पाक व्याप्त काश्मीर मध्ये भारताचा तिरंगा फडकणार? (पहलगाम हल्ला लेख ४)
पहलगाम हल्ला लेख ४
पाक व्याप्त काश्मीर भारतात येणार?
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई करावी आणि पाक व्याप्त काश्मीर (पीओके) पुन्हा भारतात घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे. भारत अशा प्रकारची रणनिती आखणार का? पीओके पुन्हा भारतात येणार का? सद्यस्थितीत ते शक्य आहे का?
भावेश ब्राह्मणकर
काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी
हल्ला झाल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट आहे. भारताने आता पाकिस्तानला धडा
शिकवावाच आणि पाक व्याप्त काश्मीर पुन्हा भारतात आणावे, अशी मागणी जोर धरु लागली
आहे. यापूर्वी दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तरादाखल भारताने सर्जिकल स्ट्राईक करुन
पाकिस्तानातील दहशतवाद्यांची स्थळे उद्धवस्त केली आहेत. त्यामुळे भारत सरकारकडून
देशवासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात हे शक्य आहे का, हे पहायला
आहे.
पाक व्याप्त काश्मीरचा इतिहास नेमका
काय आहे हे आधी समजून घ्यायला हवे. १९४७ मध्ये ब्रिटीशांनी भारत आणि पाकिस्तान यांना
स्वतंत्र देशाचा दर्जा देऊन काढता पाय घेतला. त्यावेळी ब्रिटिशांनी तत्कालिन
संस्थानांवरील आपला दावा सोडला. या संस्थानांनी भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील व्हावे
किंवा स्वतंत्र रहावे, यातील कोणताही पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. जम्मू
आणि काश्मीरचे महाराजा हरी सिंह यांनी भारत किंवा पाकिस्तान यापैकी कुणातही सामील
न होण्याचा निर्णय घेतला. तसेच जम्मू आणि काश्मीरला एक स्वतंत्र देश बनवण्याचा
निश्चय केला. त्यावेळी जम्मू आणि काश्मीर राज्यात मोठी लोकसंख्याशास्त्रीय विविधता
होती. काश्मीर खोरे हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला प्रदेश आणि ऐतिहासिकदृष्ट्या
शक्तिशाली राज्य होते. तेथे अफगाण-तुर्कीक आणि अरब लोकांची लोकसंख्या होती.
म्हणूनच येथील लोकसंख्या ९७ टक्के मुस्लिम होती आणि उर्वरित ३ टक्के धार्मिक
अल्पसंख्याक होते, बहुतेक काश्मिरी
पंडित समुदायाचे होते. जम्मू विभागातील पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये हिंदू बहुल
लोकसंख्या सांस्कृतिकदृष्ट्या हिमाचल प्रदेशकडे झुकलेली होती, तर कोटली, पूंछ आणि मीरपूर यासारख्या पश्चिमेकडील
जिल्ह्यांमध्ये मुस्लिम बहुल लोकसंख्या होती आणि ती पाकिस्तानकडे झुकलेली होती.
शेतकऱ्यांवर दंडात्मक कर लादल्यामुळे महाराजा
हरी सिंह यांच्याविरुद्ध पुंछमध्ये बंड सुरू झाले. त्यामुळे या संधीचा फायदा
घ्यावा, असा विचार पाकिस्तानकडून सुरू झाला. अखेर २१ ऑक्टोबर १९४७ रोजी मोठी घटना
घडली. वायव्य सरहद्द प्रांतातील (एनडब्ल्यूएफपी) हजारो पश्तून आदिवासी आक्रमक
झाले. महाराजांच्या राजवटीपासून हा परिसर मुक्त करण्यासाठी त्यांनी बंड केले. या
आदिवासींना पाकिस्तानी सैन्याचा पाठिंबा होता. महाराजांच्या सैन्याने आक्रमण
थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु पाकिस्तान समर्थक बंडखोर आधुनिक शस्त्रांनी सज्ज
झाले. २४ ऑक्टोबर रोजी या बंडखोरांनी जवळजवळ संपूर्ण पूंछ जिल्ह्याचा ताबा मिळवला.
मुझफ्फराबाद आणि बारामुल्ला ही शहरे बंडखोरांनी ताब्यात घेतली आणि राज्याची
राजधानी श्रीनगरच्या वायव्येस वीस मैल पुढे गेले. त्यांनी या जिल्ह्यांमध्ये
दुकाने लुटण्यास सुरुवात केली. महिला आणि मुलींवर बलात्कारही केले. या भयानक
परिस्थितीमुळे काश्मीर भागात जणू हाहाकार उडाला. ही बिघडणारी परिस्थिती पाहून महाराजा
हरी सिंह यांनी २४ ऑक्टोबर रोजी भारताकडे लष्करी मदत मागितली. भारताने त्यावेळी एक
अट ठेवली. "जम्मू आणि काश्मीरच्या भारतात विलिनीकरणाच्या करारावर"
स्वाक्षरी केली तरच भारत मदत करेल, ही ती अट होती. अखेर जम्मू आणि काश्मीरचे रक्षण
करण्यासाठी महाराजा हरी सिंह यांनी शेख अब्दुल्ला यांच्या संमतीने २६ ऑक्टोबर रोजी
मोठा निर्णय घेतला. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या भारतात विलीनीकरणाच्या
कागदपत्रांवर स्वाक्षरी केली.
नवीन करारानुसार, जम्मू आणि काश्मीरने भारताला फक्त तीन विषय सोपवले. ते म्हणजे संरक्षण,
परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण. करारानंतर, भारतीय
सैनिकांना ताबडतोब श्रीनगरला नेण्यात आले. पाकिस्तानी सैन्याने उघडपणे भारताशी
लढायला सुरुवात केली. या युद्धादरम्यान, दोन्ही देशांमध्ये
यथास्थिती राखण्यासाठी एक करार झाला. पाकिस्तानने ताब्यात घेतलेले जिल्हे
त्यांच्याकडेच राहिले. या ताब्यात घेतलेल्या जिल्ह्यांना पाकव्याप्त काश्मीर (पीओके)
म्हणतात. पाकिस्तान त्याला आझाद काश्मीर म्हणतो. प्रशासकीय सोयीसाठी
पाकिस्तानने पीओकेचे दोन भागात विभाजन केले आहे. ज्यांना अधिकृत भाषांमध्ये
जम्मू-काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तान म्हणतात. आझाद काश्मीर हे आझाद काश्मीर
अंतरिम संविधान कायदा, १९७४ अंतर्गत शासित आहे. आझाद
काश्मीरमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान आणि एक परिषद आहे,
परंतु प्रशासकीय रचना पूर्णपणे शक्तीहीन आहे आणि ती पाकिस्तान
सरकारच्या अंतर्गत काम करते. पाकव्याप्त काश्मीरच्या दक्षिण भागात १० जिल्हे आहेत.
त्यात नीलम, मीरपूर, भिंबर, कोटली, मुझफ्फराबाद, बाग, हवेली, हत्तीयन व्हॅली, रावलकोट आणि सुधनोटी यांचा समावेश आहे.
पाक व्याप्त काश्मीर पुन्हा भारतात घ्यावा,
अशी मागणी गेल्या अनेक दशकांपासून होत आहे. मात्र, ही मागणी पूर्ण करणे वाटते
तेवढे सोपे नाही. त्यामुळे परिस्थिती जैसे थेच आहे. आता पहलगाम
हल्ल्यानंतर भारताच्या आक्रमक कारवाईत पीओके भारतात येणार का, असा प्रश्न उपस्थित
होतो आहे. परंतु, पाकिस्तानात सद्यस्थिती काय आहे हे सुद्धा तपासून पहायला हवे. पाकिस्तान
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानने बाह्य देशांकडून घेतलेल्या कर्जाचा २०२३ मधील आकडा सुमारे १३०
अब्ज डॉलर एवढा झाला आहे. २०१५ च्या तुलनेत (अवघ्या ८ वर्षातच) हे कर्ज दुप्पट
झाले आहे. या कर्जामध्ये चिनी कर्जाचा वाटा १३ टक्के एवढा आहे. पाकिस्तान
दिवसागणिक कर्जाच्या ओझ्याखाली दबत आहे. जागतिक बँक, आशियाई
बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यापाठोपाठ चीन हाच पाकसाठी
कर्ताधर्ता आहे. त्यामुळे त्याचे पाय धरण्याशिवाय पाककडे कुठलाही पर्याय नाही.
दहशतवादाच्या समस्येमुळे अन्य देशांनी पाककडे पाठ फिरवली आहे. चीनच एकमेव, मोठी आणि सक्षम आशा पाकला आहे. म्हणूनच पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ हे सतत
चीनचे गुणगान गात असतात. चीनने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये (CPEC) गुंतवणूक करावी आणि त्यास चालना देण्याची आग्रही विनंती ते करीत आहेत. चीनला
ते हवे आहे कारण, पाकच्या ग्वादार बंदरातून थेट व्यापार आणि
मालवाहतूक करण्याचा चीनचा डाव आहे. समुद्रमार्गे होणारी मालवाहतूक पुढे थेट रस्ते
आणि रेल्वे मार्गे कमी वेळेत करण्याची योजना आहे. खासकरुन चीनमध्ये आयात होणारे
तेल. शिवाय भारताला शह देण्यासाठी पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये
कॉरिडॉरच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यासाठी चीनसोबत करारही केला आहे.
विशेष म्हणजे पाक व्याप्त काश्मीर ही परकीय भूमी असल्याची स्पष्टोक्ती पाकिस्तानने
इस्लामाबाद उच्च न्यायालयात केली आहे. पीओकेमधील कॉरिडॉरच्या कामांना भारताने
तीव्र आक्षेप घेतला आहे. याकडे दुर्लक्ष करीत चीनने दळणवळणासह लष्करी कामे सुरू
ठेवली आहेत. भारताला शह देण्यासाठी आगामी काळात ही कामे महत्त्वाची ठरतील, असा चीनचा कावा आहे. काश्मीरच्या शक्सागाम खोऱ्यातील विकास कामे हे
त्याचेच द्योतक आहे. तसेच, युद्ध झाले तर याच पायाभूत
सोयी-सुविधांचा वापर पाकला भारताविरुद्ध करता येणार आहे. परिणामी, पाक आणि चीन दोन्हीही आपापले इप्सित साध्य करण्यासाठी आग्रही आहेत.
पीओके घेण्यासाठी भारताला पाकिस्तानवर
हल्ला करावा लागेल. पण ते वाटते तेवढे सोपे नाही. यानिमित्ताने भारत-पाक यांच्यात
युद्ध होईल. हे युद्ध दोघांनाही परवडणारे नाही. भलेही पाक कंगाल असेल पण तो चीन
आणि अन्य देशांकडून मदत घेऊन युद्ध लढेल. म्हणतात ना दुसऱ्याच्या जीवावर सण साजरा
करणे अगदी तसेही पाक करेल. भारतालाही युद्धामुळे जबर किंमत मोजावी लागेल. शिवाय
पाककडे अण्वस्त्र आहेत. त्याचा प्रत्यक्ष वापर होईल की नाही हे कुणालाच सांगता
येणार नाही. मात्र, पीओके मध्ये जी गुंतवणूक चीनने केली आहे ती भारताच्या
हल्ल्यामुळे धोक्यात येऊ शकते. चीनने याठिकाणी रस्ते, रेल्वे, धरण, ऊर्जा आणि अन्य
पायाभूत सुविधा प्रकल्प साकारले आहेत. काही ठिकाणी संरक्षण तळही बांधले आहेत. याठिकाणी
पाकबरोबर चीन सैन्यही तेथे टेहेळणी करते. पीओकेमधील प्रकल्पांचे संरक्षण
करण्यासाठी चिनी लष्कर, तंत्रज्ञ तेथे कार्यरत आहेत. शिवाय चीनकडून पाकला शस्त्रास्त्रांचाही
पुरवठा होतो. शिवाय चीनचा महत्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरओ) हा पीओके
मधूनच थेट युरोपपर्यंत जातो. परिणामी, भारताने पीओकेवर कारवाई करताच त्याचा प्रचंड
मोठा फटका चीनला बसणार आहे. चीनने कोट्यवधींची गुंतवणूक या भागात केली आहे. याद्वारे
पाकवर उपकार करतानाच कर्जबाजारीही केले आहे. ही स्थिती कायमस्वरुपी अशीच रहावी,
असा चीनचा कावा आहे. म्हणून पीओके जैसे थे रहावे यासाठी चीन सक्रीय राहिल.
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतावर दबाव चीन टाकू शकतो. याचाच अर्थ भारताला पीओके
मिळविण्यासाठी केवळ पाकिस्तानच नाही तर त्यासोबत चीनचाही विचार गांभिर्याने करावा
लागेल. भूराजकीय स्थिती आणि समीकरणांचा बारकाईने विचार करुनच पाकिस्तानला शह
देण्याची खेळी भारताला खेळावी लागेल. यात मुत्सद्देगिरी पणाला लागणार, हे मात्र
नक्की. तूर्त तरी पीओके घेण्याच्या वल्गना होत असल्या तरी प्रत्यक्षात सध्या तरी
तसे होणे अवघडच आहे.
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
माझे WhatsApp चॅनल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
--
India, Pakistan, Dispute, POK, Kashmir, Terrorist, Pahalgam, Attack, War,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा