चीनमुळेच आसामची दैना (अक्षरनामा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
चीनमुळेच आसामची दैना
हेडिंग वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. पण हे खरे आहे. ईशान्य भारतातील आसाम राज्यात सध्या महापुराने हाहाकार माजला आहे. लाखो नागरिक बाधित झाले असून जवळपास ३ लाख नागरिक निवासी छावण्यांमध्ये दाखल झाले आहेत. चीनच्या बेदरकार आणि कुटिल कारस्थानामुळेच ही दैना उडाली आहे.
भावेश ब्राह्मणकर
ईशान्य भारतातील अतिशय देखणे राज्य म्हणून आसामची ओळख आहे. त्याशिवाय जगभराला ज्या एकशिंगी गेंड्यांची मोहिनी आहे ते सारे आसाममध्येच नांदत असतात. मात्र, याच आसामला गेल्या काही महिन्यांपासून कुणाची तरी नजर लागली आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे आसामची पार वाताहत झाली आहे. अस्मानी अशा या आपत्तीमुळे हे राज्य पार कोलमडून जाण्याची चिन्हे आहेत. आसाममध्ये एकूण ३३ जिल्हे आहेत. यातील तब्बल २५ जिल्हे सध्या महापुराच्या तडाख्यात सापडले आहेत. लखीमपुरा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १ लाख ६५ हजाराहून नागरिक महापुराने बाधित झाले आहेत. बाधित नागरिकांसाठी निवासी छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आजच्याघडीला आसाममध्ये जवळपास ३ लाख नागरिक निवासी छावण्यांमध्ये वास्तव्याला आहेत. यावरुनच तेथील महापूर आणि त्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर आपत्तीची कल्पना येऊ शकेल. विशेष म्हणजे यासंदर्भात फारशी वाच्यता होताना दिसत नाही. आसामची ही दैना होण्यास मुख्य कारण आहे ते ब्रह्मपुत्रा नदीचे. महाकाय असलेली ही नदी कोपली आणि तिने परिसरातील गावे, शहरे, वाड्या सारेच कवेत घेतले. जवळपास दरवर्षी ब्रह्मपुत्रेला महापूर येतो. त्यामुळे आसाममधील नागरिक बाधित होतात. पण, यामुळे आता आणखी एक संकट निर्माण झाले आहे ते म्हणजे शेतीचे. महापुरामुळे शेकडो एकर शेती नापिक बनत चालली आहे. पुराचे पाणी आणि गाळ या शेतांमध्ये येतो. तसेच, पुरात वाहून आलेल्या असंख्य वस्तू आणि घटक हे शेतांमध्ये येत आहेत. परिणामी, आसाममधील शेतकरी आणखी खोलात जात आहेत. या सर्व परिस्थितीला चीन कारणीभूत आहे. आणि तीच तीव्र चिंतेची बाब आहे.
ब्रह्मपुत्रा नदीचा उगम तिबेटच्या पठारांमध्ये होतो. चीनने आक्रमण करुन तिबेट गिळंकृत केला आहे. ब्रह्मपुत्रा नदी ही चीनमधून अरुणाचल प्रदेशात येते. त्यानंतर ती आसाममध्ये वाहते. पुढे ती बांगलादेशात प्रवेश करुन बंगालच्या उपसागराला मिळते. ब्रह्मपुत्रेच्या माध्यमातून चीन कशी खेळी खेळतो आहे हे आपण आधी समजून घेऊया. चीन आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये यापुढील काळात मोठे वाद उदभवणार आहेत. कारण, चीनचे आडाखे आणि त्यांनी पाण्याच्या मालकीसाठी आक्रमकपणे सुरू केलेली कामे. आज जगात सर्वाधिक धरणे ही चीनमध्ये आहेत. तेथे तब्बल ९० हजारापेक्षा अधिक धरणे असली तरी चीनने आणखी काही धरणे बांधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याचे काम हे त्यापैकीच एक. जगभरात जेवढे गोडेपाणी उपलब्ध आहे त्यापैकी एक तृतीयांश पाण्यावर चीनने मालकी मिळविली आहे. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. चीनच्या या साऱ्या कारभाराला १९५९ मधील घटना कारणीभूत आहे. तिबेटवर हक्क मिळवून चीनने अनेक संदेश जगभरात दिले. विशेष म्हणजे, जगातील सर्वाधिक जलसमृद्ध अशा तिबेटियन परिसरावर चीनने ताबा मिळवला. आशिया खंडातील हा सर्वाधिक समृद्ध जलस्त्रोत आहे. कारण तिबेटमधील हिमनद्या आणि जलस्त्रोतावर शेजारील देशांची तब्बल १.३ अब्ज लोकसंख्या अवलंबून आहे. खास म्हणजे, जगातील ही एक पंचमांश लोकसंख्या आहे. एवढ्या लोकसंख्येसाठीच्या पाण्यावर हक्क मिळणे तसे दुर्मिळच. आणि तेच चीनने साध्य केले आहे.
पाणी राहिले तरच आपण जगावर वर्चस्व गाजवू शकतो या होऱ्याने चीनचा माओवाद आक्रमक बनतो आहे. असे असले तरी, नद्यांचे प्रदूषण ही एक मोठी समस्या चीनला भेडसावते आहे. विनाप्रक्रिया नदीत मिसळणारे सांडपाणी, हवामान बदल, दुष्काळामुळे कोरड्या पडणाऱ्या नद्या, घटते भूजल या संकटाला चीन सध्या तोंड देत आहे. यावर पर्याय म्हणून जलस्त्रोत असलेल्या भागातून दुष्काळी भागात जलदगतीने पाणी नेण्याचा आश्वासक पवित्रा चीनने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मेकॉन आणि सॉल्विन या नद्यांवर नऊ मोठी धरणे बांधली आहेत. आता ३० हून अधिक धरण बांधण्याचा आराखडा चीनने अंतिम केला आहे. या साऱ्याचा मोठा परिणाम दक्षिण पूर्व आशियाई देशांवर होणार आहे. उत्तरेकडील प्रदेशाचा दुष्काळ संपविण्यासाठी दक्षिणेकडील पाणी नेण्याचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या चीनमध्ये आकाराला येत आहे. तिबेटियन जलस्त्रोतांचे पाणी उत्तरेकडील बिजींगपर्यंत पाईपलाईनने नेण्याचे काम प्रगतीपथावर आहे. जगात असे महाकाय काम आजवर कुठेच झालेले नाही. प्रचंड महत्त्वाकांक्षा हा त्यामागचा कणा आहे.
ब्रह्मपुत्रेवर बांधले जाणारे धरण हे भारत, बांगलादेश आदी देशांसमोर संकट निर्माण करणारे आहे. चीनशी थेट पंगा घेणे आजच्याघडीला कुठल्याही देशाला शक्य नाही. तसे भक्कम स्थान चीनने निर्माण केले आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, आज चीन जे काही आडाखे बांधतो आहे किंवा महत्वाकांक्षेपोटी जे करतो आहे त्यातून जलयुद्धच निर्माण होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण विषयक कार्यक्रमात अनेक वर्षे काम पाहिलेल्या व्यक्ती चीनच्या या आक्रमक धोरणावर टीका करीत आहेत. तिबेटवर हक्क मिळवून चीनने आशियाचा जल नकाशा (वॉटर मॅप) बदलला आहे. आता या पुढील काळात पाण्यावर सर्वाधिक मालकी मिळवून किंवा सर्वाधिक पाणी आपल्या ताब्यात घेऊन चीन जगाला वेगळा संदेश देऊ पहात आहे. वाढत्या महत्त्वाकांक्षांपुढे मानवताही फिकी पडत आहे. तसा शुष्की अन कृत्रिम मानवी स्वभाव तयार झाला आहे. यातून पाण्याचे उग्र होणारे रुप युद्धाला चालना देणारेच आहे.
घटती जमीन, वाढते नागरी युद्ध, भूजलाचा वारेमाप उपसा अशी संकटांची मालिका जगात सुरू आहे. बिजींग प्रांतात भूजलाचा उपसा एवढा प्रचंड आहे की, वर्षाला चार इंच पाणी पातळी कमी होत आहे. त्याचा कुठलाही सारासार विचार होताना दिसत नाही. जगातील सर्वाधिक जलदुर्भिक्ष्य जाणवणारे शहर म्हणून आज चीनची राजधानी बिजींगची ओळख तयार झाली आहे. यापुढील काळात हा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. एक लाख वीस हजार किलोमीटर वर्ग एवढ्या क्षेत्रावरील भूस्तर (नॉर्थ चायना प्लेन अॅक्विफर) बाधित झाल्याच्या नोंदी आहेत. पाण्याचे हे महत्त्व ओळखून चीन आक्रमक झाला असून ब्रह्मपुत्रा नदीवर त्याने अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
ब्रह्मपुत्रा ही आशिया खंडातील प्रमुख नदी आहे. हिमालय पर्वतरांगेतील तिबेटच्या बुरांग जिल्ह्यामध्ये त्सांगपो किंवा यारलुंग झांबो (यार्लुंग त्सांग्पो) ह्या नावाने ती उगम पावते. तेथून पूर्वेकडे वाहत येऊन ब्रह्मपुत्रा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये प्रवेश करते. अरुणाचल व आसाममधून नैर्ऋत्य दिशेने वाहत जाऊन ती बांगलादेशामध्ये शिरते. बांगलादेशमध्ये तिला जमुना या नावाने ओळखले जाते. बांगलादेशात ब्रह्मपुत्रेला प्रथम पद्मा ही गंगेपासून फुटलेली नदी व नंतर मेघना ह्या दोन प्रमुख नद्या मिळतात. गंगेच्या त्रिभुज प्रदेशामध्ये येऊन ब्रह्मपुत्रा बंगालच्या उपसागराला मिळते. आसाम राज्यामधील बहुतेक सर्व मोठी शहरे ब्रह्मपुत्रेच्या काठावरच वसली आहेत.
ब्रह्मपुत्रा खोऱ्याची सरासरी रुंदी सुमारे ८० किमी आहे. खोऱ्यातील मुख्य नदी, ब्रह्मपुत्रा ही जगातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे आणि तिच्या सरासरी पाणी विसर्गाच्या संदर्भात पाचव्या क्रमांकावर आहे. ही नदी हिमालयाच्या कैलास पर्वतरांगांमधून ५३०० मीटर उंचीवर उगम पावते. तिबेटमधील ब्रह्मपुत्रेचे पाणलोट क्षेत्र २,९३,००० चौकिमी एवढे आहे. तर, भारत आणि भूतानमध्ये २,४०,००० चौकिमी आणि बांगलादेशात ४७,००० चौकिमी एवढे आहे. ब्रह्मपुत्रेची सरासरी रुंदी ५.४६ किमी आहे. भारतात प्रवेश करेपर्यंत नदीचा उतार खूपच उंच आहे. चीन (तिबेट) मध्ये सुमारे १७०० किमी लांबीमध्ये सुमारे ४८०० मीटरचा एक थेंब गाठला जातो. आसाम खोऱ्यात सुमारे २.८२ मीटर/कि.मी.चा हा सरासरी उतार ०.१ मी/किमी इतका कमी होतो. नदीचा उतार अचानक सपाट झाल्यामुळे आसाम खोऱ्यात ही नदी वेणीसारखी आहे. आसाम खोऱ्यात कोबो ते धुबरी या नदीच्या प्रवासादरम्यान तिच्या उत्तर किनाऱ्यावर सुमारे २० महत्त्वाच्या उपनद्या आणि दक्षिण किनाऱ्यावरील १३ नद्या जोडल्या जातात. उच्च गाळाचा भार आणणाऱ्या या उपनद्यांना जोडल्याने ब्रह्मपुत्रेचे पात्र फार मोठे झाले आहे. ब्रह्मपुत्रेचे निचरा क्षेत्र भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या जवळपास ५.९ टक्के आहे. उत्तरेला हिमालयाने, पूर्वेला आसाम-ब्रह्मदेश सीमेवर वाहणाऱ्या टेकड्यांच्या पाटकरी रांगेने, दक्षिणेला आसामच्या टेकड्या आणि पश्चिमेला हिमालय आणि कड्यांनी वेढलेले आहे. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया.
एक तर चीन ब्रह्मपुत्रेवर महाकाय धरण बांधून तेथे अब्जावधी लीटर पाणी अडविण्याचे कारस्थान करीत आहे. त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यावर मोठा परिणाम होणार आहे. हे धरण पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मपुत्रा ही भारतात आणि बांगलादेशात चक्क तिमाही किंवा चारमाही वाहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत आसाममध्ये आलेला महापुर हा चीनमुळे कसा हे आता समजून घेऊया. सर्वसाधारणपणे हिमालय पर्वतरांग आणि तिबेटच्या पठारात अतिवृष्टीचे प्रमाण अधिक असते. परिसरात जे काही पावसाचे पाणी असते ते सहाजिकच प्रमुख नदी असलेल्या ब्रह्मपुत्रेमध्ये मिसळते. शिवाय या नदीला मोठा उतार आहे. त्यामुळे हे पाणी अवखळ होऊन बसते. तिबेटमधून वाहताना ब्रह्मपुत्रेतून केव्हा आणि किती पाण्याचा विसर्ग होतो आहे याची कुठलीही माहिती भारताला प्राप्त होत नाही. भारत आणि चीन यांच्यातील संबंध सध्या ताणले गेलेले आहेत. त्यामुळे चीनकडून कुठल्याही प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण होत नाही. ती झाली तर नदीच्या खालच्या भागात असलेल्या अरुणाचल आणि आसाम राज्यात योग्य ती उपाययोजना केली जाऊ शकते किंवा करता येईल. मात्र, चीनकडून तिबेटमधील अतिवृष्टी, ब्रह्मपुत्रेचा प्रवाह, विसर्ग यासंबंधीची कुठलीही माहिती दिली जात नाही. परिणामी, अचानक नदी महापुराचे रुप घेते. त्यामुळे अरुणाचल आणि आसाम या राज्यांमध्ये प्रचंड दैना उडते. दरवर्षी असंख्य निष्पाप बळी यात जातात.
आसाममधील शेतकरी, व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिक हे मोठ्या संख्येने बाधित होतात. हे चक्र आजवर सुटलेले नाही. भारताला कोंडित पकडण्यासाठी चीनकडून विविध प्रकारची कारस्थाने रचली जातात. मात्र, ब्रह्मपुत्रेच्या रुपाने चीनला आयतेच कोलीत मिळाले आहे. त्यामुळे त्याचा तो पुरेपुर वापर करतो. ब्रह्मपुत्रेच्या पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या निवारणार्थ दरवर्षी आसाम सरकार आणि केंद्र सरकारची यांची मोठी शक्ती खर्च होते आहे. मोठा निधीही त्यासाठी द्यावा लागतो. नागरिकांचे विस्थापन, त्यांचे रोजगार हिरावून घेणे, नवनवीन व्यवसाय किंवा रोजगार शोधण्यासाठी त्यांना धडपड करावी लागणे हे सारे अव्याहतपणे होत आहे. या परिस्थितीत बदल होत नसला तरी या आपत्तीचे गांभिर्य दिवसागणिक वाढते आहे. आणि तीच चिंतेची बाब आहे. त्यामुळे हा साराच प्रश्न भारताने अतिशय गांभिर्याने घेणे अगत्याचे आहे.
भारताने उपग्रह, अत्याधुनिक यंत्रणा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन अरुणाचल व आसाममधील ब्रह्मपुत्रेच्या महापुराच्या आपत्तीवर तोडगा काढायला हवा. तसे झाले नाही तर अरुणाचल आणि आसाममधील प्रदेश ओसाड होण्याची भीती दाट आहे. तसेच, भारताचे अधिकाधिक नुकसान करण्याचे चीनचे इप्सितही साध्य होणार आहे. गुवाहाटीतील आयआयटी असो की हिमालयातील जीबी पंत इन्स्टिट्यूट यांच्यातील तज्ज्ञ, संशोधक तसेच इस्त्रोचे शास्त्रज्ञ आणि जाणकारांची समिती स्थापन करुन भारताने ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रश्नावर सखोल असा आराखडा तयार करायला हवा. अर्थात चीनचे महाकाय धरण पूर्ण झाले तर महापुराचा धोका कमी होऊन जलटंचाईचा प्रश्न निर्माण होईल. आणि हे धरण पूर्ण झाले नाही तर तिबेटमधून अचानकपणे होणाऱ्या लाखो क्युसेक्स पाण्याच्या विसर्गाच्या समस्येला तोंड द्यावे लागेल. चीनने भारताला अशा कैचित पकडले आहे. केवळ समोरासमोर युद्ध न करता अशा प्रकारची खेळी करुन चीन आपले डावपेच यशस्वी करतो आहे. या सर्वाला भारताकडून तडाखेबाज उत्तर देणे आवश्यक आहे. अभ्यास आणि संशोधनाच्या माध्यमातून ते शक्य आहे. याचा विचार भारतीय धुरीणांनी नक्कीच करायला हवा.
--
bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक व मुक्त पत्रकार
मो. ९४२३४७९३४८
India Assam Brahmaputra Flood China Dam Natural Disaster Relief Rehabilitation Calamity Water Discharge Relations diplomacy Arunachal Pradesh North East States River
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा