

डॉक्टरांचे ऐकून छोरिया यांना मोठा धक्का बसला. वयाच्या ३७ व्या वर्षी आपण शरीराचं एवढं मोठं नुकसान केलं आहे. यामुळे त्यांना प्रचंड वाईट वाटत होतं. नाशिकला येऊन त्यांनी सर्व रिपोर्टस डॉ. चितळे यांना दाखविले. ते पाहून ते चिंताग्रस्त झाले आणि म्हणाले, ‘तुला तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. अन्यथा पुढील सहा महिन्यात तुला हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक दोघांपैकी काही तरी होऊ शकते.’ यामुळे तर छोरिया आणखीनच चिंतेत पडले. सगळं सपलं, असं त्यांना वाटू लागलं. आता काय करायचे?

घरी आल्यावर छोरिया यांना अस्वस्थ वाटू लागले. आपल्यावर कुटुंब अवलंबून आहे. पत्नी, दोन मुली, वडिल, भाऊ आणि भगर मिल उद्योग. माझे काही झाले तर या सर्वांचे कसे होणार? असा विचार त्यांना सतावू लागला. घरात आपण मोठे आहोत. म्हणजे आपली जबाबदारीही सर्वाधिक आहे. असं घाबरुन आणि हातावर हात धरुन बसल्याने काही होणार नाही. हेल्थ इज वेल्थ. स्वतःला बदलण्याचा ठाम निश्चय केला. पहिलं लक्ष्य होतं. वजन कमी करण्याचे. त्यासाठी व्यायाम करायला हवा. अनेकांशी बोलल्यावर कळले की धावणे हे सगळ्यात उत्तम. पण, धावणे हे काही सोपं नव्हतं. साधं १०० मीटर चाललं तरी धाप लागायची. तेव्हा धावणे दूरच. आपल्याला विविध आजार असल्याने सतत भीती असायची की जास्त पळाल्यावर मला हृदयविकाराचा झटका येईल का? की मी कोसळून पडेल?’

अनंत समस्या होत्या. खुप त्रास व्हायचा. आता धावण बंद करायचं का? मानसिक, शारिरीक अडचणी यायच्या. पण, निश्चय ठाम असल्यानेच त्यांनी स्विमिंग बरोबर हळूहळू धावणे सुरू केले. डॉ. चंद्रकांत संकलेचा यांच्या मार्गदर्शनाने मी धावण्याचा सराव करु लागलो. सुरुवातीचे काही दिवस आणि आठवडे कठीण होते. परीक्षा पाहणारे होते. पण, त्यावर मात केली. धावण्याच्या प्रयत्नांना यश आले. वजन घटू लागलं तसं धावण्याची क्षमताही वाढली. हुरूप वाढला. सर्व पथ्ये पाळून शारीरीक व्यायामाचे प्रमाण वाढवत नेले. याच बरोबर खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. मनावर ताबा ठेवला. मधूनच सगळे नको वाटायचे. पण त्याच वेळी मित्र/सहकारी मोटीव्हेट करायचे. गेल्या ९ वर्षात तब्बल १३ हजार किलोमीटर पेक्षा जास्त धावण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे. १०० पेक्षा जास्त हाफ मॅरेथॉन, ६ पूर्ण मॅरेथॉन त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. लोणावळ्याला अल्ट्रा रन पूर्ण केली. यात अतिउंचीवर धावायचे असते. सप्तशृंग गडापेक्षाही उंच असलेल्या भागात ५० किमी धावण्याची ही स्पर्धा त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. विशेष म्हणजे छोरिया हे तब्बल ४ आयर्नमॅनचे मानकरी आहेत. त्यात २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया, २०२१ मध्ये दक्षिण अफ्रिका तर २०२२ मध्ये दुबई आणि गोवा यांचा समावेश आहे. या चारही स्पर्धा अतिशय खडतर असतात. ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी रनिंग हे सलग करायचे असते. त्यातच हवामानाचाही अडसर असतो. कुठलाही सपोर्ट नसतो. कधी नदीत तर कधी थेट समुद्रात पोहायचे असते. त्यामुळे आयर्नमॅनचा किताब मिळविणे प्रचंड अवघड असते. पण हे सारे छोरिया यांनी करुन दाखविले आहे.

तंदुरुस्ती आणि व्याधींवर मात केलेले छोरिया म्हणतात की, ‘मधुमेहाला घाबरु नका. फक्त जीवनशैली बदला. रोज १ तास व्यायाम करा. जेवणाची पथ्ये पाळा. मधुमेहावर १०० टक्के नियंत्रण शक्य आहे. मी करु शकलो तर तुम्हीही करु शकता. घाबरु नका. नित्यनियमाने व्यायाम करा. संतुलित आहार हाच खरा उपाय आहे,’ असे ते आत्मविश्वासाने सांगतात.

छोरिया यांचा उद्योजकीय प्रवासही अतिशय विलक्षण आहे. अभ्यासात रस नसलेला विद्यार्थी, उडाणटप्पू असणारा अशी त्यांची ओळख होती. कसे बसे ते १२वी पास झाले. पुढे बिकॉमचे शिक्षण सुरू केले पण एटीकेटीचे भूत मानगुटीवर बसले. असा तरुण पुढे काही करेल, असे कुणालाच वाटणार नाही. अगदी घरच्यांनाही! छोरिया सुद्धा त्याला अपवाद नाहीत. भगर उद्योग कसा सुरू झाला याविषयी ते सांगतात की, ‘लहानपणी मी मामाच्या गावी घोटी येथे जायचो. मामांचा भगरी (वरई)चा व्यवसाय होता. मामा दर आठवड्याला वाशी मार्केटला भगरीचे नमुने घेऊन जायचे. ऑर्डर मिळवायचे. मस्त हॉटेलमध्ये जेवण करायचे. घरी परतायचे. कुटुंबाला सांगायचे की, आज एवढा धंदा झाला. एवढी भगर विकली. हे पाहून मलाही वाटायचं की मी सुद्धा भगरीचा व्यवसाय करावा. पण, सर्व कुटुंबियांना वाटायचे की मी सीए व्हावं. कारण, माझे वडिल सीए होते.’

छोरिया यांची घरची परिस्थिती हलाखीची होती. वडिलांसह एकूण ७ भाऊ, ३ बहिणी असे कुटुंब होते. वन रुम किचनच्या फ्लॅटमध्ये सर्व रहायचे. आर्थिक चणचण खुप असायची. त्यामुळे सर्व जण म्हणायचे की, ‘शिक्षण करुन पुढे जा. चांगले पैसे कमव.’ मामांकडे बघून भगर मिल टाकण्याचे स्वप्न बाळगले. पण, वडिलांनी नकार दिला. कारण, व्यवसायासाठी पैसेच नव्हते. ‘तु सीए हो’, असे ते सांगायचे. रडत खडत बीकॉमचे शिक्षण पूर्ण झाल्याचे पाहून वडिलांना कळून चुकले की, हा काही सीए व्हायचा नाही. अखेर भगर व्यवसायाला संमती मिळाली. वडिल म्हणाले, ‘ठीक आहे. तुला जे करायचे ते कर. पण मनापासून कर.’ मामा आणि आजोबांनी आर्थिक मदत केली आणि भगर मील उभारली. 

भगर व्यवसाय इतका सोपा नाही हे त्यात आल्यावर कळाल्याची स्पष्ट कबुली छोरिया देतात. सुरुवातीच्या या प्रवासाबद्दल ते सांगतात की, ‘अनेक ठेचा लागल्या. स्पर्धक व्यावसायिक हे ४० वर्षे जुने होते. मी नवखा २२ वर्षांचा तरुण होतो. स्पर्धकांनी अनेक अडचणी उभ्या केल्या. त्रास देण्याचा प्रयत्न केला. एकवेळ तर अशी आली की या धंद्यात का आलो, असे वाटायला लागले. पण न डगमगता मार्ग काढत गेलो. एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे जुन्या जाणत्या आणि प्रस्थापित स्पर्धक व्यावसायिकांनी भगर मिल व्यवसाय आणि उद्योगात काहीच विकास केला नाही. नवे तंत्रज्ञान आत्मसात केले नाही. जुनेच तंत्रज्ञान आणि ठराविक व पारंपारिक पद्धतीवर ते व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे मला ही संधी वाटली. वेगळं करायचं ठरवलं. हे केलं तरच आपण टिकू हे कळून चुकलं.’

२००२ पूर्वी भगर हे गरिबाचं धान्य म्हणून ओळखलं जात होतं. भगरीचा दाणा बारीक आणि त्यात माती, काडीकचरा असायचा. त्यामुळे महिलांना खुप त्रास व्हायचा. भगर स्वच्छ करणं आणि मग ती शिजवणं असा प्रकार होता. छोरिया यांनी भगर मिल व्यवसायाचे आधुनिकीककरण केले. भारतातील पहिले कलर सॉर्टर मशीन मीलमध्ये बसवले. भगर स्वच्छ होऊ लागली. या कार्यात सुरेश भंडारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. वडिलांचा यात सिंहाचा वाटा होता आणि आहे. चार्टर्ड अकाऊंटंट असूनही ते या व्यवसायात मला मदत करु लागले. मार्गदर्शन करीत होते, असे छोरिया अभिमानाने सांगतात. अखेर यश फूड या उद्योगाचा सोनपरी हा ब्रँड तयार झाला.  

भारतात कुणीच आजवर जो प्रयोग केला नाही तो आम्ही केला. यशस्वी ठरला. देशभरात सोनपरी भगरीला प्रचंड मागणी आहे. आम्ही आमच्या स्पर्धकांना मागे टाकू शकलो. यासाठी आम्ही अपार मेहनत घेतली’, हे सांगताना छोरिया यांच्या डोळ्यात चमक पहायला मिळते. सातपूर औद्योगिक वसाहतीत २००२ मध्ये पहिली भगर मिल त्यांनी उभारली. लहान भाऊ पंकज हा सीएचा अभ्यास करीत होता. मात्र, त्याचा कलही भगर व्यवसायाकडे असल्याचे पाहून २००८ मध्ये दिंडोरी रोडवर ढकांबे येथे फॅक्टरी सुरू केली. तेथे भगरीचे पॅकिंग होऊ लागले. छोरिया सांगतात की, ‘सोनपरी भगरीने कमाल केली. ग्राहक आग्रहाने मागू लागले. असे आजवर भगरीच्या बाबतीत कधीच झाले नाही. दाणेदार, स्वच्छ केलेली आणि पांढरी शुभ्र भगर ग्राहकांच्या पसंतीला उरली. अर्धा किलो पॅकिंगला प्रचंड मागणी वाढली. २०१८ मध्ये तिसरी फॅक्टरी सुरू केली. पावणे दोन वर्षात भारतातलं पहिलं अत्याधुनिक अशी भगर मील आम्ही विकसित केली. विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आम्ही भगर व्यवसायात अमुलाग्र बदल घडवून आणला. अनेकांना वाटायचं की भगरीवर प्रक्रिया करतात. पण आम्ही फक्त आधुनिक मशिन्सद्वारे भगरीतील दगड, माती, टरफल हे बाजूला करतो. ती स्वच्छ करतो. अत्यंत बारीक दाणे बाजूला होतात. चांगले दाणे निवडले जातात’, असे छोरिया म्हणतात.

२२ वर्षात ४ कारखाने सुरू करुन भगरीच्या व्यवसायात देदिप्यमान यश मिळवून छोरिया कुटुंबाने विक्रमच केला आहे. छोरिया सांगतात की, ‘वडिल आमच्याकरता इतकं काही सोडून गेले की आम्हाला फक्त ते सांभाळायचं आहे. त्यात भर घालायची आहे. त्याकरता फिट राहायचं आहे. फिटनेस लेव्हल चांगली असेल तर व्यवसायही उत्तम करता येतो. व्यावसायिकच आजारी असेल तर व्यापार कसा होणार?’ त्यांचा हा प्रश्न खरोखरच विचार करायला लावणारा आहे. छोरिया सांगतात की, ‘टीम म्हणून आम्ही काम करतो. कामे वाटून घेतली आहे. पंकज प्रॉडक्शन विभाग सांभाळतो. उर्वरीत अकाऊंट, पर्चेस, सेल्स, अडमिन हे माझ्याक़डे.’

भगरीचे महत्व सांगताना ते थकत नाहीत. भगरीचे पोषण मूल्य खुप आहे. लठ्ठपणा, मधुमेह यासारख्या विविध आजारांनी ग्रस्त झालेल्यांना भगरीचे महत्व कळू लागले आहे. तृणधान्याकडे आता सर्व जण वळत आहेत. डाएटिशिअन, न्यूट्रिशनिस्ट सूचवू लागले आहेत की, भगरीचा आहारात समावेश करा. भगर ही ग्लुटेन फ्री आहे. ग्लायसेमिक इंडेक्स अत्यंत कमी आहे. फॅटस अजिबात नाहीत. भगरीत सर्वाधिक फायबर आहेत. शिवाय भगर मिलमध्ये कोणतीही रासायनिक प्रक्रिया होत नाही. हे नैसर्गिक आदिवासी उत्पादन आहे. आम्ही फक्त ती स्वच्छ करतो. नाशिक हे भगरीचे कोठार आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात जवळपास ४० भगर मिल आहेत. येथूनच देशभरात भगर पोहचते. सोनपरी हा ब्रँड तर आता मॉल्ससह छोट्या किराणा दुकानातही मिळतो. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे व भगर लोकप्रिय बनविण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत. रेडी टू इट ही भगरही यश फुडसने ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहे. तिलाही मोठी मागणी आहे. यश फुडसने भगरच्या वेगवेगळ्या पाककृतीही ग्राहकांसाठी आणल्या. त्यात डोसा, इडली, खीर, शिरा, पुरी, भजी, ढोकळा यांचा समावेश आहे. या सर्व लोकप्रिय झाल्या आहेत.

फुड किंवा अग्रो प्रोसेसिंग क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना छोरिया सांगतात की, ‘सरकार खुप प्रोत्साहन देत आहे. बऱ्याच सरकारी योजना आहेत. त्याचा लाभ घ्या. मेहनत करण्याची तयारी ठेवा. इमानदारीने काम करा. तुमच्या ब्रँडला लोकं ओळखतात, तुम्हाला नाही. त्यामुळे उद्योग किंवा व्यवसायात गुणवत्ता, प्रामाणकपणा, क्वालिटी, चिकाटी हवी. मेहनतीला शॉर्टकट नाही.’  छोरिया यांचा हा यशोप्रवास एखाद्या चित्रपटात दाखवावा असाच आहे. एवढी प्रसिद्धी आणि प्रथितयश उद्योजक असूनही छोरिया हे अतिशय नम्र आहेत. हसरा स्वभाव आणि माणसे जोडण्याची हातोटी त्यांच्यात आहे. त्यामुळेच आज जवळपास सर्वच क्षेत्रात त्यांचा मित्र परिवार आहे. पत्नी किर्ती, कन्या यशोदिता आणि निशी यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच मी हे सारे करु शकलो, असे ते अभिमानाने सांगतात. छोरिया यांना खऱ्या अर्थाने जीवन कळले ते इतरांनाही कळावे म्हणूनच हा लेखन प्रपंच.

--

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार

मो. 9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

माझे WhatsApp चॅनल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे 

https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

--

Anand Tarang, Diwali Ank, Mahendra Chhoriya, Success Story, Positive, Ironman, Industrialist, Nashik, 


टिप्पण्या

  1. अतिउत्तम लेख आहे.वाचकांना आमचे मित्र महेंद्र छोरिया यांच्याकडून नक्कीच प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद भावेश

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)

तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी (नवशक्ती)