महानिवडणुकीत नाट्यमय घडामोडींची मालिका अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीने अतिशय नाट्यमय वळण घेतले आहे. ट्रम्प यांच्यावरील जीवघेणा हल्ला, बायडेन यांनी घेतलेली माघार, ट्रम्प यांनी घेतलेली आघाडी आणि कमला हॅरिस यांची निश्चित होणारी दावेदारी या साऱ्याकडेच संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कारण, महासत्तेचे नेतृत्व कुणाकडे असेल यावर पुढील ५ वर्षेच नाही तर त्यापुढील मोठा काळही अवलंबून असणार आहे. भावेश ब्राह्मणकर कुठल्याही राष्ट्राची सार्वत्रिक निवडणूक ही तेथील जनता, प्रशासन, राजकीय पक्ष आणि नेते यांच्यासाठी महत्त्वाची असते. किंबहुना ती त्यांच्यासाठीच असते. मात्र, अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशातील निवडणूक ही त्या देशापुरती निश्चितच नाही. कारण, जागतिकीकरण, आधुनिकीकरण आणि उदारीकरणामुळे संपूर्ण जगच छोट्या खेड्यासारखे झाले आहे. तसेच, अमेरिकेसारख्या देशाशी अविकसित, विकसनशील किंवा विकसित अशा कुठल्याही गटातील देश जोडले गेलेले आहेत. मग, ते आर्थिक संबंध असो की लष्करी, सामाजिक किंवा अन्य स्वरुपाचे. म्हणूनच जगभरामध्ये सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची जबरदस्त चर्चा आहे. ...