पाक व्याप्त काश्मीर मध्ये भारताचा तिरंगा फडकणार? (पहलगाम हल्ला लेख ४)

पहलगाम हल्ला लेख ४ पाक व्याप्त काश्मीर भारतात येणार ? पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई करावी आणि पाक व्याप्त काश्मीर (पीओके) पुन्हा भारतात घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे. भारत अशा प्रकारची रणनिती आखणार का ? पीओके पुन्हा भारतात येणार का ? सद्यस्थितीत ते शक्य आहे का ? भावेश ब्राह्मणकर काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट आहे. भारताने आता पाकिस्तानला धडा शिकवावाच आणि पाक व्याप्त काश्मीर पुन्हा भारतात आणावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे. यापूर्वी दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तरादाखल भारताने सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानातील दहशतवाद्यांची स्थळे उद्धवस्त केली आहेत. त्यामुळे भारत सरकारकडून देशवासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात हे शक्य आहे का, हे पहायला आहे. पाक व्याप्त काश्मीरचा इतिहास नेमका काय आहे हे आधी समजून घ्यायला हवे. १९४७ मध्ये ब्रिटीशांनी भारत आणि पाकिस्तान यांना स्वतंत्र देशाचा दर्जा देऊन काढता पाय घेतला. त्यावेळी ब्रिटिशांनी तत्कालिन संस्थानांवरील आपला दावा सोडला. या संस्थानांनी भारत किंव...