नाशिक-डहाणू रेल्वेमार्ग प्रत्यक्ष होणार?

नाशिक-डहाणू रेल्वेमार्ग प्रत्यक्ष होणार?

तब्बल १९३२ सालापासून नाशिक-डहाणू रेल्वेमार्गाची चर्चा आणि मागणी आहे. आता केंद्र सरकारने या मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला परवानगी दिली आहे. हा मार्ग एवढा महत्त्वाचा का आहे, त्यातून काय साध्य होणार आहे? तसेच, प्रत्यक्षात हा मार्ग होणार का?

भावेश ब्राह्मणकर

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वीच घोषणा केली की, नाशिक ते डहाणू या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे अंतिम स्थान सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गाविषयी पुन्हा एकदा चर्चा झडू लागली आहे. हा रेल्वेमार्ग एकूण शंभर किलोमीटर अंतराचा आहे. त्र्यंबकेश्वर आणि वाडगाव मार्गे ही रेल्वे धावणार आहे. डहाणूरोड हे सध्या पश्चिम रेल्वेवरील एक रेल्वेस्थानक आहे. त्याला नाशिकशी थेट जोडले जाणार आहे. या रेल्वे मार्गामुळे पालघर आणि नाशिक जिल्ह्याचा आदिवासी भाग विकासाच्या वाटेवर येणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील महत्त्वाची शहरे रेल्वेने जोडली जातील. खास करून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर आणि थंड हवेचे ठिकाण असलेले जव्हार येथे जाणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. भाविक, पर्यटक यांची संख्या वाढल्याने या भागातील अर्थकारणाला मोठी चालना मिळेल. सहाजिकच त्याचा थेट लाभ आदिवासी बांधवांना मिळणार आहे.



वैष्णव यांचा सुखद धक्का
गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या नाशिक-डहाणू रेल्वे मार्गाचे अंतिम सर्वेक्षण आता होणार आहे. यापूर्वी जे सर्वेक्षण झाले त्यात १६७.६७ किमी अंतरासाठी एकूण २६ रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार होते. रेल्वे बोर्डाला त्याचा अहवाल सादर झाला. मात्र, तो व्यवहार्य नसल्याने त्याचे पुढे काही झाले नाही. पुन्हा हा रेल्वेमार्गाचा विषय मागे पडला. आता रेल्वे मंत्री वैष्णव यांनी अचानकपणे या मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाची घोषणा करुन मोठा सुखद धक्का दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा आशा पल्लवित झाल्या आहेत.

आदिवासी बांधवांना लाभ
नाशिक-डहाणू रेल्वे मार्ग हा पालघर व नाशिक जिल्ह्याच्या डोंगरी
, नागरी आणि सागरी अशा तिन्ही भागांचा विकास होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशकांपेक्षा अधिक काळ लोटला असला तरी पूर्वीच्या ठाणे आणि आताच्या पालघर जिल्ह्यातील आदिवासींना आपल्या भागातून रेल्वेगाडीचे दर्शन झालेले नाही. जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, तलासरी हे भाग शंभर टक्के आदिवासी तसेच दुर्गम तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याचा भाग आदिवासी आणि धार्मिक म्हणून प्रसिद्ध आहे. जव्हार हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. तर नाशिक हे धार्मिक, कृषी आणि औद्योगिक कारणांसाठी ख्यात आहे.

१९९९ आणि २०१२ मध्ये सर्वेक्षण
या रेल्वेमार्गामुळे जव्हार हे निसर्ग सौंदर्याने नटलेले थंड हवेचे ठिकाण पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. त्यासाठी देखील हा रेल्वेमार्ग भाविकांना उपयोगी पडणार आहे. हा मार्ग बांधून पूर्ण झाल्यावर आदिवासी भागाचा कायापालट तर होईलच
, शिवाय रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन आदिवासींना काम मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. १९९९ नंतर २०१२ मध्ये नाशिक-डहाणू रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर या मार्गाचा विषय थंडबस्त्यात गेला.

यापूर्वीच्या सर्वेक्षणातील रेल्वेस्थानके
डहाणू, आशागड, गंजाड, कासा, खडकी, कासपाडा, जव्हार, मोखाडा, पिंपळपाडा, कंधाटी, त्र्यंबकेश्वर, खंबाळे, पिंपळद, शिंगवेबहुले, देवळाली आणि नाशिक ही २६ रेल्वेस्थानके या मार्गावर बांधण्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले होते.

जव्हारच्या राजांची मागणी
नाशिक-डहाणू रेल्वेमार्ग करण्यात यावा, अशी मागणी जव्हारचे तत्कालिन राजे मार्तंडराव मुकणे यांनी १९३२ मध्ये ब्रिटीशांकडे केली होती. त्यानंतर १९४२ मध्ये ‘चले जाव’ आंदोलन करण्यात आले. त्यावेळी देशातील सर्व रेल्वे मार्गांचे काम बंद करण्यात आले होते. त्यानंतर अनेकदा नाशिक-जव्हार-डहाणू रेल्वेमार्गाची मागणी करण्यात आली. जव्हार, मोखाड्याबरोबरच डहाणू तालुक्यातील डोंगराळ भागाच्या विकासासाठी रेल्वेचा आग्रह धरण्यात येत होता.

राम नाईकांच्या काळात सर्वेक्षण
केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या सरकारमध्ये राम नाईक रेल्वे राज्यमंत्री असल्याने नाशिक-डहाणू रेल्वेमार्गाच्या मागणीला जोर आला. अखेर १२ जून १९९९ रोजी मोठ्या थाटामाटात जव्हार येथील जुना राजवाडा येथे रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाने पाच लाख ६३ हजार रुपये मंजूर केले होते. डहाणू-नाशिक परिसरात औद्योगिक विकासाची दालने उघडण्यास हा मार्ग उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर शेतीमालावर आधारित उद्योग
, वाणिज्य आणि व्यापाराच्या विकासासाठी तो फायदेशीर ठरेल. वसई-दिवा आणि उधना-जळगाव रेल्वेमार्गाला हा मार्ग पर्यायी ठरणार असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले. मात्र, आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य मार्ग असल्याचे स्पष्ट करीत रेल्वे मंत्रालयाने हा प्रकल्प गुंडाळला.

ममता बॅनर्जींची घोषणा
ममता बॅनर्जी रेल्वे अर्थमंत्री असताना २०००मध्ये पुन्हा डहाणू-नाशिक रेल्वेमार्गाची मागणी करण्यात आली. पण
, बॅनर्जी यांनी अर्थसंकल्पात त्याची कुठलीही दखल घेतली नाही. अखेर ममता बॅनर्जी यांनीच २०१०-११च्या अर्थसंकल्पात नाशिक-डहाणू रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाची घोषणा केली. त्यानंतर २०१२ मध्ये हे सर्वेक्षण पार पडले.

यामुळे अधिक चिंता
नाशिक-डहाणू रेल्वे मार्ग साकार व्हावा अशी मागणी आणि तो झाल्यानंतर आदिवासींच्या जीवनात अमुलाग्र कायापालट होण्याची भाषा वापरली जात आहे. मात्र, या मार्गात सर्वात महत्त्वाची बाब ठरणार आहे ती झाडांची. कारण, त्र्यंबकेश्वर तालुका आणि पालघर जिल्ह्यातील ज्या भागातून हा मार्ग जाणार आहे तेथे जुनी, प्राचिन आणि मोठी झाडी आहेत. काही भागात तर जंगलच आहे. विशेष म्हणजे, त्र्यंबकेश्वर आणि पालघर हे पश्चिम घाटामध्ये येते. जगातील सर्वात मोठ्या हॉटस्पॉटपैकी तो एक आहे. गुजरातच्या डांग जिल्ह्यापासून थेट केरळ राज्यापर्यंत पसरलेल्या या पश्चिम घाटात अत्यंत मौलिक जैवविविधता आहे. केरळच्या वायनाडमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर पश्चिम घाटातील विकासकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बेसुमार आणि अनियंत्रित विकासकामांमुळेच पश्चिम घाटामध्ये भूस्खलनासह अनेक गंभीर दुर्घटना घडत आहेत. पश्चिम घाट हा संवेदनशील क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे. ते केले तर विकासकामांवर अनेक निर्बंध येतील म्हणून सरकारकडून हा निर्णय टाळला जात आहे. वायनाड दुर्घटनेनंतर संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ते घोषित केले तर नाशिक-डहाणू मार्ग अडचणीत येऊ शकतो. या रेल्वेमार्गाच्या क्षेत्रातील केवळ झाडेच नाही तर पक्षी, प्राणी आणि एकूणच जैविक विविधेच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येऊ शकतो. पर्यावरण कायद्यानुसार, या रेल्वे मार्गासाठी पर्यावरण प्रभाव अहवाल (एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट) तयार करणे बंधनकारक आहे. हा अहवाल काय असेल त्यावरही या मार्गाचे भवितव्य अवलंबून असेल. कारण, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागली तर हा प्रश्न थेट सर्वोच्च न्यायालय किंवा हरित लवादामध्ये जाऊ शकतो. परिणामी, सर्वेक्षणाने आशा पल्लवित झाली असली तरी प्रत्यक्षात हा मार्ग साकार होण्यासाठी नक्की किती कालावधी लागेल आणि अडथळ्यांची शर्यत विनासायास पार पडेल, याबाबत संदिग्धता आहे. तोपर्यंत या मार्गाच्या विविध चर्चा आणि माहितीचे चर्वितचर्वण होणार, एवढे मात्र खरे.  

bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक व मुक्त पत्रकार

Railway, ghat, Development, Indian, rout, Environment, western, Nashik, Dahanu, Trible

फोटो सौजन्य : सुदर्शन कुलथे 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)

तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी (नवशक्ती)