चीनमुळे लडाखमधील धोका वाढला (अक्षरनामा)

 चीनमुळे लडाखमधील धोका वाढला

भारत-चीन सैन्यातील सशस्त्र संघर्षाला ४ वर्षे पूर्ण होत असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चीनने पँगॉन्ग त्सो सरोवराच्या ठिकाणी मोठा पूल उभारल्याचे उघड झाले आहे. यामुळे लडाखमधील धोका वाढला आहे. तसेच, आगामी काळात चीनी सैन्यच नाही तर शस्त्रास्त्रे, रणगाडे थेट लडाख सीमेवर येऊ शकणार आहेत. ही बाब भारतासाठी धोकादायक आहे.

भावेश ब्राह्मणकर

विश्वासघातकी चीनने भारतासोबतचे ताणलेले संबंध आणखी बिघडतील अशा प्रकारचे कृत्य केल्याची बाब समोर आल्याने संरक्षण आणि सामरिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. लडाख प्रदेशातील गलवान खोऱ्यात गेल्या ४ वर्षांपूर्वी भारत आणि चीन सैन्यात हिंसक चकमक झाली. त्यात लष्करी अधिकाऱ्यासह २० जवान शहीद झाले. चीनची किती प्राणहानी झाली हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. पुन्हा भारत-चीन यांच्यात युद्ध होणार का, असा प्रश्नही उपस्थित केला गेला. मात्र, दोन्ही देशांमध्ये बोलणी सुरू झाली आणि हे प्रकरण तेवढ्यावरच थांबले. भलेही भारत-चीन यांच्यातील संबंध सुधारले नसतील पण लष्करी परिस्थिती चिघळली नाही एवढेच. मात्र, आता चार वर्षांनंतर चीनच्या कारवाया उघड होत आहेत.

भारतात लोकशाही असल्याने सहाजिकच सीमेपासून ते दिल्लीपर्यंत काय काय घडते आहे हे साऱ्या जगाला ठाऊक होते. मात्र, चीनमध्ये हुकुमशाही असल्याने तेथे नक्की काय घडते आहे याचा सुगावा कुणालाही लागत नाही. उपग्रहासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे चीनी कारवाया लपून राहिलेल्या नाहीत, हेही तितकेच खरे. सीमेवर किंवा त्याच्या पलिकडे चीन काय काय करतो आहे हे उपग्रहाच्या टेहेळणीवरुन स्पष्ट होते. आताही अशीच एक धक्कादायक बाब उजेडात आली आहे. पँगॉन्ग त्सो सरोवराच्या ठिकाणी चीनने मोठा पूल साकारला आहे. आणि तो भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

गलवानमध्ये चीनला भारतीय सैनिकांकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाले. ही बाब चीनला चांगलीच खटकली आहे. त्यामुळे चीनने याठिकाणी पायाभूत सुविधा आणि सामरिकदृष्ट्या सक्षम अशा सोयी निर्माण करण्यास विशेष प्राधान्य दिले आहे. म्हणूनच पूर्व लडाख आणि पश्चिम तिबेटमध्ये लष्करी सामर्थ्य मजबूत करण्याचा जोरदार सपाटा चीनने लावला आहे. पूर्व लडाखमधील पँगॉन्ग त्सो सरोवर हे सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि याच सरोवरावर आपल्या ताब्यातील भागात चीनने पूल बांधला आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याचे उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांद्वारे निदर्शनास येत आहे. या पुलाच्या निर्मितीमुळे चिनी सैन्य (पीएलए अर्थात पिपल्स लिबरेशन आर्मी) मजबूत होणार आहे. चिनी सैन्याला सुलभ आणि गतिमान हालचाली करता येणार आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२२ मध्ये पहिल्यांदाच असे समोर आले की, पँगॉन्ग त्सो सरोवराच्या सर्वात अरुंद भागातील खुर्नाकमध्ये चीन पूल बांधत आहे. नंतर उघड झाले की हा एक सेवा पूल होता, ज्याचा उपयोग मोठा पूल बांधण्यासाठी केला जात होता.

सॅटेलाइट प्रतिमा तज्ञ डॅमियन सायमन यांनी चीनच्या नव्या पुलाची छायाचित्रे उघड केली आहेत. त्यावरुन हे स्पष्ट होते की, नवीन पूल वापरासाठी सज्ज आहे. या पुलाच्या पृष्ठभागावर नुकतेच डांबर टाकण्यात आले आहे. पूल परिसरात चिनी सैन्याची गतिशीलता वाढलेली दिसते. या पुलामुळे चिनी सैन्य हे सीमेवरील वादग्रस्त भाग, तलावाच्या सभोवताली आणि भारतीय हद्दीत थेट प्रवेश करु शकते.

सामरिकदृष्ट्या या पुलाचे महत्व अनन्यसाधारण आहे. कारण, या पुलावरून चिनी सैन्य थेट रणगाड्यांसह फिरू शकतील. परिणामी, दक्षिणेकडील रेझांगला सारख्या भागात पोहोचण्यास सैन्याला मोठी मदत होणार आहे. हे तेच क्षेत्र आहे जिथे २०२० मध्ये चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. या पुलामुळे चिनी सैन्य पँगॉन्ग त्सोच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर सहज पोहचू शकते. उत्तर किनाऱ्यावर पोहचण्यासाठी चिनी सैन्याला आतापर्यंत तब्बल १८० किलोमीटरचे अंतर कापावे लागत होते. त्यासाठी रुटोंग भागातून खुर्नाकच्या दक्षिणेकडील काठाचा वापर केला जात होता. मात्र, आता नव्या पुलाने हे अंतर घटले आहे. वाहने, जड आणि लढाऊ उपकरणे, शस्त्रास्त्रे सहजरित्या उत्तर किनाऱ्यावर आणणे या पुलामुळे चिनी सैन्याला शक्य झाले आहे.

सप्टेंबर २०२० आणि २०२१ मध्ये चीनने भक्कम पायाभूत सुविधा निर्माणासाठी हालचाली केल्या. पँगॉन्ग त्सो सरोवराच्या परिसरात उच्च उंचीच्या भागात भारतीय सैन्याचे लक्ष टाळण्यासाठी मोल्डो गॅरिसनपर्यंत नवीन रस्ता चीनने तयार केला. चीनचा मुकाबला करण्यासाठी भारतही आपली लष्करी पायाभूत सुविधा मजबूत करत आहे. फिंगर ४ च्या दिशेने भारत एक रस्ता तयार करत आहे. त्यास उच्च प्राधान्य प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. फिंगर ४ पर्यंतचा रस्ता दरबुक-स्क्योक-दौलत बेग ओल्डी रस्त्याला पर्याय म्हणून सासेरला मार्गे भारतीय सैन्याला महत्वपूर्ण ठरणार आहे. भारत-चीन सीमेवर भारतीय हद्दीत सुमारे ४३५० मीटर उंचीवर असलेले पँगॉन्ग त्सो हे सरोवर जगातील सर्वात उंच खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. तसेच, हिमालय पर्वत रांगांमधील हा परिसर सामरिकदृष्ट्या भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.

भारत आणि तिबेट यांच्यातील बफर झोन असलेल्या अक्साई चीन प्रदेशातही चीनने अतिशय भक्कमपणे लष्करी सुविधा निर्माण केल्या आहेत. असाच प्रकार पाकव्याप्त काश्मीर मध्येही आहे. सध्या हा प्रदेश पाकिस्तानच्या ताब्यात असला तरी चीन तेथे पायाभूत सुविधा निर्माण करीत आहे. कारण, चीनच्या महत्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या प्रकल्पात पाकिस्तानने सक्रीय सहभाग घेतला आहे. याच अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमध्ये रस्ते, रेल्वे व लष्करी सुविधा बळकट करण्यासाठी पाकिस्तानने चीनसोबत करार केला आहे. म्हणजेच, पश्चिमेला पाकव्याप्त काश्मीर, पूर्वेला अक्साई चीन, गलवान पँगॉन्ग त्सो तर भारताच्या ईशान्येला असलेल्या अरुणाचल प्रदेशालगतही चीन अतिशय प्रभावीपणे आणि नियोजनबद्ध लष्करी सुविधा निर्माण करत आहे. यामुळे भारताची पूर्व ते पश्चिम सीमा ही चीनच्या आक्रमणाच्या सावटाखाली राहणार आहे. महासत्ता आणि साम्राज्यवादाच्या इर्षेने पेटलेल्या चीनने भारताला आपले लक्ष्य बनविले आहे. उपग्रहामुळे चीनचा वेळोवेळी भांडाफोड होत आहे. चीनच्या या आक्रमक कुरापती आणि खेळींना भारताकडून सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे. चीनने भारतीय सीमेलगत चार ते पाच मजली एवढ्या आकाराचे शक्तीशाली रडार बसविले आहेत. याद्वारे भारतीय सीमाच नाही तर सीमेच्या आतील भागावर विशेष लक्ष केंद्रित करता येते. विविध हालचाली टिपता येतात. भारत मात्र, सीमेवर अद्यापही दुर्बिणीच्याच भरवश्यावर आहे. अलिकडच्या काळात अल्प संख्येने ड्रोन दिमतीला आले आहेत. मात्र, ते पुरेसे नाहीत. चीनचा धोका ओळखणे, त्यासाठी सर्वंकष असे धोरण तयार करणे आणि वेगवेगळ्या माध्यमातून चीनला शह देणे आवश्यक आहे. मोदी सरकार काय करते हे नजिकच्या काळातच स्पष्ट होईल. 

bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार

Defence India China Ladakh Himalayan Region Relations Threat Pangong Tso Lake Galwan Bridge Strategic Security Forces Conflict Zone LAC 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)