पहलगाम हल्ल्याचे टायमिंग आणि अनुत्तरीत प्रश्न (नवशक्ती)

पहलगाम हल्ल्याचे टायमिंग आणि अनुत्तरीत प्रश्न

काश्मीरच्या पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ला हा काही अचानक झालेला नाही. त्यामागे मोठे नियोजन आणि पाक लष्कराची साथ आहे. या हल्ल्याचे टायमिंग पाहता अनेक अनुत्तरीत प्रश्न काय सांगत आहेत?

भावेश ब्राह्मणकर

मिनी स्वित्झर्लंड समजल्या जाणाऱ्या बैसनर या पहलगामच्या भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछुट गोळ्या झाडल्या. निष्पाप २६ जणांचा बळी गेला. हा हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात तर, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स भारत दौऱ्यावर होते. म्हणजेच, एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे टायमिंग दहशतवाद्यांनी आणि या हल्ल्याच्या क्रूर सूत्रधारांनी साधले आहे. यापूर्वी काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले. पठाणकोट, उरी व बारामुल्ला (२०१६), अमरनाथ यात्रा (२०१७), पुलवामा (२०१९). मात्र, आताचा हा हल्ला अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे.

या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी तत्काळ सौदी अरेबियाचा दौरा आटोपून मायदेश गाठले. म्हणजे नियोजित गाठीभेटी आणि अनेक महत्वपूर्ण बाबी अपूर्ण राहिल्या. हे व्हावे हिच कदाचित हल्ल्यामागची योजना असावी. आखातातील मुस्लिम देशाचे भारताशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित होणे, त्यांच्याशी व्यापार, दळणवळण, संरक्षण अशा विविध क्षेत्रात सहयोग होणे हे पाकिस्तानला रुचणारे नाही. त्यात मीठाचा खडा कसा टाकता येईल, भारताचे प्रयत्न कसे विफल होतील, यात त्याला अधिक रस. तर, अमेरिकन उपाध्यक्ष भारतात आले असताना हा हल्ला घडवून काश्मीरकडे संपूर्ण जगाचे लक्ष वळविणे हा सुद्धा कयास आहे. या दोन्ही पातळ्यांवर हल्लेखोर कमालीचे यशस्वी झाले आहेत.

काश्मीरमध्ये घातपाती कारवाई होणार याचा सुगावा गुप्तहेर खात्याला लागला. त्यामुळेच पंतप्रधान मोदींचा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातील काश्मीर दौरा रद्द झाला. तर केंद्रीय गृहमंत्री आणि गृहसचिव यांनी काश्मीरचा दौरा केला. बैठक घेऊन सुरक्षेचा आढावाही घेण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांची उपस्थिती का नव्हती? बैसनर येथील हल्ला आपण का रोखू शकलो नाही? आपल्या गुप्तहेर खात्याने खरंच इशारा दिला होता का? नसेल तर का नाही? असेल तर त्याकडे दुर्लक्ष कसे झाले? आपण गाफील कसे राहिलो? ज्या भागात हा हल्ला झाला तेथे पायी किंवा घोडे किंवा खेचरांवरून जावे लागते. म्हणजेच मुख्य रस्ता ते बैसनर या दरम्यान एकही भारतीय सैनिक नव्हता का? हातात अत्याधुनिक रायफल घेऊन पायी जाणारे दहशतवादी कुणालाच कसे दिसले नाही? उन्हाळ्यात पर्यटकांनी बहरणाऱ्या या भागात दहशतवादी अचानक कसे येऊ शकतात? अतिरेक्यांच्या रेकीचा आपल्या कुठल्याच यंत्रणेला सुगावा कसा लागला नाही? दहशतवादी त्याच परिसरात मुक्कामाला असतील तर त्याचा थांगपत्ताही आपल्याला कसा नाही? हे सारे अपयश कुणा एकाचे नक्कीच नाही. त्यास अनेक जण जबाबदार आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक पोलिस, प्रशासन, लष्कर, गुप्तहेर खाते, निमलष्करी दल, स्थानिक नागरिक, व्यावसायिक असे सारेच.  

अशा प्रकारचा हल्ला झाला की पाकिस्तानशी दोन हात करण्याची भाषा बोलली जाते. सर्जिकल स्ट्राईकचेही धुमारे फुटतात. मुळात हल्ल्याच्या मुळाशी जाण्याचे सोडून आपण फांद्यांकडेच पाहतो. पुलवामा हल्ल्याचेच उदाहरण घेता येईल. त्या हल्ल्यासाठी जे आरडीएक्स वापरण्यात आले ते कुठल्या मार्गाने आणि कसे आले? सैनिकांची बस त्या मार्गानेच जाणार आहे याची माहिती दहशतवाद्यांना कशी अचूक मिळाली? प्रत्यक्ष हल्ला झाला तोपर्यंत आपल्या साऱ्याच यंत्रणा सूशेगात कशा होत्या? या सर्वाचा थांगपत्ता आजवर लागलेला नाही. किंबहुना त्यावर कुणीच बोलत नाही. त्याची चौकशी होत नाही की दोषींवर कारवाई सुद्धा. अशा प्रकारच्या गंभीर घटना घडूनही दोषी नामानिराळे राहत असतील तर एकप्रकारे त्यांना हे बळच आहे. देशांतर्गत घरभेदी कोण आहेत? त्यांचा शोध कोण आणि कसा घेणार? छत्रपती शिवाजी महाराजांनाही फंदफितुरीचा जबर फटका बसल्याचा इतिहास आहे. या इतिहासातून आपण काहीच कसे शिकत नाही?

पाकव्याप्त काश्मीर घेऊनच राहू, आता पाकिस्तानला धडा शिकवू अशा प्रकारची प्रसिद्धीलोलुप वक्तव्ये करुन काही साध्य होत नाही. याउलट बोलण्यापेक्षा आधी कृती हवी. तोंडाच्या वाफा बाहेर काढून फक्त चर्चा होते बाकी काहीच होत नाही. प्रत्यक्षात अत्यंत अचूक माहितीचे संकलन, कसोशीचे नियोजन, काटेकोर अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर भर हवा. काही महत्त्वाच्या बाबींची गांभिर्याने चर्चा देशात होणे आवश्यक आहे. मूळात आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. केंद्रातील सत्ताधारी सरकार हे हिंदुंचा पुरस्कार करणारे असल्याचा संदेश सर्वत्र सतत जातो. सत्ताधारी भाजपचे तब्बल २४० तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) २९२ खासदार आहेत. त्यात एकही मुस्लिम नाही. सध्याच्या १८व्या लोकसभेत केवळ २४ मुस्लिम खासदार आहेत. हे प्रमाण अवघे ४.४ टक्के आहे. गेल्या सहा दशकातील हे सर्वात निच्चांकी आहे. शिवाय भाजपशासित राज्यांमध्ये होणाऱ्या बुल्डोझर कारवाईत लक्ष्य केले जाणारे मुस्लिम बांधव, प्रचंड गाजावाजा करुन साकारलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर, नुकताच संमत झालेला वक्फ सुधारणा कायदा हा मुस्लिमांच्या हितविरोधी असल्याचा आरोप, नागपूरसह अनेक ठिकाणी झालेल्या धार्मिक दंगली आदी प्रकार हे भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेला छेद देणारे आहेत. त्यामुळेच भारतात मुस्लिम बांधव हे असुरक्षित असल्याचा समज बंडखोर गट किंवा दहशतवाद्यांचा होतो आहे. म्हणजेच, त्यांना आक्रमक होण्यास देशात होणाऱ्या कृती कारणीभूत ठरत आहेत. आपण स्वतःहून त्यांना संधी निर्माण करुन देत आहोत, हे कुणाच्याच कसे लक्षात येत नाही? की आपण त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहोत?

३७० कलम हटविल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता आहे, तेथे विकासाची कवाडे खुली झाली आहेत, पर्यटन व्यवसाय भरभराटीस आहे, असा प्रचार होतो आहे. ही बाब हेरुनच दहशतवाद्यांनी ऐन पर्यटन हंगामाच्या प्रारंभी हल्ला केला आहे. त्यामुळे आता पुढील काही महिने पर्यटक तेथे जाण्यास धजावणार नाहीत. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेचे ज्या लाखो भाविकांनी बुकींग केले आहे त्यांच्या पोटातही भीतीचा गोळा आला आहे. म्हणजेच, या हल्ल्यातून दहशतवाद्यांनी तेथील पर्यटनाला मोठा सुरूंग लावला आहे. याचा फटका कर रुपातून सरकारला बसेलच पण स्थानिक नागरिकही त्यातून सुटणार नाहीत. विशेष म्हणजे, मुस्लिम बांधवांची संख्या त्यात अधिक आहे. ज्या धर्मद्वेषापोटी दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यातून त्यांचेच धर्मबांधव भरडले जाणार आहेत. या हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये पुन्हा बेरोजगारी वाढण्याची भीती आहे. परिणामी माथेफिरु तरुणांना आपल्या गळाला लावणे दहशतवाद्यांना शक्य होणार आहे. स्थानिक जाणकारांना हाताशी धरुन घातपात घडविणे सोपे होते.

दहशतवादी गटांकडून अतिशय नियोजनपूर्वक आणि थंड डोक्याने हल्ल्याला पूर्ण रुप दिले जाते. मुंबई हल्ल्याच्या कटातील आरोपी तहव्वूर राणा याचे अमेरिकेतून भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. न्यायालयीन सुनावणीही सुरू झाली आहे. या खटल्यातून आणि त्याच्या चौकशीतून पाकचा नापाक बुरखा जगासमोर येणार आहे. त्यामुळेही पाकिस्तान व दहशतवाद्यांचा तिळपापड झाला आहे. यातूनच आक्रमक होत पहलगाममध्ये हल्ला झाला असू शकतो. हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या नाकेबंदीसाठी भारत सरकारने पाच मोठे निर्णय घेतले आहेत. त्याचेही पडसाद उमटतीलच. मात्र, दहशतवाद्यांचे हल्ले आपण का रोखू शकत नाही? आपण कुठे कमी पडत आहोत? दहशतवाद्यांच्या काश्मीरमधील मुसक्या आवळण्यासाठी नक्की काय करायला हवे? याचा सर्वंकष विचार करायला हवा. तसेच, धार्मिक तेढ निर्माण करुन भलेही नजिकचे ईप्सित साध्य होत असेल, पण दूरगामी देशाचेच नुकसान होते, हे आपण कधी समजून घेणार? फोडा आणि राज्य करा’, हे ब्रिटीशांचे धोरण आपण अद्यापही भारतीय भूमीत का गाडू शकलेलो नाही? कुठल्याही घटना घडल्या की त्याला धार्मिक रंग देणे आणि धार्मिक भावना चेतवण्याने देश दुभंगतो आहे, फुटीची बीजे रोवली जात आहेत, यातूनच देशाच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो आहे. खरं तर अशा प्रकारच्या कुटील कारवायांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याबरोबरच घातकी पाकिस्तान व दहशतवाद्यांना धडा शिकविण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. ते आपण कसे पेलतो यावरच पुढील दहशतवादी हल्ले अवलंबून आहेत.

--

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

माझे WhatsApp चॅनल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

--

India, Jammu, Kashmir, Pakistan, Terrorism, Pehalgam, Attack, Baisaran, Defence, Security, Terrorists,   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)