हायटेक तंत्रज्ञानाचाही कुंभ (लोकमत)
हायटेक तंत्रज्ञानाचाही कुंभ
दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने हायटेक होऊ शकतो. गर्दी नियंत्रणासह अनेक आव्हाने असले तरी यानिमित्ताने मोठी संधीही आहे. ती आपण कशी एन्कॅश करतो, हेच महत्वाचे आहे.
भावेश ब्राह्मणकर
प्रयागराजमध्ये नुकताच महाकुंभ संपन्न
झाला तर नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये आणखी दोन वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. प्रशासकीय
तयारीला वेग आला आहे. या वैश्विक सोहळ्यासाठी कृत्रिम प्रज्ञेसारख्या (आर्टिफिशिअल
इंटेलिजन्स) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शक्य आहे. कुंभथॉनच्या माध्यमातून देशभरातील
विद्यार्थी आणि स्टार्टअपला नाशिकमध्ये आमंत्रित करण्यात आले. त्यात विविध
सादरीकरणही झाले. प्रशासनानेही त्यांच्या गरजा आणि मागणी स्पष्ट केली. अत्यंत
कल्पक आणि उत्साही तरुण पिढीच्या सहाय्याने कुंभमेळा सकुशल संपन्न होऊ शकतो.
गर्दी व्यवस्थापन हे सिंहस्थातील
महाकाय आव्हान आहे. जीपीएसला जोडलेल्या मनगटी पट्ट्या (व्रिस्ट बँड) भाविकांच्या
हाताला बांधण्याचा सक्षम पर्याय आहे. कुठल्या
भागात किती गर्दी झाली आहे हे कंट्रोल रुमवरील स्क्रीनवर दिसते. त्याद्वारे त्वरीत
त्या भागातील पोलिस आणि स्वयंसेवकांना संदेश देऊन तेथील गर्दी विरळ करता येईल
किंवा तेथे येणाऱ्या भाविकांना प्रवेशास मज्जाव करता येऊ शकतो. अशाच प्रकारे
मोबाईल टॉवरच्या माध्यमातून हे सुद्धा कळून चुकते की कुठल्या भागात मोबाईल ग्राहक
आणि भाविकांची घनता किती आहे. मोबाईल कंपन्यांच्या सहाय्याने ते शक्य होईल.
प्रयागराजमध्ये आकाशवाणीने विशेष
केंद्र स्थापन करुन प्रबोधन, जनजागृती आणि महत्वाच्या सूचना देण्याचे काम केले. असेच
केंद्र नाशिकमध्ये करता येईल. याचबरोबर बहुभाषिक उद्घोषक यंत्रणा कार्यन्वित करणे
आवश्यक आहे. एकाचवेळी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, भोजपुरी, आसामी, बंगाली अशा
बहुविध भाषांमध्ये उद्घोषणा केल्यास भाविकांपर्यंत वेळेत आणि महत्त्वाच्या सूचना पोहचतात.
परिणामी, गर्दी व्यवस्थापनासह विविध प्रकारच्या कार्यात सूसूत्रता येते.
बहुमजली पार्किंगसाठी ऑनलाईन पद्धतीने
त्याचे बुकींग, स्लॉटची निवड करता येते. याद्वारे पारदर्शकपणे व्यवहारही घडतो. यातून
चोखपणे वाहतूक व्यवस्थापन शक्य होते. वॉकी टॉकी, सॅटेलाईट फोन, मोबाईल याद्वारे स्वयंसेवक,
पोलिस आणि व्यवस्थापन पदाधिकारी हे संपर्कात राहू शकतात. वेळोवेळी विविध निर्णय
घेणे आणि त्याची अंमलबजावणी शक्य होते.
अत्याधुनिक स्वरुपाचे चॅटबॉट भाविकांसाठी
उपलब्ध करुन देता येईल. याद्वारे भाविक त्यांच्या शंकांचे निरसन मोबाईलवर कुठेही
करु शकतात. सध्या अशा प्रकारचे चॅटबॉट अनेक ठिकाणी वापरले जात आहेत. भाविकांना असलेल्या
प्राधान्यक्रमातील प्रश्नांची उत्तरे तत्काळ मिळतात. बहुभाषिक पद्धतीचे चॅटबॉट सुद्धा
उपयुक्त आणि प्रभावी ठरु शकेल.
एकाच वेबसाईट किंवा मोबाईल अपवर सर्व
प्रकारची इत्थंभूत माहिती उपलब्ध करुन दिली तर भाविकांना ते सोयीचे बनते.
विमानसेवा, सिटीबस, रेल्वे, एसटी बस या वाहतूक सेवांचे वेळापत्रक, शहरांतर्गत
टॅक्सी सेवा, हॉटेल्स, गेस्ट हाऊस, रेस्टॉरंटस, विविध ठिकाणे दर्शविणारा नकाशा,
महत्वाचे आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक आदी त्यात असू शकतील.
सीसीटीव्ही, चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान
(फेशिअल रेकग्निशन) यांचा वापर प्रभावी ठरु शकतो. याद्वारे पोलिसांना मोठी मदत होऊ
शकते. गुन्ह्यांची उकलही सोपी होते. रेल्वे स्टेशन, बसस्टँड, विमानतळ, वाहनतळ,
सिटी बसचे डेपो आदी ठिकाणांवर गर्दी व्यवस्थापनासाठी वरील तंत्रज्ञान मोलाचे ठरेल.
नाशिक व त्र्यंबक शहरात महत्वाच्या चौकांमध्ये किंवा ठराविक ठिकाणी एलईडी स्क्रीन
लावणे, त्यावर महत्त्वाची माहिती प्रसारीत करणे उपयुक्त बनेल.
व्हॉटसअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स
(ट्विटर), यूट्यूब, लिंकडइन यासारख्या सोशल मिडियाचा अत्यंत प्रभावी वापर महत्त्वाचा
आहे. विविध प्रकारचे अपडेटस, जनजागृती करणारी माहिती प्रसारीत करता येईल. त्यासाठी
प्रशासनाला सोशल मिडिया टीमच सक्रीय करावी लागेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त
अशा बहुविध आयुधांचा वापर झाल्यास सिंहस्थातील अनेक सेवा, सुविधा सुकर तर होतीलच
पण भाविकांना इच्छित माहिती तत्काळ उपलब्ध होऊ शकेल. त्यादृष्टीने प्रशासन
प्रयत्नशील आहे.
--
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
माझे WhatsApp चॅनल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
--
Nashik, Simhastha, Kumbhamela, Trimbakeshwar, Hightech, Technology, Religious, Event, Godavari, Gathering,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा