अमेरिकन निवडणुकीत नाट्यमय घडामोडींची मालिका (नवशक्ति)

महानिवडणुकीत नाट्यमय घडामोडींची मालिका

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीने अतिशय नाट्यमय वळण घेतले आहे. ट्रम्प यांच्यावरील जीवघेणा हल्ला, बायडेन यांनी घेतलेली माघार, ट्रम्प यांनी घेतलेली आघाडी आणि कमला हॅरिस यांची निश्चित होणारी दावेदारी या साऱ्याकडेच संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कारण, महासत्तेचे नेतृत्व कुणाकडे असेल यावर पुढील ५ वर्षेच नाही तर त्यापुढील मोठा काळही अवलंबून असणार आहे. 

भावेश ब्राह्मणकर

कुठल्याही राष्ट्राची सार्वत्रिक निवडणूक ही तेथील जनता, प्रशासन, राजकीय पक्ष आणि नेते यांच्यासाठी महत्त्वाची असते. किंबहुना ती त्यांच्यासाठीच असते. मात्र, अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशातील निवडणूक ही त्या देशापुरती निश्चितच नाही. कारण, जागतिकीकरण, आधुनिकीकरण आणि उदारीकरणामुळे संपूर्ण जगच छोट्या खेड्यासारखे झाले आहे. तसेच, अमेरिकेसारख्या देशाशी अविकसित, विकसनशील किंवा विकसित अशा कुठल्याही गटातील देश जोडले गेलेले आहेत. मग, ते आर्थिक संबंध असो की लष्करी, सामाजिक किंवा अन्य स्वरुपाचे. म्हणूनच जगभरामध्ये सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची जबरदस्त चर्चा आहे. जगभरातील विविध देश, नेते यांचेच नाही तर खासगी कंपन्या, त्यांचे प्रमुख यांचेही अत्यंत बारकाईने लक्ष आहे.



अमेरिकेत सध्या डेमोक्रेटिक पक्ष सत्तेत आहे. विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन हेच पक्षाचे पुन्हा उमेदवार ठरले खरे पण त्यांच्या शरीर प्रकृतीने त्यांची काही साथ दिली नाही. वयाची ८१ ओलांडलेले बायडेन हे शरीर आणि मनानेही थकलेले आहेत. त्याचा परिचय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान येतो आहे. असंबद्ध बोलणे, हात थरथरणे, बोलण्यातील विसंगती आदींची प्रचंड चर्चा झाली. विरोधी पक्षाचे म्हणजेच रिपब्लिकन पक्षाचे नेते व राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी हीच संधी साधली. (तसे पाहता ट्रम्प यांचेही वय सध्या ७८ वर्षे एवढे आहे). टीव्ही माध्यमाच्या थेट मुलाखतीत बायडेन आणि ट्रम्प यांची जुगलबंदी पहायला मिळाली. पण, त्यात ट्रम्प हे बायडेन यांच्यापेक्षा वरचढ ढरले. भलेही ट्रम्प बिनदिक्कत खोटे बोलत असले तरी ते रेटून आणि ठामपणे होते. सहाजिकच सर्वांचेच लक्ष बायडेन यांच्याकडे गेले. पक्षांतर्गत येणारा दबाव आणि सूचना लक्षात घेता अखेर बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. तशी घोषणा करताना त्यांनी विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस (वय ५९) यांना अध्यक्षपदासाठी पसंती दर्शविली आहे. या नाट्यमयरित्या झालेल्या घडामोडी जगभर चर्चेच्या ठरल्या.

गेल्या काही आठवड्यातील घडामोडी या ट्रम्प यांच्यासाठी अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक ठरल्या आहेत. पहिली बाब म्हणजे, बायडेन यांच्या विरोधात जनमत तयार करण्याला यश. ट्रम्प हे अक्रास्ताळे आहेत. बेधडकपणे ते काहीही बोलून जातात. त्यांचा आविर्भाव हा आक्रमक असतो. त्यामुळे त्यात तथ्य नसले आणि ते खोटे असले तरी त्याचा प्रभाव जनतेवर पडतो. याउलट बायडेन यांचे झाले. अध्यक्ष या नात्याने ते गेल्या ५ वर्षातील कामे किंवा रोडमॅप जनतेला व्यवस्थित सांगू शकले नाहीत. त्यांची छाप पडलीच नाही. परिणामी, बायडेन यांनी माघार घ्यावी यासाठी वातावरण तयार करण्यात आले. अमेरिकन माध्यमेही बायडेन यांच्यावर तुटून पडली. ट्रम्प यांच्या खोटारडेपणा ऐवजी बायडेन हेच लक्ष्य बनले. त्यातच बायडेन हे आजारी पडले. त्यांना कोरोनाही झाला. या सर्व परिस्थितीचा सारासार विचार करता बायडेन यांनी थांबणे पसंत केले. एकप्रकारे हा ट्रम्प यांचा अर्धा विजय मानला जातो. कारण, ट्रम्प यांनीही बायडेन यांना लक्ष्य करीत त्यांच्या तब्ब्येतीवर टीका केली. असा थकलेला अध्यक्ष देशाला कसा पुढे घेऊन जाणार अशी गरळ ओकली. त्याचबरोबर प्रचारादरम्यान, ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्या दिशेने झाडलेली बंदुकीची गोळी त्यांच्या कानाला लागून गेली. त्यात ते जखमी झाले. कान आणि गालातून रक्त येत असलेल्या अवस्थेतील ट्रम्प यांचे व्हिडिओ व फोटो प्रचंड व्हायरल झाले. या हल्ल्यानंतर कानाला पट्टी लावून त्यांनी काही प्रचारसभा घेतल्या. सहाजिकच त्याचा मोठा प्रभाव पडताना दिसून येत आहे. यातून सहानुभुतीचे वातावरण तयार होईल आणि ट्रम्प यांचा विजय सुकर होईल, हे लक्षात घेऊनही बायडेन यांनी माघार घेणे पसंत केले आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो ट्रम्प यांच्या विरोधात कोण याचा.

डेमोक्रेटिक पक्षाचे अधिवेशन हे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस होणार आहे. त्यात अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल. सध्या तरी कमला हॅरिस यांचे पारडे जड आहे. बायडेन यांच्या घोषणेनंतर आतापर्यंत हॅरिस यांनी कोट्यवधी रुपयांचा पक्ष निधी जमविण्यात आघाडी घेतली आहे. ही सुद्धा जमेची बाब आहे. पक्षातून त्यांना किती आणि कशी पसंती मिळते यावरच सारे काही ठरणार आहे. मात्र, ट्रम्प यांना याचाही फायदा होतो आहे. कारण, पुढील एक महिना तरी त्यांच्यासमोर उमेदवार नाही. त्यामुळे याचा लाभ उठविण्यासाठी ते महिनाभर जोरदार प्रचार करतील. जनतेला प्रभावित करण्यासाठी नानाविध क्लृप्त्या वापरतील. ही बाब डेमोक्रेटिक पक्षासाठी अडचणीची ठरु शकते. शिवाय ट्रम्प यांना टक्कर देण्यासाठी हॅरिस या अत्यंत प्रभावी चेहरा आणि उमेदवार आहेत का, याबाबतही तेथील माध्यमे आणि जाणकारांमध्ये मतभेद आहेत. असे असले तरीही दोन्ही पक्षाचे भक्कम समर्थक तेथे आहेत. ट्रम्प यांच्या समर्थकांना आपल्या बाजूला वळविण्यात हॅरिस या आगामी महिन्याभरात कशी चाल खेळतात त्यावरही बरेच काही अवलंबून असेल.

अमेरिकन निवडणुकीत काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यात रोजगार, गर्भपात अधिकार, अन्य देशातून अमेरिकेत येणारे लोंढे, व्यापार वृद्धी हे महत्त्वाचे आहेत. हॅरिस या गर्भपाताचे समर्थन करतात तर ट्रम्प विरोध. महिला या नात्याने त्यांची ही भूमिका ते ठामपणे मांडू शकल्या तर ते सुद्धा निर्णायक ठरु शकते. तरुणांना रोजगार निर्माण व्हावा हा सुद्धा तेथे कळीचा प्रश्न आहे. बाहेरुन येणाऱ्यांना रोखणे आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करणे यात साधर्म्य आहे. यासंदर्भात आपल्याकडे काय स्ट्रॅटेजी आहे ते सत्ताधारी डेमोक्रेटिक पक्षाला जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचवावे लागेल. ट्रम्प यांचा यापूर्वीचा कार्यकाळ जनतेने अनुभवला आहे. तो पसंत पडला नाही म्हणूनच बायडेन अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यामुळे त्यांनाही जनतेचे मत मिळविण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. ट्रम्प यांच्यावर एकूण ४ खटले न्यायालयांमध्ये सुरू आहेत. त्यात ते दोषी ठरले आणि त्यांना शिक्षा सुनावण्यात आली तर ती बाब सुद्धा निवडणुकीवर परिणाम करु शकते. हे निकाल जर निवडणुकीपूर्वी आले तर ट्रम्प अडचणीत येऊ शकतात. हॅरिस यांची डेमोक्रेटसने निवड केली तर त्या उपाध्यक्षपदासाठी कुणाला संधी देतात ते सुद्धा महत्त्वाचे आहे. म्हणजेच गौरवर्णीय की अन्य की महिलाच हे सुद्धा कळीचे मुद्दे आहेत.

हॅरिस या निवडणूक जिंकल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरतील. हा इतिहास घडविण्याची संधी डेमोक्रेटिक पक्ष आणि हॅरिस यांना आहे. या निवडणुकीत अनेकांनी विशेष रस घेतला आहे. जसे की जगातील सर्वात धनाढ्य इलॉन मस्क. त्यांनी उघडपणे ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे विविध व्यक्ती आणि मान्यवरांची या निवडणुकीत काय भूमिका आहे किंवा असेल हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. भारतासह देशोदेशीचे प्रमुख व अनेक नेते या निवडणुकीकडे डोळे लावून आहेत कारण नेतृत्व कुणाकडे जाईल, त्याचा आपल्या देशावर काय परिणाम होईल, याचा अंदाज हे सर्व जण बांधत आहेत.

नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या लष्करी संघटनेला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अमेरिकेच्या नेतृत्वातील या संघटनेत एकूण ३२ देश आहेत. त्यातील युरोपीय सदस्य धास्तावलेले आहेत. कारण, ट्रम्प निवडून आले तर अमेरिका नाटोमधून बाहेर पडण्याची भीती त्यांना सतावते आहे. आपल्या जीडीपीच्या दोन टक्के निधी नाटो संघटनेला देणे अनेक सदस्यांना शक्य होत नाही. हे लक्षात घेऊनच तत्कालिन अध्यक्ष ट्रम्प यांनी नाटोतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता तो आता खरा ठरण्याची भीती त्यांना आहे. ट्रम्प यांनी चीनशी थेट पंगा घेत अनेक घोषणा केल्या होत्या. आताही ते सत्तेत आले तर अमेरिका आणि चीन यांचे छुपे किंवा उघड युद्ध सुरू होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. रशिया-युक्रेन, इस्राईल-हमास या युद्धांवरही नव्या अमेरिकन अध्यक्षांचा परिणाम होणार आहे. त्यामुळे सत्तेत कोण येते यावर बऱ्याच बाबी निश्चित होणार आहेत. निवडणुकीला अजून साधारण चार महिने आहेत. तोवर काय काय घडते यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. तूर्तास नाट्यमय, अनपेक्षित आणि अपेक्षित अशा सर्वच घडामोडींवर लक्ष ठेवणे, पाहणे, त्यांचा अंदाज लावणे हेच जवळपास सर्वांच्या हाती आहे. अमेरिकन मतदार अतिशय सूज्ञ आहे. तो कुणाची आणि का निवड करतो यावर केवळ अमेरिकेचे नाही तर जगाचेही भवितव्य अवलंबून असेल.

bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
मो. 9423479348

International USA America President Election Politics Donald Trump Joe Biden Kamala Harris Republican Democratic 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)