सगळेच सोन्याच्या मागे का लागले आहेत? (नवशक्ती)

दिवाळी, त्यापाठोपाठ सुरू होणाऱ्या लग्नसराईमुळे भारतात सोन्याला झळाळी आली आहे. दर उच्चांकी पातळीवर असतानाही ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने धनत्रयोदशीच्या दिवशी १०० टन सोने मायदेशी आणले. भारतीय नागरीक, चीन, जगभरातील ५० हून अधिक देश या साऱ्यांनीच सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. याचे काय कारण आहे?

भावेश ब्राह्मणकर

दिवाळीच्या उत्सवाची सध्या सगळीकडे रौनक आहे. बाजारपेठेत चैतन्य आहे. महाराष्ट्रात सार्वत्रिक निवडणूक असल्याने त्याचाही परिणाम आहे. लाडकी बहिण असो की विविध सरकारी योजना, सर्वसामान्यांना विविध माध्यमातून सरकारी पैसे थेट बँक खात्यात मिळाले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत मोठेच आर्थिक चलनवलन सुरू आहे. महिलांना जे पैसे प्राप्त झाले त्यातून सोने खरेदीकडे कल असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, सोन्याचे दर हे दहा ग्रॅमला (तोळे) ८० हजारांच्या पुढे गेले आहेत. असे असले तरी सोन्याची झळाळी कमी झालेली नाही. सर्वसामान्य किंवा गुंतवणूकदार यांना सोन्याचे आकर्षण असणे स्वाभाविक आहे. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँक, बलाढ्य चीन आणि अनेक देश सोन्याच्या मागे लागले आहेत.

सोन्याकडे केवळ धातू म्हणून पाहणे योग्य ठरत नाही. सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहिले जाते. महिला वर्ग सोन्याच्या आभूषणांकडे आकृष्ट होतो. सोने हे समृद्धता आणि संपन्नतेचे लक्षण समजले जाते. सोन्याचे दागिने परिधान केल्याने सौंदर्यात लक्षणीय भर पडते. तर, अडचणीच्या वेळी हेच सोने अतिशय कामी येते. एक तर त्यावर कर्ज मिळते, गहाण ठेवता येते, विकूनही टाकता येते. कर्जावरील व्याजाचे दर इतर कर्ज दरांपेक्षा कमी असते. शिवाय सोने विक्री करण्याचा पर्यायही जलद आहे. याचा सारासार विचार करुनच भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित तर राहतेच पण घसघशीत परतावाही त्यातून मिळतो. सण, उत्सव असो की लग्न समारंभ, अपत्यप्राप्ती, साखरपुडा अशा कुठल्याही कारणावेळी सोन्याची खरेदी केली जाते. सध्या तर दिवाळीचा सण साजरा होत आहे. सोन्याच्या दरांनी उसळी घेतली आहे. ८१ हजारांच्या आसपास दर असले तरी त्याची मागणी घटलेली नाही. किंबहुना ती वाढतेच आहे. सर्वसामान्य, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत असा कुठलाही वर्ग सोन्यापासून लांब नाही. जो तो आपापल्या कुवती किंवा क्षमतेप्रमाणे सोन्याची खरेदी करतो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतातील बँकांची बँक म्हणून ओळखली जाते. देशातील बँकींग व्यवस्थेवर तिचे बारीक लक्ष असते. भारताची आर्थिक घडी योग्य राहण्यात रिझर्व्ह बँकेचा वाटा अतिशय मोलाचा राहिला आहे. वेळेप्रसंगी कारवाई करणे, अंकुश ठेवणे, मुभा देणे अशा विविध पातळ्यांवर बँक सक्रीय असते. याच रिझर्व्ह बँकेने धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तब्बल १०२ टन सोने लंडनहून भारतात आणले आहे. यापूर्वी मे महिन्यातही बँकेने अशाच प्रकारे सोने मायदेशी आणले होते. गेल्या दोन वर्षात बँकेने तब्बल २१४ टन सोने भारतात आणले आहे. अद्यापही रिझर्व्ह बँकेचे ३२४ टन सोने हे बँक ऑफ इंग्लंडमध्ये सुरक्षितरित्या पडून आहे. तर, भारतात ५१० टन सोने बँकेकडे आहे. म्हणजेच, तब्बल ८४० टन सोन्याची मालकी बँकेकडे आहे. ही बाब अतिशय महत्वपूर्ण आहे.  

रिझर्व्ह बँकेने गेल्या काही महिन्यात १४ ते १५ टन सोने खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. सद्यस्थितीत रशिया-युक्रेन आणि पश्चिम आशियातील (मध्य पूर्व) इस्त्राईल-लेबनॉन, इस्त्राईल-हमास, इस्त्राईल-इराण यांच्यातील युद्धामुळे भूराजकीय बदलांचा वेध घेता रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. आपली सुवर्ण संपत्ती आपल्या ताब्यात आणि देशात रहावी, याला बँकेचे प्राधान्य दिसते. पश्चिम आशियातील युद्धाचा भडका आणखी उडाला किंवा अरब राष्ट्रे या युद्धात उतरली तर परिस्थिती अतिशय गंभीर होण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत आर्थिक आघाडीवर भारत स्थिर राहणे आवश्यक आहे. त्यासाठीची आवश्यक उपाययोजना म्हणूनही सोन्याच्या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

तिकडे चीन सुद्धा सोन्याच्या मागे लागला आहे. चीनच्या पिपल्स बँक ऑफ चायना या सरकारी बँकेनेही सोन्याच्या खरेदीचा सपाटा लावला आहे. गेल्या दीड वर्षांच्या काळात तब्बल २०० टनांहून अधिक सोन्याची खरेदी चीनने केली आहे. त्यामुळेच सोन्याचे दर ग्रॅमला ८ हजारांच्या पुढे गेले आहे. सर्वसाधारणपणे भारतातून सोन्याची सर्वाधिक आयात होते. वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रथा, परंपरा, गुंतवणूक अशा विविध माध्यमातून सोन्याचे महत्त्व भारतीयांमध्ये अनन्यसाधारण आहे. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी सोन्याची आय़ात केली जाते. मात्र, जगातील आर्थिक, भूराजकीय आणि युद्धजन्य स्थिती लक्षात घेता चीनने आपला मोर्चा सोन्याकडे वळविला आहे. सोने हा असा धातू आहे ज्याच्या असण्याने आर्थिक आघाडीवर विश्वास आणि स्थिरता प्रदान होते. आगामी काळात युद्धाचा भडका आणखी उडाला तर देशोदेशीच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होणे अपेक्षित आहे. चीनसारखा देश तर जगभरात आपली उत्पादने विक्री करतो. अजस्त्र उत्पादन क्षमतेमुळे चीनने देशोदेशीची बाजारपेठ काबीज केली आहे. पश्चिम आशियातील स्थिती चिघळली तर चिनी मालाची मागणी घटू शकते. त्याचबरोबर अन्य उत्पादने आणि वस्तूंच्या पुरवठा साखळी बाधित होऊ शकते. याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन चीनने सोन्याची खरेदी करुन त्याचा साठा वाढविण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. चीनमध्ये सध्या सोन्याचा २२ हजार टनाहून अधिक साठा आहे. तरीही जेवढे सोने खरेदी करता येईल, तेवढे करावे, असे चीनला वाटते. यातून जागतिक बाजारपेठेत सोन्याला मागणी प्रचंड वाढली आहे.

भारत किंवा चीन हे दोन देशच सोन्याच्या मागे धावत नाहीत. तर, जवळपास ५० हून अधिक देशांनी सोन्याच्या खरेदीला पसंती दिली आहे. यातून जागतिक अर्थकारणात सोन्याचे मूल्य दिवसागणिक वाढत आहे. मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन बिघडल्याने त्याचा थेट परिणाम दरावर झाला आहे. नजिकच्या काळात सोन्याचे दर प्रति ग्रॅमला ८५ हजाराचा आकडा ओलांडण्याची चिन्हे आहेत. फोर्ब्जने सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सोन्याचा साठा करण्यात भारत आठव्या स्थानी आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. त्यांच्याकडे ८१३३ टन एवढे सोने आहे. त्यांच्यानंतर जर्मनी ३३५१ टन, इटली २४५१, फ्रान्स २४३६, रशिया २३३५, चीन २२६४, जपान ८४५, भारत ८४०, नेदरलँड ६१२ तर तुर्की ५८४ टन अशी सोने साठवणूक आहे.

एखाद्या देशाचे चलन आंतरराष्ट्रीय स्तरावर कमकुवत झाले तर सोन्याचा साठा त्या देशाची क्रयशक्ती आणि आर्थिक स्थिरता टिकवून ठेवण्यास मदत करतो. १९९१ मध्ये जेव्हा भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती आणि तेव्हा वस्तूंच्या आयातीसाठी भारताकडे पैसे नव्हते. त्यावेळी भारताने सोने गहाण ठेवून पैसे उभे केले आणि या आर्थिक संकटातून स्वतःला सुरक्षित बाहेर काढले. सोन्याचा भरपूर साठा असणे म्हणजे देशाची अर्थव्यवस्था मजबूत असणे. देश आपल्या पैशाचे व्यवस्थित व्यवस्थापन करतो हे देखील यावरून दिसून येते. अशा परिस्थितीत इतर देश आणि जागतिक वित्तीय संस्था त्या देशावर अधिक विश्वास ठेवतात. सोन्याचे साठे कोणत्याही देशाच्या चलन मूल्याला समर्थन देण्यासाठी एक ठोस मालमत्ता प्रदान करतात. ही बाब ओळखून भारत, चीनसह अनेक देश सुवर्ण खरेदीच्या मागे आहेत. विशेष म्हणजे, युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी जगभरातून प्रयत्न होणे गरजेचे असताना आर्थिक स्थैर्य व सुरक्षिततेसाठी सोने खरेदी करुन अनेक देश धन्यता मानत आहेत. जागतिकीकरणाचे हे वरदान समजायचे की शाप?

--

bhavbrahma@gmail.com
संरक्षण
, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
मो. 9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

International, Gold, India, China, Economics, Sale, Purchase, Storage, Metal, 


टिप्पण्या

  1. आपल्या देशाजवळचा 840 टन साठा गौरवास्पद आहे. आपल्या देशातील नागरिकांकडे असलेले सोने यात समाविष्ट केले तर आपली रँकिंग बरीच जाईल असे वाटते.उत्तम लेख

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)

तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी (नवशक्ती)