बरं झालं मुनीर अण्वस्त्रांबद्दल बोलले! (नवशक्ती)
बरं झालं मुनीर अण्वस्त्रांबद्दल बोलले!
पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी अमेरिकेत अण्वस्त्रांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. यानिमित्ताने पाकची विचारधारा आणि आगामी काळातील रणनिती स्पष्ट झाली आहे. शिवाय भारताला नामी संधीही चालून आली आहे.
भावेश ब्राह्मणकर
जहाल वक्तव्य आणि कट्टर प्रतिमा असलेले
पाक लष्कर प्रमुख असीफ मुनीर सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. महिन्याभरातच ते दुसऱ्यांदा
तेथे गेले आहेत. गेल्या वेळी अमेरिकन अध्यक्षांसोबत त्यांनी जेवण घेतले. आता ते
विविध ठिकाणी भेटीगाठी घेत आहेत. अमेरिकेतील पाक समुदायासोबत मुनीर यांनी संवाद
साधला. त्यात त्यांनी अनेक मुक्ताफळे उधळळी आहेत. ‘आमच्याकडे
अण्वस्त्रे आहेत आणि संरक्षणासाठी त्याचा आम्ही बिनधास्त वापर करू. पाकिस्तानवर आपत्ती
आली तर अर्ध्या जगाला घेऊन आम्ही बुडू’ हे त्यापैकीच आहे. त्यांचे
दुसरे वक्तव्य असे की, ‘गुजरातच्या जामनगरमध्ये अंबानींच्या
रिलायन्सचा जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. जर, भारताने पुन्हा पाकिस्तानवर
हल्ला केला तर पाकिस्तान सर्वप्रथम जामनगरच्या प्रकल्पाला लक्ष्य करेल.’ त्यांच्या या वक्तव्यावरुन भारतात अतिशय तिखट प्रतिक्रीया उमटत आहेत. मात्र,
व्यापक आणि अनेकर्थाने मुनीर यांच्या वक्तव्यांकडे पहायला हवे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तत्काळ निवेदन
प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘अमेरिकेच्या
दौऱ्यावर असताना पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी केलेल्या वक्तव्यांकडे आमचे लक्ष
वेधले गेले आहे. अण्वस्त्रांचा वापर हा पाकिस्तानचा व्यापारातील एक महत्त्वाचा भाग
आहे. अशा वक्तव्यांमध्ये अंतर्निहित बेजबाबदारपणा आहे. यावर आंतरराष्ट्रीय समुदाय
स्वतःचे निष्कर्ष काढू शकतो. ज्यामुळे दहशतवादी गटांशी लष्कराचे सहकार्य असलेल्या देशात
अण्वस्त्र कमांड आणि नियंत्रणाच्या अखंडतेबद्दलच्या सुप्रसिद्ध शंकांना बळकटी
मिळते. हे वक्तव्य एका मैत्रीपूर्ण तिसऱ्या देशाच्या भूमीवरून करणे हे देखील
खेदजनक आहे. भारताने आधीच स्पष्ट केले आहे की आम्ही अण्वस्त्र ब्लॅकमेलिंगला बळी
पडणार नाही. आम्ही आमच्या राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली
सर्व पावले उचलत राहू.’
असे म्हटले जाते की, लवकरच मुनीर हे
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. त्यासाठी सध्याचे राष्ट्राध्यक्ष असीफ अली
झरदारी यांना पदच्युत करून ते खुर्ची बळकावतील. याद्वारे ते पाकची सर्व सत्ता हाती
घेतील. पंतप्रधान केवळ नाममात्र राहतील. आणि अशातच मुनीर यांनी ही वक्तव्ये केली
आहेत. त्यांची कार्यशैली आणि विचारधारा लक्षात घेता ते काहीही बरळलेले नाहीत. जे
बोलले ते मनापासून. यातून त्यांची आगामी काळातील ध्येयधोरणे स्पष्ट होत आहेत. जे
भारतासाठी महत्वाचे आहे. कारण, पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करेल, हे त्यांनी
निक्षून सांगितल्याने भारतालाही यापुढे तसेच उत्तर द्यायचे की आणखी कशा पद्धतीने
ते निश्चित करता येईल. म्हणजेच, भारताचे आगामी डावपेच आखण्यासाठी मुनीर यांनी चाल
दिली आहे. ते एकप्रकारे चांगलेच झाले. जामगर प्रकल्पाची सुरक्षा भरभक्कम
करण्यासाठी भारत आता सर्वंकष पावले उचलेल. तसेच, यापुढे भारतही द्विधा मनस्थितीत
राहणार नाही. शत्रूचे उद्देश कळाले तर आपल्यालाही योग्य डावपेच टाकता येतात आणि
विजय पदरात पाडता येतो.
ऑपरेशन सिंदूर असो किंवा इतिहासातील
कुठलेही युद्ध प्रत्येक वेळी अमेरिकेने पाकला मदत केली आहे. त्याच्या पाठी खंबीरपणे
उभा राहिला आहे. अमेरिका-पाक हे मित्र आहेत किंवा पाक हा अमेरिकेचा गुलाम. काहीही
असो पण अमेरिका त्याच्या मदतीला धावून जाते. याच अमेरिकेवर भीषण दहशतवादी हल्ला
करणाऱ्या ओसामा बिन लादेनचा खात्मा झाला खरा पण त्याला आश्रय देणारा पाकिस्तानच
होता. यातून अमेरिकेने योग्य तो धडा घेतलाच नाही. असो. आता पाक लष्कर प्रमुखाने
थेट अमेरिकन भूमीवरुनच अण्वस्त्रांची वल्गना केली आहे. अर्ध्या जगाला नष्ट करण्याची
भाषा वापरुन मुनीर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला सहकार्यच केले आहे. यानिमित्ताने
संपूर्ण जगाला कळले की महासत्ता आणि बलाढ्य लोकशाही असलेली अमेरिका ज्या पाकला
नेहमी कडेवर उचलून घेते त्या देशाचे धोरण काय आहे. अण्वस्त्रांद्वारे अर्ध्या
जगाला नष्ट करायचे तर त्यात अमेरिकेचेही नुकसान होणारच. ज्या अमेरिकेने जगात
सर्वप्रथम अण्वस्त्रांचा वापर केला त्याच अमेरिकेलाही मुनीर यांनी एकप्रकारे धमकी
दिली आहे. शांततेचे नोबेल मिळावे म्हणून डोनाल्ड ट्रम्प आटोकाट प्रयत्न करीत आहेत.
आणि आता त्यांच्याच भूमीत आणि त्यांनीच लाडवलेला मुनीर अण्वस्त्रांचा धाक दाखवतो
यातून जगभरात अनेकानेक संदेश गेले आहेत. केवळ भारत नाही तर अनेक देशांच्या
सुरक्षेवर घाला घालण्याचा मनसुबा बाळगणाऱ्या पाकचा खरा चेहरा यानिमित्ताने उघड
झाला आहे.
जगभरात केवळ ९ ते १० राष्ट्रांकडेच
अण्वस्त्रे असल्याचे सांगितले जाते. त्यात पाकिस्तान एक आहे. अण्वस्त्रे ही अतिशय
घातक असल्याने त्याच्या निर्मितीला आळा घालण्याचे धोरण अमेरिकेने अनेक दशकांपासून
हाती घेतले आहे. भारताने अण्वस्त्र चाचणी करू नये यासाठी वारंवार अमेरिकेने
प्रयत्न केले. धाक दाखविला. पण भारताने शांततेसाठी करून दाखविले. अमेरिकेने निर्बंधांचे
अस्त्र वापरुन भारताला घायाळ केले. पण भारत नमला नाही. आणि आता पाक जागतिक
शांततेच्या चिंधड्या उडवून संपूर्ण जगाला अण्वस्त्रांद्वारे वेठीस धरू शकतो, हे
स्पष्ट झाले आहे. यानिमित्ताने अमेरिकेचीही आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा मलिन
झाली आहे. ज्या पाकच्या मदतीला अमेरिका धावून जातो तो देश किती विघातक विचारधारा
बाळगून आहे हा संदेश जगभर गेला आहे. सर्वात हास्यास्पद बाब म्हणजे, पाक सध्या संयुक्त
राष्ट्र सुरक्षा परिषदेचा यंदा अस्थायी सदस्य आहे. याच परिषदेच्या तालिबान
प्रतिबंधक समितीचा तो अध्यक्ष आहे. आणि याच परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीचा
उपाध्यक्षही. आंतरराष्ट्रीय मंचावर अशा महत्वपूर्ण जबाबदाऱ्या देण्यात आलेला देश
किती बेफिकीर आणि दहशतवाद्यांची भाषा बोलणारा आहे हे सुद्धा स्पष्ट होते.
पाकिस्तानने आजवर दहशतवाद्यांना पोसले
आहे. भारत वारंवार याबाबत बोलतो आणि त्यासंदर्भातील पुरावे आंतरराष्ट्रीय पातळीवर
मांडतो. मात्र अमेरिका पाकची नेहमी पाठराखण करत असल्याने भारताला फारसे यश येत
नाही. आता मात्र मुनीर यांनी अण्वस्त्रांची वक्तव्ये करून पाकची प्रतिमा जगासमोर
तर मांडलीच आहे पण जी अमेरिका नेहमी त्यांना मदतीचा हात देते त्यांचीही चांगलीच
जिरवली आहे. आपण सापाला दूध पाजत आहोत याची जाणिव अजूनही अमेरिकेला झालेली नाही.
लादेनच्यावेळी ती होणे आवश्यक होते. आता मुनीर यांनी अमेरिकेतच छातीठोकपणे बरळून
अमेरिकेला संधी दिली आहे. अर्थात ती सुद्धा वायाच जाणार आहे. पण पाक आणि अमेरिका
यांच्याविरोधात अनेक देश एकत्र येण्याची शक्यताही त्यामुळे बळावली आहे. ही बाब भारताच्या
फायद्याची आहे. नजिकच्या काळात मुनीर अध्यक्ष झाले आणि त्यांनी सर्व सूत्रे हाती घेतली
तर अनेक देश तातडीने एकवटतील. भारताने आता या संधीचा फायदा घ्यायला हवा. त्यामुळे
आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकचा बुरखा टराटरा फाटतानाच अमेरिकेची प्रतिमाही मलिन
होणार आहे. गेल्या अनेक दशकात भारताला पाकविरुद्ध इतकी चांगली चाल खेळायला मिळाली
नाही. तिचे सोने करण्याची वेळ आली आहे. त्यादृष्टीने भारत सरकार काय करते यावरच
सारा डोलारा अवलंबून आहे.
--
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र
संबंध अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
माझे WhatsApp चॅनल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
--
Pakistan, USA, Nuclear, India, Field Marshal Syed Asim Munir, sabre rattling, America, Blackmailing,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा