नृशंस हत्यांचा कळस अन बेदरकार नेतन्याहू (नवशक्ती)

नृशंस हत्यांचा कळस अन बेदरकार नेतन्याहू

गेल्या २३ महिन्यांपासून गाझा पट्टीत सुरू असलेला नरसंहार कल्पनेपलिकडचाच आहे. जगाच्या इतिहासात हिटलरचे क्रौर्य कुख्यात आहे. इस्राईलचे सर्वेसर्वा बेंजामिन नेतन्याहू यांनी आता त्यापुढची पायरी गाठून मानवतेलाच काळिमा फासली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण जग निपचितपणे याचे साक्षीदार बनत आहे.

भावेश ब्राह्मणकर

अन्नासाठी तडफडणारी लहान मुले... औषधांसाठी कासावीस झालेले रुग्ण... सत्य परिस्थिती जगाला दाखविण्यासाठी धडपडणारे पत्रकार... कुणीतरी सहाय्य करेल या आशेने आसुसलेले ज्येष्ठ नागरिक... अन्नाची पाकिटे शोधण्यासाठी भटकणाऱ्या गर्भवती महिला... औषधोपचाराच्या चिंतेत असलेले मधुमेह, रक्तदाब आणि दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण... भळभळती जखम घेऊन हिंडणारे जखमी... सैरावैरा धावणारे तरुण आणि प्रौढ... या साऱ्यांवर बेछूट गोळ्या झाडल्या जात आहेत किंवा बॉम्ब टाकून त्यांची निर्दयीपणे हत्या केली जात आहे. ही काही काल्पनिक किंवा इतिहासातील घटना नाही. गाझा पट्टीमध्ये दिवसाढवळ्या आणि बिनदिक्कतपणे हा सारा नंगानाच इस्राईलकडून सुरू आहे. याचे नेतृत्व करीत आहेत नृशंस हत्यांचे शिरोमणी बेंजामिन नेतन्याहू. गाझा पट्टीत निष्पाप नागरिकांचा बळी घेतला जात असला तरी जगभरात हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवण्यात येत आहे. गाझा पट्टीतील खरे चित्र जगासमोर येऊ नये म्हणून इस्त्राईलने २३ महिन्यात तब्बल २४० पत्रकारांचा जीव घेतला आहे. यात ख्यातनाम दैनिके, माध्यमे आणि वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. हे सारेच मन हेलावून टाकणारे आहे.

हमासने दहशतवादी हल्ला केला म्हणून गाझा पट्टीवर तुटून पडलेल्या इस्त्राईलने थोडीशीही उसंत घेतलेली नाही. नेतन्याहू यांनी लष्कराला संपूर्णपणे मोकळीक देत बेछूट हल्ला करण्याचे फर्मान सोडले आहे. म्हणूनच गाझा पट्टीत रणगाडे, गनमशिन्स, क्षेपणास्त्रे, बंदुका, तोफगोळे आदींनी जोरदार हल्ले केले जात आहेत. त्यामुळे गाझा पट्टी अक्षरशः नरक बनली आहे. निष्पाप नागरिकांचे आतोनात बळी जात आहेत. कुठलाही आंतरराष्ट्रीय नियम, कायदे, मानवता, मानवी हक्क किंवा दया-मया आदींना न जुमानता नेतन्याहू यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. युद्धग्रस्त गाझामध्ये अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. घरे, कार्यालये, दुकाने, सार्वजनिक ठिकाणे, रुग्णालये आदी उद्धवस्त झाली आहेत. निवारा आणि अन्नासाठी वणवण भटकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तसेच, कधी व कुठून अचानक हल्ला होईल आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे भेदरलेल्या अवस्थेतच गाझावासिय अक्षरशः दिवस-रात्र कुंठत आहेत. संयुक्त राष्ट्र किंवा जागतिक संघटनांद्वारे गाझा पट्टीत अन्नाची पाकिटे पुरविण्यात येत आहेत. ती घेण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर हल्ला करून त्यांचा जीव घेतला जात आहे. हृदय पिळवटून टाकणारे हे सारेच क्रौर्य तेथे बिनबोभाट घडते आहे. मात्र, क्रूरकर्मा नेतन्याहू यांना त्याचे काहीच सोयरसूतक नाही. त्यांचे निष्ठूर मन अजूनही शेकडो निष्पाप बळी घेण्यासाठी आसुसलेले आहे. 

संयुक्त राष्ट्राच्याच एका अहवालानुसार, गाझा पट्टीमध्ये अन्नावाचून तब्बल ५ लाखाहून अधिक नागरिक, लहान मुले, स्त्रिया, वृद्ध अक्षरशः तडफडत आहेत. कुपोषण आणि हल्ल्यांमुळे जवळपास ५० हजार निष्पाप चिमुरड्यांचा बळी गेला आहे. कुणी कल्पनाही करणार नाही अशी भयावह स्थिती गाझावासियांच्या वाट्याला आली आहे. इस्राईल सेना आणि सत्ताधारी सरकार संवेदनाहीन बनले आहे. इस्राईलच्या जनतेमध्ये मात्र असंतोष आहे. नेतन्याहू यांची खुर्ची डळमळीत आहे. ज्या पद्धतीने ते नरसंहार घडवून आणत आहे ते पाहून जगभरात अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत. अनेकानेक संघटनांनी जाहीर निषेध नोंदवत नेतन्याहू यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, ही कारवाई कोण आणि कशी करणार? जगात दोन देशांचा वरचष्मा आहे. एक म्हणजे अमेरिका आणि दुसरा म्हणजे रशिया. युक्रेनसोबतच्या युद्ध आणि निर्बंधांमुळे रशिया जायबंदी झाला आहे. तर अमेरिका उघडपणे इस्राईलला पाठिंबा देत आहे. बेताल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे डोळ्यावर पट्टी बांधून नेतन्याहू यांना कड्यावर बसवित आहेत. रशिया-युक्रेन युद्धात निष्पाप जनता भरडून अनेकांचे बळी जात असल्याचे सांगत ट्रम्प यांनी रशियावर निर्बंध लादले. रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून भारतीय मालावर ५० टक्के आयातशुल्क आकारले आहे. इतका युक्रेनवासियांचा कळवळा येणाऱ्या ट्रम्प यांना मात्र गाझामधील नरसंहार दिसत नाही, हे विशेष. जगातील राष्ट्रांचे पालकत्व सांभाळणारी संयुक्त राष्ट्रासारखी संस्था पंगु बनली आहे. अमेरिकेच्या हातचे बाहुले बनून ही संस्था गपगुमान सारे पाहत आहे. चीनसारख्या बलाढ्य देशानेही गाझाबद्दल आक्रमक भूमिका घेतलेली नाही. युरोपिय देश हे रशिया-युक्रेन युद्धाने चिंतीत आहेत. आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या रशियाला रोखायचे कसे याच विवंचनेत ते आहेत. खास म्हणजे, नाटो संघटनेचे कवच युरोपीय देशांना आहे तरीही त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे इस्राईलचे फावते आहे. नेतन्याहू मोकाट सुटले असून गाझातील जणू शेवटच्या व्यक्तीची हत्या केल्यावरच ते थांबणार आहेत अशी भीती व्यक्त केली जात आहे.

इस्राईल-गाझा संघर्षात भारताने नरो वा कुंजरोवा अशी भूमिका घेतली आहे. अहिंसेचे पुजारी आणि मार्गदर्शक महात्मा गांधी हे भारताचे राष्ट्रपिता आहेत. आणि त्यांच्याच बलिदानामुळे स्वतंत्र झालेला भारत देश मात्र डोळे, कान व तोंड बंद करून सारे काही पाहत आहे. ना भारताने गाझातील हत्यांचा निषेध केला, ना नाराजी व्यक्त केली की निवेदन काढले. विश्वगुरू, विश्वबंधू, विश्वमित्र अशा बिरुदांनी वलयांकित भारताला हे शोभा देणारे नक्कीच नाही. मात्र भूराजकीय आणि भूसामरिकदृष्ट्या भारताने अशी भूमिका घेतल्याचे बोलले जाते. आपल्याविरोधात बोलणारे कुणीच नाही हे पाहून नेतन्याहू यांची छाती जणू छप्पन्न इंचांची झाली आहे. त्यामुळेच त्यांच्या सेनेने काही दिवसांपूर्वी थेट रुग्णालयावर जबर हल्ला केला. यात जगविख्यात वृत्तसंस्था रॉयटर्सचा प्रतिनिधी ठार झाला. कुठल्याही परदेशी पत्रकाराला गाझा किंवा इस्राईलमध्ये येण्यास नेतन्याहू यांनी मज्जाव केला आहे. तर, जे पत्रकार गाझात आहेत त्यांचा खात्मा करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. रॉयटर्स आणि असोसिएटेड प्रेस या वृत्त संस्थांच्या प्रमुखांनी नेतन्याहू यांना पत्र पाठवून पत्रकारांचा आवाज दाबणे थांबवावे, अशी आग्रही मागणी केली आहे. अर्थात नेतन्याहू सध्या कुणालाही भीक घालण्याच्या मनस्थितीत नाहीत. ज्या वारूवर ते आरूढ झाले आहे ते मस्तवालपणा आणि क्रौर्याचा आनंद घेणारे आहे.

गाझाचा संपूर्ण ताबा इस्राईलची सेना घेईल. हमासला पूर्णपणे नेस्तनाबूत करून तेथे सक्षम सरकार आरूढ केले जाईल. तोपर्यंत इस्राईल गाझाची योग्य ती काळजी घेईल’, अशा प्रकारची वक्तव्ये नेतन्याहू यांच्याकडून केली जात आहेत. तर, बिल्डर आणि व्यावसायिक असलेले ट्रम्प म्हणतात की, गाझा खाली करून टाकू. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन शहर साकारू. अशा प्रकारची अक्कल पाजळण्यात दोन्ही नेते मश्गुल आहेत. हे सारे ऐकून, पाहून गाझावासियांचा जीव तीळ तीळ तुटतो आहे. आपल्याच भूमीवर राहणाऱ्या गाझावासियांना अशा प्रकारे देशोधडीला लावणे आणि तेथे बिनबोभाट नरसंहार घडवून आणणे हे आजच्या आधुनिक युगाला शोभणारे नाही. मात्र, ज्यांची मतीच कुंठीत झाली आहे त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय करणार?

जगाच्या इतिहासात मात्र गाझातील हे अनन्वित हत्याकांड ठळकपणे नमूद केले जाईल. माथेफिरू आणि क्रूरकर्मा नेत्यांचा शेवट आजवर कसा झाला हे इतिहास सांगतो. मात्र, नेतन्याहू यांना तो पाहण्यास यत्किंचीतही वेळ नाही. त्यांना फक्त आणि फक्त गाझा दिसतो आहे. १९३हून अधिक देश, तेथील सत्ताधारी, राजकीय नेते, जनता आणि बहुविध स्वयंसेवी संघटना यांना कुणालाच ना गाझा दिसतो आहे, ना तेथील नागरिकांचे भीषण हाल, ना हत्या, ना नेतन्याहूंचा मस्तवालपणा, ना मानवता. सारेच कसे सुन्न सुन्न आहे.

--

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध अभ्यासक आणि मुक्त पत्रकार. मो. 9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

Please Follow me on :

WhatsApp Channel  - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

Facebook   - www.facebook.com/BhaveshBrahmankar

X (Twitter)  - www.twitter.com/BhavBrahma

Instagram   - https://www.instagram.com/bhavbrahma

--

Israel, Gaza, Conflict, Murder, Middle East, West Asia, War, Benjamin Netanyahu, Strike, Attack, Hamas, 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)