...म्हणून नाशिकला झाले मिग २१ चे उत्पादन (साप्ताहिक सकाळ)
...म्हणून नाशिकला झाले मिग २१ चे उत्पादन
भारताच्या सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात इतिहास घडविणारी मिग २१ ही लढाऊ विमाने सेवानिवृत्त होत आहेत. या विमानांचे संपूर्ण उत्पादन नाशिकच्या ओझरमध्ये झाले. ते कसे सुरू झाले? त्यापूर्वी कुठल्या नाट्यमय घडामोडी घडल्या? या विमानांमुळे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेची पायाभरणी कशी झाली? यांचा घेतलेला हा धांडोळा...
भावेश ब्राह्मणकर
ही घटना आहे १९६२ ची. चीनने भारतावर आक्रमण केले. या युद्धात भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संरक्षणमंत्री पदासाठी यशवंतराव चव्हाण यांना पाचारण केले. चव्हाण त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत चव्हाण यांनी संरक्षणमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, केंद्रात मंत्री झाल्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत खासदार होणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन नाशिककरांनी चव्हाण यांना बिनविरोध निवडून दिले. हे ऋण फेडण्यासाठी चव्हाण यांनी नाशिकला मोठा संरक्षण प्रकल्प देण्याचे जाहीर केले. चीन युद्धामुळे भारताला जाणिव झाली की, आपल्याकडे चांगल्या दर्जा आणि क्षमतेची लढाऊ विमाने नाहीत. आवाजापेक्षा अधिक वेग असलेल्या मिग २१ लढाऊ विमानांबाबत भारत-रशिया शिष्टमंडळाची बोलणी सुरू झाली. त्यानंतर दोन्ही देशाच्या प्रमुखांनी त्यास अंतिम रूप दिले. त्यानुसार, रशियन तंत्रज्ञ आणि अभियंते यांचे विशेष पथक भारतात दाखल झाले. ओडिशाचे मुख्यमंत्री बिजू पटनाईक हे पंतप्रधान नेहरू यांचे खूप विश्वासू होते. ओडिशा राज्याला विकासाच्या पथावर आणण्यासाठी मिग २१ विमानांचा प्रकल्प कोरापूट या दुर्गम भागात करण्याचा विचार सुरू झाला. म्हणूनच रशियन पथक कोरापूटला पोहचले. त्यांनी जागा व परिसराची पाहणी केली. दऱ्या-खोऱ्या आणि डोंगराळ प्रदेश पाहून रशियन पथक बेहद्द खुष झाले. सुरक्षेच्या दृष्टीने ही जागा त्यांना सर्वोत्तम वाटली. मात्र, त्याचवेळी मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली. मिग २१ लढाऊ विमानांचे उत्पादन झाल्यानंतर या विमानांची उड्डाण आणि जमिनीवर उतरण्याची चाचणी घ्यावी लागते. त्यासाठी प्रकल्पालगत किमान तीन किलोमीटर लांबीचा रन वे आवश्यक होता. आजूबाजूला डोंगर असल्याने सलग तीन किमीचा रन वे तेथे तयार करणे शक्य नव्हते. अखेर रशियन पथकाने कोरापूटला हा प्रकल्प करणे शक्य नसल्याचे सांगितले. संरक्षणमंत्री चव्हाण यांनी तत्काळ हा प्रकल्प नाशिकला करण्याचा प्रस्ताव दिला. नाशिक शहराजवळील ओझर या ठिकाणी पाहणी करण्यासाठी रशियन पथक दाखल झाले. त्यांनी तत्काळ सकारात्मक अहवाल दिला. मात्र, पंतप्रधान नेहरू यांच्यासमोर पेच निर्माण झाला. संरक्षणमंत्री चव्हाण आणि मुख्यमंत्री पटनाईक हे दोन्ही नेहरूंचे उजवे व डावे हात समजले जायचे. या दोघांनाही नाराज करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे मिग २१ विमानांच्या प्रकल्पासाठी मध्यम मार्ग काढण्यात आला. हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या सरकारी संरक्षण उत्पादन कंपनीचा मिग २१ लढाऊ विमान निर्मितीचा प्रकल्प ओझरमध्ये साकारण्याचे निश्चित झाले. तसेच, एचएएलचाच कोरापूट येथे एक प्रकल्प विकसित करायचा. कोरापूट येथे विमानाचे इंजिन तर ओझरच्या कारखान्यात संपूर्ण विमान उत्पादित करायचे. रशियन पथकानेही त्यास होकार दर्शविला. अशा प्रकारे मिग २१ विमानांच्या प्रकल्पाचा भारतात शुभारंभ झाला.
देशाच्या सुरक्षा आणि संरक्षणाच्या
दृष्टीने मिग २१ हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आणि महत्वाकांक्षी होता. त्यामुळे ओझर
येथील जागेचे भूसंपादन अत्यंत वेगाने झाले. याठिकाणी स्थानिकांना रोजगाराची संधी
दिली जाईल, अशी ग्वाही देण्यात आली. त्यामुळे भूसंपादनास फारसा विरोध झाला नाही. मध्य
रेल्वेचा मार्गही निफाड येथून जात असल्याने ओझर एचएएलपर्यंत रेल्वेमार्गही विकसित
करण्यात आला. मिग २१ साठी लागणारे सुटे भाग, इंधन आदी मालगाडीद्वारे ओझर एचएएलमध्ये
आणण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली. रशियन तंत्रज्ञ आणि अभियंते कुटुंबासह ओझरला
दाखल झाले. त्यांच्या निवासासाठी ओझर एचएएलच्या प्रकल्पालगत विशेष वसाहत स्थापन
करण्यात आली. १९६४ च्या दरम्यान ओझर एचएएल येथे मिग २१ चे प्रत्यक्ष उत्पादन सुरू
झाले. स्थानिकांच्या हाताला मोठ्या प्रमाणात काम मिळाल्याने तेही खूष होते.
रशियन तंत्रज्ञ, अभियंते आणि
त्यांच्याजोडीला भारतीय अभियंते, तंत्रज्ञ, कामगार यांचा अनोखा मिलाफ सुरू झाला. मिग
२१ च्या निमित्ताने प्रथमच भारतात संरक्षण उत्पादनाची मुहूर्तमेढे रोवली गेली. स्वदेशी
बनावटीच्या शस्त्रास्त्र आणि युद्ध सामग्री विषयी आपण आता म्हणजे २०२५ मध्ये प्रकर्षाने
बोलतो. मात्र १९६४ मध्येच त्याचा शुभारंभ रशियाच्या मदतीने झाला. जगभरात नवी लढाऊ
विमाने थेट आयात करण्याचा प्रघात असताना पंतप्रधान नेहरू आणि संरक्षणमंत्री चव्हाण
यांच्या दूरदृष्टीमुळे भारतात मिग २१ चे संपूर्ण उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतर
असा करार रशियासोबत करण्यात आला. त्यामुळेच नाशिक जिल्ह्यासह मुंबई, पुणे, बंगळुरू
अशा विविध ठिकाणी संरक्षण उत्पादन प्रकल्प सरकारच्या साथीने सुरू झाले. खासगी उद्योजकही
पुढे सरसावले. मिग २१ ला लागणारे विविध सुटे पार्टस जसे की, इलेक्ट्रिकल,
इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटस, फायबर, मेकॅनिकल. भारतातच सुट्या भागांची
निर्मिती, कोरापूटला इंजिनाचे उत्पादन, ओझर येथे सर्व सुट्या भागांची जुळणी आणि
मिग २१ विमानाची निर्मिती असा प्रयोग सुरू झाला. विशेष म्हणजे तो अत्यंत यशस्वी
ठरला. यामुळे भारतात मोठ्या संख्येने खासगी संरक्षण उद्योग सुरू झाले. तसेच,
देशांतर्गत उत्पादन झाल्याने आत्मविश्वासही वाढीस लागला. आयात वस्तू किंवा संरक्षण
उत्पादनाबाबत काहीशी शंका असते. मात्र, मिग २१ बाबत ती नव्हती. सुरक्षा आणि
गोपनियतेच्या पातळीवर मिग २१ अतिशय उत्तम ठरले. देशाच्या सुरक्षेसाठी मिग २१ विमाने
हळूहळू उपलब्ध होऊ लागली. त्यामुळेच भारतीय हवाई हद्द अधिक भक्कम आणि सुरक्षित होत
गेली.
मिग २१च्या रूपाने भारताने थेट
सुपरसोनिक विमान निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. साठच्या दशकातील ही बाब अतिशय
प्रभावी आणि परिणामकारक होती. आवाजापेक्षा अधिक वेग आणि शक्तीशाली इंजिन असलेले हे
विमान अतिशय चपळ स्वरूपाचे होते. सोपे नियंत्रण, सहजनेते हाताळणी, कमी-अधिक उंचीवर
उडण्याची क्षमता आदी वैशिष्ट्यांमुळे हवाई दलाच्या वैमानिकांनीही मिग २१ ला अधिक
पसंती दिली. या विमानामध्ये प्रारंभीच्या काळात फारसे इलेक्ट्रॉनिक भाग नव्हते. मात्र,
जसा काळ बदलत गेला, नवनवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास झाला तसा या विमानात
बदल करण्यात आल्याचे हवाई दलाचे सेवानिवृत्त ग्रुप कॅप्टन विनायक देवधर सांगतात. ओझरच्या
कारखान्यात उत्पादन सुरू असतानाच या विमानांच्या देखभाल, दुरुस्तीबरोबरच या
विमानांच्या आधुनिकीकरणाचीही सुविधा निर्माण करण्यात आली. वैमानिक आणि हवाई
दलाच्या सूचनांनुसारही या विमानात विविध बदल करण्यात आले. भारत आणि रशिया यांच्यात
झालेल्या करारानुसार, २५ वर्षात ८७४ मिग २१ लढाऊ विमाने हवाई दलात समाविष्ट
करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. यातील एकूण ६५७ मिग २१ विमानांचे उत्पादन
ओझर एचएएलमध्ये करण्यात आले. १९६४ ते १९९० या काळात हा करार पूर्ण झाला आणि मिग २१
चे उत्पादनही.
७०, ८० आणि ९० च्या दशकात भारतीय हवाई
दलामध्ये सर्वाधिक मिग २१ विमाने होती. सरावासह विविध कारणांसाठी याच विमानांचा
वापर केला जात होता. मात्र, या विमानांचे विविध कारणांमुळे अपघात होत असल्याचे
दिसून आले. यासंदर्भात या विमानांना ‘उडत्या
शवपेट्या’ असे नकारात्मक बिरुदही लावण्यात आले. याठिकाणी एक
लक्षात घेण्यासारखे होते की, भारताकडे मिग २१ विमानेच अधिक होते. त्यामुळे अन्य
विमानांच्या अपघातांच्या घटना घडत नव्हत्या. तसेच, पक्षी धडकण्यासह अन्य
कारणांमुळे हे अपघात होते. शिवाय या विमानात आजच्या सारखी अत्याधुनिक आणि संगणकीय
यंत्रणा नव्हती. त्यामुळे वैमानिकांची छोटीशी चुकही अपघातास कारणीभूत ठरत होती. प्रत्येक
अपघाताचा अहवाल तयार करुन त्यातील तथ्ये पडताळून पाहण्यात येत होती. त्यानुसार,
मिग २१ विमानांमध्ये बदल करण्याची कार्यवाही तेवढ्याच गतीने सुरू झाली. म्हणूनच जवळपास
मिग २१ मध्ये एकूण १०० बदल करण्यात आले. मिग २१ चे ७५, ७७, ९६ आणि बायसन अशा
आधुनिक आवृत्ती काढण्यात आल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे, सर्वप्रथम उत्पादित
झालेल्या मिग २१ विमानांचेही नंतर आधुनिकीकरण करण्यात आले आणि ते हवाई दलात समाविष्ट
झाले. इलेक्ट्रॉनिक्स आणि एरोनॉमिक्स तंत्रज्ञान वापरुन मिग २१ विमाने कालसुसंगत
करण्याला प्राधान्य दिले गेले. मिग २१ विमानांची क्षमता वाढवून देशाचे हवाई सुरक्षा
कवच अभेद्य करण्याचा प्रयत्न झाला. ओझर एचएएलच्या कारखान्यालगतच भारतीय हवाई दलाचे
देखभाल व दुरुस्ती केंद्र २९ एप्रिल १९७४ मध्ये सुरू करण्यात आले. त्यामुळे हे
केंद्र आणि ओझर एचएएल या दोन्ही ठिकाणी मिग २१ विमानांची देखभाल व दुरुस्ती
करण्यात येत होती.
१९६४ ते २०१७ अशी तब्बल ५३ वर्षे
रशियन अभियंते आणि तंत्रज्ञ ओझर एचएएलच्या परिसरात वास्तव्यास होते. त्यांची
शेवटची तुकडी २०१७ मध्ये रशियाला रवाना झाली. मिग आणि सुखोई विमानांचे संपूर्ण
उत्पादन सुरू असताना ओझरमध्ये तब्बल ३०० रशियन कुटुंबे वास्तव्यास होती. ही रशियन
कुटुंबे भारतीय संस्कृती आणि नाशिककरांशी मिळून मिसळून राहत होती. दर रविवारी या
कुटुंबांना घेऊन एचएएलची एक बस नाशिक शहरात येत असे. त्यावेळी ही कुटुंबे शहरातील
बाजारपेठांमध्ये खरेदीस प्राधान्य देत. याद्वारे नाशिक शहराच्या आर्थिक
चलनवलनालाही मोठा हातभार लागला. नाशिकहून परतताना रशियन कुटुंबातील मित्सकेव्ह
विस्चेस्लॅव म्हणाले होते की, ‘आम्ही साडेतीन वर्षे
ओझरमध्ये राहिलो. समोसा, तंदुरी आणि भारतीय भाजी आम्हाला
विशेष आवडत. येथील तिखट जेवणही आवडायचे. नाशिकचे हवामान खुप चांगले आहे. त्यामुळेच
आम्हाला इथे फरचे कपडे घालावी लागली नाहीत.’ विस्चेस्लॅव यांची
पत्नी लुईडमिला यांनी सांगितले की, ‘मी ओझरच्याच काही
कुटुंबांबरोबर योगा करायची. रशियन आणि भारतीय खाद्य पदार्थांची रेसिपीची
देवाणघेवाण आम्ही केली. स्विमिंग पूल, रिक्रीएशन हॉल या
सुविधा आम्हाला सुखावणाऱ्या होत्या. सुटीच्या दिवशी नाशिकच्या कॉलेजरोडला आम्ही
खरेदी करण्यासाठी यायचो. भारतीय नागरिक खुप शांत आणि मदत करणारे आहेत. आम्ही या
सर्व बाबी खुप मिस करू.’
एखाद्या देशाची हवाई सुरक्षा जवळपास
पाच दशके मिग २१ यासारख्या लढाऊ विमानांवर अवलंबून राहण्याचा इतिहासही घडला आहे. मिग
२१ नंतर भारताने रशियाशी पुन्हा करार केला. त्यामुळे मिग २१, मिग २७, मिग २९ आणि
सुखोई ही आधुनिक विमानेही भारतात उत्पादित झाली. भारतातील संरक्षण उत्पादन बाजारपेठ
तब्बल दीड लाख कोटी रुपयांवर जाऊन पोहचली आहे. अनेक देशांना भारत आता संरक्षण
उत्पादने निर्यात करतो आहे. आयात कमी करुन संरक्षण क्षेत्रात देशाला स्वावलंबी
बनवतानाच शस्त्रास्त्रांची निर्यात करून भारत अग्रेसर बनतो आहे. मात्र, या
साऱ्याची खरी पायाभरणी झाली ती ओझरमधील मिग २१ विमानांच्या उत्पादनामुळे असे ओझर
एचएएलचे सेवानिवृत्त महासंचालक पी व्ही देशमुख सांगतात. इतिहास घडविणारे आणि संरक्षण
क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला चालना देणारे मिग २१ खऱ्या अर्थाने भारतासाठी जायंट
होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
--
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र
संबंध अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
Please Follow me on :
WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
Facebook - www.facebook.com/BhaveshBrahmankar
X (Twitter)
- www.twitter.com/BhavBrahma
Instagram
- https://www.instagram.com/bhavbrahma
Blog
- https://bhavbrahma.blogspot.com/
--
Defence, Mig21, fighter, Aircraft, HAL, Nashik, Ojhar, Production, Ozar, Hindustan Aeronautics Limited, Supersonic, Jet, Air Force,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा