कारगील युद्धात मरणाच्या दारातून परतले... पाय गमावला... नंतर केला हा विश्वविक्रम...

कारगील युद्धात मरणाच्या दारातून परतले... पाय गमावला... नंतर केला हा विश्वविक्रम...

कारगील युद्धात तोफगोळा पडला... ते बेशुद्ध झाले... त्यांना मृत घोषित केले... मात्र, ते जिवंत होते... एक पाय गमवावा लागला... सारं काही संपलं नव्हतं... इंडियन ब्लेड रनर ते स्कायडायव्हिंगचा विक्रम करुन त्यांनी इतिहास रचला आहे... त्यांचे नाव आहे मेजर डी पी सिंह...

भावेश ब्राह्मणकर

कारगीलच्या युद्धात एक पाय गमवावा लागल्यानंतरही तब्बल ९ हजार फूट उंचीवरुन स्कायडायव्हिंग करण्याचा पराक्रम मेजर डी पी सिंह यांनी केला आहे. भारतात अशा प्रकारे युद्धातील जखमी सैनिकाने स्कायडायव्हिंग केल्याची ही पहिलीच घटना नोंदवली गेली. विशेष म्हणजे हा विक्रम नाशिकमध्ये करण्यात आला. या विक्रमानंतर मेजर सिंह यांची मी भेट घेतली. त्यांचे अभिनंदन केले आणि महाराष्ट्र टाइम्ससाठी विशेष मुलाखतही घेतली.



मोठ्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावरच मेजर डी पी सिंह यांना हा पराक्रम शक्य झाला. हा पराक्रम देशासाठी शहिद झालेल्या जवानांना आणि त्यांच्या पश्चात अनेक बाबींना तोंड देणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना अर्पण करीत असल्याची भावना सिंग त्यांनी व्यक्त केली.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेले कारगील युद्ध हे अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरले आहे. या रणसंग्रामात एक पाय गमावलेले मेजर डी पी सिंह यांनी अजूनही तोच जोश कायम असल्याचे दाखवून दिले आहे. कारगिल युद्धात पाकिस्तानविरुद्ध लढताना सिंह यांनी पाय गमावला. त्यानंतर त्यांना लोखंडी पाय बसवावा लागला आहे. काही तरी वेगळे करावे आणि आपल्या सैन्याचे नाव उंचवावे या उद्देशाने सिंह यांनी स्काय डायव्हिंगचे खडतर उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवले. चार वर्षांच्या अथक मेहनतीनंतर त्यांना यश आले. सिंह यांनी २८ मार्च २०१९ रोजी नाशकातून स्काय डायव्हिंग करत नवा पराक्रम नोंदवला. युद्धातील जखमी सैनिकाची ही भारतात पहिलीच स्काय डायव्हिंग ठरली. सिंह यांनी नाशिकमधील कम्बॅट एव्हिएशन ट्रेनिंग (कॅट) येथे प्रशिक्षण घेतले. ध्रुव हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्यांनी समुद्रसपाटीपासून ९ हजार फुट ऊंचावरून उडी मारली. ही घटना ऐतिहासिक ठरली. 

मेजर डी. पी. सिंह यांना भारतीय लष्कराच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्काय डायव्हिंगचे प्रशिक्षण दिले. युद्ध किंवा लष्करी कामात जखमी झालेल्या किंवा अपंगत्व आलेल्या जवानांना प्रेरणा देण्यासाठी सिंह यांनी हा उपक्रम राबवला आहे. सिंह यांनी नाशिकमध्ये १८ मार्च पासून आर्मीच्या साहसी प्रशिक्षणाला प्रारंभ केला. त्यानंतर प्रत्यक्ष स्काय डायव्हिंग करत त्यांनी इतिहास रचला. या मोहिमेबाबत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांनी प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले. तसेच, सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे मी हा पराक्रम करू शकलो, असे सिंह यांनी सांगितले. त्यामुळेच लष्करासह वायू दलाचेही सहकार्य त्यांना मिळाले आणि स्काय डायव्हिंगची परवानगी मिळाली.

कर्तव्यावर असताना अपंग झालेल्या जवानांप्रति विशेष वार्षिक कार्यक्रम लष्कराकडून राबविला जात आहे. ही मोहिम त्याचाच एक भाग असल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, या पराक्रमामुळे इतरही दिव्यांग जवानांना प्रेरणा मिळेल, नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा मंत्रालयाने व्यक्त केली आहे.


मेजर डी पी सिंह यांची ओळख ‘इंडियन ब्लेड रनर’ अशीही आहे. १९९९ च्या कारगिल युद्धात तोफगोळा लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. प्राथमिक माहितीच्या आधारे त्यांना मृत घोषितही करण्यात आले होते. पण, सुदैवाने ते जिवीत असल्याचे दिसून आले. गंभीर जखमेमुळे त्यांना गँगरिन झाला. त्यामुळे त्यांचा एक पाय गुडघ्यापासून कापावा लागला. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी असा प्रसंग आला तरी त्यास त्यांनी धैर्याने तोंड दिले. हिंमत न हारता त्यांनी आपली वाटचाल कायम ठेवली आहे. त्यांनी १८ पेक्षा जास्त मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्या पूर्णही केल्या आहेत.

स्कायडायव्हिंगच्या पराक्रमाबद्दल सिंह म्हणतात की, काही तरी वेगळे करण्याची माझी इच्छा होती. चार वर्षांच्या प्रयत्नानंतर अखेर मी स्कायडायव्हिंग करु शकलो. लष्कराचे अधिकारी, माझे प्रशिक्षक यांनी मला मोठे मार्गदर्शन आणि सहकार्य केले. शहीदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मी हा पराक्रम समर्पित करीत आहे. ठरविले तर आपण निश्चितच करु शकतो हे सिद्ध झाले आहे.

bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
मो. 9423479348

Kargil War Major D P Singh Indian Blade Runner Record Nashik CAT Army 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)