उत्तरेमुळे बिघडतेय चेन्नईची हवा! (सामना - उत्सव पुरवणी)

उत्तरेमुळे बिघडतेय चेन्नईची हवा!

राजकीय वैर आणि सत्ताधाऱ्यांमधील मतभेदांमुळे दिल्ली आणि चेन्नई यांचे नाते विळ्याभोपळ्याचे आहे. त्यामुळे उत्तर-दक्षिणेतील वाद नेहमीच चर्चेत असतात. त्यातच आता तर उत्तरेमुळे चेन्नईची हवा बिघडत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

भावेश ब्राह्मणकर

केंद्रातील भाजप सरकार आणि तामिळनाडूतील डीएमके सरकार यांच्यातील वाद बहुचर्चित आहे. राज्यपालांची भूमिका आणि वर्तन असो की प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश किंवा जीएसटीच्या थकीत रकमेचे वितरण अशा विविध पातळ्यांवर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात मतभेद आहेत. तमिळ अस्मिता विरुद्ध उत्तरेचे राजकारण असाही पदर त्यास जोडला जातो. गेल्या अनेक दशकांपासून उत्तर विरुद्ध दक्षिण असे चित्र रंगते आहे किंवा रंगविण्यात येते. त्यातही भारतीय जनता पक्षाकडून प्रादेशिक पक्षांना अडचणीत आणण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही डीएमके पक्षाकडून केला जातो. मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दाही असाच तापला. लोकसंख्यावाढीमुळे उत्तरेत खासदारांची संख्या अधिक होईल. मात्र, नियोजनामुळे दक्षिणेत लोकसंख्या स्थिर राहिल्याने तेथील खासदार तेवढेच राहतील. परिणामी, सत्तास्थापनेत उत्तरेतील खासदारांचा वरचष्मा राहील म्हणून तामिळनाडूने लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेला तीव्र आक्षेप घेतला आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने तामिळनाडूच्याच सी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. तर, विरोधातील इंडिया आघाडीने दक्षिणेतीलच बी सुदर्शन रेड्डी यांना रिंगणात उभे केले आहे. त्यामुळेही दक्षिणेचा आखाडा उत्तरेत रंगला आहे. उत्तर-दक्षिण वादाच्या अशा असंख्य बाबी सांगता येतील. त्यातच पुढील वर्षी तामिळनाडूत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. आणि अशातच एका संशोधन अहवालाने अनेकांची झोप उडविली आहे. पर्यावरणविषयक हा अहवाल सुद्धा उत्तर विरुद्ध दक्षिण वादाला वेगळीच फोडणी देणारा आहे.

आयआयटी चेन्नईमधील सिव्हिल इंजिनीअरींगचे प्राध्यापक डॉ. चंदन सारंगी आणि भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय मेहता यांनी अ‍ॅटमॉस्फेरिक केमिस्ट्री अँड फिजिक्स जर्नलमध्ये एक शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, उत्तर भारतात वाहनांसह विविध कारणांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे चेन्नईची हवा बिघडते आहे. यास कारणीभूत आहेत एरोसोल. हे म्हणजे सूक्ष्म तुषार किंवा धुक्यासारखा पदार्थ. उत्तर भारतात उत्सर्जित होणारे एरोसोल चक्रवाती वाऱ्यांच्या अभिसरणामुळे आग्नेय किनारा आणि बंगालच्या उपसागराकडे वाहून नेले जातात. खासकरून डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांच्या कालावधीत हा प्रकार घडतो. हे एरोसोल पृथ्वीच्या पृष्ठभागापासून चार ते पाच किमी उंचीपर्यंत वातावरणाच्या उष्ण रचनेत बदल घडवून आणतात. यामुळे चेन्नई आणि परिसरातील किनारी प्रदेशात पीएम २.५ या प्रदुषित घटकाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते.

डॉ. सारंगी आणि डॉ. मेहता यांनी या संशोधनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन २०१५ ते २०२४ अशा एकूण १० वर्षांच्या कालावधीतील माहिती आणि आकडेवारीचा सखोल अभ्यास केला आहे. चेन्नईच्या एसआरएम इन्स्टिट्यूटमधील लिडार सेन्सरद्वारे एरोसोलचा, रेडिओसोंडद्वारे तापमान, आर्द्रता आणि हवेचे वस्तूमान तर, अमेरिकन आणि वाणिज्य दूतावासात दर तासाला नियमितपणे घेतले जाणारे पीएम २.५चे आकडे अभ्यासात उपयुक्त ठरले आहेत. चेन्नईच्या हवेतील विविध घटकांचे प्रमाण तपासण्यात आले. त्यातील एरोसोलचा विशेष अभ्यास करण्यात आला. ज्या दिवशी उत्तर भारतातून वाहून नेले जाणारे एरोसोल आग्नेय किनाऱ्यावर पोहोचतात आणि ५ किमी उंचीपर्यंत पोहोचतात त्या दिवशी एरोसोलचे प्रमाण जास्त असते, तर इतर दिवसांत एरोसोल १.५ किमीपेक्षा कमी उंचीवर मर्यादित असतात. एरोसोल हे सूर्य किरण आणि जुने सेंद्रीय कार्बन शोषून घेतात तसेच काळा कार्बन साठवतात. एरोसोल पृष्ठभागावरील तापमानात घट घडवून आणतात तसेच ते आढळणाऱ्या उंचीभोवती जास्त तापमान वाढवतात. स्वच्छ दिवसात वातावरणातील एरोसोल पृष्ठभागावर थंडावा निर्माण करतात. परंतु या संशोधनात असे आढळून आले की, ज्या दिवशी उत्तर भारतातून वाहून नेले जाणारे एरोसोल पूर्व किनाऱ्यावर पोहोचतात त्या दिवशी पृष्ठभागावरील थंडावा प्रति चौरस मीटर २० ते ४० वॅट्सने वाढतो. डॉ. सारंगी म्हणतात की, जसे उंचीवर जावे तसे तापमान कमी होत जाते. परंतु एरोसोलच्या प्रादेशिक वाहतुकीमुळे गतिशीलता बदलते. ज्यामुळे वातावरण जास्त उंचीवर तुलनेने गरम होते आणि पृष्ठभागावर थंड होते. यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरणातील उष्णता यांच्यातील आदलाबदल कमकुवत होते. यातूनच संवहन प्रक्रियेत अडथळा येतो.

हवामान विभागाच्या कोलकाता, भुवनेश्वर, विजागपटम, चेन्नई आणि चेन्नईच्या दक्षिणेकडील शहर कराइकल येथील केंद्रात नोंद झालेला वरच्या हवेतील रेडिओसोंड मोजमापाचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला. कोलकाता, भुवनेश्वर आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये वाहून आलेल्या एरोसोलचा हवेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम हा विजागपटम आणि कराइकलसारख्या लहान शहरांपेक्षा जास्त आहे. कारण, महानगरांमध्ये स्थानिक प्रदूषणही असते. चेन्नईच्या बाबतीत, उत्तर भारतातून वाहून नेल्या जाणाऱ्या एरोसोलमुळे पीएम २.५ च्या प्रमाणात ५० टक्के पेक्षा जास्त वाढ होते, असे डॉ. मेहता सांगतात.

उत्तर भारतातून एरोसोलच्या वाहतुकीमुळे कोलकाता येथील तापमानात होणारी सापेक्ष वाढ ३०० मीटर उंचीपासून सुरू होते आणि २ किमीपर्यंत वाढते. भुवनेश्वर आणि विजागपटममध्ये ते ५०० मीटर उंचीपासून सुरू होते आणि २.५ किमीपर्यंत वाढते. चेन्नई आणि कराइकलच्या बाबतीत ते ५०० मीटर उंचीपासून सुरू होते आणि ३ किमीपर्यंत वाढते. कोलकाता ते चेन्नई आणि कराइकल येथे वाहून आलेल्या एरोसोलमुळे वातावरणातील तापमान वाढते. मात्र, ज्या दिवशी उत्तर भारतातून एरोसोलची वाहतूक होत नाही, त्या दिवशी कोलकाता, भुवनेश्वर आणि विजागपटमच्या बाबतीत मिश्रण थराची (मिक्सिंग लेयर) उंची १.५ किमी ते २ किमी दरम्यान असते. तर चेन्नई आणि कराइकलमध्ये २ किमी ते २.५ किमी दरम्यान असते. जी नंतर कोलकाता, भुवनेश्वर आणि विजागपटमसाठी ३००-४०० मीटर आणि चेन्नई आणि कराइकलसाठी ५०० मीटर ते १ किमी पर्यंत कमी होते.

उदाहरणार्थ २४ ते २७ जानेवारी २०१८ रोजीच्या नोंदी पाहता येतील. या दिवसांमध्ये उत्तर भारतातून चेन्नईला एरोसोलची वाहतूक झाली. तेव्हा स्वच्छ दिवसांच्या (२३ जानेवारी आणि २८-२९ जानेवारी) तुलनेत संशोधकांना असे आढळून आले की, १ किमी ते २.५ किमी उंचीच्या दरम्यान वाहून नेलेल्या एरोसोलची संख्या ५०-६० टक्के जास्त होते. आणि २४ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान ची उंची १.४ किमी वरून फक्त ३०० मीटर (७८ टक्के घट) पर्यंत कमी झाली. चेन्नई आणि कराइकल या दोन्ही ठिकाणी ३ किमी पर्यंत तापमानवाढ होते. यावरून असे सूचित होते की एरोसोलमुळे होणारे तापमानवाढ केवळ एरोसोलच्या उंचीवर तापमान वाढवत नाही तर पृष्ठभागाजवळील हवेच्या तापमानावर देखील परिणाम करू शकते.

डॉ. सारंगी सांगतात की, आमच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते की, चेन्नईमध्ये हवा गुणवत्तेच्या व्यवस्थापनात उत्तरेकडील एरोसोलच्या वाहतुकीचा विचार झाला पाहिजे. अशा प्रकारचे प्रादेशिक उत्सर्जन कमी करण्यासाठी धोरण आखणे आवश्यक आहे. विशेषतः उत्तर-दक्षिण प्रवाहाच्या तीव्र हंगामात ते अत्यंत गरजेचे आहे. अचूक हवेच्या गुणवत्तेच्या अंदाजासाठी एरोसोल-रेडिएशन परस्परसंवादाचा समावेश असलेल्या एकात्मिक मॉडेलिंग फ्रेमवर्कची आवश्यकता आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समोर आलेली ही तथ्ये आपण नक्कीच नाकारू शकत नाहीत. हवा, तापमान किंवा एरोसोल यांना मानवी भांडण किंवा मतभेद कळत नाहीत. मात्र, उत्तरेकडील प्रदूषित घटक थेट अग्नेय भागातील शहरांच्या हवा गुणवत्तेवर परिणाम करीत असल्याने वायू प्रदूषणाबाबत आपण खडबडूनच जागे व्हायला हवे. कारण, हवेला आकाशात कुठलीही मर्यादा नाही. त्यामुळे प्रदूषित घटक जर अशा प्रकारे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जात असतील तर त्याने अधिकचच जटील प्रश्न निर्माण होत आहे. आतापर्यंत आपण केवळ एखादा शहर किंवा त्याभोवतीच्या परिसरातून होणाऱ्या प्रदूषणाचा अभ्यास करीत होतो. किंबहुना तोच ग्राह्य धरत आहोत. आता मात्र, आपल्याला उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम असा सर्वंकष विचार करावा लागणार आहे. त्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम प्रज्ञा, उपग्रह अशा साऱ्यांचीच मदत घ्यावी लागेल. राजकीय आणि वैचारीक मतभेद बाजूला सारून किमान सर्वसामान्यांच्या जगण्याच्या हक्काचा विचार करायला हवा. वायू प्रदूषणाकडे एकांगी नाही तर अधिक चौकसपणे पहावे लागेल. तसेच, यासंदर्भात सर्वंकष असे धोरण आणि कृती आराखडा तयार केला तरच इथून पुढचा काळ सुसह्य असेल. अन्यथा सर्वसामान्यांच्या नशिबी प्रदूषित हवाच असेल!

--

bhavbrahma@gmail.com

पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार. मो. 9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

Please Follow me on :

WhatsApp Channel  - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

Facebook   - www.facebook.com/BhaveshBrahmankar

X (Twitter)  - www.twitter.com/BhavBrahma

Instagram   - https://www.instagram.com/bhavbrahma

Blog            - https://bhavbrahma.blogspot.com/

--

North India, Chennai, Air Pollution, Environment, Aerosol, Pollution, Climate, Weather, Tamilnadu, South, IIT, 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)